गोवा किल्ला | Goa Fort

गोवा किल्ला | Goa Fort

गोवा किल्ला | Goa Fort

हर्णे बंदराजवळ सुवर्णगडाचे रक्षण करण्यासाठी जी दुर्गत्रयी बांधली आहे त्यापैकी एक गोवा किल्ला. इतर दोन किल्ले कनकदूर्ग व फत्तेगड यांच्यापेक्षा हा किल्ला विस्ताराने बराच मोठा आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गोवा नावाचे एक राज्य आहे पण नावातील साम्य सोडल्यास ह्या दोघांमधे काही संबंध नाही. सदयस्थितीत समुद्राकडील बाजूची ढासळलेली तटबंदी सोडली तर चांगल्या अवस्थेत उभा आहे.

साधारण सव्वातीन हेक्टरात बांधलेला हा किल्ला समुद्राने तीन बाजूंनी वेढलेला आहे किल्ल्याला जमिनीच्या दिशेने एक व समुद्राच्या दिशेने एक असे दोन दरवाजे आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा समुद्राकडील बाजूस असून तो दगडांनी बंद केलेला आहे. मुख्य दरवाच्याबाहेर उजव्या हाताला मारुतीची मूर्ती पाहता येते. दरवाज्याच्या खाली शरभाचे एक शिल्प आहे. डाव्या हातास दरवाजावर गंडभेरुड व त्याने पायात पकडलेले चार हत्ती असे शिल्प आहे. दरवाज्याच्या डाव्या बाजूस असलेल्या दुर्मिळ शिल्पात ३ कुत्र्यांनी एकमेकांचे गळे आपापल्या जबड्यात पकडले आहेत व पायात प्रत्येकी दोन हत्ती पकडले आहेत. हत्तींनी आपापल्या सोंडांनी दुसर्‍या हत्तींच्या शेपट्या पकडल्या आहेत.

किल्ल्यात एक साच पाण्याचे टाक आहे. दक्षिणेच्या बाजूला नैसर्गिक उंची मिळाल्याने किल्ला बाहेरील बाजूने साधारण १० मीटर उंचावला आहे. आतल्या बाजूला हा भाग आणखी एका तटाने वेगळा पाडून त्याला बालेकिल्ला बनविले आहे. पायऱ्यांनी आपल्याला ह्या बालेकिल्ल्यात जाता येते व तिथेही काही अवशेष नजरेस पडतात. गडाच्या खालच्या भागात पाण्याचा मोठा साठा दिसतो पण आता त्यात पाणी दिसत नाही. त्याच्या बाजूलाच युरोपीय वाटणारे एक बांधकाम दिसते. कलेक्टर निवासाचा व आणखी एका वसतीगृहाचा संदर्भ काही साधनांमधे आपल्याला सापडतो पण ते नेमके ओळखता येत नाहीत. मुख्य दरवाज्याला लागून असलेला शिबंदीच्या खोल्या अजून चांगल्या अवस्थेत आहेत.तटाला असलेल्या पायर्‍यांनी तटावर चढून तटफेरी मारता येते.सन १८६२ मधल्या एका साधनात हा किल्ला चांगल्या स्थितीत असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी त्यात ६९ तोफा व १९ सैनिक तैनात होते. सध्या इथे एकही तोफ वा पर्यटक दिसत नाही.हा किल्ला कोणी बांधला ते अजूनही इतिहासाला ज्ञात नाही.पण दरवाजावरील शिल्प किल्ल्याचे प्राचीनत्व दाखवुन देते.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here