महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

दांडा कित्तल कोट

By Discover Maharashtra Views: 3510 3 Min Read

दांडा कित्तल कोट

पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकापासून ९ कि.मी व केळवे गावातून १ कि.मीवर दांडा खाडी आहे. केळवे स्थानकात उतरुन रिक्षाने अथवा एस.टीने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरावरुन बाजाराकडून पुढे जाताना दांडाखाडी पूल ओलांडल्यावर उजव्या हातास गावामध्ये दांडा कित्तल कोट चे फारच थोडे अवशेष उरलेले आहेत आणि ते अवशेषही तीन भागात गावभर विखुरलेले आहेत. दोन ठिकाणचे अवशेष बुरुजासारखे असुन दुमजली आहेत. यातील एक बुरूज षटकोनी आकाराचा असुन दुसरा गोलाकार आहे. तिसऱ्या ठिकाणच्या अवशेषात एका भल्यामोठ्या वाड्याचा पाया आढळून येतो. हा पोर्तुगीजांच्या गव्हर्नराचा वाडा होता.

पोर्तुगीजांचे कायदे ज्या वास्तूत तयार होत त्याची अवस्था आज शौचालय व कचऱ्याचा डब्बा याप्रमाणे झाली आहे. या अवशेषांजवळ असणारी वस्ती मुस्लिमबहुल आहे. सध्या दांडा कित्तल कोटाचा वापर स्थानिकांकडून शौचालय म्हणून करण्यात येत असल्याने किल्ला पाहणे म्हणजे एक आव्हानच आहे. दांडा खाडी किनारी झाडाझुडुपात दांडा कित्तल कोट गुरफटला आहे. सदर कोटातील उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट एक वखारच आहे. याच्या सभोवतालच्या संरक्षक भिंती पडून गेल्याने याचे स्वरूप बदललेले आहे. दांडा परिसरातील जलमार्गाने आलेल्या मालाची साठवण करण्यासाठी या वास्तूची निर्मिती करण्यात आलेली असावी. दांडा परिसरातील गढय़ा, कोट, वास्तू खाडीच्या समांतर रेषेत बांधण्यात आलेले आहेत. या कोटाच्या बांधकामात आढळणारी विशेष बाब म्हणजे खोबणीयुक्त विभाग वा दालन. याच्या अंतर्गत भागात भिंतीला समांतर अशी बैठकीची व्यवस्था आहे व इतर भागात मालाची साठवण करण्याकरिता मोकळी जागा आहे.

दांडा गावाच्या परिसरात एकूण चार विभागात पोर्तुगीजकालीन अवशेष असल्याने सदर किल्ल्यांच्या नावाविषयी गोंधळ होतो. केळव्याहून भवानीगडाकडे जाताना दांडा खाडीपूल ओलांडल्यावर डाव्या हाताचे अवशेष म्हणजे दांडा कोट तर उजव्या हाताला गावात विखुरलेले अवशेष म्हणजे दांडा कित्तल कोट. ह्या भागातील इतर किल्ल्यांबरोबरच पोर्तुगिजांनी हा कोट बांधला होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. किल्ला छोटेखानी असून पंधरा ते वीस मिनिटात पाहून होतो. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या वखारी व टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता.

इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. दांडा या प्रदेशाचा प्राचीन संदर्भ उल्लेख ‘दांडा ऋशादिगण’ असा आहे.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment