छत्रीबाग

chatribag

छत्रीबाग

मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून अलिबागची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मिताना आरमाराची मुहुर्तमेढ रोवली तर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने मराठ्यांच्या आरमाराचा कळस रचला गेला. कान्होजी आंग्रेंनी इंग्रज व पोर्तुगिजांची अनेक आक्रमणे परतवून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मराठी आरमाराच रक्षण केले. महान पराक्रमी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शेवटच्या स्मृती जतन करणारी वास्तु म्हणजे छत्रीबाग.

रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे ११० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने बोटीने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने पनवेल-पेण-अलिबाग हे अंतर सुमारे तीन तास आहे. अलिबागला पनवेल-पेण रेल्वेनेही जाता येते. अलिबाग शहरात पोहोचलो की अलिबाग यस.टी.स्थानकापासून ५ मिनिटांच्या अंतरावर बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठुकराली नाका येथील छत्रीबागेत सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे. समाधीच्या आतील भाग अष्टकोनी असून खांबावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. समाधीशेजारी कान्होजी आंग्रे यांचा नव्याने उभारलेला दिमाखदार पुतळा दिसतो. ही बाग आंग्रेकालीन असुन या बागेत आंग्रे घराण्यातील स्त्रीपुरूषांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या एकुण बावीस दगडी समाध्या व वृंदावने पडक्या अवस्थेत आहेत. दगडांवरील कोरीव काम मात्र अप्रतिम आहे.

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मुख्य समाधीजवळ कान्होजी आंग्रे यांच्या ज्येष्ठ पत्नी आणि स्वराज्याचे दोन सरखेल सेखोजी आंग्रे व संभाजी आंग्रे यांची आई मथुराबाई आंग्रे यांची समाधी आहे. याशिवाय मानाजी आंग्रे यांची देखील समाधी येथे असल्याचे सांगितले जाते पण येथे तसा फलक नसल्याने कोणाची कोणती समाधी हे सांगणे कठीण आहे. या तीन समाधीनंतर त्यांच्या कुटुंबातील आणखी १९ जणांच्या समाधी याठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. छत्रीबागेत एक विहिर असुन या संपूर्ण प्राचीन वास्तुंचे नुतनीकरण करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाने या परिसरात आंग्रे घराण्यातील काही समाध्यांचे काम पूर्ण केले आहे तर काही समाध्यांचे काम अर्धवट सोडले आहे. समाधी स्थळाभोवती भिंतीचे कुंपण तीन बाजूने बांधण्यात आले आहे मात्र मागील बाजुला भिंतीचे कुंपण बांधण्यात आलेले नाही.

अलिबाग म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांची कर्मभूमी. तुकोजी यांचे कान्होजी आंग्रे हे पुत्र. कान्होजींना मथुराबाई, लक्ष्मीबाई आणि गहिनाबाई या तीन पत्नी होत्या. कान्होजीना मथुराबाई पत्नी पासून सेखोजी व संभाजी हे दोन पुत्र, लक्ष्मीबाईपासून मानाजी, तुकाजी हे दोन पूत्र तर गहिनाबाईपासून येसाजी व धोडजी हे दोन पुत्र असे एकुण सहा पुत्र होते. त्यांना लाईबाई नावाची एक कन्या असल्याचा उल्लेखही सापडतो. सेखोजी आंग्रे यांना तुकोजी, रायाजी, आणि मावजी ही तीन मुले होती. श्री क्षेत्र आळंदी येथे कान्होजी आंग्रे यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी दीपमाळ बांधल्याचा शिलालेखात उल्लेख सापडतो. इ.स.४ जुलै १७२९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीचा हा दिवस दर्यावर्दी दिन म्हणुन साजरा केला जातो. अलिबागला आल्यास छत्रीबागेत येऊन मराठयांचा सागर सांभाळणाऱ्या व समुद्रावरील शिवाजी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या वीरास मानाचा मुजरा करण्यास विसरू नका !!!!!!

@सुरेश निंबाळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here