घारापुरी लेणी

By Discover Maharashtra Views: 6777 28 Min Read

घारापुरी लेणी…

घारापुरी लेणी मुंबई पासून १६ कि.मी. अंतरावर असलेल्या घारापुरीच्या बेटावर आहेत. घारापुरी हे बेट एलिफंटा या नावानेही ओळखलं जातं. इ.स.१५३४ च्या सुमारास भारतात आलेले पोर्तुगीज राजबंदरला आले असता त्यांनी या लेण्यांच्या परिसरात हत्तीचं दगडी शिल्प पाहिलं. त्या शिल्पावरुन तेव्हापासून या बेटाला ‘एलिफंटा’ नाव पडलं आणि इथल्या लेण्यांचा उल्लेख ‘एलिफंटा केव्हज’ असा करण्यात आला. हे शिल्प सध्या मुंबईच्या जिजामाता उद्यानात आहे. बेटावर एकूण ७ लेण्या असुन ५ शैव लेणी आणि २ बौद्ध लेणी आहेत. पाच शैवलेणी पश्चिम टेकडीवर तर दोन बौद्धलेणी या पूर्वेकडील टेकडीवर आहेत.

१९८७ साली या लेण्यांना जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला आहे. ही लेणी कोणी खोदली, यासंबंधी निश्चित माहिती नाही किंवा त्यासंबंधी एकही पुरावा वा लेख येथील लेण्यांत उपलब्ध झाला नाही. घारापुरी बेटावर एक शिलालेख होता पण तो वाचता न आल्याने पोर्तुगीजांनी तो पोर्तुगालला पाठवला व नंतर तो गहाळ झाला त्यामुळे ह्या लेण्यांचा निर्माता कोण हे आजही ठामपणे माहित नाही. शिल्पाकृती, त्यांची घडण, पेहराव वगैरेंवरून पुरातत्त्ववेत्त्यांनी ही लेणी सुमारे ८-९ शतकांत खोदलेली राष्ट्रकूटांची असावीत असे अनुमान काढले आहे. येथील मुर्तीचे गुप्त व शक काळातील मुर्तींशी साम्य असल्यामुळे चालुक्य राजा दुसरा पुलकेशीने हर्षवर्धनाच्या पराभवानंतर ही लेणी खोदली असे काहींचे म्हणणे आहे. शिल्पांशिवाय येथील भिंतींवर व छतांवरही चित्रे व रंगीत नक्षीकाम होते. येथील वास्तूच्या एकूण अवशेषांवरून सहाव्या ते नवव्या शतकांतील कोकणात राज्य करणाऱ्या मौर्य अथवा शिलाहार राजांची मंगळपुरी नामक राजधानी म्हणजेच घारापूरी असावी असे काहींचे म्हणणे आहे.

घारापुरी हे प्राचीन काळी एक उत्कृष्ट बंदर तसेच सागरी व्यापाराचे मोठे केंद्र होते. कलियान, श्रीस्थानक, सूप्पारक, चेऊल ही प्राचीन बंदरे घारापुरी पासुन जवळ असुन व्यापाऱ्यांना हे बंदर सोयीचे होते. इथे अशोककालीन बांधीव स्तूपाचे अवशेष तसेच इ.स. दुसऱ्या शतकातील सातवाहन राजा श्री यज्ञ सातकर्णी याचे कारकिर्दीतील नाणी सापडली आहेत. सातवाहनांच्या कारकिर्दीत येथे दोन बौद्ध गुहा कोरल्या गेल्या यावरुन घारापुरी बेटावर पूर्वीपासून वस्ती होती हे सिद्ध होते. नंतरच्या कालखंडात घारापुरीचा उल्लेख समुद्राने वेढलेली ‘पुरी’ असा आढळतो. याकाळात इथे राष्टकूट, कलचुरी, मौर्य अशा सत्ता येत गेल्या व येथील शैवलेणी कोरली गेली. त्यानंतर ९-१० व्या शतकात राष्ट्रकूटांचे मांडलिक उत्तर कोकणचे शिलाहार यांची पहिली राजधानी पुरी होती असे काही शिलालेख आणि ताम्रपटांतून दिसते.

काही संशोधक घारापुरी बेट किंवा जंजिऱ्या जवळील राजपुरी हे राजधानीचे ठिकाण मानतात. ठाणे जिल्ह्यातच कुठेतरी हे ठिकाण वसलेले असावे. या राज्यात प्रामुख्याने हल्लीच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या भूभाग असुन जवळपास १४०० गावे ह्यांच्या अमलाखाली होती. उत्तर कोकणात शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर. देवगिरीच्या यादवसत्तेचा प्रभाव वाढू लागल्यावर यादवसम्राट कृष्ण याने आपला मल्ल नावाचा सरदार उत्तर कोकण मोहिमेवर पाठवला. मल्लाने जरी सोमेश्वरचा पराभव केला तरी त्याला उत्तर कोकणाचा प्रदेश ताब्यात मिळाला नाही. कृष्णाचा भाऊ आणि यादवांचा उत्तराधिकारी महादेव यादवाने ही मोहीम अशीच चालू ठेवली. हत्तींचे प्रचंड सैन्यदळ घेऊन त्याने सोमेश्वरावर स्वारी केली. जमिनीवरच्या या युद्धात सोमेश्वर पराजित झाल्याने त्याने पळून जाऊन समुद्राचा आश्रय घेतला. महादेव यादवाने उत्तर किनाऱ्यावर भर समुद्रात सोमेश्वराचा पाठलाग करून आरमारी युद्धात त्याचा संपूर्ण पराभव केला आणि उत्तर कोकणच्या शिलाहारांचे राज्य बुडाले. (इ.स. १२६५).

बोरिवलीच्या अकसर गावात असणाऱ्या एका वीरगळात जमिनीवरचे हत्तींच्या साहाय्याने केलेले युद्ध आणि समुद्रावरचे नावांच्या साहाय्याने केलेले युद्ध कोरण्यात आलेले आहे. यानंतर ४० वर्षांतच देवगिरीच्या यादवांची सत्ता मलिक काफूरने उलथवून टाकली. नंतरचा घारापुरीचा इतिहास फारसा ज्ञात नाही पण साधारण १४-१५ व्या शतकात हे बेट गुजरातच्या सुलतानांच्या ताब्यात होतं. १५३४ मध्ये हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले आणि या शिल्पांस प्रसिद्धी मिळाली. १६६१साली इंग्लंडच्या चार्लस राजाला मुंबईबरोबर घारापुरी बेट हे आंदण म्हणून मिळालं. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांची रचना, येथील स्तंभ आणि शिल्पे. यांची रचना वेरूळच्या लेण्यासारखी असुन येथील त्रिमूर्ती मुख्य द्वारासमोर नसुन एका स्वतंत्र गर्भगृहात आहे. स्तंभशीर्षे गोल आकाराची असुन त्यांवर रेखीव व प्रमाणबद्ध पन्हाळ्या कोरलेल्या आहेत. बहुतेक सर्व शिल्पे शिवाच्या जीवनाशी निगडित असून ती तत्कालीन शैवपंथीय पुनरुज्जीवनाची साक्ष देतात. प्रत्येक शिल्पाच्या मागे पौराणिक कथा गुंफलेली असून शिल्पकाराने तिचे वास्तवरूप कोरलेले आहे.

एकंदरीत घारापुरी लेण्यांची निर्मिती इ.स. ९०० ते १३०० या काळात झाली असुन अखंड पाषाणात कोरलेली हि लेणी भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या लेण्या पहाण्यासाठी एक दिवस वेळ काढून गेट वे ऑफ इंडियापासून लॉंचने जावे लागते. हा प्रवास एक तासाचा असुन घारापुरीला जाणारी पहिली लॉंच सकाळी ८:३० ला सुटते तर शेवटची दुपारी २:३०ला असते. बेटावरून परतण्यासाठी संध्याकाळी शेवटची बोट ५ वाजता आहे. ही बोटसेवा पावसाळयात बंद असुन दर सोमवारी लेण्या बंद असतात. घारापुरी बेटाचे क्षेत्रफळ सुमारे १४ चौ.किमी असुन बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे. घारापुरी धक्क्याला उतरल्यावर आधी चालत आणि नंतर पाय-या चढून साधारण १५ मिनिटांतच लेण्यांच्या आवारात जाता येते. वर पोहोचल्यावर दोन रस्ते दिसतात. एक गुंफाकडे जाणारा आणि दुसरा तोफा असणाऱ्या टेकडीवर जाणारा.

लेण्यांमध्ये प्रवेशासाठी पंधरा वर्षाखालील मुलांना मोफत तर मोठय़ा माणसांसाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात येतं. तिकिटे काढून आत गेलो कि आपण घारापुरीच्या लेणी क्र.१च्या पुढ्यात उभे राहतो. इथल्या मुर्ती कारांगीरांनी इतक्या सुंदर कोरलेल्या आहेत की त्या आज भग्न असल्या तरी त्यांचे सौंदर्य अजिबात लपत नाही. घारापुरीचे शैवलेणी म्हणजे ५ गुहांचा समुदाय. पूर्वेकडील गुहा क्रमांक एक आणि पश्चिम बाजूस असणाऱ्या तीन गुहा महत्त्वपूर्ण आहेत. मुख्य गुहा ही बहुधा सामान्य अनुयायांकरिता मंदिर म्हणून असावी. सदाशिवाच्या शिल्पाच्या समोरच्या व्हरांड्याच्या दोन्ही बाजूंना दोन खोल्या आहेत ज्या ध्यानासाठी आणि गूढ व्यवहारासाठी वापरल्या जात असाव्या. बाजूचा भाग म्हणजे निवासी खोल्या आणि संन्याशांच्या खाजगी खोल्या असाव्यात. घारापुरीची लेणी क्र.१ हे शैवलेणे म्हणजे कला व स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असुन शैव पंथाचे पाशुपत संप्रदायाशी असणारे साम्य दाखवते. उत्तरेकडील मार्गाने प्रवेश केल्यानंतर प्रदक्षिणा मार्गाने जाताना पहिल्यांदा आढळते ती लकुशिलाची मूर्ती. एका भव्य चौकटीत ही मूर्ती कोरली आहे.

पाशुपत संप्रदायाचे पुनरुज्जीवन लकुलिश याने केले. पाशुपत संप्रदायाच्या मते तो शिवाचा अवतार आहे. त्यांच्या मते शिव हाच परमेश्वर असून त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराबरोबर तादात्म्य आणि दुःखाचा समूळ नाश ही कोणत्याही संन्याशाच्या आयुष्याची अंतिम ध्येये असावीत. गुहांच्या भिंतीवरील शिल्प संन्याशाच्या आयुष्याचे पाच टप्पे सूचित करतात. गुरुचे महत्त्व, त्याचे आशीर्वाद, जगताचे काल्पनिक अस्तित्व, शिव-शक्तीचे एकत्व आणि शिवाचे अंतिम रूपत्व. हे एक भले प्रचंड लेणे असुन ह्याची तुलना वेरूळमधल्या लेणी क्र. २९ सीतेची नहाणी अथवा धुमार लेण्याशी होते. घारापुरी लेणीचे वेरूळ मधील ह्या लेणीशी प्रचंड साम्य आहे. जणू एकाच राजवटीत ही खोदली गेली असावीत. घारापुरीचे कोरीव काम हे धुमार लेणीच्या आधी झाले असे मानले जाते. प्रशस्त असा लांबरूंद सभामंडप, सभामंडपाच्या छतास तोलून धरलेले भव्य स्तंभ, सभामंडपातच उजवीकडच्या कोपऱ्यात एकीकडे शिवलिंग असलेले सर्वतोभद्र प्रकारचे गर्भगृह, दोन्ही कडेच्या भिंतींवर शिवाशी निगडीत असलेले पौराणिक प्रसंग कोरलेले आणि डावीकडे एकेक उपलेणे, ती उपलेणीही कोरलेलीच आणि त्यातीलच एका उपलेण्यात पाण्याचे प्रचंड टाके अशी याची रचना. लेणीत प्रवेश करण्याच्या आधीच दोन्ही बाजूंना भव्य असे कोरलेले खडक दृष्टीस पडतात. त्यांची रचना पाहून हे स्तंभशीर्षांचे आमलक असावेत हे सहजी लक्षात येते.

प्रवेशद्वारात चार स्तंभ असून तीन पायऱ्या चढून आपला प्रवेश लेणीत होतो. लेणीत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूच्या भिंतीत महायोगी शिव अथवा योगेश्वर शिवाचा शिल्पपट कोरलेला दिसतो. हा महायोगी शिव म्हणजे ध्यानमग्न शिवाची योगी स्वरूपातली प्रतिमा. शिव पद्मासनात कमळावर बसलेला असुन शिवाचा चेहरा धीरगंभीर, डोळे मिटलेले व मुद्रा ध्यानस्थ आहे. कमळाचा दांड्याला डावी उजवीकडे असलेले दोन नागपुरुष आधार देत आहेत. ही प्रतिमा महायान पंथाच्या ध्यानस्थ बुद्धावस्थेवरून प्रेरित आहे. परंपरा बदलत असताना शिल्पाचे मुख्य स्वरूप तसेच राहते मात्र आजूबाजूची पात्रे बदलत जातात जसे इथे शिवाच्या डाव्या बाजूस हंसारूढ चतुर्मुखी ब्रह्मदेव, उजवे बाजूस गरूढारूढ विष्णू, अश्वारूढ सूर्य तर वरच्या बाजूस गंधर्व, अप्सरा आणि ऋषी शिवाचे ध्यानमग्न रूप पाहण्यास जमले आहेत. दोन्ही हात भग्न असले तरी सुंदर अशी ही मूर्ती आहे.

याच्या समोरच्याच भिंतीवर म्हणजेच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूचे भिंतीवर नटराज शिवाचा शिल्पपट कोरलेला आहे. ही शिवाची तांडव अथवा नृत्य स्वरूपातील मूर्ती. याची उंची सु. ३.५० मी. असून नृत्यमग्न अवस्थेत असलेल्या अष्ट्भुज शिवाचे नेत्र अर्धोन्मिलित आहेत. एका हातात त्याने नाग बंधात अडकवलेले शस्त्र हाती घेतलेले दिसते आहे बाकी भुजा भग्न झाल्यामुळे त्या हातांमध्ये काय होते ते कळत नाही पण डमरू, त्रिशूळ, अग्नी, कपाल अशी साधने त्यांत असावीत. इथेही शिवमूर्तीच्या डाव्या बाजूला भाला हातात धरलेला कार्तिकेय तर त्यावरती परशुधारी गणेश तर उजव्या बाजूला पार्वती आहे. पार्वतीच्या अंगावर ठळक अलंकार आहेत. वरचे बाजूस ऋषी, गंधर्व व अप्सरा असुन मागील बाजुस गरुडारूढ शंखचक्रधारी विष्णू, ऐरावतावर इंद्र आणि हंसारूढ ब्रह्मदेव आहेत. वीणा वाजविणारी स्त्री आणि अवकाशगामी यांच्या मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. घारापुरीतील सर्वात महत्वाची मुर्ती म्हणजे त्रिमुखी शिवाची अर्थात सदाशिवाची. मुख्य गुहा अथवा लेणी क्र.१ ज्यास महाकाय गुहा असे म्हणतात ती २७ चौ.मीटरचा मंडप आहे. गुंफेत प्रवेश केल्यावर गुंफेच्या मध्यभागी असलेली महेश प्रतिमा आपल्याला आकर्षित करते. या लेण्यात भव्य दालन असून याची खोली ३.२ मीटर आणि रुंदी ६.५५ मीटर तर उंची ८.३ मीटर आहे. भिंतीच्या स्तंभामध्ये द्वारपालांच्या तीन उध्वस्त भव्य मूर्ती आहेत.

मध्यभागी भव्यदिव्य असे त्रिमुर्तीचे शिल्प पाऊण मी. उंचीच्या आसनावर पाषाणात कोरलेले असुन शिरस्त्राणासह त्रिमूर्तीची उंची ५.४६ मीटर आहे. मूर्तीचे खोदकाम उत्थित पद्धतीचे असून मुर्तीभोवती प्रदक्षिणापथ नाही. मूर्तिकाराने ही मूर्ती अत्यंत कौशल्याने घडविलेली आहे. हे शिल्प म्हणजे भारतीय शिल्पकलेचा परमोच्च बिंदू समजला जातो. बरेच जण ह्या मूर्तीला ब्रह्मा, विष्णू आणि महेश समजतात पण हे पूर्णपणे शैवलेणे आहे. ब्रह्मा, विष्णू ह्या मुर्तींना ह्या लेण्यातील इतर शिल्पपटांत दुय्यम स्थान दिलेले आहे. या त्रिमूर्तीविषयी संशोधकांची दोन भिन्न मते आहेत. एक या मूर्तीत ब्रह्मा, विष्णू व महेश यांचा समन्वय आहे आणि दुसरे ही तिन्ही रूपे शंकराचीच आहेत. प्रसिद्ध विदुषी स्टेला क्रॅमरिश यांच्या मते ही तीन रूपे महादेवाचीच असुन त्रिमूर्तीत तत्पुरुष– महादेवमध्ये डावीकडे अधोर–भैरव आणि उजवीकडे वामदेव-उमा ही रूपे दाखविलेली आहेत. महादेवाच्या या तीन रूपांतील फरक अत्यंत लालित्यपूर्ण रीतीने दाखविलेला आहे. प्रत्येकाची प्रतीके वेगळी, चेहऱ्यांची ठेवण वेगळी, मुखावरील आविर्भाव वेगळे, मुकुटही वेगळे, डोळे मिटलेले असूनही भिन्न भाव त्यात व्यक्त झालेले दिसतात. अघोर-भैरव, तत्पुरुष महादेव आणि वामदेव यांचे भिन्न भाव येथे स्पष्ट दिसतात.

त्रिमूर्तीचा मस्तक व छातीपर्यंतचा भाग कोरण्यात आला असुन तीनही मुखे अतिशय सुंदरअसुन त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. गळ्यात मोत्यांचा हार आणि छातीवर मोत्यांची पेंडी व लोलक लावलेला रत्नांचा हार आहे. उजवा हात तुटलेला असुन मस्तकावर जटाभार व त्यावर जडावाचे काम केलेला उंच मुकुट आहे. उजव्या कानात व्याघ्रकुंडल आणि डाव्या पाळीत मकरकुंडल आहे. कपाळावर कीर्तिमुखासारखे कोरीवकाम आहे. मूर्ती प्रचंड मोठी असुन इथे जरी प्रत्यक्ष तीन मुखे दिसत असली तरी ही मूर्ती पंचमुखी शिव अथवा सदाशिव असे मानले जाते. ही दिसणारी तिन्ही मुखे शिवाच्या चेहऱ्यावरील तीन वेगवेगळे भाव दाखवतात. यात विधाता, त्राता आणि संहारक अशी तिन्ही अंगे कोरली असुन अनुक्रमे शांत, रौद्र व उदात्त भाव मूर्तीच्या चेहऱ्यावर दाखवले आहेत. डावीकडचे अघोर मुख,मधले तत्पुरुष मुख, उजवीकडचे वामदेव मुख ही तीन दृष्य मुखे तर चौथे सद्योजात नावाचे मुख मस्तकाच्या मागच्या भागी तर पाचवे इशानचे मुख हे वरचे बाजूस अर्थात आकाशात असल्याचे मानले जाते. अघोर हे मुख आपल्या डावीकडे आहे. नावाप्रमाणेच हे मुख शिवाच्या रौद्र स्वरूपाचे प्रतिक आहे. शिवाच्या चेहऱ्यावर मिशी असून कपाळी तिसरा डोळा आहे. कानात नागरूपी कुंडल आहे तर एका हातातही त्याने नाग उचलून धरीला आहे. केस कुरळे असून मुकुटावर कवटी कोरलेली आहे तर चेहऱ्यावरील भाव बेफिकीर आहेत.

तत्पुरुष हे शिवाचे मुख अतिशय प्रसन्न भाव दर्शवतात. जटासांभारावर त्याने सालंकृत मुकुट धारण केला असून डाव्या हातात महाळूंग आहे. ते गर्भाचे प्रतीक मानण्यात येते. जणू ह्या मुखाने शिव जनांचे पालन करीत आहे. वामदेव हे मुख आपल्या उजवीकडे आहे. शिवाच्या डावीकडे ते असल्याने त्याला वामदेव म्हणतात हे पार्वतीचे मुख असेही मानले जाते. ह्या मुखावरील भाव अतिशय सात्विक आहेत. चेहरा कोमल आणि प्रसन्न आहे. केशअलंकार आणि हातात बांगडय़ा आणि कर्णकुंडलं आहेत. ह्याच्या मुकुटाची ठेवणही वेगळी असून त्याने हाती कमळ धरीले आहे. मुकुटाखालील कुरळ्या केसांनी कान झाकून गेलेले आहेत. मुकुटाला मोत्यांच्या माळा व घोस आहेत. वरच्या बाजूस उमललेले कमळ आहे. विष्णूच्या उजव्या हातात कमळ आहे. ह्या मूर्तीचे स्थान प्रवेशद्वाराच्या बरोबर समोरील बाजूच्या भिंतीवर आहे. दोन्ही बाजूंस स्तंभांच्या रांगा आहेत. ही मूर्ती येथील सर्वात महत्वाची असल्यामुळे येथील शिवपिंडीचे गर्भगृह हे मधोमध न ठेवता ते उजवीकडच्या कोपऱ्यात कोरलेले आहे. ही सदाशिव मूर्ती एका चौकटीत कोरलेली असुन चौकटीच्या दोन्ही बाजूस आधारासाठी बटू घेऊन उभे राहिलेले भव्य द्वारपाल आहेत. हे बटू म्हणजे कोणी सेवक नसून द्वारपालांची शस्त्रे आहेत. अशा प्रकारच्या मूर्तीला आयुधपुरुष म्हणतात. आणि इथले इतरही शिल्पपटांत दिसणारे द्वारपाल हे आयुधपुरुष द्वारपालच आहेत. अत्यंत देखण्या अशा ह्या सदाशिवाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर सुरेख असे दोन शिल्पपट कोरलेले आहेत. ह्यापैकी डावीकडचा अत्यंत सुंदर शिल्पपट अर्धनारीश्वर मूर्तीचा आहे. अर्धनारीश्वर म्हणजे शिव-पार्वती एकत्र मूर्ती अर्थात पुरुष आणि प्रकृती यांचे एकत्रीकरण म्हणजेच सृजनमूर्ती. अर्धनारीश्वराची मूर्ती त्रिभंगमुद्रेत असून चतुर्हस्त आहे. उजवे अंग शिवाचे व डावे उमेचे. या मूर्तीची उंची ५.१० मी. असून शंकराचा जटाभार व पार्वतीचा केशसंभार यांना जरतारी वस्त्रात आच्छादून त्यावर जडावाचा उंच मुकुट चढविलेला आहे. मुकुटाच्या घडणीतून बाहेर आलेल्या उजवीकडील शंकराच्या जटा आणि डावीकडील पार्वतीच्या कुरळ्या बटा दिसतात.

शंकराच्या जटांमध्ये चंद्रकला असून कानाची पाळी लांब व तीत एकच बाळी आहे, तर पार्वतीच्या कानात कर्णफुलांची जोडी दिसते. मूर्ती एक असूनही दोन्ही बाजूंनी भिन्न भाव दिसतात, तसेच साजेसी शारीरिक ठेवणही आढळते. पार्वतीचे नितंब नि स्तन तिच्या बांधेसूद स्त्रीत्वाची साक्ष देतात तर भरदार वक्षःस्थळ व सडपातळ कटिप्रदेश शंकराच्या पुरुषत्वाचा दाखला देतात. शिवाच्या अर्ध्या भागाने उभे राहण्यासाठी नंदीचा आधार घेतला असून आपले कोपर त्याच्या वशिंडावर टेकविले आहे. तर पार्वतीचा अर्धा भाग हा स्त्रीरूप असल्याने तो जास्तच कमनीय दाखवला आहे. पार्वतीने आपल्या कंबरेचाच आधार हात टेकवण्यासाठी घेतलेला आहे. शिवाच्या एका हातात नागबंधन असून पार्वती ही स्त्री असल्याने तिच्या हाती आरसा आहे. हा आरसा बहिर्वक्र आहे कारण तत्कालीन आरसे हे शिशाचे अथवा दगड घासून घासून गुळगुळीत करून बनवलेले असत. बहिर्वक्र स्वरूपामुळे हे आरसे जास्तीत जास्त मोठी प्रतिमा दाखवू शकत. पार्वतीने आपल्या केसांचा अंबाडा घातलेला दिसून येतो. अर्धनारीश्वराच्या मागे आणि आजूबाजूला अनेक मूर्ती आहेत.

अर्धनारीश्वराच्या शिवाच्या डाव्या बाजूला भालाधारी स्कंद उभा आहे. त्याचे वरचे बाजूस ब्रह्मा आणि ऐरावतारूढ इंद्र आहे तर पार्वतीच्या भागाच्या उजवीकडे मकरारूढ वरूण आणि गरूडारूढ विष्णू आहे. विष्णूच्या हाती चक्र आहे. तर वरचे बाजूस गंधर्व, अप्सरा आहेत तर अर्धनारीश्वराच्या खालचे बाजूस सेवक आहेत. सदाशिवाच्या उजव्या बाजूच्या भिंतीत असलेला शिल्पपट गंगावतरण प्रसंगाचा आहे. गंगावतरणाची कथा ही रामायणात आलेली आहे. इथले गंगावतरणाचे शिल्प थोडे वेगळे आहे. ही मूर्ती ३.७५ × ५.५० मीटरच्या चौकटीत खोदलेली असुन शिवाची उंची सु. ५ मी. तर पार्वतीची उंची सु. ३.७५ मी.आहे. शंकराचे दोन हात भग्न झालेले असुन उरलेल्या दोन हातांपैकी एक बुटक्या गणाच्या मस्तकावर व दुसऱ्याची तर्जनी पार्वतीच्या हनुवटीवर आहे. शंकराच्या जटाभारावर त्रिधारी मुकुटाचे आच्छादन असून त्याच्या शिखरातून त्रिमुख स्त्रीची अर्धमूर्ती दाखविलेली आहे. ही मुखे गंगा, यमुना व सरस्वती या तीन पवित्र नद्यांची प्रतीके असावीत असे अनुमान करण्यात येते. शंकर या भाराने किंचित कलला आहे आणि पार्वतीला जवळ घेण्याचा प्रयत्न करीत असून पार्वती रागाने दूर सरकण्याचा यत्न करीत आहे असे वाटते. तिच्या कुरळ्या केसांवर मुकुट आहे नि मागे अंबाडा बांधलेला आहे. कुंडलांपासून नूपुरापर्यंत ती अलंकारांनी नटलेली असुन झुळझुळीत वस्त्र नेसलेली आहे. तिच्या शेजारी दासी उभी आहे. एकूण पार्वतीची मूर्ती त्रिभंगात असून फक्त स्कंधाकडील भाग शंकराकडे कलला आहे.

शिवाच्या खालचे बाजूस भगीरथ हात जोडलेल्या अवस्थेत बसून शिवाची प्रार्थना करीत आहे. शिवाच्या मस्तकावर आकाशात तीन मुख असलेली गंगा जटेत येण्यासाठी उत्सुक आहे. गंगेच्या तीन मुखांचे कारण म्हणजे तिला त्रिपथगंगा म्हणतात. कारण ती स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ असा तीन पथांतून प्रवास करत आहे. स्वर्गातून उडी घेताना ती मंदाकिनी असते, पृथ्वीवर ती भगीरथ प्रयत्नांनी येत आहे म्हणून ती भागीरथी आहे तर पाताळात सगरपुत्रांचा उद्धार करायला जाताना ती भोगवती आहे. आपल्या पतीच्या मस्तकी दुसरी स्त्री येत असलेली पाहून स्त्रीसुलभ मत्सरामुळे पार्वती शिवापासून दूर सरकलेली आहे. शिव पार्वती ह्या दोघांच्याही शरीराचा तोल एकमेकांच्या विरूद्ध बाजूस झुकल्यामुळे ह्या शिल्पपटाचा समतोल अतिशय सुरेखरित्या साधला गेलाय. गंगावतरणाचा हा चमत्कार बघण्यासाठी इथेही ब्रह्मा, विष्णू, गंधर्व आणि अप्सरा आलेले आहेत. गंगावतरणाच्या पुढील बाजूस आहे ते कल्याणसुंदर शिवाचे शिल्प अर्थात शिवपार्वती विवाहपट. शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने शंकराची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली. तिला मागणी घालण्याकरीता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले. हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला. यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे.

शिव-पार्वती ही जोडी मध्यभागी कोरली असून शिवाच्या हातात पार्वतीचा हात होता पण दुर्दैवाने आता तुटलेला आहे. एकीकडे विवाहाचा आनंद तर दुसरीकडे विरहाचे दु:ख शिल्पपटात उत्कटपणे मांडलेले आहे. शिवपार्वतीविवाह या मूर्तीत पार्वतीची मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध व बांधेसूद असून शिवपार्वती या दोन्ही मूर्तींची बरीच मोडतोड झाली आहे. पार्वती शंकराच्या उजव्या बाजूस असून तिचा उजवा हात शंकराच्या डाव्या हातात होता, असे मूर्तींच्या ठेवणीवरून वाटते. शिवपार्वतीच्या विवाहाचा प्रसंग हा वेरूळच्या क्र. २१ मधील रामेश्वर लेणीतील शिल्पपटापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचा आहे. शिवपार्वतीच्या विवाहाचे पौरोहित्य करायला साक्षात ब्रह्मदेव आलेला आहे. तो खाली बसून विवाहसोहळ्याची मांडामांड करत आहे. पार्वतीचा पिता हिमवान आपल्या कन्येला अलगदपणे घेऊन येत आहे. हिमवानाच्या मागून अमृतकुंभ घेऊन चंद्र येत आहे. आपल्या कन्येचा पती हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहऱ्यावर कृतार्थता आहे. तर पार्वतीच्या अर्धोन्मिलित चेहऱ्यावर समाधान साकारले आहे. पार्वतीने आपल्या एका हाताने शिवाचा हात पकडलेला असुन शिवही समाधानात बुडून गेला आहे. त्याचा एक हात कंबरेवरच्या वस्त्रावर असून दुसऱ्या हाताने तो पार्वतीला आधार देत आहे. शिवपार्वतीच्या अनुपम विवाहसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येथेही देवदेवता, गंधर्व, ऋषी, अप्सरा आदी आलेले आहेत. शिवाच्या ह्या मूर्तीच्या समोरच शिवाची संहारमूर्ती आहे ती म्हणजे अंधकासूर वधमूर्ती. अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते.

अंधकासुराच्या भयाने देव शंकराला शरण त्यावेळी नीलासुर नावाचा राक्षस हत्तीचे रूप धारण करून शंकराचे पूजन करणाऱ्या ऋषींना त्रास देतो. शंकर आधी गजासुराचा वध करून त्याचे कातडे अंगाभोवती गुंडाळून एका हाती कपाल धरून त्रिशुळाने अंधकासुराचा वध करतो. आपल्या त्रिशुळावर उचलून धरलेल्या अंधकाचे रक्त गोळा करता यावे म्हणून हाती कपाल धारण करतो. त्या कपालाबाहेर पडणारे पडणारे रक्ताचे चुकार थेंब त्वरेने शोषून घेण्यासाठी आपल्या योगसामर्थ्याने मातृकेची (चामुंडेची) उत्पत्ती करतो. इथली मूर्ती अतिशय प्रत्ययकारी आहे. अंधकासुरवधमूर्तीचा खालचा भाग फुटून गेला असला, तरी एकूण सारा प्रसंग स्पष्ट दिसतो. गजासुराला फाडून त्याचे चर्म आपल्या अंगाभोवती गुंडाळून क्रोधाने दग्ध झालेल्या अष्टभुज शिवाने आपल्या एका हाती खङ्ग धारण केले आहे तर दुसऱ्या हाताने अत्यंत आवेशाने आपला त्रिशूळ अंधकाच्या शरीरात खुपसला आहे. हाती कपाल धरून त्यात तो अंधकाचे रक्त गोळा करीत आहे. शिवाला इतका क्रोध आलेला आहे की त्याचे डोळे जणू खोबणीबाहेर येत आहेत तर त्याचा दात त्याच्याच ओठात रूतून बाहेर आला आहे व त्याने त्याचा ओठ जणू काही फाटला आहे. शिवाच्या मुकुटावर कवटी कोरलेली असल्याने त्याचे खवळलेले रौद्र रूप विलक्षण उठावदार दिसत आहे. एका पायावर भार देत शिवाने आपला दुसरा पाय वर उचलून ठेवला आहे. एकूण या चित्रातून उग्र शिवाने यथार्थ दर्शन होते. पायापाशी बसलेले पार्वती, सेवक आज भग्न झाल्यामुळे दिसत नाहीत पण त्यांचे अवशेष मात्र आजही दिसतात.

सभामंडपाच्या डाव्या बाजुला म्हणजे अर्धनारीश्वराच्या डावीकडील दोन शिल्पपट आहेत. एक शिल्पपट आहे तो उमा माहेश्वर मूर्तीचा. हि मुर्ती बरीच भग्न असून शिव पार्वती सारीपाट खेळताना दाखवले आहेत. अर्थात ह्यात सारीपाटाचा पट भग्न असल्याने दिसू शकत नाही. शिवपार्वतीची अक्षक्रीडा पाहण्यासाठी खाली शिवगण जमलेले आहेत. खाली नंदी असून पार्वतीच्या उजवीकडे स्कंद उभा आहे तर वर देव्गण, गंधर्व जमलेले आहेत. शिवाच्या खेळातील नैपुण्यामुळे अर्थात शिव सतत खेळात जिंकत असल्याने पार्वती किञ्चित चिडलेली आहे आणि शिवापासून थोडी दूर सरकलेली आहे. तर शिव एका हाताने तिचा हात पकडून तिचे आर्जव करीत आहे. ह्याच मूर्तीच्या विरूद्ध बाजूस शिवाची अनुग्रहमूर्ती आहे ती म्हणजे रावणानुग्रहशिवमूर्ती. या शिल्पांत रावणानुग्रह कथा चित्रित केली आहे. कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास येतो. शिवपार्वतीची अक्षक्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो. आपल्या सर्व हातांनी कैलास पर्वत तळापासून उचलायला लागतो. तर शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरतो. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो अशी हि कथा. ह्या शिल्पपटात दशमुखी रावणाने आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत उचलून धरलेला दिसत असून त्याच्या पराक्रमामुळे शिवगण भयभीत झालेले दिसत आहेत. पार्वतीचे नुकतेच अक्षक्रीडेवरून शिवाशी भांडण झाल्यामुळे ती शिवापासून दूर सरकलेली आहे. दूर सरकलेल्या पार्वतीला एका हाताने सावरून धरत भेदरलेल्या शिवगणांना धीर देत शिव आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरत रावणाचे गर्वहरण करीत आहे. शिवाच्या डाव्या बाजूस श्रीगणेश, पायाजवळ भृंगी आहे. शिल्पात गोल खडक पुढे आलेले दिसतात ते म्हणजे कैलास. त्याखाली रावणाची मूर्ती अतिशय भग्न झालेली दिसते.

शिव उंच व ऐटदार असून शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे. त्याच्या मुद्रेवर शांत निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे. शिवाचे हात तुटले आहेत. या प्रसिद्ध शिल्पाकृतीं व्यतिरिक्त चतुर्भुज द्वारपाल, कार्तिकेय, ब्रह्मा, विष्णू वगैरेंच्या मूर्तीही नजरेत भरण्यासारख्या आहेत. ह्या सभामंडपातील उजवीकडच्या कोपऱ्यात गर्भगृह आहे. हे गर्भगृह सर्वतोभद्र प्रकारचे म्हणजे हे चारही बाजूंनी मोकळे असून आत प्रवेश करण्यासाठी चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारांवर अतिशय भव्य असे आयुधपुरुष द्वारपाल असून वर आकाशात विद्याधर तर आत शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या उजवीकडे एक छोटेसे साधे लेणे असून ह्या भागात जमिनींतर्गत खोदलेले पाण्याचे भलेमोठे टाके आहे व शेजारीच एक गाभारा आहे. आतमध्ये शिवलिंग असून ओसरीच्या भिंतीवर योगेश्वर शिवाची प्रतिमा कोरलेली आहे. उजवीकडील लेणे छोटे असले तरी डावीकडील लेणे मात्र भव्य आहे. पुरातत्व खात्याने येथील स्तंभांची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. सभामंडप, आतमध्ये गर्भगृह त्याच्या दोन्ही बाजूंना सिंह शेजारीच दोन्ही बाजूंनी अनुक्रमे भैरव आणि शैव आयुधपुरुष द्वारपाल आणि त्याही पलीकडे दोन्ही बाजूंना लहानसे उपमंडप अशी याची रचना.

लेण्याच्या समोरील मोकळ्या जागेत एक प्रचंड रंगशिळा असून येथे पुर्वी नंदी असावा किंवा येथे शिवमूर्ती समोर वादक आपली कलाकारी दाखवित असावेत. याचा उजवीकडील उपमंडप महत्वाचा आहे कारण ह्याच्या अंतर्भागात एका चौकटीवर पाशुपत संप्रदायाचे प्रतीक असणारा भव्य असा अष्टमातृकापट आहे तर दोन्ही बाजूस काटकोनांत असलेल्या भिंतीवर समोरासमोर गणेश आणि स्कंद प्रतिमा आहेत. स्कंदाने एका हाती भाला तर दुसर्याज हाती कोंबडा धारण केलेला आहे जो त्याला अग्नीने दिला आहे. स्कंदाच्या बाजूस दोन्ही बाजूस अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, शिवगण, गंधर्व व अप्सरा आहेत. ऐंद्राणी, वैष्णवी, ब्राह्मणी, कौमारी, वाराही, माहेश्वरी आणि चामुंडा ह्या नेहमीच्या सप्तमातृकांच्या जोडीला कधीकधी नारसिंही नामक आठवी मातृकासुद्धा दाखविली जाते ती येथे आहे. ह्या मातृका उभ्या अवस्थेत असुन त्यांनी आपापली बाळे हातात घेतली आहेत. त्यांच्या शेजारी त्यांचे ध्वजांवर त्यांची वाहने स्थापित आहेत. ह्या मातृका बऱ्याच भग्न झाल्यामुळे ओळखू येत नाहीत पण हंसामुळे ब्राह्मणी, मोरामुळे कौमारी, गिधाडा मुळे चामुंडा तर नंदीमुळे माहेश्वरी ह्या काही मातृका बऱ्यापैकी ओळखता येतात. हे लेणे पाहिल्यावर घारापुरीचे मुख्य लेणीदर्शन संपते. या सर्व भव्य शिल्पाकृती पाहून आपण थक्क होतो.

मुख्य लेण्यापासुन काही अंतर गेल्यावर दुस-या क्रमांकाची लेणी दिसते. दुसरे लेणे खोदण्याचे काम अर्धवट राहिलेले असुन आजूबाजूला दगडात कोरलेली आणि दुरवस्था झालेली शिल्पे आणि शिवलिंग दिसतात. लेणी क्रमांक ३ च्या दर्शनी भागावर असलेल्या स्तंभांमळे हे लेणे भव्य दिसते. ओसरी, गर्भगृह आणि गर्भगृहांच्या प्रवेशद्वारावर कोरलेले द्वारपाल अशी याची रचना असुन मध्यभागी भव्य असं शिवलिंग पाहायला मिळतं. लेणी क्रमांक ४ हे लेणे अर्धवट राहिलेले दिसते. ह्या लेणीच्या दर्शनी भागावर पण आयुधपुरुष द्वारपाल आहेत. हे लेणे तर खूपच अर्धवट आणि प्रचंड पडझड झालेले आहे. आतमध्ये एक शिवलिंग स्थापित केलेले आहे. तर बाजूला दोन अंधा-या खोल्याही आहेत. शेवटच्या पाचव्या गुंफेपाशी खालच्या बाजूला मोठा तलाव दिसतो. येथील समोरच्या डोंगरावर दोन बौद्ध लेण्या असून तिथे एक विशाल स्तूप आहे. हा स्तूप पूर्णपणे मातीने आच्छादलेला आहे. मात्र या लेण्या पडझडीला आल्यामुळे तिथे प्रवेश निषिद्ध आहे. इथे घारापुरी लेणीदर्शनाची समाप्ती होते. घारापुरीची ही लेणी पहायला एक तास पुरेसा आहे पण शिल्पे समजावून घेऊन पहायचे असल्यास सर्व लेणी पहायला पाच तास लागतात. टेकडीवरून घारापुरीचा संपूर्ण परिसर दिसतो.

घारापुरीच्या पायथ्याशी असलेले राजबंदर, शेतबंदर आणि मोराबंदरही तसंच दूरवर नजर टाकली तर मुंबई, न्हावा शेवा बंदर आणि अथांग पसरलेल्या सागराचं मनोहारी दृश्य दिसतं. घारापुरीतील काही शिल्पाकृती सध्या मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत. लेण्याव्यतिरिक्त इतरही काही अवशेष येथे सापडले आहेत. इ. स. तिसऱ्या शतकातील विटांच्या स्तूपाचे अवशेष, अनेक शिवलिंगे, शिवमूर्तीचे भग्नावशेष, वास्तूचे पाये आणि मोठमोठ्या विटांचे तुकडे इतस्ततः विखुरलेले आहेत. येथील साऱ्या शिल्पांची फार मोठ्या प्रमाणावर मोडतोड झालेली आहे. १९३९ साली पाणी झिरपून त्रिमूर्तीचा बराच मोठा ढलपा निखळून पडला. नैसर्गिक आणि मानवी नासधुसीमुळे येथील शिल्पांच्या जतनाचा प्रश्न बिकट झाला आहे. हवेतील आणि पाण्यातील क्षारामुळे खडक ठिसूळ बनत चालला आहे. त्याचप्रमाणे झिरपणाऱ्या पाण्यामुळे गुहांमध्ये नासधूस होत असते. याकरिता पुरातत्त्वखात्याने चिरांत दाबाने सिमेंट भरणे, पाणी जाण्याकरिता पन्हाळ्या खोदणे, वरचे छत तोलून धरण्याकरिता दगडी खांब उभारणे इ. महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत. अलीकडे त्रिमूर्तीमध्ये कागदाचा ओला लगदा क्षार काढण्याकरिता भरून नंतर मूर्तीवर एक रक्षक लेप दिला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेणी आहेत पण घारापुरची शैवलेणी ही अनुपमच आहे. भारतीय शिल्पकलेचे हे सौंदर्य पहाण्यासाठी एकदा तरी भेट द्यायला हवी.

@सुरेश निंबाळकर

Leave a comment