महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,406

बेळगाव किल्ला | Belgoan Fort

By Discover Maharashtra Views: 4114 11 Min Read

बेळगाव किल्ला

बेळगाव किल्ला | Belgoan Fort – बेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. सौंदत्ती येथील राष्ट्रकुट राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इ.स.बाराव्या शतकात केली. रट्ट अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला व कमल बस्ती या चालुक्य शैलीतील जैन मंदिराची निर्मिती केली. किल्ल्यातील इतर बांधकाम हे इ.स.१५१९ सुमाराचे आहे. इ.स. १२१०-१२५० पर्यंत बेळगाव राष्ट्रकुटाची राजधानी होती. देवगिरीच्या यादवांनी राष्ट्रकुटाना हरवून बेळगाव जिंकले. इ.स. १३०० मध्ये अल्लाउद्दीन खिलजी यांने येथील यादव व होयसोळ राजांना पराभूत केले. इ.स. १३३६ मध्ये विजयनगर राज्यकर्त्यांनी बेळगाव काबीज केले. इ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले पण १५११ मध्ये बहामनी राज्याची शकले उडाली व त्याचा फायदा विजापुरच्या आदिलशहाने घेतला. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या.

सध्या असलेली तटबंदी व खंदक बांधण्यामध्ये महत्वाचे योगदान विजापूरचा अदिलशहा याकुबअली खान याने दिलेले आहे. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगावावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटीश काळात या किल्ल्याचा वापर लष्करी तळ म्हणून केला गेला. १८४४ मध्ये सामानगडाच्या गडकऱ्यानी केलेले बंड मोडून काढण्यासाठी याच किल्ल्यातून ब्रिटीश लष्कर सामानगड किल्ल्यावर चालून गेले. बेळगावचा भुईकोट किल्ला बेळगाव शहराच्या मध्यवर्ती बस डेपोपासून काही अंतरावर आहे. शहराच्या मध्यभागी असलेला हा किल्ला लष्कराकडे असल्याने काही भागात फोटो काढण्यास बंदी आहे. किल्ल्याला तटबंदीच्या काठाने खोल खंदक असून सध्या तो दलदलीने भरलेला आहे.

किल्ल्याला उंच व भक्कम बुरुजांची चांगल्या अवस्थेतील तटबंदी आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सर्वप्रथम रणमंडळ लागते. या भागातुन खाली खंदकात उतरण्यासाठी चोरवाट आहे जी सद्यस्थितीत अर्धवट बुजलेल्या अवस्थेत आहे. रणमंडळात किल्ल्यात शिरण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार असुन या द्वारावरचे खिळे ठोकलेले जुने लाकडी दरवाजे व दिंडी दरवाजा आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या आत उजव्या बाजूला अंबाबाई व गणपतीचे प्राचीन मंदिर असुन डाव्या बाजुला पहारेकऱ्यासाठी देवडया आहेत.या देवड्यामध्येच गडाच्या दरवाजाच्या वरील बाजुस बुरुजावर व फांजीवर जाण्याचा जिना आहे पण वरती जाण्यास व येथे फोटो काढण्यास बंदी आहे. दरवाजासमोरच रस्त्यावर एक तोफ गाडलेली दिसून येते. प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या या भागात अदिलशहाच्या काळात बांधलेल्या अनेक इमारती आहेत ज्यात सध्या लष्कराची व शासनाची कार्यालये आहेत. तेथून पुढे गेल्यावर मुघल शैलीतील प्रवेशद्वारा सारखे कमानीचे बांधकाम दिसते. हा भाग मराठा लाइट इंन्फन्ट्रीचा तळ व लष्कराचे भरती केंद्र आहे.

भरती केंद्राच्या थोडे पुढे रामकृष्ण आश्रमाच्या मागील बाजुस तटावर गणपतीचे मंदीर आहे. येथुन थोडे पुढे गेल्यावर भगवान पार्श्वनाथ व नेमिनाथांची मुर्ती असलेले १२०४ सालातील चालुक्य शैलीतील एक सुंदर जैन मंदिर आहे. हे मंदिरच कमल बस्ती म्हणुन ओळखले जाते. काळया दगडात बांधलेले हे मंदिर शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. मुख्य मंडपात छतावर कोरलेले एक भव्य आणि अतिशय देखणे कमळपुष्पाचे दगडी झुंबर आहे. या शिल्पावरूनच या मंदिराला कमलबस्ती हे नाव पडले असे सांगण्यात येते. या मंदिरातुन बाहेर पडल्यावर उजव्या बाजुला अजुन एक चालुक्य शैलीतील कोरीव कामाने नटलेले सुंदर मंदिर आहे पण या मंदिराचा केवळ सभामंडप शिल्लक असुन गाभारा नष्ट झाला आहे. पुरातत्व विभागाने या दोनही मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे. मंदिराच्या डाव्या बाजुला असणाऱ्या रस्त्याशेजारी गडाची तटबंदी व दोन बुरुज दिसून येतात. गडाला दक्षिणेच्या मुख्य दरवाजाशिवाय पुर्व बाजुस कमलबस्तीच्या पुढे अजुन एक दरवाजा आहे. हा दरवाजा बहुदा नंतरच्या काळात बांधला गेला असावा. याशिवाय किल्ल्यामध्ये अदिलशाही काळातील साफा व जामिया नावाच्या दोन मशीदी व बद्रुद्दिन शहाचा दर्गा आहे. दोनही मशिदी लष्करी परिसरात असल्याने तेथे प्रवेश नाही पण दर्गा पहाता येतो.

गडाच्या उत्तर भागात कमलबस्ती व पुर्व दरवाजाच्या पुढे डाव्या बाजुस अजुन एक चालुक्य शैलीतील कोरीवकामाने नटलेले शिवमंदिर आहे पण या मंदिराचा देखील केवळ सभामंडप शिल्लक असुन गाभारा व वरील भाग नष्ट झाला आहे. खाजगी वाहन असल्यास वाहन घेऊन संपुर्ण गडावर तटाला फेरी मारून बुरुज व तटबंदी पहाता येते पण काही ठिकाणी लष्कर परिसरात प्रवेश नाही शिवाय फोटो काढण्यावर देखील निर्बंध आहेत. संपुर्ण गड निवांत फिरण्यासाठी एक दिवसाची सवड असायला हवी. गेल्या एक हजार वर्षांत बेळगाव परिसरावर चालुक्य, कदंब, राष्ट्रकुट(रट्ट) शिलाहर,यादव विजयनगर, बहामनी, आदिलशाही, मराठे, मोगल, निजाम अशा अनेक घराण्यांनी राज्य केले. या परिसरात या राजघराण्यांचे अनेक शिलालेख आणि ताम्रपट सापडले आहेत. या प्रदेशावर राज्य करणाऱया शिलाहार आणि रट्ट वंशीय राजांच्या शिलालेख आणि ताम्रपटांत सन 1040 पूर्वीपासून बेळगावचे वेणूग्राम असे नाव आढळून येते आणि त्यानंतरच्या काळात त्याचे बेळगाव असे नामकरण झाल्याचे दिसते.

बेळगांवचे एक हजार वर्षापूर्वीपासूनचे नाव वेणूग्राम होते हे सिध्द करणारा सर्वांत जुना पुरावा हा 1040 सालातील रायबाग येथे सापडलेला शिलालेख असून रट्ट राजा कार्तवीर्यच्या कारकीर्दीतील आहे. सध्या तो कोल्हापूर येथील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये असुन या लेखाच्या 15 व्या ओळींमध्ये कार्तवीर्य वेणुग्रामधून राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे. रट्ट नृपती एरेग याने आपला मुख्यमंत्री मादिराज याला कुंडीमधील मलकुरूबेट्टमधील काही जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या शिलालेखात उल्लेख केलेला कुंडी म्हणजे सध्याच्या बेळगाव जिल्हय़ाचा पश्चिम भाग होय. शिलाहर राजा गंडरादित्य याने कार्तिक शुद्ध ८ शके१०३७ मन्मथनाम संवत्सरे म्हणजे २७ ऑक्टोंबर १११५ रोजी दिलेल्या ताम्रपटामध्ये ‘वेणुग्राम’ चा उल्लेख आला आहे. कोल्हापुरला वळिवडे येथे मुक्कामास असताना त्याने हा ताम्रपट दिला असुन त्यात त्याने आपल्या कुळाची प्रशंसा केली आहे. त्यामध्ये शिलाहर राजा भोज याने खूप पराक्रम गाजवुन वेणुग्राम दहन केल्याचे वर्णन आहे. या दोन्ही शिलालेखांमधून बेळगावचे मूळ नाव वेणूग्राम असल्याचे स्पष्ट होते. इ.स. ११६० च्या सुमारास गोवा प्रांतावर कदंबांचे राज्य असताना त्यांच्या एका लेखात वेळुग्राम नावाचा उल्लेख सापडतो. त्यावरून वेळुग्राम म्हणजेच बेळगाव या शहरावर प्रथम कदंब राजांची सत्ता असावी. इ.स.१२०८ पासून १२५० पर्यंत बेळगाववर राष्ट्रकूटवंशीय रठ्ठ राजांचा अंमल होता. या रठ्ठयांच्या महामंडलेश्वरांनी आपली राजधानी वेणुग्राम येथे आणल्याची माहीती हन्नेगिरी येथील शिलालेखावरून मिळते.

सन १२५० ते १३२७ या काळात बेळगाव हे देवगिरीच्या यादवांच्या अमलाखाली आले. इ.स.१३२७ ते १४७२ या काळात महंमद तुघलक याने दक्षिण भारतावर स्वारी केली. त्याने हुक्केरी आणि रायबाग जिंकून तेथे आपले दोन सरदार नेमले. मात्र बेळगावचा किल्ला शहर आणि भोवतालचा प्रदेश एका हिंदू सरदाराच्या ताब्यात राहिला. १४७२ साली महंमदशहा बहामनी बेळगाव शहरावर चाल करून आला. त्यावेळी बेळगावच्या विक्रमराय राजाने किल्ल्याचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. महंमदशहाने बेळगावचा किल्ला व शहर कारभार पाहण्याची जबाबदारी वजीर महंमद गवान यांच्याकडे सोपवली. वजिराने बेळगाव शहराची घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला पण १५११ मध्ये बहामनी राज्याची शकले उडाली. त्याचा फायदा विजापुरच्या आदिलशहाने घेतला. सन १५१० व ११मध्ये अल्फान्सो अलबुकर्कने गोवा प्रांतावर स्वारी करून तो जिंकला. यावेळी विजापुरच्या आदिलशहाने खुश्रुतुर्क(आसदखान) नावाच्या इराणी सरदाराला बेळगावची सुभेदारी देऊन बेळगावचा कारभार त्याच्याकडे सोपवला. १५४९पर्यंत आसदखानाने बेळगाव शहराचा कारभार पाहीला. सन १५५० मध्ये शेरखानाने बेळगाव शहरांलगत शहापूर येथे शहापेठ वसविली असे सांगतात. बेळगाव शहर आणि किल्ला यांचीही बाजारपेठ हीच होती. फिंच नावाचा एक इंग्रज प्रवासी येथे येऊन गेला. त्याने आपल्या डायरीत नोंद केली आहे की बेळगाव हे शहर गोवा आणि विजापूर दरम्यानचे मोठे शहर असुन येथे हिरे, माणके, नील, पाचू वगैरे सारख्या रत्नांचा मोठा व्यापार चालतो.

सन १५८० मध्ये विजापुरात इब्राहिम आदिलशहाचा भाऊ इस्माइलने बंडखोरी केली म्हणून आदिलशाहने त्याला अटक करून बेळगाव किल्ल्यात आणून ठेवले.या किल्ल्यात ठेवलेला हा राजबंदी तेरा वर्षे इथे अटकेत होता. सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतल्यावर बेळगाव, शहापूर घेऊन ते हुबळीस गेले. बेळगाव परीसरात शिवाजी महाराजांनी पारगड, भीमगड, वल्लभगड, राजहंसगड, महिपालगड, कलानंदीगड, पवित्रगड, परसगड यासारखे अनेक लहानमोठे गड-कोट बांधले. सन १६८६ मध्ये औरंगजेब बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. शाहजादा आझम याने बेळगावचा किल्ला जिंकला त्यामुळे काही काळ बेळगावला आझमनगर म्हटले जात होते. बेळगाव किल्ल्याचा किल्लेदार असलेल्या मुस्तफाखानाने बेळगाव किल्ला परिसराला मुस्तफाबाद असे नाव दिले मात्र ही नावे स्थानिकांच्या अंगवळणी पडली नाहीत. सन १६९५ मध्ये जमेली कॅरेरी हा इटालियन प्रवासी बेळगावला आला होता. शहापूरची पेठ व बेळगावचा किल्ला पाहून त्याने आपल्या डायरीत अशी नोंद केली कि दगडांनी बांधलेला हा किल्ला विस्ताराने मोठा असुन जागोजागी बुरुज असुन मजबूत तटबंदी आहे. तटाबाहेर पाण्याने भरलेला खोल व रुंद खंदक असुन किल्ल्याच्या मानाने संरक्षण यंत्रणा फारच कमी आहे. सन १७१९मध्ये पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट दिल्लीच्या बादशहाच्या मदतीस सैन्यासह दिल्लीस गेले म्हणून बादशहाने त्यांच्याकडे महाराष्ट्रातील मराठयांच्या स्वराज्याची सनद व दक्षिणेतील मोगली मुलुखाचे चौथाई व सरदेशमुखी वसुलीचे हक्क लिहून दिले. या खंडणी वसुलीसाठी छत्रपतींनी अक्कलकोटचे राजे फत्तेसिंग भोसले यांची नेमणूक केली.

सन १७२०मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा मृत्यू झाला ही संधी साधून हैद्राबादच्या निजाम उल्मुल्कने बेळगावचा किल्ला व अथणी परगणा ताब्यात घेतला. त्यानंतर १७५६ साली पेशव्यांनी बेळगाव आपल्या अमलाखाली आणले. तेव्हापासून १८१८ पर्यंत किल्ला व शहर पेशव्यांच्याच हाती राहिले. पेशव्यांनी हा किल्ला व त्याच्याभोवतीचा चाळीस हजार उत्पन्नाचा भुप्रदेश यावर देखरेख करण्यासाठी सदाशिव पंडित यांची नेमणूक केली. १८१८ मध्ये इंग्रजांनी आठवडाभर संघर्ष करून हा किल्ला जिंकला. बेळगाव जिंकल्यावर इंग्रजांनी त्याचा समावेश धारवाड जिल्ह्यात केला पण नंतर या शहराचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन १८३६ ते ३८ या काळात बेळगाव हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण करून त्याचा एक स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधी यांना या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी बांधली व स्वातंत्रोत्तर काळात भारतीय लष्कराच्या मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन झाले. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा जवळ असल्यामुळे ब्रिटिश काळात नंतरदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव बॉम्बे राज्यात व १९५६च्या राज्य पुनर्रचनेनंतर कर्नाटक राज्यात गेले. तेव्हापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे.

@सुरेश निंबाळकर

Leave a comment