महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

अंजनेरीची प्राचीन मंदिरे

By Discover Maharashtra Views: 1312 4 Min Read

अंजनेरीची प्राचीन मंदिरे –

नाशिकपासून अवघे वीस-बावीस किलोमीटर अंतरावरील अंजनेरी पर्वताच्या कुशीत पहुडलेले अंजनेरी गाव हनुमानाचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र हेच अंजनेरी गाव जवळपास अकराव्या-बाराव्या शतकातील जुन्या प्राचीन भग्न मंदिरांसाठी सुद्धा ओळखले जाते. अंजनेरीत यादवकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली तब्बल १६ मंदिरे विखुरलेली आहेत. यातली बारा मंदिरे ही जैन असून उर्वरित ४ हिंदू मंदिरे आहेत. अंजनेरी प्राचीन काळातील एक मुख्य बाजारपेठ व एक प्रमुख राजकीय केंद्र होते, हे या मंदिरांवरून स्पष्ट होते. अंजनेरी प्रमुख व्यापारी पेठ असल्याने येथे येणाऱ्या राजे, महाराजे तसेच व्यापाऱ्यांकडून मंदिरांना मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्यामुळे या परिसरात मंदिर उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात झाले असावे असा अंदाज आहे. अंजनेरीची प्राचीन मंदिरे या मंदिरांच्या स्थापत्यावर वेगवेगळ्या शैलींचा प्रभाव दिसतो. इथे नागर, फांसना आणि भूमिज अशा विभिन्न शैलीची मंदिरे आहेत.

यादवांच्या राज्याची सुरुवातीची राजधानी नाशिक जवळील सेऊणनगर (सध्याचे सिन्नर) येथे होती. यादवांनी विशेषतः सेऊणचंद्र तिसरा यांने हिंदू धर्माबरोबरच जैन धर्माला आश्रय दिलेला येथील शिलालेख व काही ताम्रपटांमधून आपल्याला समजतो. त्याची साक्ष अंजनेरी येथील दगडी प्राकारातील जैन मंदिरातील एका भिंतीवर सेऊणचंद्र यादव (तृतीय) ह्याचा स्पष्ट असा देवनागरी भाषेतील शिलालेखात आढळून येते.

या प्राकारातील मंदिरे तुलनेने लहान आकाराची असून बहुतांशी मंदिरांवर नागर पद्धतीची उंच शंखू शिखरे आढळतात. प्राकाराला लागून अनेक खोल्यांची शिखर विरहित जैन मठाची इमारत आहे. आज महानुभाव ठाणे असलेल्या एका मंदिरात ललाटबिंबावर (दारावरची मधली शिल्पचौकट) ध्यानस्थ तीर्थांकर दिसतात तसेच सर्पफणा असलेले पार्श्वनाथ व सुपार्श्वनाथ कोरलेले आहेत. याचे छताचे नक्षीकाम अप्रतिम आहे व गाभाऱ्यात जैन तीर्थंकराचे दगडी कोरीव आसन रिकामे आहे.

या मंदिराच्या आवारात अनेक हिंदू व जैन मूर्ती, हत्ती, गणपती, नाग शिळा, वीरगळी विखुरलेल्या आहेत तसेच जैन मुनींच्या यम-सल्लेखना (religious suicide) दर्शवणाऱ्या स्मारकशिळा आहेत. जैनधर्मीयांमध्ये संथारा किंवा यम-संल्लेखना व्रत (प्राणातिंक उपोषण) अंगिकारुन  प्राणत्याग करणा-या व्यक्तीची स्मारकशिळा ‘चौमुखी’ नावाने ओळखले जाते. एका अज्ञात जैन मुनीच्या स्मरणार्थ येथे अशा प्रकारची एक शिळा कोरलेली आहे. या चौमुखी वर दोन चौकटी असून वरच्या चौकटीत भगवान महावीर आहेत तर खालचे चौकटीत जैन मुनी अन्नपाण्याचा त्याग करुन व्रताचे पालन करताना दाखवले आहेत.

हिंदू मंदिरांमध्ये उंच जागेवर असलेले विष्णू मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. अनेक लघु शिखरांच्या रांगांची चवड रचलेले भूमीज पद्धतीचे, त्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचलित असलेले शिखर आपल्याला इथे दिसते. मंदिराची अवस्था आज वाईट असली तरी बाह्य भिंतीवरील देवकोष्टांमधील विष्णूच्या वराह अवतार, त्रिविक्रम विदर्ण-नरसिंह व योगेश्वर विष्णूमूर्ती महत्वपूर्ण आहेत. गर्भगृहात नंतरची नरसिंह हिरण्यकक्षिपूवधमूर्ती आहे व पीठावर विष्णूचे वाहन गरुड स्पष्ट दिसते.

ही मंदिरे पाहिल्यानंतर लक्षात येणारे वैशिष्ट्य म्हणजे जैन व हिंदू धर्म येथे एकत्रपणे आनंदात नांदत होते, असे दिसते. मागील अंजनेरी किल्ला व ब्रह्मगिरीच्या शिखरांच्या पार्श्वभूमीवर ही पुरातन मंदिरे विलक्षण दिसतात. एकेकाळी राजधानीचा दर्जा असलेले अंजनेरी गाव व इथली बाजारपेठ देशोदेशींच्या व्यापारी व नागरिकांनी गजबजून गेले होते. हिचे वैभव जगभर पसरले होते. अंजनेरीच्या अवतीभवती  असलेल्या या पाऊलखुणा पुन्हा पुन्हा ‘त्या’ वैभवशाली दिवसांची आठवण करून देतात.

या पर्वताच्या कुशीत एकेकाळी वैभवाने मिरवलेली, सजलेली, पुजलेली व आता भग्नावशेष बनून शिल्लक राहिलेली ही प्राचीन मंदिरे अनास्था व दुर्लक्षामुळे अखेरचा श्वास घेत आहेत. या मंदिरांची पुनर्बांधणी अत्यंत आवश्यक आहे. ही मंदिरे पुन्हा उभी राहिली तर अंजनेरी परिसराचे व पर्यायाने नाशिकचे महत्व पर्यटनाच्या नकाशावर आधिकच वाढेल यात शंका नाही.

नाशिक प्रतिबिंब
Leave a comment