जिवधन | Jivdhan Fort

किल्ले जीवधन | Fort Jivdhan

जिवधन | Jivdhan Fort

सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या घाटवाटा सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक ठिकाणी आढळतात. तत्कालीन राजांनी व्यापारासाठी हे घाटरस्ते तयार केले. सातवाहन हे महाराष्ट्रातील पहिले राजघराणे. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश करून जुन्नर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सातवाहन यांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गडकिल्यांचे साज चढले व सारा सह्याद्री गडकोटांनी सजला. या सातवाहन राजांनी इ.स.पुर्व २५० ते इ.स.२५० या कालखंडात सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी जुन्नरजवळ डोंगर फोडून कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट बांधला व त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन(Jivdhan Fort), चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी किल्यांची निर्मिती केली. यातील नाणेघाटचा सख्खा शेजारी म्हणजे किल्ले जिवधन.

किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य दरवाजे असुन नाणेघाटाच्या बाजुने जाणारी वाट कल्याण दरवाजा म्हणुन ओळखली जाते तर घाटघर गावातुन जाणारी वाट जुन्नर दरवाजा म्हणुन ओळखली जाते.यापैकी कल्याण दरवाज्याची वाट घळीतून पायरीमार्गाने वर येते तर दुसरी जुन्नर दरवाजाची वाट कड्यातून वर येते. या दोनही वाटांनी वर येण्यासाठी थोडेसे प्रस्तरारोहण करावे लागते. मुंबईहून जीवधनला यायचे असल्यास कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे. येथुन नाणेघाट चढून आपण जीवधनच्या पायथ्याच्या पठारावर पोहोचतो. पुण्याहून जीवधनला यायचे असल्यास पुणे-जुन्नर मार्गे २५ कि.मी.वरील घाटघरला यावे. घाटघरपासून ५ कि.मी.अंतरावर नाणेघाट आहे. स्वतःचे वाहन असल्यास यामार्गे जीवधनचा पायथा गाठता येतो. नाणेघाट पठारा वरून वांदरलिंगी सुळक्याच्या दिशेने जाताना एक वाट डावीकडे जंगलात जाते. या वाटेने वर चढत आपण किल्ल्याच्या डोंगराला भिडतो. येथे कातळात कोरलेल्या २५-३० पायऱ्या असुन किल्ल्याच्या कातळ भिंतीपर्यंत जाताना वाटेत दोन ठिकाणी कोरलेल्या पायऱ्या लागतात.

किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचल्यावर या भिंतीला लागुन एक वाट उजवीकडे वांदरलिंगी सुळक्यापाशी जाते तर डावीकडील वाट किल्ल्याच्या पायऱ्या असणाऱ्या घळीत जाते. येथुन सर्वप्रथम वांदरलिंगी सुळक्याकडे निघावे. वांदरलिंगी सुळका व किल्ल्याची कातळभिंत यामध्ये एक लहानशी घळ आहे. हि घळ ओलांडुन सुळक्याच्या पायथ्याशी जाता येते. या सुळक्याच्या पायथ्याला एक सात फुट लांब आत खोदलेली गुहा असुन या गुहेच्या आतील टोकाला १०x८ फुट आकाराची दुसरी गुहा खोदली आहे. सुळका पाहुन घळीत आल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. १० फुट लांबीच्या व दिड फुट ऊंचीच्या या पायऱ्या झिजलेल्या असुन काही ठिकाणी ढासळलेल्या आहेत.

सन १८१८ मध्ये इंग्रजांनी जिवधन ताब्यात घेतल्यावर सुरुंग लावून येथील पायऱ्या उद्‌ध्वस्त केल्या व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. त्यासाठी जागोजाग सुरुंग लावल्याच्या खुणा आजही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. या ५०-६० कोरीव पायऱ्या चढून आपण एका कातळ टप्प्यापाशी येऊन थांबतो. येथे सुरुंग लावल्याच्या खुणा असुन पायऱ्यांचा हा मार्ग या ठिकाणी तुटला आहे. या तुटलेल्या भागात त्यामध्ये असलेल्या खोबण्यांचा आधार घेत वर जावे लागते. अन्यथा स्थानिकांची मदतीने दोर लावूनच हा भाग पार करावा. घळीच्या तोंडापासुन साधारण २५० पायऱ्या चढुन वर आल्यावर गडाची तटबंदी समोर येते. उभ्या कडय़ातील ही वाट चारी बाजूंनी ताशीव कडे असल्याने एका नाळेतून खोदुन काढली आहे. जिवधन,हडसर व चावंड या गडांच्या प्रवेशमार्गात असलेली समानता पहाता हे तीनही किल्ले एकाच कालखंडात बांधल्याचे जाणवतात. गडाचा दरवाजा तटबंदीत पायऱ्यांच्या काटकोनात असुन वाटेच्या डाव्या बाजुस दरवाजाच्या रक्षणासाठी बुरूज बांधलेला आहे. त्यामुळे पायऱ्या चढून वर आलो तरी गडाचा दरवाजा दिसत नाही.

गडाचा दरवाजा दक्षिणाभिमुख असुन गडाचा दरवाजा व परीसर एका अखंड कातळात तासलेला आहे. दरवाजाच्या दगडी कमानीवर मध्यभागी कलश कोरलेला असुन कलशाच्या उजव्या बाजुस सूर्य तर डाव्या बाजुस चंद्र कोरलेला आहे. दरवाजाच्या वरील बाजुस मारगीरीसाठी असलेल्या जंग्या तसेच झरोका दिसुन येतो. हा दरवाजा मोठमोठे दगड पडून बुजला होता तो २०१२ साली मोकळा करण्यात आला आहे. दरवाजाच्या आत उजव्या बाजुस अजुनही दगडात अर्धवट बुजलेली गुहा दिसुन येते. किल्ल्यात शिरल्यावर काही पायऱ्या चढुन आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.

जिवधन किल्ला समुद्रसपाटीपासून ३७५४ फूट उंचावर असुन ६५ एकर परिसरात दक्षिणोत्तर पसरला आहे. नाणेघाट पायथ्यापासुन येथवर येण्यास चार तास तर पठारावरून १.५ तास लागतात. दरवाजाच्या परीसरात किल्ल्याची तटबंदी दिसुन येते. पायऱ्याच्या डावीकडे तटबंदीकडे जाणारी वाट असुन उजव्या बाजुची वाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या दिशेने जाते. हि टेकडी म्हणजे किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. टेकडीवर जाताना वाटेत सर्वप्रथम एक चौकोनी टाके दिसुन येते. याच्या पुढील भागात काही अंतरावर पाच टाक्यांचा समुह असुन यातील दोन मोठी टाकी जोडटाकी असुन उर्वरीत तीन टाकी लहान आकारची आहेत. या टाक्याच्या खालील भागात माचीवर एका वाड्याचे अवशेष दिसुन येतात.

वांदरलिंगी सुळका जवळुन पहायचा असल्यास माचीच्या या भागात जावे अन्यथा येथे एका वाडयाच्या अवशेषां व्यतीरिक्त इतर कोणतेही अवशेष नाहीत. येथुन टेकडीच्या माथ्यावर आले असता हि वाट उजवीकडे व डावीकडे वळते तसेच समोरील बाजुस जुन्नर दरवाजाच्या दिशेने खाली उतरते. बालेकिल्ल्याच्या डाव्या बाजुस कोणतेही अवशेष नसल्याने नसल्याने सर्वप्रथम उजवीकडे वळावे. वाटेत सर्वप्रथम एका लहानशा जोत्यावर उघडयावरच गडदेवता जीवाबाईची मुर्ती आहे. या देवीच्या नावावरूनच गडाला ‘जीवधन’ असे नाव पडले. मुर्तीच्या मागील भागात काही अंतरावर दोन समाध्या दिसुन येतात. या समाधीच्या पुढील भागात काही अंतरावर एक लहान साचपाण्याचा तलाव असुन वांदरलिंगीच्या सुळक्याचे टोक दिसते तर पुढे जाणारी वाट खाली माचीवर उतरते. येथुन परत फिरून मूळ वाटेवर यावे व जुन्नर दरवाजाच्या दिशेने खाली उतरावे. वाट उतरताना उजव्या बाजुस पाच टाक्यांचा समुह दिसुन येतो तर डाव्या बाजुस दगडात बांधकाम केलेली एक वास्तू दिसते. हि वास्तू म्हणजे एक अर्धवट खोदलेले लेणे असुन याच्या दर्शनी भागात बांधकाम केलेले आहे तर पाठीमागील भाग आत खोलवर कातळात कोरलेला आहे.

प्रवेशद्वाराच्या आतील भागावर गजलक्ष्मीचे शिल्प असुन आत अंधार असल्याने विजेरी घेऊनच प्रवेश करावा लागतो. या वास्तुच्या आतील बाजुस एकामागे एक अशी तीन दालने असुन मधल्या भागात डाव्या-उजव्या बाजुस एकेक दालन आहे. हि सर्व दालने मिळुन एकुण पाच कोठारे आहेत. यातील बाहेरील दोन बांधीव दालनांच्या छतावर कमळाची झुंबरे असुन कोपऱ्यावरील खांबांच्या वरील बाजुस फणा काढलेले नाग कोरले आहेत. तिसऱ्या कोरलेल्या दालनाच्या वरील बाजुस बालेकिल्ल्याचा डोंगर असुन बाहेरील दालनाच्या भिंतीत कमानीदार दरवाजा व खिडक्या आहेत. जीवधनच्या पोटातील हे खोदकाम सातवाहन काळातील असावे. या वास्तुला स्थानिक लोक धान्यकोठी म्हणून ओळखतात.

१८१८ मध्ये झालेल्या मराठे-इंग्रज युद्धावेळी या कोठीतील धान्यसाठयाला आग लागली. आतील कोठारात पायाखाली असणारी नरम माती म्हणजे त्यावेळच्या धान्याची राख आहे असे स्थानीक सांगतात. या कोठीतुन बाहेर आल्यावर खाली उतरून उजव्या बाजुस जुन्नर दरवाजाकडे जाताना खुप मोठया प्रमाणात अवशेष सर्वत्र विखुरलेले दिसतात. या भागात गडाची सदर तसेच एका मोठया वाड्याचे अवशेष दिसुन येतात. गडाची मुख्य वस्ती याच भागात असावी. गडाचा जुन्नर दरवाजा पुर्णपणे कोसळलेला असुन या भागातील तटबंदी व बुरुजांचे बांधकाम मात्र मोठया प्रमाणात शिल्लक आहे. दरवाजाच्या वरील बाजुस एका गुहेत खडकात खोदलेली पाण्याची सातवाहनकालीन खांबटाकी असुन या टाक्यासमोरील बाजुस तटबंदी आहे. येथुन काही पायऱ्या उतरून खाली गेल्यावर खडकात खोदलेल्या पहारेकऱ्याच्या खोल्या दिसतात. यात काही प्रमाणात पाणी साठले आहे.

खडकात खोदलेल्या पायऱ्यांचा हा मार्ग ब्रिटिशांनी सुरुंग लावुन तोडल्याच्या खुणा आजही जागोजाग दिसतात. पायऱ्यांचा हा मार्ग दोन ठिकाणी तुटलेला असुन वनखात्याने तेथे लोखंडी शिड्या लावल्या आहेत तसेच खालील भागात धोक्याच्या ठिकाणी सरंक्षक लोखंडी कठडे लावले आहेत. त्यामुळे हि वाट वर येण्यास सोपी झाली आहे. हे सर्व पाहुन झाल्यावर जुन्नर दरवाजाच्या वरील बाजुने दक्षिणेकडील तटबंदीच्या दिशेने गडाच्या माचीवरून गड प्रदक्षिणेला सुरवात करावी. या वाटेने संपुर्ण माचीवर फेरी मारता येते. गडाची दक्षिण बाजुची तटबंदी मोठया प्रमाणात शिल्लक असुन या वाटेत काही सुकलेली लहान टाकी,एक जोडटाके तसेच शिबंदीची घरे दिसतात. गडाच्या दक्षिण माचीवर कातळात खोदलेले एक मोठे टाके असुन या टाक्याच्या काठावर एक कोरीव मुर्ती आहे. या गडाची बांधणी नाणेघाटाच्या रक्षणासाठी झाल्याने नाणेघाटाच्या दिशेने तटबंदीत पहाऱ्याच्या २२ चौक्या दिसुन येतात. येथे वावरण्यास सोपे जावे यासाठी तटबंदीच्या कडेने बऱ्याच ठिकाणी कातळात पायऱ्या खोदल्या आहेत. या वाटेने आपण कल्याण दरवाजापर्यंत येतो व आपली गडफेरी पुर्ण होते.

इंग्रजांनी जीवधन ताब्यात घेतल्यावर मेजर एल्ड्रीज या अधिकाऱ्याने तो पहिल्यांदा पाहिला व त्यावर बॉम्बे कुरिअर या वृत्तपत्रात १६ मे १८१८च्या अंकात एक लेख लिहिला. या लेखात तो म्हणतो हा किल्ला म्हणजे चहूबाजूने उभा तुटलेला एक कडा आहे. गडावर जाणारी वाट उभ्या कातळातून शिडीसारखी वर चढते. वायव्येस किल्ल्यापासून अलग झालेला निमुळता सुळका असून इथे समोर भयंकर खोल दरी दिसते. किल्ल्याच्या कडय़ावरून जर एखादा दगड खाली टाकला तर तो थेट दोन हजार फूट खाली तळकोकणात जाऊन पडतो. हा किल्ला पाहिल्यावर या वर्णनामध्ये काहीही अतिशयोक्ती नसल्याचे जाणवते. गडाच्या पुर्व माचीच्या टोकावरून चारशे फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो तर गडाच्या बालेकिल्ल्यावरून सिद्धगड.दुर्ग,धाकोबा, नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वर, धसइचे धरण, माळशेज घाटातील रस्ते इतका लांबचा प्रदेश न्याहाळता येतात. संपुर्ण गड फिरण्यास दोन तास लागतात.

निजामशाहीत काही महत्वाच्या राजकीय घडामोडीं या किल्ल्यावर घडल्या. सन १४८५ मध्ये बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर निजामशाही स्थापन करणाऱ्या मलिक अहमदने उत्तर कोकण व पुणे प्रांतावर कब्जा घेतल्यावर सन १४८७ साली हा किल्ला ताब्यात घेतला. १७ जुन १६६३ रोजी मुघल व आदिलशाहीने एकत्र येऊन निजामशाही जिंकली व खुद्द निजामशहाला कैदेत टाकले त्यावेळी निजामशाहीचा एक वंशज मुर्तुजा या गडावर कैदेत होता. शहाजीराजांनी त्याला सोडवून संगनेरजवळ असणाऱ्या पेमगिरी किल्ल्यावर नेले व त्याला निजामशहा म्हणून घोषित करून स्वतः वजीर बनले. निजामशाही टिकविण्याच्या निमित्ताने शहाजीराजांनी हा स्वतंत्र राज्य निर्मितीचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. उत्तरेच्या प्रचंड फौजांपुढे निभाव न लागल्याने शहाजीराजांनी मुघलांशी तह केला व त्यात जिवधन व इतर चार किल्ले मुघलांना द्यावे लागले. इंग्रजांनी १८१९ मध्ये मराठ्यांचा पराभव करून हा किल्ला ताब्यात घेतला.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here