महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

चाकण | Chakan Fort

By Discover Maharashtra Views: 3743 12 Min Read

चाकण | Chakan Fort

प्राचीन काळी चाकण या घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्राच्या रक्षणासाठी चाकणचा भुइकोट बांधण्यात आला. प्राचिन व दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या या किल्ल्याची सध्याची अवस्था अतिशय वाईट असुन किल्ला मधोमध विभागुन म्हणजे समोरासमोरची तटबंदी फोडून वाहनांना जाण्या-येण्यास डांबराचा पक्का रस्ता बनवला आहे. संग्रामदुर्ग उर्फ चाकणचा भुईकोट किल्ला पुण्यापासून २५ कि.मी अंतरावर असुन बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग ५५ दिवस लढणाऱ्या फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराच्या पराक्रमाची साक्ष देत आहे.

चाकण बसस्थानकापासुन उजव्या बाजुने गेल्यास डांबरी रस्त्याने किल्ल्याच्या तोडलेल्या तटबंदीतुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. चाकणचा किल्ला पुर्व-पश्चिम असा भुईकोट असुन साधारण चौकोनी आकाराचा आहे. किल्ल्याची तटबंदी ४० ते ५० फूट उंच असुन खालील भागात दगड आणि वरील भागात विटांचे बांधकाम आढळून येते. किल्ल्याच्या अर्ध्या बाजुच्या तटबंदी बुरुजांचे पुरातत्व खात्याने संवर्धन केलेले आहे. या किल्ल्याला एकूण नऊ बुरूज असुन त्यातील चार बुरूज संवर्धन केल्याने भक्कमपणे उभे आहेत तर उर्वरित पाच बुरुजावर गवत माजलेले असुन ते संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहेत. निधी अभावी किल्ल्याची डावी बाजु प्रलंबित असुन तटबंदी अनेक ठिकाणी ढासळलेली तर काही ठिकाणी तग धरून आहे. या दुर्गाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे संपुर्ण तटबंदीला असणारा २५ ते ३० फुट खोल व १२-१५ फुट रुंद खंदक आजही शिल्लक आहे. पूर्वेकडील काही भाग वगळता संपुर्ण खंदक कचऱ्याने भरलेला आहे तर काही ठिकाणी या खंदकात सांडपाणी सोडलेले आहे. किल्ल्यात कधीकाळी चार पाण्याच्या विहिरी असल्याचा उल्लेख आढळतो त्यातील दोन खंदकात होत्या. ह्या चारपैकी दोन दगडमाती व कचऱ्याने भरलेल्या असुन खंदकातील दोन विहिरी आता शोधुनही सापडत नाहीत.

चाकणचे मुख्य प्रवेशद्वार पुर्व बाजुस उत्तराभिमुख असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे. या दरवाजाचे रणमंडळ पहाण्यासारखे आहे. पुर्वेच्या बाजुने आत आल्यावर उजव्या बाजूला एक प्रवेशद्वार दिसते. किल्ल्यावर आत येण्यासाठी हाच एक मार्ग होता. गुरेढोरे येथुन आत खंदकात जाऊ नये यासाठी आता लोखंडी खांब टाकून ते बंद केले आहे पण आपण वाकून आत जाऊ शकतो. आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन पुढील बाजुस मुख्य दरवाजा आहे. दरवाजा पुढची वाट अरुंद व सर्पाकार असुन पुर्णपणे तटावरून व बुरुजावरून माऱ्याच्या टप्प्यात आहे. हि वाट पुढे खंदकात उतरते. पुर्वी या खंदकावर काढता घालता पुल असावा असे वाटते. या बाजुच्या खंदकाच्या भिंतीत बरेच चौकोनी कोरीव विरगळ दगड म्हणुन वापरलेले दिसतात. किल्ल्याचा बाहेरील तट म्हणजे परकोट आता फारसा अस्तित्वात नाही पण दरवाजासमोर खंदकाच्या बाहेरील बाजुस एक दुसरी कोसळलेली मातीची तटबंदी पहायला मिळते. दरवाजाला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी हे बांधकाम केलेले असावे. दरवाजा, खंदक आणि तटबंदी यावरून किल्ल्याची संरक्षण व्यवस्था अभेद्य असल्याचे दिसून येते. काळाच्या ओघात किल्ल्याची पडझड झाली असुन आतील भागात फारसे अवशेष नाहीत. आत तटाला लागुन एक मोडकळीस आलेले वास्तु व शेजारीच एक बुजलेला हौद आहे.

किल्ल्याच्या साधारण मध्यावर एक चौथरा असुन त्यावर तोफेच्या गाड्यावर एक छोटी उखळी तोफ ठेवलेली आहे. समोरच श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले असुन मंदिराच्या समोर दोन बाजुला दोन तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या डाव्या बाजुला दगडात कोरलेली ३ शिल्प पहायला मिळतात. यातील एक चक्रेश्वराची नागफणा धारण केलेली मूर्ती असुन उरलेली दोन शिल्पे म्हणजे विरगळ आहेत. मुर्तीशेजारी एक कोरीव दगड असुन त्याला दामोदर किंवा चंद्रशीळा म्हणुन ओळखले जाते. याच बाजुला एक मशिद असुन मंदिर व मशिद अलीकडच्या काळातील आहेत. मशीदीच्या बाजुच्या दक्षिणेच्या कोप-यातल्या बुरुजाखालून एक भुयारी मार्ग गेलेला दिसतो जो खंदकातुन बाहेर पडतो. मंदिराच्या समोरच रस्त्याच्या कडेला किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठान मंडळाने ऐतिहासिक माहितीचा फलक उभारलेला आहे. मंदिरासमोर किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या दिसतात. या पायऱ्यात अनेक कोरीव दगड वापरले आहेत. तटबंदीवर तोफा व बंदुका डागण्यासाठी ठिकठिकाणी जंग्या दिसतात. सर्व बुरुजात छोटी-छोटी दालने पाहण्यास मिळतात. किल्ल्याच्या तटबंदीवरून अर्ध्या किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते व किल्ल्याचा संपूर्ण परिसर,खंदक व बुरुज पाहता येतात. दक्षिण बुरुजावर भगवा ध्वज डौलाने फडकत असुन या बुरुजावरून चाकण शहराचं दर्शन होत होतं.

किल्ल्याच्या पुर्व दरवाजातुन बाहेर पडुन चक्रेश्वर मंदिराकडे जाता येते.मंदिराकडे जाताना पुर्वी चाकण गावाभोवती असणाऱ्या तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात. चक्रेश्वर मंदिर परिसरात अनेक प्राचीन अवशेष विखुरलेले आहेत यातील खासकरून वराहमुर्ती व शिवलिंग पहाण्यासारखे आहेत. चाकण किल्ल्याची बांधणी कोणी केली हे नक्की सांगता येत नाही पण बाराव्या शतकाच्या अखेरीस बडा अरब या बादशाहने केली असावी असा उल्लेख आढळतो. बहामनी राजवटीत चाकण हे सुभ्याचं मुख्य ठाण होतं. देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यावर या किल्ल्यांचा ताबा अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. त्यानंतर अल्लाउद्दीनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याची कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवली. त्याने इ.स.१४५३ला चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले. या मोहीमेत विशाळगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मलिक उत्तुजारच्या सेनेला शिर्के व मोरे यांनी निबीड अरण्यात आणले व त्यांच्यावर अचानक हल्ला करुन मलिक उत्तुजारसह २५०० जणांची कत्तल केली. या मोहीमेत स्थानिक मुसलमान व परकीय मुसलमान यांच्यात भांडण झाल्याने स्थानिक मुसलमान मोहीम अर्धवट सोडून चाकणला परतले. त्यांच्या या भ्याड वर्तनामुळे विशाळगड मोहीमेच्या अपयशाचे खापर परकिय मुसलमान त्यांच्यावर ठेवू लागले. हा आरोप शहाला कळला तर आपली धडगत नाही हे ओळखुन स्थानिक मुसलमानांनी शहा दारु पिऊन तर्र असताना खबर केली की परकीय मुसलमानांनी चाकण किल्ल्यावर कब्जा केला असुन त्यांना कोकणच्या राजाची साथ आहे. यावर शहाने चाकणच्या किल्ल्यावर हल्ला करुन सर्व परकीय मुसलमानांना ठार मारण्याचा हुकूम दिला.

दक्षिणी फौजेने चाकणच्या किल्ल्यास वेढा घातला पण ते वेढ्याला दाद देत नाही हे पाहुन त्यांनी परकीय मुसलमानांना शहाने माफ केले आहे असा बनावट हुकूम दाखवला. त्यांना किल्ल्याच्या बाहेर काढले व मेजवानीस बोलवुन त्यांची कत्तल केली. पुढे चाकणच्या किल्ल्यासाठी अहमद निजाम व बहामनी सरदार आदिलशाही संस्थापक आदिलखान यांच्यात लढाई होऊन चाकणचा सुभेदार जैनुद्दीनसह सातशे जण मारले गेले. शिवाजी राजांचे आजोबा मालोजी यांना दौलताबादचा सुभेदार अमिरशा याने चाकण चौऱ्याशी परगण्याची जहागिरी दिली होती (१५९५). शहाजीराजांनी सन १६६३ मध्ये निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला त्या वेळी चाकण शहाजीराजांच्या ताब्यात होते. स्वराज्य स्थापनेच्या वेळी चाकण किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात असुन त्यावर फिरंगोजी नरसाळा हे आदिलशाही किल्लेदार होते. शिवाजी महाराजांनी त्यांचे मन जिंकुन त्यांना स्वराज्याच्या कामी आणलं व चाकणच्या किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग ठेऊन फिरंगोजी नरसाळा यांनाच किल्लेदारी दिली. औरंगजेब बादशाहचा मामा शाहिस्तेखान हा मोठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला व लाल महालात मुक्काम ठोकून बसला. शाहिस्तेखानाच्या २०,००० फौजेने २१ जून १६६० रोजी चाकण भुइकोटला वेढा घातला तेव्हा शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकलेले होते. संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे त्यामुळे शाहिस्तेखानाचे सरदारांना संग्रामदुर्ग लवकर ताब्यात घेऊ असा पुर्ण विश्वास होता. किल्ल्यावर साधारण ३५० ते ४०० मावळे हेते. पावसाळा चालु होणार म्हणून किल्यावर भरपूर रसद भरली होती.

किल्ला बरेच दिवस लढेल अशी व्यवस्था किल्ल्यावर आधीपासुनच असल्याने वेढा पडला तरी किल्ला सहज हाती पडण्याची शक्यता नव्हती. तोफा दणाणू लागल्या तरी पराक्रमी मराठे खानाच्या सैन्याला दाद देईना. किल्ल्यातून मराठय़ांनी कडवा प्रतिकार सुरु केला. मराठे किल्ल्याबाहेर पडून रात्रीचे मोगल सैन्यावर हल्ले करून परत किल्ल्यात येत होते. फिरंगोजी नरसाळा यांनी सयाजी थोपटा, मालुजी मोहिता, भिवा दुधावडा , बाळाजी कर्डीला या शूर लोकांनीशी चाकण किल्ला तब्बल ५६ दिवस लढवला. याच काळात महाराज १२ जुलै १६६० रोजी पन्हाळगडावरून निसटले. पुण्यापासून चाकणपर्यंत सर्व भाग शाहिस्तेखानाच्या फौजेने व्यापल्याने चाकण किल्ल्याला सैनिकी मदत मिळत नव्हती. चाकणचा वेढा पडून आता ४० दिवस झाले होते. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहुन मुघल सैन्याने त्यांच्या फौजेच्या तळापासुन ईशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. किल्ल्यातील मराठ्यांना याची काडीमात्र खबर नव्हती. वेढ्याचा ५५वा दिवस १४ ऑगस्ट १६६० या दिवशी भुयारात दारु भरुन दुपारी तीनच्या दरम्यान सुरुंग उडवण्यात आला त्यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटाने बुरुजाला खिंडार पडले व त्यावरचे भिवा दुधावडेसह शंभरसव्वाशे मावळे हवेत उडाले. बुरुजावरील मराठे मारले गेले हे पाहुन मोगल सैन्याला स्फुरण चढले व आरोळ्या ठोकतच ते खिंडाराकडे धावले.

मोगली सेना खिंडारातुन किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करु लागली पण मराठ्यांनी त्यांना किल्ल्यात शिरकाव करु दिला नाही. उद्ध्वस्त झालेल्या तटाच्या मागे मातीची तटबंदी उभारून मराठे प्रतिकार करत होते. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. शमसुद्दीन खान व राजा भावसिंह यांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण मराठ्यांनी या दिवशी संग्रामदुर्ग हातातून जाऊन दिला नाही. उरलेल्या २५० ते ३०० मावळ्यांनी २०००० पेक्षा जास्त सैन्याला समोरासमोरच्या युद्धातही ८ तासांपेक्षा जास्त वेळ थोपवून ठेवले. दुस-या दिवशी १५ ऑगस्ट १६६० रोजी मोगलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे या दिवशी फिरंगोजी नरसाळा यांनी राजा भावसिहांच्या मध्यस्तीने १५ ऑगस्ट १६६० रोजी किल्ला खानाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. या लढाईत खानाची दोनशे अडुसष्ट माणसे ठार झाली व सहाशे माणसे जखमी झाली तर अनेक मराठे मारले गेले.

चाकणच्या पराभवानंतर फिरंगोजी जड मनाने महाराजांना भेटायला गेले. किल्ला हातचा गेला तरी राजे फिरंगोजीवर नाराज झाले नाही उलट फिरंगोजीच्या पराक्रमावर खुष होऊन राजांनी त्यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली. शाहिस्तेखानाने किल्ला ताब्यात घेतल्यावर त्याचे नाव इस्लामाबाद ठेवले. चाकणचा किल्लेदार म्हणून औरंगजेबाने उजबेगखान याची नेमणूक केली. शाहिस्ताखानाने पुण्यात आल्यावर मिळवलेले हे पाहिले आणि शेवटचेच यश ठरले. पुढे सन १६७०च्या सुमारास मराठय़ांनी चाकणचा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने चाकणचा किल्ला जिंकून घेऊन त्याचे पुन्हा इस्लामगड असे नामकरण केले. पुढे १ नोव्हेंबर १७०४ रोजी औरंगजेबाने चाकण ऊर्फ इस्लामाबाद हे नाव बदलून मोमिनाबाद असे नाव ठेवलं. सन १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांचा दक्षिणेतला सुभेदार निजाम याच्या ताब्यात चाकणचा किल्ला होता.

२९ नोव्हेंबर १७५५ रोजी चाकण मराठय़ांच्या ताब्यात आला. इंग्रज अधिकारी व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने सन १८१८ मधे इंग्रजांनी जेव्हा हा किल्ला जिंकून घेतला त्याचे वर्णन केले आहे. ले.क.डिकन २१-२२ फेब्रुवारीपर्यंत शिरुरला होता. तिथुन तो २५ फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रज सैन्य व आपल्या तोफदलासह चाकणला आला व पुण्याहून आलेली आणखी एक तुकडी त्याला मिळाली. निजामाचे सैन्यदेखील इंग्रजांच्या मदतीला आले. सगळ्यांनी मिळून चाकणवर तोफांचा भडीमार केला. बारा पौंडी तोफगोळे किल्ल्यावर आदळू लागले. किल्ल्याच्या दक्षिणेला सतरावी मद्रास तुकडी व आणखी एक गट नेमला होता. उत्तरेकडे निजामाचे सैन्य व त्याबरोबर इंग्रज कॅप्टन डेव्हिस हा होता. सकाळी किल्ल्यातुन थोडाफार प्रतिकार झाला. किल्ल्यातील सैन्य तोफांच्या भडीमाराने पोळून निघाले व शेवटी संध्याकाळी मराठय़ांनी शरण येऊन किल्ला इंग्रज अधिकारी कर्नल डिकन याच्या हवाली केला पण त्याआधी चार पाच इंग्रज अधिकारी त्यांनी यमसदनी धाडले. या किल्ल्याने इतिहासात आपले नाव कमावले ते त्याच्यातील ३५० माणसांनी दाखविलेल्या अतुल पराक्रमामुळे. फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने शाहिस्तेखानच्या प्रचंड मुघल सेनेला ५६ दिवस रोखून धरले. एक छोटी गढी मिळवण्यासाठी मुघल सेनेला इतके झुलविणे म्हणजे फार मोठा पराक्रमच म्हणावा लागेल.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment