महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

गड कोट दुर्ग

By Discover Maharashtra Views: 2699 10 Min Read

गड कोट दुर्ग –

महाराष्ट राज्याची उभारणी कशी केली हे सांगताना रामचंद्र अमात्य आज्ञापत्रात म्हणतात “ हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामिनी गडावरूनच निर्माण केले. गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्याचे बळ गडकोट म्हणजे राजलक्ष्मी गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षक . शिवकालीन युद्ध पध्तीत संरक्षणाच्या दृष्टीने गड कोट दुर्गाना अत्यंत महत्वाचे स्थान होते . “संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग“ असे मानले जात होते . “दुर्गे नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय , भग्न होऊन देश उध्वस्त होतो. देश उध्वस्थ जाल्यावरी राज्य कोण्हास म्हणावे ? . या करिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी दुर्गे बांधून देश शाश्वत करून घेतला , आले परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार झाले.“(गड कोट दुर्ग)

राजा हे मस्तक , मंत्री हे मुख, धन आणि सैन्य हे भूज , बाकीचे सारे राष्ट्र ( प्रजा ) हे शरीर , मित्र हे सांधे आणि दुर्ग हे त्यामधील अत्यंत दृढ हाडे होत. शिवभारतातील हे दुर्गांचे वर्णन गड किल्याचे त्या काळातील महत्व विषद करते . गड ,कोट , दुर्ग अश्या विविध नावांनी इतिहासात आपल्याला किल्यांच्या अस्तित्वाचे दर्शन घडते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग ( सागरी किल्ले ) , गिरिदुर्ग ( डोंगरी किल्ला ) , भुईकोट ( गढी ) असे अनेक दुर्ग व किल्ले युद्धात जिंकून स्वराज्यात सामील केले तर काही नवीन किल्यांची निर्मिती करून किल्यांची अभेद्य संरक्षक साखळी स्वराज्याभोवती उभी केली . सभासद बखरकार याबाबत लिहितो ” पुढे ज्या ज्या मुलखात आदिलशाही , निजामशाही गड होते तितके घेतले. कित्तेक डोंगर बांके जागेत होते ते गड वसविले. जागोजाग गांवावरी मुलखांत नूतन गड वसविले. गडाकरिता मुलुक जप्त होतो असे समजून गड बांधिले.” छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती या गडावरुंनच केली .

छत्रपती शिवाजी महाराजांना या गडकोटांन बद्दल असलेला विश्वास व गडकोटांनबद्दल महाराजांची दुरदुष्टी आपल्या त्यांच्या विचारातून जाणवते “ दील्लीद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवेजुने तीनशे साठ किल्ले हजेरीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी पुरी दख्खन काबीज करावयास आलामगीरास तीनशे साठ वर्ष पाहिजेत .” महाराजांनी भविष्यातील औरंगजेबाचा धोका ओळखून दक्षिणदिग्विजायची मोहीम हाती घेतली व जिंजीसारखा अभेद्य दुर्गम दुर्ग स्वराज्यात सामील करून रायगड ते जिंजी अशी अभेद्य दुर्गांची साखळी उभी केली . छत्रपतींचे हे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब अफाट सैन्य, दारुगोळा , तोफा व प्रचंड खजिना घेऊन दक्षिणेत आला परंतु गड कोट दुर्गांच्या अभेद्य साखळीने औरंगजेबाचा स्वराज्य नामशेष करण्याचा मनसुबा धुळीस मिळवला .

“दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानीत नाहीत , तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय. प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळे प्रभू दुर्गम होतो. दोघांच्या अभावी शत्रूच दुर्गम होतो.” शिवभारतातील दुर्गाच्या ह्या वर्णनाचे प्रत्यंतर आपणास नाशिकजवळील रामसेज या किल्याच्या लढाईत जाणवते. औरंगजेबाने संभाजी महाराजांची कोंडी करावी व मराठ्यांच्या स्वराज्यातील किल्ला मुगली अंमलाखाली आणून दक्षिणेतील मोहिमेची सुरवात विजयाने करावी या आशेने नाशिकजवळील रामसेज किल्ला जिंकण्यासाठी मार्च १६८२ साली रामसेजला वेढा दिला . रामसेजच्या किल्लेदाराने सलग पाच वर्ष किल्ला झुंजवत ठेवला. किल्यावरील स्वराज्याचे भगवे निशाण डौलाने फडकत होते .

इ.स. १६६३ मध्ये शिवाजी महाराजांनी मुगल सैन्याच्या अधिकाऱ्यास पत्र लिहून त्याचे स्वराज्य जिंकण्याचे स्वप्न या गड कोटांमुळे पूर्ण होऊ शकत नाही याची जाणीव करून दिली . “ आमच्या या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचविणे कठीण आहे . मग तो प्रदेश काबीज करण्याच्या गोष्टी कशाला ! भलत्याच खोट्या बातम्या लिहून पाठवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही .! कल्याणी व बेदरचे किल्ले उघड्या मैदानात होते ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. नदीनाले उतरून जाण्यास वाट नाही .

अत्यंत मजबूत असे साठ किल्ले आज माझे तयार आहेत पैकी काही समुद्रकिनाऱ्यालगत आहेत. बिचारा अफझलखान जावलीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला . हा सर्व प्रकार आपल्या बादशहास का कळवीत नाहीत. अमिरूल उमराव शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबी डोंगरात पाताळास पोह्चणाऱ्या खोऱ्यात तीन वर्ष सारखा खपत होता. “ शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याला काबीज करतो असे बादशाहाकडे लिहून लिहून थकला .ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला.

शिवाजी महाराजांनी इ.स. १६७१-७२ मध्ये दोन जाबिता ( ठराव ) मंजूर केले त्याद्वारे स्वराज्यातील गड कोट दुर्गांची व्यवस्था व भविष्यकाळातील युद्धप्रसंगी किल्यांस या संकटांकाळी लागणाऱ्या रक्कमेची तरतूद केली. शिवाजी महाराजांनी गडदुर्गांच्या तत्कालीन डागडुजीसाठी इ.स. १६७१-७२ मध्ये १ लाख ७५ हजार होन इतकी मोठी रक्कम राखून ठेवण्याचा ठराव केला. तसेच भविष्यात मोगलांच्या आक्रमणाच्या शक्यतेचा विचार करून मोगल आक्रमणाच्यावेळी किल्यांचा आधार घ्यावा लागणार त्यासाठी १ लाख २५ हजार होन इतकी मोठी रक्कम भविष्यातील तरतुद म्हणून राखून ठेवण्याचा ठराव केला . जेव्हा मोगली फौजा किल्यास वेढा घालून बसतील त्यावेळी बाहेरून येणाऱ्या मदतीवर किल्ला लढवला जाऊ शकेल . अश्या युद्धप्रसंगी महालोमहाली खजिना करावा आणि त्या पैशामधुन वेढा पडलेल्या किल्यास मदत पाठवावी . सदर पैश्यांचा उपयोग युद्धप्रसंगीच करावा इतर वेळेच्या खर्चासाठी तसेच राज्यकारभार चालविण्यासाठी या पैशांचा उपयोग करू नये अशी सक्त ताकीद दिली. भविष्यातील हि तरतूद एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवण्यात आली.

शिवछत्रपतींच्या राजव्यवहार कोशातील दुर्गवर्ग या सातव्या अध्यायात किल्यांच्या प्रकाराचा उल्लेख करून किल्ल्यांची माहिती दिली आहे . त्यात तट , बुरुज , माची, खंदक , बालेकिल्ला इ. किल्याच्या बाह्यरूपाची माहिती दिली आहे. किल्यावर हल्ला होत असताना किल्यावरील संरक्षण व्यवस्था कशी असावी याविषयी माहिती दिली आहे. किल्याच्या डागडुजीसाठी व किल्याच्या देखभालीसाठी असणारे अधिकारी व कामगारवर्ग तसेच किल्याच्या बांधकामास लागणारी सामुग्री याचे वर्णन आले आहे . किल्यावर असणारे कारखाने व राजवाडे व इतर सुखसोयी यांसाठी उपयोगी पडणारी अवजारे यांची माहिती देण्यात आली आहे.

जोपर्यंत गड पडत नाही तोपर्यंत राज्य कोसळत नाही याची जाणीव शिवाजी महाराजांना होती . महाराजांनी गडाची व्यवस्था चोख ठेवली होती. सभासद म्हणतो “ गडावरी लोक हवालदार व सरनौबत मराठे जातिवंत ठेवावे . त्यास जमीन आपले हुजरातीस लोक असतील त्यापैकि घेऊन मग ठेवावे. सबनीस ब्राम्हण हुजरातीचे ओळखीचेच ठेवावे व कारखानीस प्रभू ठेवावे. असे एकास एक प्रतीमेळ ठेवावे . एक हवालदाराचे हाती किल्ला नाही. “ गडाचे मुख्य अधिकारी म्हणजे हवालदार , सरनौबत , आणि कारखानीस असे होते. या तिघांच्या विचाराने गडाचा कारभार चाले. गड फितुरी करून शत्रूच्या ताब्यात द्यावयाचा झाल्यास हे तिघेही अधिकारी फितूर व्हावे लागत.

आज्ञापत्रात गडाची देखभाल व सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी याचे विवेचन रामचंद्र अमात्य यांनी केले आहे. गडावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असत. गडावरील हवालदार ३ वर्षांनी , सरनौबत ४ वर्षांनी तर सबनीस व कारखानीस ५ वर्षांनी बदलला जाई . गडावरील हवालदार प्रसंगी मृत्यू पावला तरी त्याच्या नातलगांना पिढीजात सरनौबत करत नसत . गडकोटा जवळील वतनदारांना गडकोटाची देखरेख करण्यास मनाई होती. गडावरील चोरी करणाऱ्या किंवा कामचुकार करणाऱ्या व्यक्ती तसेच भांडखोर व्यक्तीस तत्काळ शिक्षा केली जात असे किंवा तत्काळ कामावरून काढून टाकण्यात येई. गडास शत्रूचा वेढा पडल्यास गडात साधनसामुग्री व सैन्यबळ असेल तोपर्यंत गड झुंजवावा अन्यथा लोकांचा जीव वाचवावा यासाठी तह करावा. लढाईत धरातीर्थी पडणाऱ्या सैनिकांच्या परिवारांचे पालनपोषण सरकारी खर्चातून केले जाई. गडावरील झाडे झुडपे न तोडता त्यांचे जतन केले जाई. गडावर पाण्याची उपलब्धता पाहून गड बांधला जाई . गडावर साफ सफाई ठेवली जाई . गडावर अन्नधान्याचा पुरेसा साठा करून अन्नधान्याचा साठ्यास किडे , कीटक , आग व उंदीर यांच्यापासून सुरक्षित ठेवला जाई.

गड कोट दुर्गां विषयी शिवाजी महाराजांच्या मनातील धारणा विजापूर कवी नुस्त्रतीने त्याच्या शब्दात वर्णिले आहे . हा प्रदेश माझ्या ( शिवाजीच्या ) जीवाची आशा आहे. तो माझ्या आडोशाचे घर आहे. हे अरण्य , वन व डोंगर हि माझी सेना होय. जेथपर्यंतसुद्धा ही अशी जितकी भूमी आहे तेथपर्यंत सुद्धा माझे गड आहेत. हि झडती व टेहाळणीची माझी ठिकाणे होत. नद्या आणि नाल्यांच्या खंदकांचे ते आधार होत. या सेवकाचे हरप्रकारच्या झाडांच्या जाळ्यांचे कोटकील्ले आहेत. सैन्याचा व्यूह म्हणजे माझे प्रत्येक झुडूप. सदासर्वदा ते सहस्त्रावधी खंजीर बनून भोसकत असतात. ते अटकाव करून सक्त परेशान करतात. माझे प्रत्येक झाड म्हणजे माझा दुर्दम्य अटळ असा शिपाई होय.

प्रत्येक झाड हे अल्बुर्ज पर्वताप्रमाणे संरक्षक आहे. ( अल्बुर्ज पर्वत ईराणच्या उत्तरेस कास्पियन समुद्राच्या दक्षिणेस . उंची १९००० फुट ) . हिंदकोट झाड म्हणजे प्रसिद्ध योद्धा रुस्तमच्या हातातील खड्ग होय. जर वेलीयुक्त वृक्षाने फासा टाकला तर तो घोडेस्वार व घोडा दोघांनाही कैद करून ठेवतो. ज्यावर डोंगर एका घोड्यासारखा दिसतो असा तो छोटासा भाग पण त्यात लपविण्यासाठी सर्व जग थोडे दिसते. हा प्रदेश न्हवे , ती एक अपूर्व प्रेयसी आहे कि जी प्रियकराची रक्तपिपासू आहे. जरी या अंधकारमय प्रदेशात सहस्त्रावधी अमृत कुंभ आहेत आणि एखादा सिकंदर सुद्धा जर आत प्रवेशला तरी तो बाहेर पडू शकत नाही.

नागेश सावंत.

Leave a comment