अकलुज

akaluj-fort

अकलुज

जिल्हा – सोलापुर
श्रेणी  – सोपी
दुर्गप्रकार-भुईकोट

अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे-सोलापूर मार्गावर इंदापूर येथून अकलूजला जाणारा फाटा असुन पुणे -अकलूज अंतर १६० कि.मी आहे. या शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा भूईकोट किल्ला उभा आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी कारंजी, हिरवळ व फुलझाडे लावण्यात आलेली असुन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात एक भव्य शिवसृष्टी उभारली आहे. किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत. किल्ल्याचा जिर्णोध्दार करताना मूळ बांधकामास धक्का न लावता नवीन बांधकामाचा समतोल साधला गेला आहे.

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मोठ्यांसाठी २०/-रु व लहानांना १५/- तिकीट असुन किल्ला सकाळी १० ते ६ या वेळेत पहायला मिळतो. किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण असुन तेथे शिल्प आणि भित्ती‍शिल्पांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभा करण्यात आला आहे. किल्ला राबता असतानाचे किल्ल्यावरील जीवनमान प्रतिकृतींच्या माध्यमातुन हुबेहुब दर्शविण्यात आले असुन आपण थेट शिवकाळात जातो. किल्ल्याच्या पुर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वारासमोर फायबरचे हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे ठेवले असुन वरील बाजुस नगारखान्यात विवीध वादकांचे पुतळे आहेत.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर तटबंदीवर विविध जातीधर्माचे मावळे आपापल्या पारंपारिक वेशात उभे केलेले असुन यात तटावरील पहारेकरी, तोफची, मशालजी, तिरंदाज, रामोशी यांचा समावेश आहे. नदीच्या बाजुला तटबंदीत असणाऱ्या एका बुरुजावरून नदीचे पाणी वर खेचण्याची सोय दिसून येते. तटबंदीच्या आतील भागात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत फायबरची एकुण २० शिल्पे असुन यातील शिवजन्म व राज्याभिषेक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडतात. गडाच्या मध्यभागी असणाऱ्या टेहळणी बुरुजावर शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. जिन्याने तिथे जाताना बुरुजाच्या आत बांधलेली एक कोठार दिसते. किल्ल्याच्या या सर्वोच्च भागातुन संपुर्ण किल्ला व आजूबाजूचा परिसर एका नजरेत पहाता येतो. या बुरुजाच्या खालील बाजुस एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे आहेत तर दुसऱ्या बाजूस शेकोटी पेटवून पहाऱ्यावर बसलेले रामोशी दाखविलेले आहेत.

किल्ल्याचे एकुण क्षेत्रफळ अडीच एकर असुन तटबंदीत दहा बुरूज दिसुन येतात. किल्ल्याच्या नदीकडील बाजुच्या तटबंदीत किल्ल्याच्या मूळ बांधकामातील सहा ओवऱ्या असुन त्यात उत्खननात सापडलेले अवशेष ठेवण्यात आले आहेत. येथुनच नदीच्या बाजुस उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे पण तो सध्या बंद केलेला आहे. येथे असणाऱ्या गडाला पाणीपुरवठा करणाऱ्या हौदाचे कारंज्यात रुपांतर करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजुस असलेल्या एका दालनात रायगड, राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी, देवगिरी, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतीकृती आपल्याला किल्ल्यांची सफर घडवून आणतात. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास नदीकाठची तटबंदी, घाट, किल्ल्याचे बुरुज, तटबंदी बांधताना वापरलेल्या विरगळ, किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी व इतर प्राचीन अवशेष पहाता येतात.

अकलुज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले असुन किल्ला इ.स. १२११ मध्ये यादव वंशीय सिंघन राजाने अकलूज शहर व किल्ला वसवल्याचा उल्लेख आढळतो. पुढे बहामनी, आदिलशाही. मुघल आणि मग मराठे यांची या किल्ल्यावर सत्ता होती. मुघलकाळात औरंगजेबचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या अखत्यारीत दौंड जवळील बहाद्दूरगड व हा किल्ला होता. पुढे रणमस्तखान इथला किल्लेदार झाल्याची नोंद आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. औरंगजेब १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात अकलूज परिसरात मुक्कामाला होता. या काळात त्याला मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्याची बातमी कळली तेव्हा त्याने आनंदप्रीत्यर्थ अकलूजचे नामांतर अदसपुर ’ केल्याचे महाराष्ट्र ग्याझेटीअर मध्ये नोंद आहे. इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यावर दुसरे बाजीराव पेशवे तीन महिने या ठिकाणी वास्तव्यास होते. याशिवाय ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांचाही मुक्काम या ठिकाणी काही काळ असल्याची नोंद आढळते.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
www.durgbharari.com
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Previous articleअंजनेरी
Next articleआपला इतिहास
महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here