महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

गोवा इन्क्विझिशन आणि शिवाजी महाराज

By Discover Maharashtra Views: 1486 7 Min Read

गोवा इन्क्विझिशन आणि शिवाजी महाराज –

इ.स.वी. १४९८ मध्ये वास्को द गामा कालिकतला भारतात पहिल्यांदा आला. पुढच्या फेरीत पोर्तुगीज सशस्त्र सेना घेऊन भारतात वसाहत तयार करायला आले. १५१५ पर्यंत पोर्तुगीजांनी गोव्यावर पूर्ण ताबा मिळवला. पोर्तुगीजांच्या राज्यकारभारावर रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचा प्रचंड पगडा होता. त्यामुळे त्यांच्या कायदे आणि नियमांवरसुद्धा ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता. यातील जेसुइट पाद्री हे अत्यंत कडवे धर्मांध मानले जातात. अखेर १५४२ ला या समस्त पाद्रयांनी मिळून पुर्तुगालमध्ये ‘इन्क्विझिशन’ चे नियम राबवले. आणि पुढे १५६० ला हे ‘इन्क्विझिशन’ आफ्रिकेच्या पूर्वेला पोर्तुगालच्या समस्त वसाहतींमध्ये राबवण्यात आलं. म्हणजेच ते गोव्यातसुद्धा राबवण्यात आलं.

हा लेख व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

हे ‘इन्क्विझिशन’ म्हणजे नक्की काय असतं? तर ‘इन्क्विझिशन’ म्हणजे नवीन ‘धर्मांतर’ झालेल्या ख्रिश्चनांनी धर्म पाळावा म्हणून, किंवा ख्रिश्चन धर्माविरुद्ध वक्तव्य आणि कृती करणाऱ्या ख्रिश्चन आणि इन्फेडाईल्स ना शिक्षा देतां यावी म्हणून केलेले अत्यंत क्रूर नियम. ज्याप्रमाणे इस्लाममध्ये इस्लाम न मानणाऱ्या लोकांना काफिर म्हटलं जातं तस ख्रिश्चन धर्माला न मानणाऱ्यांना इन्फेडाईल्स म्हटलं जातं. या ‘इन्क्विझिशन’ मध्ये धर्मांतर करणं, धर्मांतराला बाधा करणाऱ्यांना शिक्षा करणं, इन्फेडाईल्स ना कमीत कमी अधिकार देणं, त्यांच्याकडून टॅक्स आणि दंड अकारण, ख्रिश्चन धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांना जास्तीत जास्त आणि क्रूर शिक्षा करणं असे बरेच नियम होते. यातली काही नियमांची उदाहरणं आम्ही खाली देत आहोत.

१. हिंदू पद्धतीने विवाह घराच्या आत करता येईल किंवा गोव्याच्या बाहेर जाऊन करावा लागेल म्हणजेच गोव्यात उघडपणे करता येणार नाही.

२. कोणत्याही ब्राह्मणाला आणि इतर हिंदू माणसाला पोर्तुगीज सरकारच्या कोणत्याच पदावर नोकरी देण्यात येणार नाही.

३. अनाथ मुलं सापडल्यास त्यांना ख्रिश्चन करणं अनिवार्य आहे.

४. हिंदूंना शेंडी ठेवायला घोड्यावरून, पालखीतून प्रवास करायला बंदी होती.

५. पाद्रीने हिंदूंना त्यांचे सण साजरे करण्यापासून थांबवणं हे त्याच्या मुख्य कामांपैकी एक होतं.

आम्ही हे फक्त काही नियम दिले आहेत. या नियमांच पालन न करणार्यावर खटला चालवला जात असे. गुन्हा सिद्ध झाला की अत्यंत क्रूर शिक्षा दिल्या जात. तेलात बुडवलेला अंगरखा घालून पेटवून देणं, माणसाचे अवयव तोडणं, चटके देणं असे शिक्षांचे बरेच अमानुष प्रकार होते. जर माणसाचा गुन्हा सिद्द करता येत नसेल तर त्याला ‘चेंबर ऑफ टॉर्चरमध्ये’ नेऊन त्याच्यावर अतिशय क्रूर अत्याचार करण्याचा हक्क या इन्क्विझिशनरना होता. हे अत्याचार इतके क्रूर आणि जीवघेणे असत कि यापेक्षा गुन्हा कबूल करून मरणं आरोपी स्वीकारत असत. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला प्रसंगातला ‘राम’ हा माणूस जरी काल्पनिक असला तरी ज्या अश्या इन्फेडाईल्सना म्हणजे हिंदू अथवा मुसलमानांना शिक्षा देता येत नसत, त्यांना मुद्दाम तुरुंगात डांबून त्यांच्या धर्मात निषिद्ध असलेले पदार्थ त्यांना जबरदस्तीने खाऊ घालत ज्यामुळे पुढे या इन्फेडाईल्सचे नातेवाईक त्यांना स्वधर्मात घेत नसत म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याशिवाय त्यांच्यासमोर अन्य काहीच पर्याय उरत नसे. हे आणि असे बरेच अत्याचार ए के प्रिओलकरांच्या ‘द गोवा इन्क्विझिशन’ या पुस्तकात दिलेले आहेत. त्या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.

१६६७ मध्ये म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्यानंतर एक वर्षांनी त्यांनी गोव्यातल्या नाईकांना अद्दल घडवण्यासाठी एक मोहीम काढली. हे नाईक खंडणी देऊ असं मान्य करत आणि खंडणी भरायची वेळ आली की पोर्तुगीजांकडे पळून जात आणि हे दीडशहाणे पोर्तुगीज त्यांना आश्रय देत. त्यामुळे या नायकांना म्हणजे काही अधिकाऱ्यांना आणि पर्यायाने पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी ही मोहीम काढली होती. बरं या मोहिमेचं अजून एक कारण होत. १६६७ मध्ये गोव्याच्या विजरईने म्हणजे व्हाइसरॉय काऊंट अॅाफ सेंटविंसेंट ने एक नवीन नियम काढला. गोव्याचे तीन भाग आहेत बार्देश, साष्टी आणि तिसवाडी या काऊंट ऑफ सेंटविंसेंट ने नियम काढला की बार्देशात फक्त रोमन कॅथलिक ख्रिश्चनच राहू शकतील. बाकीच्यांना एक महिन्याचा अवधी देण्यात आला. याचाच अर्थ ज्यांना बार्देशात राहायचं असेल आणि ते ख्रिश्चन नसतील तर त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल किंवा आपला धर्म सोडायचा नसेल तर आपली बार्देशातली मालमत्ता सोडून बारदेशाबाहेर निघून जावं. दोन्हीही मार्गाने पोर्तुगीजांचाच फायदा.

शिवाजी महाराजांना ही बातमी कळली. महाराजांना गोवा इन्क्विझिशन च्या अंतर्गत आपल्या मराठी, हिंदू बांधवांवर केले जाणारे अत्याचारसुद्धा वेळोवेळी कळत होते. यावर तोडगा काढण्यासाठी महाराजांनी आपल्या फौजेसह बार्देशावर हल्ला केला. त्या गावातल्या सगळ्या लोकांना तर बोलावलच पण खासकरून त्या गावातल्या चर्चमधल्या पाद्रयांना पकडून आणायला सांगितलं. हे पकडून आणलेले ४ पादरी जेसुइट म्हणजे कट्टर ख्रिश्चन पाद्री होते. त्यांना पकडून आणताच महाराजांनी आपल्या दुभाष्याला त्या पाद्रयांना एक संदेश द्यायला सांगितला. तो संदेश होता “तुम्ही (म्हणजे ते ४ पाद्री) आता हिंदुभूमीवर उभे आहात, जर या भूमीवर राहायचं असेल तर तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा”. हा संदेश ऐकून त्या जेसुइट पाद्रयांनी हिंदू धर्म स्वीकारायला नकार दिला. त्यांचा नकार कळताच महाराज म्हणाले की हे आमचा धर्म स्वीकारायला तयार नाही म्हणतात पण आमच्या लोकांनी यांचा धर्म स्वीकारावा यासाठी हे जबरदस्ती तर करतातच पण नवनवीन नियमही बनवतात. महाराजांनी या चारही पाद्रयांची गर्दन मारायचा आणि त्यांची मस्तकं गोव्याच्या वीजरईकडे पाठवायचा हुकूम दिला. महाराजांचा हुकूम लगेच आमलात आणला गेला. गोव्याच्या विजरईला पाद्रयांची मस्तकं पाहून योग्य तो संदेश मिळाला. दुसऱ्या दिवशी विजरईने आपला नियम मागे घेतला.

नोव्हेंबर १६७५ मध्येही इंग्रजांच्या एका पत्रात उल्लेख आहे की शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांमध्ये सतत लढाया होत आहेत. याच मूळ कारण पोर्तुगीज त्यांच्या म्हणजे महाराजांच्या धर्माच्या म्हणजेच हिंदू धर्माच्या अनाथ मुलांना जबरदस्ती ख्रिश्चन करत आहेत.

मुसलमानी आक्रमणांमुळे, गोव्यातल्या धर्मांध पोर्तुगीजांमुळे कित्येक हिंदूंना अत्याचार सहन करावे लागले, त्यांचा धर्म सोडावा लागला कधी बळजबरी केल्यामुळे तर कधी नाईलाज म्हणून. पण महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केलं होतं. या राज्यात सगळ्यांना सारखा न्याय मिळत होता, योग्य वागणूक मिळत होती, स्वैराचाराला आळा घालून योग्य ते नियम महाराजांनी राबवले होते. हे सर्व करताना महाराजांनी दुसऱ्या धर्मियांचा जाणून बुजून अपमान नाही केला पण स्वधर्माचाही अपमान कधी होऊ नाही दिला. महाराजांच्या हिंदू धर्माभिमानाची साक्ष देणारी हि घटना काळाच्या ओघात हरवून गेली होती. ती आज तुमच्यासमोर मांडायचा आमचा उद्देश होता. अशा करतो आज तुम्हाला नक्कीच काही नवीन माहिती मिळाली असेल. धन्यवाद.

संदर्भ:

१. पत्रसारसंग्रह
२. The Goa Inquisition: A K Priolkar

Suyog Sadanand Shembekar

Leave a comment