महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,77,649

पेन्सिलींचे जुने शार्पनर्स | Antique Pencil Sharpners

By Discover Maharashtra Views: 3605 3 Min Read

पेन्सिलींचे जुने शार्पनर्स | Antique Pencil Sharpners

पेन्सिलने लिखाण सुरु झाल्यावर साहजिकच, पेन्सिलचा पुरेसा वापर झाल्यामुळे, टोक मोडल्यावर, चांगले अक्षर येण्यासाठी इत्यादी विविध कारणांसाठी पेन्सिलला पुन्हा पुन्हा टोक काढणे अत्यावश्यक ठरू लागले. पूर्वी त्यासाठी पेन्सिल करणे, तासणे, टोक करणे, टोक काढणे, धार काढणे अशी अनेक क्रियापदे होती तशीच त्यासाठी अनेक अवजारेही होती. साधा चाकू, विशिष्ट चाकू, सुरी, ब्लेड, प्लॅस्टिकच्या पट्टीत अडकविलेले अर्धे ब्लेड अशी अनेक हत्यारे हे काम करीत असत. पण ते काम जाणत्याला करावे लागत असे, नाहीतर मुलं बोट कापून घेतील ही भीती असायची !

हात न कापता पेन्सिलीला टोक काढण्याच्या सुरक्षित अवजाराच्या शोधाला २०० वर्षांचा इतिहास आहे. अनेकजण यासाठी खटपटीत होते पण फ्रेंच गणितज्ञ बर्नाड लॅसिमॉन यांनी अशा सुरक्षित अवजाराच्या म्हणजेच शार्पनरच्या पेटंटसाठी १८२८ मध्ये प्रथम अर्ज केला होता. पण नेटका आणि नेमका शार्पनर थेरी देस एस्टीवॉक्स या दुसऱ्या फ्रेंच माणसाने १८४७ मध्ये तयार केला. खिशात घालून नेता येईल आणि पेन्सिलचा तासलेला कचरा त्याच्याच पेटीत राहील असा शार्पनर, अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील जॉन ली लव्ह यांनी १८९७ मध्ये तयार केला.

मग अर्थातच त्यामध्ये सुधारणा आणि सोयींचा अंतर्भाव होऊ लागला. पेन्सिलींच्या लहान आणि मोठ्या आकारानुसार शार्पनर्स तयार झाले. काम करतांना घरंगळून टोक मोडू नये म्हणून तेव्हां सुतार मंडळी, चपट्या पेन्सिल्स वापरत असत. अशा चपट्या पेन्सिलींसाठी खास शार्पनर्स मिळू लागले. क्रेयॉन्स म्हणजे मऊ तैलरंगांच्या पेन्सिलींसाठी प्लॅस्टिकच्या ब्लेडचे शार्पनर्स आले. विजेवर आणि बॅटरीवर चालणारे, नळकांड्यांसारखे, भिंतीवर बसविण्याचे, पितळ- ऍल्युमिनियमचे, विविध आकर्षक रंगांचे, प्राणी- पक्षी- जलचर- विमाने-जहाजे- मानवी आकार- फळे-फुले अशा आकारांचे,शार्पनर्स सहज मिळू लागले.
आपल्याकडे पूर्वी या शार्पनर्सना सोरा, सोऱ्या, गिरमिट, कटर अशी वेगवेगळी स्थानिक नावे होती. नंतर आता मात्र शार्पनरच ! आपल्याकडे प्लॅस्टिक आणि अल्युमिनियमचे शार्पनर पाहायला मिळत असत. आता ” मेड इन चायना ” मध्ये कमालीच्या वैविध्याचे शार्पनर्स उपलब्ध आहेत. खरेतर यामधून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती देण्यासाठी किंवा चांगल्या सवयी लावण्यासाठी शार्पनर्सचा वापर करता येईल. माझ्याकडे अशीच एक जोडी आहे. एका कंपनीने ओला कचरा आणि सुका कचरा वेगळ्या करण्याचे प्रतीक म्हणून मोठ्या डस्टबिन्सच्या छोट्या प्रतिकृती काढल्या आहेत. ( कृपया फोटो पाहावा ). यामध्ये शार्पनर्स आणि इरेझर दोन्हीही आहेत.

माझ्या संग्रहात आणखी विविध प्रतिकृतींचे जुने शार्पनर्स आहेत. मेड इन चायना, मेड इन हॉंगकॉंग, मेड इन स्पेन इ. शार्पनर्समधून शिवणाचे मशीन, प्रिंटिंग प्रेस, रॉकेलचा कंदील, घड्याळ, टेलिफोन, विदेशात प्रसिद्ध असलेला स्टुडंट्स लॅम्प इ. वस्तूंच्या प्रतिकृती खूप सुबक आणि काही प्रमाणात हालचाल करणाऱ्या आहेत.
जगभर शार्पनर्सचे लाखो संग्राहक आहेत. लिम्का बुक, गिनीज बुक, इंडिया बुक इत्यादींमध्ये त्यांचे विक्रम नोंदले जातात, मोडले जातात, पुन्हा नवीन नोंदले जातात.

मे २०११ मध्ये ओहियोमध्ये तेथील पर्यटन खात्याने ३४०० हून अधिक शार्पनर्सचे प्रदर्शन भरविले होते. दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या रेव्हरंड पॉल जॉन्सन यांनी हे सर्व शार्पनर्स जमविले होते आणि त्यात एक शार्पनर तर १०५ वर्षे जुना होता.

माझ्या संग्रहातील कांही शार्पनर्सचे फोटो सोबत देत आहे. त्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जमविण्याचा छंद असलेले संग्राहक काहीही जमा करू शकतात…. आणि त्यातूनही सर्वांना आनंद लाभू शकतो.





माहिती साभार – Makarand Karandikar | [email protected] 

Leave a comment