अवचितगड –
कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे अवचितगड. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फ़ूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांबुरुजांनी वेढलेला हा किल्ला कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. उपरांगेच्या उत्तरेकडे श्रीबाग व पेण आहे तर दक्षिणेकडे रोहा व मुरुड तालुका आहे. रोह्यावरुन कुंडलिकेवरचा एक पुल आपल्याला पिंगळसाई गावी नेतो. तिथून तासाभराच्या चालीनंतर आपण गडावर पोहोचू शकतो.
अवचितगडाचा किल्ला हा शिलाहारांच्या काळात लष्करी ठाणे म्हणून बांधला गेला असावा असे दिसते. पुढे निजामशाहीच्या राजवटीमध्ये हे सुभ्याचे ठिकाण म्हणून वापरले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवचितपणे येवून हा किल्ला ताब्यात घेतला म्हणून याला अवचितगड असे नाव मिळाले असे म्हणतात पण याचे पूर्वीचे नाव काय होते ते मात्र कळत नाही. मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर यांचा संबंध या किल्ल्याशी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात आल्यावर याची लष्करीदृष्ट्या पुनर्बांधणी केली. इंग्रजांबरोबर झालेल्या मराठ्यांच्या युद्धामध्ये कर्नल प्रॉथर याने याने हा किल्ला इ. स. १८१८ मध्ये जिंकून घेतला. गडावर महादेव मंदिर, दिपमाळ, गणपती, पार्वती, विष्णू यांच्या स्थानांबरोबर दक्षिणेकडील बुरुजावर शिलालेख ही पहायला मिळतो.गडाच्या माथ्यावरुन कुंडलिका खोऱ्याचे दृष्य उत्तम दिसते. सूरगडाचेही दर्शन होते.
अवचितगडावरुन पिंगळसईच्या मार्गाने उतरुन गावातील गणेश मंदिर पाहून रोहेकडे जाता येते. गडाची वाट सोपी आहे. मेढा गावातून येणारी वाट बुरुजाखालून पूर्व दिशेच्या प्रवेशव्दारातून गडावर जाते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे .किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास “शरभ” हे शिल्प दिसेल. हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ८०० ते १००० वर्षे इतके जुने असू शकते. यावरून या “किल्ले अवचितगड”चा इतिहास किती जुना आहे हे समजते. गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : “श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा.” दुसऱ्या दरवाज्यात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्त वाडा आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरूज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. या तलावाजवळ महादेवाचे मंदिर आहे.
पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांजवळच पिंगळाई देवीचे/ महिषासुरमर्दिनीचे छोटेसे मंदिर आहे. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे. टाक्यांच्या भिंतीवर एक घुमटी व वीराचे दगडावर कोरलेले शिल्प आहे, ते बाजी पासलकरांचे शिल्प आहे असे मानले जाते. बालेकिल्ल्याच्या टोकाला टेहळ्णी बुरुज आहे.बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. बुरुजावरुन नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इत्यादी परिसर न्याहाळता येतो. गडाच्या उत्तरेकडील टोकावर एक बुरुज आहे. याशिवाय गडावर तोफा, वाड्यांचे चौथरे, सदर इत्यादी गोष्टी पाहाता येतात. साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. किल्ला जास्त मोठा नाही, पण तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव येते. गडाचे स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे.
गर्द रानात एका उंच डोंगरावर किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ. परिसर न्याहळता येतो.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.