Durgbharari Teamमहाराष्ट्र दर्शनमहाराष्ट्राचे वैभवमहाराष्ट्रातील गडकिल्ले

अंजीमोठी

अंजीमोठी

जिल्हा – वर्धा
श्रेणी  –  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट

वर्धा जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवते महात्मा गांधी यांचे सेवाग्राम. सध्या पर्यटन म्हणुन प्रसिद्धीस आलेल्या या आश्रमापासुनच वर्धा जिल्ह्याचा इतिहास सुरु होतो. विदर्भातील या वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी स्वरुपात अस्तित्वात होते. वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकुण १० कोट अवशेष रुपात पहायला मिळाले. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे गडकिल्ले महाराष्ट्राचे पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही.

आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. या किल्ल्यांचा दौरा केला असता मिळालेली माहिती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बऱ्याच गढी पुर्णपणे नष्ट झाल्या असुन केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे उर्वरित अवशेष काळाशी झुंज देत आहेत. या १० किल्ल्यात २ गिरिदुर्ग १ सराई तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांचे या वास्तु बद्दलचे अज्ञान व उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे.

वर्धा तालुक्यातील अंजीमोठी गावात असलेली गढी यापैकी एक आहे. अंजीमोठी येथील गढीला भेट देण्यासाठी आपल्याला वर्धा शहर गाठावे लागते. वर्धा ते अंजी मोठी हे अंतर १५ कि.मी.असुन तेथे जाण्यासाठी बस अथवा रिक्षा उपलब्ध आहेत. गढी गावाच्या उत्तर टोकाला असलेल्या गढीपुरा भागात नदीकाठावर आहे. गढीचा परीसर गढीपुरा म्हणुन ओळखला जात असल्याने गढी शोधण्यास फारशी अडचण येत नाही. चौकोनी आकाराची हि गढी नदीकाठी १ एकर परिसरावर वसली होती. चार टोकाला चार बुरुज अशी रचना असलेल्या या गढीची आज केवळ उत्तरेकडील १०-१२ फुट उंचीची भिंतच काही प्रमाणात शिल्लक असुन उर्वरित तटबंदी पुर्णपणे नष्ट झालेली आहे व ती अजुन किती काळ शिल्लक राहील ते सांगता येत नाही.

गढीच्या आतच घरे झाल्याने आतील मूळ वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. गढीच्या आत गोमासे परीवाराची घरे असुन त्यांना गढीविषयी फारशी माहिती नाही. नागपुरच्या भोसले राजवटीत हि हि गढी बांधली गेली पण नंतरच्या काळात येथील मालगुजाराने आपले ठिकाण आर्वीस हलविल्याने हि गढी ओस पडली. गढीची शिल्लक असलेली केवळ एक भिंत ५ मिनिटात पाहुन होते.

सुरेश निंबाळकर

Website आणि Android App चा हेतू महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी हा आहे.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.

लेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

One Comment

 1. आंजीच्‍या गढीचे चि‍त्र पाहून आणि विवरण वाचून अतिशय आनंद झाला
  वर्धा जिल्‍हा गॅझेेटियरमध्‍ये आंजी येथील गढीत असलेले भोसलेकालीन कमाविसदाराचे मुख्‍यालय पुढे आर्वीस स्‍थानांतरीत झाले होते असा उल्‍लेख आढळतो
  झाशीची राणी लक्ष्‍मीबाईचे सावत्र बंधु चिंतामणराव तांबे हे 1890/1900 दरम्‍यान आर्वीचे तहसीलदार होते
  आम्‍ही मूळ आर्वीचे
  माझे वडील 1917 मध्‍येे नागपूरला स्‍थायीक झाले
  कृपया उपराेेेेक्‍त चित्र व विवरण या अमूल्‍य माहितीचा उपयोग माझ़या लिखाणात करण्‍याची परवानगी असावी धन्‍यवाद ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close