महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

क्षत्रियकुलावतंस प्रतापसिंह छत्रपती (थोरले) (1793 ते 1847) भाग १

By Discover Maharashtra Views: 3666 4 Min Read

क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती (थोरले) (1793 ते 1847) भाग १

( Chatrapati Pratapsingh part 1)

 अटकेपार झेंडा फडकणाऱ्या मराठा साम्राज्याची राजधानी श्रीशाहूनगर म्हणजेच आपला सातारा. क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज श्रीशाहू छत्रपती (थोरले) यांनी प्रथम श्रीकिल्ले अजिंक्यतारा येथून मराठा साम्राज्याचा कारभार पाहिला. कालांतराने श्रीकिल्ले अजिंक्यतारा च्या पायथ्याशी श्रीशाहू नगर वसवून तेथूनच कारभार पाहिला. तेव्हा पासून ते आज अखेर क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज छत्रपती राजपरिवार (सातारा संस्थान) येथूनच कारभार पहात आहेत. 1749 पर्यंत श्रीछत्रपती शाहू महाराज यांनी मराठी सत्तेचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांचे दत्तक पुत्र श्रीछत्रपती रामराजे (पुण्यश्लोक श्रीछत्रपती ताराबाई साहेब यांचे नातू) यांनी 1749 ते 1777 पर्यंत राज्यकारभार केला. 1777 मधे श्रीछत्रपती रामराजेंचे निधन झाले. त्या नंतर त्यांचे पुत्र श्रीछत्रपती शाहू महाराज (दूसरे) हे गादिवर आले. यांच्याच काळात पेशवाई मधून मुक्त होण्याचा एकमेव प्रयत्न इ. स 1798 मध्ये झाला. याकामी करवीर गादीचे क्षत्रियकुलावतंस श्रीशिवाजीराजे छत्रपती महाराजसाहेब (दूसरे) ससैन्य मदतीस धावून आले. पण घरभेदीं मुळे हा प्रयत्न फसला. यानंतर पेशव्याने छत्रपती शाहू महाराज आणि राजपरिवार भोवती फास आवळला. त्यांला किल्ल्यावरुन उतरण्यास मनाई केली. इतराना ही किल्ल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली. जायचे झाल्यास आणि छत्रपतींला अथवा इतर राजपरिवाराला गड़ावरुन खाली उतरून शहरात यायचे झाल्यास पेशव्याच्या कारभाऱ्याची परवानगी घ्यावी लागे. थोडक्यात धनी आपल्या नोकराच्या कैदेत पडल्या सारखे परिस्थिती निर्माण झाली.

छत्रपती प्रतापसिंह

याच दरम्यान क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज छत्रपती प्रतापसिंह राजे(थोरले) यांचा 18 जानेवारी 1793 रोजी जन्म झाला. छत्रपती शाहू महाराज (दूसरे) यांचे ४ मे 1808 रोजी दुःखद निधन झाले. त्यानंतर क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज छत्रपती प्रतापसिंहराजे यांचा 16 मे 1808 मधे राज्याभिषेक झाला. त्यांचे ही दुसऱ्या बाजीराव पेशव्या बरोबर संबंध तानलेलेच होते. कारण प्रतापसिंह महाराजां वर ही पेशव्याने मानहानीकारक बंधने लादली होती आणि आपले वडिलांची केलेले मानहानि ते विसरले नव्हते. अखेरीस ब्रिटीशांनी आष्टी येथे 20 फेब्रूवारी 1818 रोजी झालेल्या लढाई मधे पेशवाई घालवली आणि छत्रपतींनी 1818 साली राज्यकारभार हाती घेतला. धूर्त इंग्रजांनी खरेतर महाराजांला, राजपरिवार, सरदार मंडळी आणि लोकांला असे भासवून दिले होते की आमची ही लढाई शिवशाहीशी नसून तिच्या बंडखोर अधिकाऱ्याशी आहे. छत्रपतींची सत्ता पेशव्याने बळकवली आणि स्वतः ची मसनद स्थापित केली ती मसनद नष्ट करून लोकांचा राजा छत्रपतींचे राज्य पुनः स्थापीत करीत आहोत. इंग्रजांनी महाराजांला खुप आश्वसन प्रत्यक्ष भेटून, लेखी पत्रद्वारे दिली होती. त्यातील एक भाग पुढील प्रमाणे.

“आपण राज्य करतील तो आपला हुकुम. यात बाजीराव याचा हात शिरू देणार नाही. आपण खावंद या उपरि काही फिकिर नाही. सातारियास जाऊन तख्तावर बसुन राज्य करावे. बाजीरावचि कदापी आपणास इजा लागणार नाही. तो राज्यात येऊ पावनार नाही. आपण काळजी तिळमात्र करु नये”

(डेक्कन कॉलेज , पारसनिस संग्रह रुमाल 55 फाईल क्र. 2)

कंपनी अधिकाऱ्यांबरोबर 4 मार्च 1818 नंतर बेलसर या ठिकाना पासून मजल दर मजल करत आपल्या लवाजम्या निशी महाराज साताऱ्याच्या दिशेने निघाले. वाटेत लागणारे किल्ले काबिज करीत 10 एप्रिल रोजी सातारा शहरा मधे मोठ्या समारंभात दाखल झाले. रयतेने दारोदारी गुढी उभ्या करून आपल्या राजाचे स्वागत केले. त्याचे मराठी दफ्तर रूमाल 2 मधे वर्णन पुढील प्रमाणे ‘तृतीय प्रहरी मुहूर्ताने मोठे समारंभे बराबर आलपिस्टन व सर्व साहेब लोक खासे त्रिवर्ग.. सिव्हासना रूढ झाले डावे बाजूस सर्व साहेब लोक बसले वरकड हुजूर मंडळी व शहरातील थोर थोर आले. नाच वैगेरे समारंभ झाला, नजरा जाल्या विडे अत्तर गुलाब होऊन सर्वांस निरोप जाला खुसी तोफा जाल्या’

10 ते 13 एप्रिल पर्यंत सातारा शहरामधे मोठा समारंभ झाला. समारंभ आटोपुन महाराज संपूर्ण राज परिवारासह अजिंक्यतारा वर रहावयास गेले.

 

©पुस्तक:- छत्रपतींच्या पाऊलखुणा
(लवकरच आपल्या भेटीला)
लेखक:- निलेश झोरे
@श्रीशिवसंस्कृती दुर्ग संवर्धन परिवार सातारा

1 Comment