छत्रपती शाहू महाराज आणि कान्होजी आंग्रे यांच्यातला लोहगडचा तह !
छत्रपती शाहू महाराज आणि कान्होजी आंग्रे यांच्यात झालेल्या लोहगडचा तह या तहाच्या तरतुदी थोडक्यात याप्रमाणे होत्या :
(१) कान्होजीने कबूल केले की, शाहू महाराजांच्या पायांशी पूर्वी अंतर झाले नाही. यापुढेही करणार नाही.
(२) वरघाटाचे कान्होजींनी घेतलेले किल्ले शाहू महाराजांच्या स्वाधीन करावेत.
(३) तळघाटाचे शाहू महाराजांच्या ताब्यातील किल्ले आंग्रेस द्यावेत.
(४) पेशव्यांनी काबीज केलेल्या कोठाली गावातील लोक, जनावरे, मालमत्ता परत करावी.
(५) प्रतिवर्षी दसऱ्यापासून मार्गशीर्षपर्यंत पेशव्यांनी कोकणची मोहीम करावी. सिद्दी, पोर्तुगीज या शत्रूंचा पूर्ण बंदोबस्त व्हावा.
(६) एकमेकांचे चाकर इसम असतील ते एकमेकांनी ठेवावेत, परंतु पुढे न ठेवावे.
(७) रायगड आंग्रेनी जिंकला, तर तो छत्रपतींकडे द्यावा.
(८) लोहगड, तुंग, तिकोना, कोरगड, घनगड, चंदनगड, पट्टा किल्ले सामानासह शाहू महाराजांकडे तर राजमाची, श्रीवर्धन, मनोरंजनगड, कोथळागड, त्रिंबकगड इ. किल्ले आंग्रेंकडे राहतील.
(९) शाहू महाराजांनी दमाजी थोरातांशी अवक्रिया करू नये. भाकर दिली आहे ती त्याने खावी. याशिवाय महालांच्या वाटणींची यादी, नावांसह तहात दिलेली आहे…
तहाचे महत्त्व : अनेक दृष्टीने या तहास महत्त्व आहे..
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जरी तहात तरतूद नसली तरी शाहू महाराजांनी कान्होजीस सरखेल (Admiral) हे पद दिले. तहानंतर कान्होजी महाराजांच्या भेटीस नोव्हेंबर १७१४ मध्ये गेले, तेव्हा शाहू महाराजांनी त्यांचा योग्य सन्मान केला. मानचिन्हे बहाल केली. त्यात सरखेल हे प्रतीक होते. त्यानुसार यापुढे कान्होजींच्या सिक्क्यामध्ये सरखेल असा उल्लेख आहे. सोबत तो गोलाकार सिक्का, मजकुरासह दिला आहे. याचा अर्थ असा आहे की, ‘श्री शाहू छत्रपतींना प्रिय असणाऱ्या तुकोजीपुत्र, कान्होजी सरखेल यांच्या मुद्रेचा सर्वदा विजय असो…’ देशाच्या सुस्थापित राज्याचे छत्रपती शाहू महाराज यांचा नौदल प्रमुख अधिकारी म्हणून कान्होजींना कायदेशीर, अधिकृत दर्जा मिळाला. त्यांचे स्थान बळकट झाले…
दुसरा परिणाम म्हणजे या तहाने सागरावर आणि घाटाखालील सागरकिनाऱ्यावर वर्चस्व मिळविण्याची कान्होजींना संधी मिळाली. ही संधी साधण्यात त्यांनी दिरंगाई केली नाही. डॉ.आ. पवार लिहितात, ‘कान्होजींनी मुंबईलगतची अनेक बेटं आणि सुमारे १८० मैल लांब व ३० ते ६० मैल रुंद प्रदेशावर व अनेक किल्ल्यांवर वर्चस्व मिळविले..’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत एक सागरी खलाशी असलेला कान्होजी आंग्रे एक एक पद मिळवित छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मराठा आरमार प्रमुख बनले. छत्रपती शाहू महाराजांशी तह झाल्यावर त्यांच्या वर्चस्वाखाली सावंतवाडी ते मुंबई किनारपट्टी, कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग (घेरीया) इ. १० किल्ले आले. तसेच सरखेल पद मिळाले. २७अ हे वर्चस्व मराठा सत्तेचे असून आम्ही म्हणतो ते छत्रपती शाहू महाराजकालीन मराठा आरमाराचा विकास तो हाच एक भाग होय. मग सेन लिहितात ते पटते की, कान्होजींची जहाजे परवाने न घेता धाडसाने सागरावर संचार करू लागली…
या तहाने भूभागाबरोबर सागरावर मराठा सत्तेचे वर्चस्व निर्माण करण्याची संधी निर्माण झाली. कान्होजींच्या आग्रहानुसार दरवर्षी कोकणातील मोहीम काढावी, अशी तहात एक तरतूद होती. पण, पेशव्यांनी ते केले नाही. काही वर्षांनंतर सिद्दी व पोर्तुगीजांविरुद्ध काढलेल्या मोहिमा हा त्याचाच भाग होता. पण, त्या वेळी कान्होजी हयात नव्हते. पण, यातून कान्होजींची दूरदृष्टी लक्षात येते. कैद केलेले बहिरोपंत व इतर मुक्त केले गेले. उत्सव रंगाचा (Festival of Colours) कान्होजी व छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीची तयारी सुरू झाली. विश्वासू सेवक बसवंतराव खोजा याने ८ नोव्हेंबर १७१४ रोजी, छत्रपती शाहू महाराजांना पत्र पाठवून कान्होजींच्या स्वागतासाठी आवश्यक साहित्याची तयारी झाली असून भेटी दाखल द्यावयाचे पोषाख, वस्त्रे तयार असल्याचे कळविले होते. ही कान्होजी व शाहू महाराजांची पहिली भेट होती. कान्होजींना घेऊन येण्यासाठी शाहू महाराजांनी पिंगळा, महाडिक, दामाजी हे हुजरे पाठविले. कान्होजी बोरघाट मार्गे जेजुरी येथे शाहू महाराजांना भेटण्यासाठी येत होते. शाहू महाराज जेजुरीस थांबले होते. तेथे २५ मार्च १७१५ रोजी गुढी पाडव्याच्या शुभदिनी दोघांची भेट झाली. अनेक दिवस हा भेटीचा समारंभ चालू होता…
कान्होजींचा उचित सन्मान केला गेला. त्यांनीही आणलेले अनेक बंदरी जिन्नस, उत्तम पदार्थ, खजिना हे सर्व शाहू महाराजांना नजर केले. प्रतिपदेस कूच करून निघाले, तेव्हा आंग्रे यांनी पाच रंगांचा गुलाल व रंगाचे सामान बहुत आणिले. दरकूच हत्तीवर रंग व गुलाल भरून चार-पाच कोस मजल करावी. नाच, रंग, गुलाल खेळत मुक्कामपर्यंत चालावें, ऐसे करत पंचमीस सातारा येऊन पोहोचले. जेजुरीपासून सातारापर्यंत रस्ता गुलालांनी भरला ऐसे जाहले. अष्टप्रधान, दरखदार व सरदार सुद्धा वस्त्रे बहुमान देऊन मेजवानी केली. सुभ्याच्या सनदा, वस्त्रे, बहुमान शाहू महाराजांनी दिला तो घेऊन प्रांताचे बंदोबस्तात गेले…
मराठा आरमाराची उद्दिष्टे आणि अनेक सत्ता :
• सागरी वसूलीपासून मराठा व्यापाराचे रक्षण करणे हा धोका मलबार किनाऱ्यावर अधिक होता.
• सिद्दीपासून मराठा लोकांचे रक्षण करणे.
• मराठा राज्याचे सागरावरील स्वामित्व राखणे इ.
पश्चिम सागरावर अनेक सत्ता होत्या. आंग्रेंचा या सत्तांशी संबंध व संघर्ष होत असे. उत्तरेस वसईला पोर्तुगीज, मुंबईला इंग्रज, कुलाबा येथे स्वतः आंग्रे, नंतर जंजिऱ्याचे सिद्दी, मालवण- सिंधुदुर्ग, करवीरचे छत्रपती, सावंतवाडीला सावंत, वेंर्गुला येथे डच आणि खाली दक्षिणेला गोव्यास पोर्तुगीज असे सत्ताधीश होते. एकूण ही राजकीय परिस्थिती होती. अशा सर्व सत्ताधीशांना धाकात ठेवून सरखेल आंग्रे यांनी छत्रपती शाहू महाराजांनी मिळविलेले यश…
@gadwat_official
