महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

डहाणु

By Discover Maharashtra Views: 3536 3 Min Read

डहाणु

पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने डहाणू स्थानकास उतरावे. डहाणू रोड स्थानकापासून साधारण सहा-सात किमीवर हा किल्ला उभा आहे. डहाणू स्थानकाहून १० मिनिटात किल्ल्यापाशी पोहोचता येते. डहाणू किल्ला खाडीच्या मुखावर वसलेला असुन किल्ल्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस असणाऱ्या खाडीमुळे किल्ल्याला नैसर्गिक सरंक्षण लाभलेले आहे.डहाणू खाडीच्या उत्तर तीरावर मोठा डहाणू नावाचा भाग आहे त्याला लागूनच हा किल्ला बांधला आहे.खाडीच्या दक्षिणेकडे मुख्यतः कोळी समाजाची वस्ती आहे. सध्या या किल्ल्याचा वापर तहसीलदार कार्यालयासाठी होत असल्याने किल्ल्यावर मोकळेपणाने फिरता येत नाही.

इ.स.पहिल्या शतकापासून डहाणू प्रांताचा प्रसिद्ध बंदर असे संदर्भ मिळतात.प्राचीन काळी डहाणू हे एक मोठे बंदर होते. नाशिकच्या गुहांमधे डहाणुका शहर व नदीचा उल्लेख सापडतो. नहपान राजाचा जावई उशवदत्त ह्याने डहाणू खाडीतून होडीमार्गे जाण्याची सोय केली होती असाही उल्लेख आहे.दमन व तारापूर यातील समुद्री दळणवळणावर नजर ठेवण्यासाठी डहाणू किल्ला महत्वाची भूमिका निभावत होता. पोर्तुगीजांच्या समुद्री दस्तकांचा धाक पाहणारा हा इतिहासाचा मूक साक्षीदार आहे. पोर्तुगीजांनी इ.स.१५३४च्या तहाद्वारे गुजरातच्या सुलतानाकडून डहाणू प्रांत ताब्यात घेतला.पुढे डहाणू बंदराचे महत्व लक्षात घेऊन कॅप्टन नोसा सेन्होरा दा ऑगस्टीया याने डहाणू किल्ला बांधला. सन १६३४ च्या एका नोंदीत नोस्सा सेनोरा दे च्या पुतळ्याचा संदर्भ सापडतो पण सध्या तसा कुठलाही पुतळा आपल्याला तिथे दिसत नाही.शिवाजी महाराजांच्या काळात डहाणुवर पोर्तुगीजांचे राज्य होते.

मुघलांनी १५८२ मधे त्यावर आक्रमण केले होते पण ते परतवले गेले.१६८३ च्या मे महिन्यात संभाजी महाराजांनी डहाणू प्रांतावर हल्ला चढवला होता. चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत १७३९ साली डहाणू किल्ला मराठ्याकडे आला.सन १८१८च्या इंग्रज-मराठा करारानंतर डहाणूचा किल्ला इंग्रजांकडे गेला आणि नेहमीप्रमाणेs ब्रिटीशानी किल्ल्याची नासधूस केली.इ.स.१८६२च्या नोंदीप्रमाणे डहाणू येथे पडीक विहीर असलेला व झाडी मातलेला एक भक्कम किल्ला होता.इ.स.१८८८ मध्ये येथे पोलीस व तहसील कार्यालय उभारण्यात आले. डहाणू किल्ल्याच्या ब्रिटीश कालखंडात जुन्या वास्तू नामशेष करण्यात आल्या व नवीन इमारती बांधण्यात आल्या.ह्या किल्ल्याला दोन प्रवेश आहेत व मुख्य प्रवेशदार उत्तरेकडे आहे. चार भक्कम बुरुज व इतर अवशेषात चार तोफा ( दोन मुख्य प्रवेशद्वारात तर दोन पाठी कस्टम कार्यालय आवारात),एक विहीर ,दोन दरवाजे, देवड्या यांचा समावेश होतो.

सन १८१८ च्या एका इंग्रजी साधनात ह्या किल्ल्याला तीन मीटर रुंद व ११-१२ मीटर उंच तट,चार देखणे मनोरे व भक्कम बांधकामाचे बुरूज असल्याचे म्हटले आहे. इतिहासातील नोंदीप्रमाणे या किल्ल्याच्या शिबंदीत एक कप्तान,काही पोर्तुगीज,दोन कार्पोरल, तीन संदेशवाहक ,दोन अरबी घोडेस्वार, काही ख्रिस्चन कुटुंबे तसेच काही शिकारी ससाणे असल्याचे उल्लेख मिळतात. किल्ल्याचे सध्याचे स्वरूप व इतिहास याचा मागोवा घेत गडफेरी पुर्ण करावी लागते.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment