महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,74,490

रायगडावरील शिवछत्रपतिंच्या सिंहासनाची पेशवेकाळातील व्यवस्था

By Discover Maharashtra Views: 1498 6 Min Read

रायगडावरील शिवछत्रपतिंच्या सिंहासनाची पेशवेकाळातील व्यवस्था –

छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगडच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची आणि गौरवशाली घटना आणि शिवछत्रपतिंच्या तख्ताची म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वात महत्त्वाची आणि पूजनीय जागा. ६ जून १६७४ रोजी रायगडावर महाराज सिंहासनाधिश्वर झाले. पुढें इ.स. १६८९ मध्यें रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. नंतर १७३३ मध्यें रायगड श्रीपतराव पंतप्रतिनिधींच्या करवी छत्रपति शाहू महाराजांकडे आला. इ.स. १७७३ पासून रायगडची व्यवस्था पेशव्यांच्या हस्ते चालू झाली. इ.स. १७३५ पासून १७७२ पर्यंत रायगड तालुका हुजूरचा प्रदेश होता. शत्रूने स्वारी केल्यावर, त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती; पण कारभारी नेमणे, तालुक्याचे जमाखर्च पाहणे वगैरे गोष्टींबाबत पेशव्यांस अधिकार नव्हता. शाहू महाराजांनी या तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांच्याकडे दिला होता. १७७३ पासून मात्र रायगडची सारक व्यवस्था प्रत्यक्षात पेशवे बघू लागले.(रायगडावरील शिवछत्रपतिंच्या सिंहासनाची पेशवेकाळातील व्यवस्था)

इ.स. १७७३ मध्ये पेशव्यांनी रायगड आपल्याकडे घेतल्यावर त्याची व्यवस्था ठरवून टाकली. छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्त्व कमी झाले होते. पण तरीही पेशव्यांनी रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. पेशवे दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रें याची पुष्टी देतात. ह्या कागदपत्रांत शिवछत्रपतिंच्या सिंहासनाची जी व्यवस्था आढळते ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे.

इ.स. १७७३ मध्यें पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अशा बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे. १६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला. खर्चास सरकारी मंजुरी मिळत असे. त्यानंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसंभार जीर्ण झाल्यामुळे इ.स. १७८६-८७ मध्ये पुन्हा याच स्वरूपाचा खर्च झाला. नंतर १९ एप्रिल १७९७ रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला. यावेळी सिंहासनाच्या खांबास लाल मखमल वापरली होती.

इ.स. १७९७ मध्ये सिंहासनास २७३८ रुपयांचे कापड खर्ची पडले. त्या कापडाचा तपशील असा, १३९८ रु.चे किनखाप, ५३८ रु. गजनी, २०८ रु. ताफता, २५ रु. खारवा व ५७० रु.ची मखमल. हे कापड किती लांबीरुंदीचे लागले हेही गजवार दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबीरुंदी अजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असलेल्या चौथऱ्याच्या मोजमापाशी जुळते. कागदपत्रांत सिंहासनाच्या कापडाची लांबी ५ गज ४ तसू (अदमासे १५ फूट २ इंच) व रुंदी ४ गज ४ तसू (अदमासे १२ फूट) दिलेली आहे. प्रत्यक्षात सिंहासनाच्या चौथऱ्याची लांबी १३ फूट व रुंदी १२ फूट आहे. अर्थात कागदांतील कापड अधिक आहे. पण ते सिंहासनावर घालायचे कापड आहे त्यामुळे ते साहजिकच सिंहासनापेक्षा मोठेच असणार. यामुळे सिंहासनाच्या चौथऱ्याची स्थाननिश्चिती होते.

‘सिंहासन’ आणि ‘तख्त’ ह्या दोन वेगवेगळ्या संज्ञा होय. सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा, आणि तख्त म्हणजे त्या ओट्यावरील राजाने स्वतः बसावयाचे आसन. ह्या आसनावर शेला आणि गलेफ अशी दोन प्रकारची वस्त्रे घातली जायची. गलेफांतही दोन प्रकार होते. सिंहासनावर चौखांबी मंडप होता. ह्या मंडपाच्या खांबांना खारव्याचे अस्तर असलेल्या मखमलीचे वेष्टन असे व त्याचे माप नऊ गज म्हणजे २५ फूट होते. ह्या सिंहासनाच्या मंडपास छत म्हणजे झालर असलेला चांदवा लावलेला होता. हा चांदवा किनखापी आणि त्याची झालर ताफत्याची असायची. ह्या किनखापी चांदव्यास गजनीचे अस्तर असे.

दररोज संध्याकाळी सरकारी माणसे सिंहासनाजवळ जमून सिंहासनास मुजरा घालीत असत व तेथे दिवटी लावीत असत. तेथे रात्रभर दिवटी असे. गडावरच्या इतर काही ठिकाणांप्रमाणेच तख्ताजवळही रात्रभर दिवा जळत असावयाचा, असा शिरस्ताच होता. तख्ताजवळ मशालेस पोत म्हणूनही खर्च पडला आहे. ह्या सिंहासनाची दररोज पूजा होत असे. त्याचा ‘तख्त पुजारी’ म्हणून ‘महाराजांचे तख्ताचे पूजेस फरास’ असा निर्देश आला आहे.

सिंहासनाच्या व्यवस्थेचा आणखी विशेष म्हणजे सिंहासनासमोर दरवर्षी कीर्तन होत असे. हे कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याकडे वंशपरंपरागत होते. ह्या कीर्तनकारास जमीन इनाम दिली होती. हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथींस होत असे. उदाहरणार्थ, जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होई. इ.स. १७७८ मध्ये या उत्सवास १५ रु. खर्च आला. या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत. त्यास ५ रु. बिदागी मिळे.

सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच म्हणून नगारखाना इ.स. १७९७ पासून नाना फडणीसांनी सुरू केला. ह्यासंबंधीचा उल्लेख – “रा. बालाजी जनार्दन फडणीस माहाडास आले, ते तेथून किल्ला पाहाण्यास आले ते समई शिवाजी महाराजांचे तख्ताजवळ नगारखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सन सवा तिसैनापासून ठेविला.” सन सवा तिसैन म्हणजे शके १७१८, इ.स. १७९७. ह्या नगारखान्याच्या खर्चाची वार्षिक नेमणूक १३०० रु. असे. नाना फडणीसांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली, तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे – २ सुर्णाजी, १ तुतारजी, २ कर्णाजी, २ दमामजी, १ डफगर, १ झांजवाला, २ घड्याळजी, ३ नगारजी व पेलेदार, १ नगारे करणार इतकी माणसे कायम नेमली होती. इ.स. १८०७-०८ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन १२०० रुपये इतकेे होते.

तख्तापुढे सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठराविक वेळी गर्जत असे. तख्तापुढे दरवर्षी एक बकरे बळी म्हणून दिले जाई. सिंहासनाजवळ राजहुडा होता व तेथे स्वतंत्र पाहारा असे. सिंहासनाच्या चौथऱ्याची जपणूक एखाद्या दैवताप्रमाणे होत असे. अशा प्रकारे एखाद्या तेजस्वी आणि जागृत देवस्थानाप्रमाणे रायगडावरील शिवछत्रपतिंच्या राजसिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती.

– प्रणव कुलकर्णी.

संदर्भ ग्रंथ :
‘रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था’, शं.ना.वस्त,जोशी,वाईकर
‘रायगडची जीवनकथा’, शां.वि.आवळसकर
‘दुर्गभ्रमणगाथा’, गो.नी.दाण्डेकर

छायाचित्रे :
१. सिंहासनाचा चौथरा. हे दुर्मिळ छायाचित्र इ.स.१९२६ मध्ये या जागेची साफसफाई केल्यानंतर काढलेले आहे.
२. सिंहासनाच्या चौथऱ्याची एकेकाळी झालेली दुरवस्था.
३. १९७४ पूर्वीची सिंहासनाच्या चौथऱ्याची स्थिती
४. १९८५ साली सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसविलेल्या मेघडंबरीचा २००९ पूर्वीचा फोटो.
५. २००९ मध्ये मेघडंबरीत शिवरायांची मूर्ती बसविल्यानंतरचा फोटो.

Leave a comment