गंगोबा तात्या, होळकरांचे दिवाण | गंगाधर यशवंत चंद्रचूड

By Discover Maharashtra Views: 1640 10 Min Read

होळकरांचे दिवाण, गंगोबा तात्या उर्फ गंगाधर यशवंत चंद्रचूड –

इतिहासाने दखल घेतलेली दिवाण मंडळी –

आधुनिक शासन पद्धतीत शासनकर्त्यांना राज्यकारभाराशी संबंधित विविध बाबींवर सल्ले,मार्गदर्शनासाठी अनुभवी सनदी अधिकारी असतात.राज्य पातळीवर त्याला मुख्य सचिव(चीफ सेक्रेटरी) म्हणतात तर केंद्र सरकार पातळीवर मंत्रीमंडळ सचिव(Cabinet Secretary) म्हणतात.ह्यांच्यासारखीच कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांस उत्तर मराठेशाहीत ` दिवाण ` म्हणून ओळखले जाई.हे दिवाण चतुरस्त्र प्रतिभेचे असून आपल्या धन्याच्या फायद्यासाठी नाना प्रकारची राजकारणे,डावपेच खेळत असत.त्यांच्यावर सोपविलेल्या जबादारीमुळे ते आपल्या धन्याच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासातील असत.महत्वाची बोलणी,करार,युद्ध,लढाया,महसूल वसुली,हिशेब वगैरे बाबींमध्ये दिवाणांचे महत्वाचे योगदान असायचे.यातील काही जण वैयक्तिक महत्वाकांक्षा,स्वार्थ यासाठी  धन्याशी बेईमानी करून विरोधकांशी संधान जुळवणारे पण निघाले.एकूणच तेव्हाच्या राजकारणात दिवाणांनी खूपच महत्वाचे स्थान मिळविले होते.काही प्रसिद्ध दिवाण ह्या प्रमाणे होते

राज्यकर्ते —–दिवाण
होळकर—– गंगाधर यशवंत उर्फ गंगोबा तात्या चंद्रचूड
भोसले —— देवाजी चोरघडे
शिंदे —– रामचंद्र बाबा शेणवी,बाळोबा तात्या पागनीस
निजाम  —–विठ्ठल सुंदर परशुरामी
पेशवे —-  सखाराम बापू बोकील, नाना फडणीस, त्रिंबकजी डेंगळे, बाळोबा तात्या कुंजीर
कुतुबशहा —- मादन्णा

यातील चार जण त्यांच्या हुशारीमुळे मराठ्यांच्या इतिहासात ` साडे तीन शहाणे ` म्हणून प्रसिद्ध आहेत. आज पासून यातील काही दिवाण मंडळींविषयी जाणून घेऊ या..सुरुवात गंगाधर यशवंत उर्फ गंगोबा तात्या चंद्रचूड यांच्यापासून करू.त्यांचे घराणे मुळचे पुणे जिल्ह्यातील तत्कालीन खेड तालुक्यातील निंबगावचे होते.ह्या घराण्याकडे देशपांडे पदाची वृत्ती/वतन असून ते धनपावडे ह्या आडनावाने ओळखले जायचे.तात्यांचे वडील यशवंत उर्फ येसाजी यांनी पुत्र प्राप्ती साठी निंबगावी भीमा नदीच्या काठी असलेल्या श्रीचंद्रचुडेश्वर मंदिरात पुष्कळ दिवस अनुष्ठान केले.त्यामुळे तेव्हापासून धनपावडे घराणे चंद्रचूड नावाने ओळखले जाऊ लागले.यशवंतरावांना दोन पुत्ररत्नांची प्राप्ती झाली-एक बाजीपंत बाबा आणि दुसरे गंगाधर उर्फ गंगोबा तात्या.ह्या दोघांच्या जन्मतारखा,वर्ष उपलब्ध नाहीय.हे दोघे जण पेशव्यांच्या सेवेत होते.इ.स.१७३४ मध्ये तात्यांचा थोरल्या बाजीरावांबरोबर प्रत्यक्ष संबंध आला.

चंद्रचूड बंधूंचा हजरजबाबीपणा तसेच महसुली कामातील प्राविण्याने प्रभावित होऊन थोरल्या बाजीरावांनी उभय बंधूना फडात (पेशव्यांचे हिशेब खाते))नियुक्त केले.इ.स.१७४३ साली मराठ्यांना माळव्याची सनद मिळाली.नानासाहेब पेशव्यांनी मल्हारराव होळकर,त्यांचा मुलगा खंडेराव आणि त्यांच्या नोकरीत असलेल्या मुत्सद्दी गंगाधर यशवंत उर्फ गंगोबा तात्या,रामजी यादव आणि राघव लक्ष्मण यांस अधिकाराची वस्त्रे दिली.मराठे आणि तत्कालीन मोगल बादशहा अहमदशहा यांच्यात एप्रिल १७५२ मध्ये झालेल्या अहदनाम्यानुसार बादशाहीचे अंतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी आपल्या शिरावर घेतली.ह्या कराराचे पालन करण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी शिंदे –होळकर ह्या दोघा सरदारांकडे माळव्याचा कारभार सोपवला.ह्यावेळी नानासाहेबांनी तात्यांना मल्हारराव होळकरांचे फडणीस म्हणून नेमल्याने ते माळव्यात गेले आणि पेशवे आणि होळकर यांच्यातील जमा,खर्च,देणी,घेणी ह्या बाबी बघू लागले.वडीलबंधू बाजीपंत बाबा मात्र पुणे दरबारातच राहिले.तात्यांनी अत्यंत हुशारीने आणि कार्यक्षमतेने होळकरांच्या महसूल खात्याचा कारभार करून मल्हाररावांचा विश्वास संपादन केला.तात्यांच्या हिशेब चोख ठेवण्याच्या शिस्तीमुळे होळकरांची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारली.त्यांनी प्रसन्न होऊन तात्यांना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे बुद्रूकसह २२ गावांची जहागीर तर दिलीच शिवाय होळकर दरबाराचे दिवाण म्हणून पदोन्नती पण दिली.मल्हारराव होळकरांच्या सान्निध्यात राहून तात्या राजकारणात पण चांगलेच तरबेज झाले.

गंगोबा तात्यांनी मल्हारराव होळकरांचे फडणीस/दिवाण म्हणून थोरले बाजीराव,नानासाहेब आणि थोरले माधवराव ह्या तीन पेशव्यांच्या कारकिर्दीत काम पाहिले.तात्यांची  थोरल्या  बाजीराव पेशव्यांच्या वेळी सुरु झालेली कारकीर्द नानासाहेब पेशव्यांच्या काळात बहरली आणि थोरल्या माधवरावांच्या काळात कोमेजली.

तात्यांचे उल्लेखनीय योगदान/सहभाग असलेल्या उत्तर हिंदुस्थानातील काही उल्लेखनीय घडामोडी याप्रमाणे होत्या  ज्यातून तात्या त्या काळात किती मोठे प्रस्थ होते याची कल्पना येयील.

१-बाजीराव पेशव्यांच्या धर्मपत्नी काशीबाई फेब.१७४६ ते मे १७४९ अशी तीन वर्षे उत्तर हिंदुस्थानात धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी गेल्या होत्या.त्यावेळी त्यांच्या उत्तरेतील प्रवास,मुक्काम,सुरक्षा इ.चा बंदोबस्त मल्हारराव होळकर आणि जयाप्पा शिंदे यांनी करावा अशा आज्ञा नानासाहेबांनी ह्या उभय सरदाराना दिल्या होत्या.त्यानुसार मल्हाररावानी हि जबाबदारी तात्यांवर तर जयाप्पानी रामचंद्र बाबा शेणवी यांच्यावर सोपवली.ह्या दोघांनी काशीबाईंची यात्रा निर्वेधपणे पार पडण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली.

२-तृतीय पानिपत युद्धास प्रारंभ होण्यापूर्वी मराठे आणि अब्दाली यांच्यात युद्ध टाळून वाद सोडविण्याच्या दृष्टीने विविध व्यक्तींच्या माध्यमातून बोलणी चालू होती.मराठ्यांच्या तर्फे गंगोबा तात्या आणि दिल्ली दरबारातील वकील महादेव हिंगणे हे भाग घेत होते.ह्या दोघांनी नजीबचा प्रदेश मराठे नजीबकडेच राहू देतील आणि अब्दालीने निघून जावे असा करार नजीब कडून १३ मार्च १७६० रोजी बेलभंडार,गंगाजल साक्षीस ठेवून मान्य करून घेतला होता.पण सदाशिवरावभाऊ उत्तरेकडे निघाल्याचे वृत्त कळताच नजीबने छावणी उठवून निघालेल्या अब्दालीस गळ घालून परत जाऊ दिले नाही.परिणामी तात्या आणि महादेव हिंगणे यांनी नजीब बरोबर केलेला करार फिसकटला.तरी पण मल्हाररावानी तात्यांमार्फत बोलणी चालूच ठेवली होती.सदाशिवराव प्रचंड फौज घेऊन येत असल्याचे दिसल्यावर मराठ्यांचा जोर वाढून त्यांनाही तह करण्याची आवश्यकता वाटेनाशी झाली.

३-तृतीय पानिपत युद्धात मराठ्यांची प्रचंड प्राणहानी होऊनही अल्पावधीतच मराठ्यांनी उत्तरेकडे पुन्हा युद्धापूर्वी होता तसा आपला दबदबा पुन्हा निर्माण केला.दिल्लीत मराठ्यांना अनुकूल व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मल्हाररावांनी तात्यांस पाठविले होते.

४-जयपूर नरेश सवाई जयसिंह सप्टेंबर १७४३ मध्ये मृत्यू पावला.त्याच्या दोन राण्यांच्या दोन मुलांत-ईश्वरसिंह आणि माधोसिंह यांच्यात-वारसा हक्कावरून वाद निर्माण झाले होते.यात होळकरांनी माधवसिंहची बाजू घेतली होती.ईश्वरसिंह आणि होळकर यांच्या सैन्यात ऑगस्ट १७४८ मध्ये सहा दिवस युद्ध होऊन ईश्वरसिंहाचा होळकरांनी पराभव केला.होळकरांनी आपली फौज तात्यांबरोबर दिली होती.ज्या माधवसिंहला जयपूर गादी मिळण्यासाठी मराठ्यांनी मदत केली होती तो नंतर मराठ्यांवरच उलटला.त्याने गंगोबा तात्या व अन्य मराठे सरदाना बोलावून मारण्याचा कट रचला होता,कुणीही सरदार न गेल्याने माधवसिंहचा डाव फसला.पण त्याने जयपुरात बाजारहाट करण्यासाठी आलेल्या सुमारे तीन हजार मराठ्यांची घात करून कत्तल केली.

याव्यतिरिक्त पठाण,रोहिले यांच्या बरोबर मराठ्यांच्या झालेल्या इतरही अनेक लढायात गंगोबा तात्यांचा सक्रीय सहभाग होता.होळकरांच्या उत्तरेकडील तसेच पुणे दरबारातील राजकारणात तात्यांची महत्वपूर्ण भूमिका असायची.

गंगोबा तात्यांची शोकांतिका: नानासाहेब पेशवे जून १७६१ मध्ये मृत्यू पावले.त्यांच्या पश्चात जुलै १७६१ मध्ये ज्येंष्ठ पुत्र माधवराव पेशवा झाले.नानासाहेबांचे कनिष्ठ बंधू रघुनाथराव उर्फ राघोबा दादा यांचा पण पेशवे पदावर डोळा होता.पेशवेपदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी राघोबादादाना मराठेशाहीतील सखाराम बापू,चिंतो विठ्ठल रायरीकर,तुकोजी होळकर,मानाजी शिंदे,दमाजी गायकवाड तसेच गंगोबा तात्या यांसारख्या प्रभावशाली मुत्सद्दी,राजकारण्यांनी व्यक्तिगत स्वार्थ,महत्वाकांक्षे पोटी पाठींबा दिला.इतकेच नव्हे तर निजाम,हैदर,इंग्रज अशा मराठ्यांच्या परंपरागत शत्रूंशी हातमिळवणी पण केली.त्यामुळे साहजिकच थोरल्या माधवरावांचे आणि ह्या गटातील मंडळींचे संबंध बिघडत गेले.मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेराव मार्च १७५४ मध्ये कुम्भेरी इथे सुरजमल जाटाच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात तोफगोळा लागून मृत्यू पावला.मल्हारराव मे १७६६ मध्ये मृत्यू पावले.त्यांच्या जागी थोरल्या माधवराव पेशव्यांनी मल्हाररावांचा नातू(खंडेरावचा मुलगा)मालेराव यास सुभेदारीची वस्त्रे दिली.

मालेराव मल्हाररावांचा वारसा समर्थपणे चालविण्यास सक्षम नसल्याचे तात्यांनी फार पूर्वीच ताडले होते.मालेरावचे मार्च १७६७ मध्ये निधन झाल्यावर त्यांनी राघोबा दादांच्या साह्याने आपल्या कह्यात राहणाऱ्या व्यक्तीस अहिल्याराणीना दत्तक देऊन होळकर संस्थानावर ताबा मिळविण्याचा डाव रचला.पण करारी अहिल्याराणीना शिंदे,गायकवाड,भोसले तसेच राजपूत राजांची मदत मिळाल्याने राघोबा दादा/तात्यांचे बेत सिद्धीस गेले नाही.(एप्रिल १७६७) तरीही दादा,तात्यांनी आपले उद्योग थांबवले नाहीत.मे १७६७ मध्ये तात्यांनी राघोबा दादांच्या पुणे दरबारातील प्रभावाचा दूरूपयोग करून पेशव्यांकडे रु.१६.६२ लाख नजराणा भरून मल्हाररावांचे मानलेले पुत्र तुकोजीना सरदारीची वस्त्रे देवविली.तेव्हापासून होळकरांच्या लष्कराचे तुकोजी होळकर प्रमुख होऊन लष्करी मोहिमात भाग घेऊ लागले.अहिल्याराणी मुलकी प्रशासन बघू लागल्या.अशाने होळकरांच्या कारभारात दोन सत्ताकेंद्रे निर्माण होऊन प्रसंगोपात विसंवादिपणा निर्माण होऊ लागला.ऑगस्ट १७६८ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांनी जहागिरीच्या वसुलावरून तात्यांस दंड ठोठावून त्यांच्या ताब्यातील किल्ले,जहागिऱ्या जप्त केल्या.

इ.स.१७६९ मध्ये पेशव्यांनी होळकरांकडे चौथाई आणि सरदेशमुखीच्या थकीत रकमेची मागणी केली असता तात्यांनी भर दरबारात ` पेशव्यांना थकीत मागण्याचा अधिकार नसून छत्रपतींचा तो अधिकार असल्याने आम्ही थकीत छत्रपतींकडेच भरू` असे उद्धामपणे सांगितले.तात्यांच्या अशा उद्धट वक्तव्याने थो.माधवरावांनी दरबारी रीतीरिवाज विसरून तात्यांच्या श्रीमुखात भडकावली आणि त्यांना ३० लाख रुपयांचा( त्या काळात म्हणजे इ.स.१७७२ मध्ये सोन्याचा दर रु.१४ ते २० प्रति तोळा असा होता.आज २०२२ मध्ये तो रु.५०००० आहे) दंड ठोठावून त्यांची रवानगी अहमदनगरच्या किल्ल्यात कारावासात केली.इतके होऊनही न तात्यांनी पेशव्यांच्या अधिकाराला आव्हान देणे थांबवले न तीस लाख रुपयांचा दंड भरला.कारावासातून पत्रव्यव्हारातून ते पेशव्यांच्या दंड ठोठावण्याच्या अधिकाराला आव्हान देत राहिले.थो.माधवरावांची सहनशक्ती संपल्यावर त्यांनी तात्यांस अहमदनगरहून पुण्यात आणले.या वेळी पण भर दरबारात तात्यांनी वाकतांडव करून पेशव्यांचा अपमान केला.सहनशक्तीचा कडेलोट होऊन थो.माधवरावांनी तात्यांना छडीने ते रक्तबंबाळ होईपर्यंत झोडपले.तात्यांचा मुलगा यशवंत जो होळकरांचा वकील म्हणून पुणे दरबारात होता,ह्याने तात्यांना समजावून सांगण्याचा अतोनात प्रयत्न केला पण तात्या त्यास बधले नाही.

संधी मिळताच राघोबा दादांच्या मदतीने सरकारी महसुलातील ९६ लाख रुपये जमा न करता तात्या पुण्यातून निसटण्यात यशस्वी झाले.पण पेशव्यांनी ताबडतोब ढालाइत पाठवून तात्यांस पकडून त्यांची रवानगी पुन्हा कारागृहात केली.तीन वर्षे कैदेत हाल अपेष्टा सोसल्यावर तात्यांनी पुत्राचा सल्ला मान्य करून दंडाची तीस लाख तसेच थकीत वसुलाची ९६ लाख रुपयांची रक्कम पुणे दरबारात भरली. अहिल्याराणी होळकरांच्या शब्दास मान देऊन थो.माधवरावानी फेब्रुवारी १७७२ मध्ये तात्यांना कैदेतून मुक्त केले.पण तात्यांचा कुरापती,उचापती करण्याचा स्वभाव काही करता जायीना.शेवटी थो.माधवरावांनी तात्यांच्या यशवंत ह्या पुत्रास सोडून चंद्रचूड घराण्यातील सर्व त्रासदायक पुरुषांना कैदेत ठेवले.तात्यांचा ज्येष्ठ पुत्र यशवंत उर्फ दादाजी ह्यास रु. ६०००० ची जहागीर देऊन आपल्या जवळ ठेवला.

एके काळी आपल्या हुशारी,कर्तृत्व,राजकीय कौशल्याने मराठेशाहीत तसेच उत्तर हिंदुस्तानातील विविध राज सत्तांमध्ये मानाचे स्थान मिळविणाऱ्या राजकारण धुरंधर, मुत्सद्दी तात्यांचे राघोबा दादांच्या नादी लागल्याने तसेच जिद्दी व हट्टी स्वभावामुळे कैदेतच हालअपेष्ठा सोसत कैदेतच २० मार्च १७७४ रोजी निधन झाले.

संदर्भ:

१-मराठी रियासत-ले.गो.स.सरदेसाई खंड चार आणि पाच,
२-ऐतिहासिक लेखसंग्रह:ले.सरदार आबासाहेब मुजुमदार
३-पेशवे-ले.श्रीराम साठे.
४-प्रवीण शिरसुंदर—गंगोबा तात्यांच्या निम्बगाव येथील गढीची छायाचित्रे.(ऐतिहासिक वाडे व गढी-फे.बु.समूहावरील ६ ऑक्टोबर २०२०)

प्रकाश लोणकर

Leave a comment