महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व काही गैरसमज

By Discover Maharashtra Views: 4205 8 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व काही गैरसमज –

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेख ६ जून १६७४ रोजी रायगडावर वैदिक पद्धतीने , वेदमंत्रांच्या उद्दघोष्यात गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. गागाभट्टानि राज्याभिषेखाचे विधी भोसल्यांचे कुलोपाध्ये व पूरोहित बाळंभट्ट यांच्या हस्ते करविले. कुलोपाध्ये बाळंभट्ट यांच्या मदतीस सर्व वेदांचे व शाखांचे विद्वान ब्राम्हण आमंत्रित केले. सदर राज्याभिषेकाविषयी काही गैरसमज जनमानसात आढळून येतात

( १ ) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास महाराष्ट्रातील ब्राम्हणांचा विरोध ?.
( २ ) शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व
( ३ ) राज्याभिषेकातील अपमानास्पद विधी ?

( १ ) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेखास महाराष्ट्रातील ब्राम्हणांचा विरोध ?.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याची प्रेरणा कोणाची याबाबत निरनिराळ्या साधनात मतमतांतरे आढळून येतात . सभासद बखरीनुसार “ भट गोसावी यांच्या मते मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले.” शेडगावकर बखरीनुसार गागाभट्टानी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाविषयी प्रेरणा दिली. चिटणीस बखरीनुसार “पूर्वयुगी राजे धर्म व नितीकरून राज्य करीत आले तसे आपण करावे म्हणून शिवाजी महाराजांनी दृढसंकल्प केला.” शिवदिग्विजय बखरीनुसरा बाळाजी आवजी चिटणीस यांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाविषयी सूचना केली.

गागाभट्ट म्हणजे कलीयुगीचे ब्रम्हदेव. वेद , शास्त्र , ज्योतिषी व मांत्रिक योगाभ्यासाचे विद्वान पंडित. गागाभट्ट यांचे घराणे हे महाराष्ट्रातील पैठणचे. पंधराव्या शतकात आलेल्या दुष्काळ व परचक्रामुळे गागाभट्टाचे पूर्वज काशीस गेले व तेथेच स्थायिक झाले. गागाभट्टाचे पणजोबा नारायणभट्ट यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. गागाभट्टाचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट परंतु त्यांचे वडील दिनकर उर्फ दिवाकर भट्ट लाडाने गागा असे म्हणत . गागाभट्टानी मीमांसाकुसुमांजली आदि मीमांसा व धर्मशास्त्र या विषयावर ग्रंथ लिहिले. काशीतील धर्मपुजेचा मान गागाभट्टाच्या घराण्यास होता. राजपुतान्यातील अभिषेकसमारंभ गागाभट्टाच्या घराण्याकडून होत असत. गागाभट्टानी “ राज्याभिषेक प्रयोग” व “ तुलापुरुष दानविधी “ या दोन ग्रंथांची निर्मिती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी केली. गागाभट्टानी क्षत्रिय धर्माचे पालन करणाऱ्या परंतु काळाच्या ओघात धर्मसंस्कार लुप्त झालेल्या शिवाजी महाराजांचा व्रतबंध विधी करून वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केला.

शिवाजी महाराजांनी गागाभट्टास एक लक्ष रुपये दक्षिणा , वस्त्र व अलंकार देवून आशीर्वाद घेतले. सर्व ॠत्विक यांस पाच सहस्त्र रुपये दक्षिणा वस्त्रे व अलंकार दिले. पुरोहीतांस आभूषणे व दक्षिणा देण्यात आली. राज्याभिषेकानंतर चार दिवस दानधर्म सुरु होता.

शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील कोणत्याही ब्राम्हणाकडे राज्यभिषेक करावा असा आग्रह केल्याचा कोणत्याही नोंदी नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राम्हणांनी राज्याभिषेकास नकार देण्याचा प्रश्नच न्हवता . महाराष्ट्रातील तत्कालीन ब्राम्हण समाजास राज्याभिषेक विधीचे कोणतेही ज्ञान न्हवते कारण महाराष्ट्रात कित्येक शतक राज्यभिषेक घडून आला न्हवता.

सुरतकर इंग्रज १६ जुलै १६७४ च्या पत्रात लिहितात : शिवाजीच्या जूनमधील राज्याभिषेक प्रसंगी निदान वीस हजार ब्राम्हण व त्याचे सर्व अमलदार होते.”

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास महाराष्ट्रातील ब्राम्हणांचा विरोध होता यास कोणताही संदर्भ नाही.

( २ ) शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व –

भोसले घराणे हे रजपूत “ सिसौदिया “ घराण्याची शाखा आहे आहे हे त्यावेळच्या जनसामान्यांना माहित असल्याचे व स्वतः भोसले घराण्यास माहित असल्याचे दिसून येते. उत्तरेतून महाराष्ट्रात आलेले कवी भूषण आपल्या काव्यात लिहितात

राजत है दिनराज को बंस अवनी अवतंस / जामे पुनि पुनि अवतरे कंसमथन प्रभू अंस //
महावीर ता बंस मे भयौ एक अवनीस / लियौ बिरद सिसौदियौ दियौईस को सीस //
ता कलमे नृपवृंद सब उपजे बखत बिलंद / भूमिपाल तिनमे भयौ बडौ माल मकरंद //

या भूमीस आभूषण ठरणारा हा असा तुझा श्रेठ वंश पृथ्वीस शोभतो कंसमर्दन करणाऱ्या त्या प्रभूचा अंश परत परत तुझ्या कुळात अवतार घेतो. महावीरांच्या या वंशात एक पृथ्वीपती जन्माला आला. त्यास सिसोदिया असे बिरूद मिळाले. कारण ईश्वराला त्याने आपले शिरकमल वाहिले होते. या कुळातील नृपनरेश अतिशय भाग्यवान होते त्या कुळात मालोजी नावाचा एक मोठा राजा झाला.

शहाजीराजे भोसले इ.स. १६५६ च्या पत्रात स्वतःचा उल्लेख रजपूत असा करतात “ तरी आपण रजपूत लोक अजी तलग पेशजीही दोघो चौ पादशाहित खिदमत केली “

समकालीन जयरामपिंडे राधामाधवविलास चंपू या ग्रंथात शहाजीराजांचे आडनाव भोसले असून वंशनाम शिसोदिया आहे असे नमूद करतो. शहाजीराजांचे उपनाम भोसले , वंश शिशोदे , वर्ण क्षत्रिय उर्फ रजपूत , गोत्र कौशिक अशी नोंद शहाजीराजांचा समकालीन जयराम पिंडे करतो.

विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या सभासद बखरीतील नोंदीनुसार मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांकडे निरोप पाठवला त्यात ते नमूद करतात “ तुम्ही शिसोदे रजपूत. आम्ही तुम्ही एकाचे एकच आहोत. तुम्ही भेटीस येणे.”

सभासद बखरीतील नोंदीनुसार “राजियांचे वंशाचा शोध करिता राजे शुद्ध क्षत्रिय शिसोदे उत्तरेकडून दक्षिणेस एक घराणे आले. तेच राजीयांचे घराणे असे शोधिले.”

सप्तप्रक्ररणात्मक चरित्रातील नोदी नुसार “ शिवाजी महाराज हे उदयपूरच्या राणाजींच्या घराण्यातील शिसोदे कुळातील वंशज , पुरुष पिढ्या लावून या प्रांती हिंदुस्थानातून आले. रजपूतराजवंश महाराष्ट्र देशी म्हराठे म्हणवितात.”

वरील विश्वसनीय नोंदीनुसार त्यावेळच्या उत्तरेतील व दक्षिणेतील लोकांना देखील भोसले घराण्याचे क्षत्रियत्व , रजपूतत्व , शिसोदियावंशत्व मान्य होते.

( ३ ) राज्याभिषेकातील अपमानास्पद विधी ?

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी ज्या शास्त्रसंमत विधी करण्यात आल्या त्यात महाराजांचा जाणूनबुजून अपमान करण्यात आला असा गैरसमज लोकांत पसरवण्यात काही प्रयत्नशील आहेत. शिवाजी महाराजांना जर कोणताही विधी जर अपमानास्पद वाटला असता तर त्यांनी त्यास विरोध केला असता व त्यास कठोर शासन केले असते . राज्याभिषेकावेळी गागाभट्टाने शिवाजी महाराजांस डाव्या पायाच्या अंगठ्याने मस्तकास टीळा लावला असा जावईशोध लावणाऱ्या इतिहासकारांकडे कोणताही समकालीन संदर्भ नाही. अश्या प्रकारचे कुतर्क करून आपण शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहोत.

शुद्ध क्षत्रिय आधी केला

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात काही तांत्रिक अडचणी होत्या त्यात प्रामुख्याने संस्कारलोपाची बाब प्रमुख अडसर होती. शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व सिद्ध होत असले तरी शास्त्रानुसार उपनयन संस्कार झाले न्हवते.

सभासद बखरीतील सदर नोंदीनुसार क्षत्रियांमध्ये व्रतबंध विधी होतो. परंतु शिवाजी महाराजांचा व्रतबंध विधी झाला न्हवता त्यामुळे उत्तरेतील क्षत्रियांचे व्रतबंध होतात त्याप्रमाणे व्रतबंध करावा . हा विचार आधी करून भट गोसावी यांनी राजियाचा क्षेत्री व्रतबंध केला. शुद्ध क्षत्रिय आधी केला. जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ जेष्ठ शुद्ध चत्तुर्थी ५ घटिका या वेळी शिवाजी महाराजांची मुंज झाली.”

शिवाजी महाराजांची मुंज उशिरा झाल्याबद्दल प्रायश्चित म्हणून ‘तुलादानविधी’ करण्यात आला. तुलादान म्हणजे यजमानाच्या वजनाचे सोने, रुपे, इत्यादि धातू व इतर जिन्नस हे दान देणे.

इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन नोंद करतो २९ मे रोजी शिवाजी महाराजांची तुला करण्यासाठी १६००० होण लागले. यात एक लक्ष होनाची भर घालून राज्याभिषेकानिम्मित गोळा होणाऱ्या ब्राम्हणांना त्याची खैरात वाटायची आहे.

शिवाजी महाराजांकडून युद्धमोहिमेत कळत नकळतपणे घडलेल्या ब्रम्हहत्या व इतर हत्यांच्या पापक्षालनार्थ प्रायश्चित म्हणून ‘तुलापुरुषदान‘ विधी करण्यात आला. तुलापुरुषदानविधित विष्णूच्या सुवर्ण मूर्तिची प्रतिष्ठा करून , होम झाल्यावर विसर्जन करून तिचे दान ब्राम्हणास करणे .

शुक्रवार २९ मे १६७४ रोजी झालेले मौजीबंधन व तुलापुरुषदानादी विधी ह्यांचा राज्याभिषेखाशी प्रत्यक्ष संबंध न्हवता. वरील सर्व विधी हे शास्त्रसंमत होते त्यामुळे या विधीतून शिवाजी महाराजांचा कोणताही अपमान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.(छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक)

श्री. नागेश सावंत

संदर्भ :- सभासद बखर
शिवकालीन पत्रसारसंग्रह
जेधे शकावली
राधामाधवविलासचंपू :- जयराम पिंडे
शिवभूषण :- निनाद बेडेकर
सप्तप्रक्ररणात्मक चरित्र
शिवाजी निबंधावली भाग १
छत्रपती शिवाजी महाराज :- वा.सी.बेंद्रे

छायाचित्र साभार गुगल

2 Comments