गंगामध्यमेश्वर मंदिर, नांदूरमध्यमेश्वर

गंगामध्यमेश्वर मंदिर, नांदूरमध्यमेश्वर

गंगामध्यमेश्वर मंदिर, नांदूरमध्यमेश्वर –

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात निफाड पासून ११ कि.मी. अंतरावर पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेले नांदूरमध्यमेश्वर हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर गाव वसले आहे. इथेच गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर बंधारा बांधण्यात आला आहे. येथील पक्षी अभयारण्या प्रमाणेच मृगव्याधेश्वर, गंगामध्यमेश्वर, बाणेश्वर या पुरातन मंदिरामुळे तसेच ऐतिहासिक व पौराणिक महात्म्यामुळे नांदूरची ओळख सर्वदूर आहे.(गंगामध्यमेश्वर मंदिर)

गावचे ग्रामदैवत गंगामध्यमेश्वर महाराजांचे मंदिर गोदापात्रात एका टेकडावर भक्कम अशा पंधरा ते वीस फूट उंच तटबंदीच्या आत उभे आहे. नदीच्या पाण्यापासून मंदिराचे संरक्षण व्हावे, हा हेतू यामागे असावा. नदी पात्रात मधोमध हे मंदिर असल्याने याला मध्यमेश्वर म्हटले गेले असावे. मंदिराच्या तटबंदीचे प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याप्रमाणेच आहे. आत प्रवेश केल्यावर साधारण २०-२५ फूटी दीपमाळ आपल्या नजरेस पडते. या दीपमाळेवर मराठी शिलालेख आहे. या शिलालेखात मौजे नांदूर असा उल्लेख आहे. म्हणजेच गावाचे नाव पूर्वी फक्त नांदूर असेच होते. मध्यमेश्वर मंदिरामुळे आता नांदूरमध्यमेश्वर म्हटले जाऊ लागले असावे.

मध्यमेश्वर मंदिरासमोर नंदी, मंदिरातील शिवलिंग अन प्रवेशद्वारावर असणारी मारुतीरायाची सुंदर मूर्ती  पाहण्यासारखी आहे. हरणाचा पाठलाग करतांना मध्यमेश्वर मंदिरात श्रीराम आल्याची दंतकथा सांगितली जाते. गाभाऱ्यात दक्षिणोत्तर शिवलिंग आहे. जागृत देवस्थान म्हणून गंगामध्यमेश्वर मंदिर प्रसिद्ध असून येथे दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते. येथे येणाऱ्या पर्यटकांना पक्ष्यांप्रमाणेच गावातील प्राचीन मंदिरांचे पर्यटनही करविता आले तर हे नंदनवन खऱ्या अर्थाने अनुभवल्याचा आनंद पर्यटकांना होईल.

संदर्भ – “वेशीवरच्या पाऊलखुणा” श्री रमेश पडवळ

©️ रोहन गाडेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here