शिवछत्रपतींचे परदेशी लोकांबद्दलचे कुतूहल !

शिवछत्रपतींचे परदेशी लोकांबद्दलचे कुतूहल !

शिवछत्रपतींचे परदेशी लोकांबद्दलचे कुतूहल !

आपल्या देशात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांबद्दल आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते. एखादा फॉरेनर रस्त्यावरून चाललेला  दिसला की आपसूकच माना त्याच्याकडे वळतात . हल्ली  परदेशी  लोक  भारतात सर्रास येऊ लागल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या आणि आपल्या पेहरावामध्ये आणि राहण्या-खाण्याच्या सवयींमध्ये आता फारसा फरक न राहिल्यामुळे म्हणा , आता हे कुतूहल काही अंशी कमी झालेले दिसते.  परंतु १७ व्या शतकात हे परदेशी लोक जेव्हा भारतात येत असत, तेव्हा इथल्या स्थानिक लोकांना त्यांच्याकडे पाहून निश्चितच नवल वाटत असणार ! युरोपियन लोकांचा तांबूस गोरा वर्ण , इथल्या लोकांपेक्षा वेगळे असणारे त्यांचे पोशाख , खाण्यापिण्याच्या सवयी हे सर्व पाहून,  हे लोक दुसऱ्याच एखाद्या  दुनियेतून येथे येत असावेत असाच स्थानिक लोकांचा समज होत असेल  !शिवछत्रपतींचे परदेशी लोकांबद्दलचे कुतूहल!

सामान्य लोकांप्रमाणेच  ज्या  राजेरजवाड्यांच्या भेटी हे परदेशी लोक घेत , त्यांना देखील असेच कुतूहल या लोकांबद्दल वाटत असेल पाहिजे. शिवाजी महाराजांना देखील या लोकांबद्दल असेच कुतूहल वाटत होते हे आपल्याला इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या हकीगतींवरून समजते. असाच एक प्रसंग “English Factory Records on Shivaji” या  पुस्तकात त्या काळी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेल्या इंग्रजांनी नोंदविला आहे. २० एप्रिल १६७५ रोजी केलेल्या नोंदीत या प्रसंगाचे वर्णन आढळते.

शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आलेले काही इंग्रज अधिकारी, राजापूरजवळ एका झाडाखाली आपले तंबू ठोकून  महाराजांची वाट बघत बसले  होते. काही वेळाने महाराज तेथे आले आणि या इंग्रजाना पाहून त्यांनी आपली पालखी थांबवली. पुढे हा इंग्रज अधिकारी लिहितो , ” शिवाजी राजाने आम्हाला जवळ बोलावले ; आम्ही पालखी जवळ गेलो आणि पालखी पासून थोड्या अंतरावर थांबलो. हे पाहून शिवाजी राजाने आम्हाला हाताच्या खुणेने आणखी जवळ बोलावले. आम्ही त्याच्या अगदी जवळ जाताच, त्याने माझ्या डोक्यावरील पेरीवीग मधील केसांना हात लावून पाहिला व आम्हाला अनेक प्रश्न विचारले.”

त्याकाळी बरेच युरोपियन लोक कृत्रिम केसांचा टॊप आपल्या डोक्यावर घालत, त्याला पेरीवीग असे  म्हणत असत. महाराजांनी या इंग्रज माणसाला काय प्रश्न विचारले हे तो सांगत नाही, परंतु महाराजांना  त्याच्या या कृत्रिम केसांच्या टोपाचे  अप्रूप वाटले असावे व कदाचित त्यांनी , “हे काय आहे ?” “तुम्ही हे कशासाठी घातले आहे ?” “तुमच्या देशातले  सगळे लोक असा टोप घालतात का ?” असे काही प्रश्न महाराजांनी त्यांना विचारले असावेत !

संदर्भ :-
१) “English Factory Records on Shivaji 1659-1682 “- पृष्ठ क्र . ४५ (https://archive.org/…/EnglishFactoryRecordsOnShivaji…)

चित्र :- पेरीवीग घातलेला युरोपियन.

लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here