महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी

By Discover Maharashtra Views: 3481 2 Min Read

दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी.

नवशक्तीपैकी दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे.

दधाना करपदमाभ्यामक्ष मालाकमंडलू।

देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।

ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘स्वाधिष्ठान’ चक्रात स्थिर होते.  या चक्रात मन स्थिर करणार्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे.

तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.

एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता.  या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला ‘अपर्णा’ हे एक नाव पडले.

अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते.  तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दु:खी झाली होती.  तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी ‘उमा’ अगं! नको ग नको!

अशी हाक दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे ‘उमा’ हे एक नाव पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले, की ‘हे देवी! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही.  तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल.

भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.’ असा वर त्यांनी दिला. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे.तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते.

देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.

 लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

Leave a comment