महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

यशवंताची घुमतील कवने

By Discover Maharashtra Views: 3572 11 Min Read

यशवंताची घुमतील कवने

साहेब…………. या शब्दाची फार मोठी परंपरा या महाराष्ट्राला, पर्यायाने भारताला लाभली आहे. आता पर्याय यासाठीचं कि ज्या राज्याच्या नावातचं राष्ट्राच्या महानतेची प्रेरणा आहे. तिथल्या सगळ्या गोष्टी राष्ट्रप्रथम या भावनेनेचं कळत – नकळत घडल्या जातात. संताच्या, क्रांतीकारकांच्या ह्याभूमीची कुसं अशीकाही बाळसेदार म्हणावी लागले कि आजपर्यंत या मातीनं बरीचं नररत्न या देशासाठी निपजली, मुळात शेकडो संस्थानिकांच्या स्वतंत्र कल्पनेला फाटा देऊन, एकसंध राष्ट्राची संकल्पना, राष्ट्रवादी विचारसरणीसुद्धा याचं मातीची देणं आहे.

छत्रपती शिवराय किंवा त्यांच्याची आधीपासूनचा काळ लक्षात घेतला तरी चालेल ते अलीकडे महाराष्ट्रचं दिल्ली दरबारचं नाकं म्हणजे शरदचंद्रजी पवार. या एवढ्या मोठ्या कर्तुत्ववान काळातील एक यशवंत पर्व म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब.

१२ मार्च १९१३ साली आताच्या तालुका कडेगाव (जिल्हा सांगली) मध्ये देवराष्ट्रे या गावी यशवंतरावांचा जन्म झाला. वयाच्या नाकळत्या वयातचं वडिलांचे छत्र प्लेग या रोगाच्या कारणानं हरपले. आणि जेमतेम परिस्थितीच्या प्रवाहात त्यांच्या नशिबाची नावं हिंदोळे खात, आपल्या प्रखर ध्येयाच्या दिशेने वाहू लागली. आयुष्याकडून मिळत जाणाऱ्या अनुभवातूनचं चव्हाण घराण्याच्या यशवंताची वाढ भारतभूमीच्या अखंडित सेवेसाठी घडतं असावी. काहीतरी करायचे आहे असे ठरवून एखाद्या मुशीत बांधून घेण्याचा “जाणता” प्रयत्न यशवंतरावांनी कधी केलाच नाही., एवढं मात्र खरं की विद्यार्थी दशेत वयाने वाढत असताना आपण एका सामान्य कुटुंबातून आहोत याची जावीन व्हावी, असे काही ना काही साहेबांच्या बाबतीत सतत घडत होते. समोर येणाऱ्या गोष्टीतून माणूस मार्गक्रमण करतं आपलं कर्तुत्व आणि आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करत असतो.

मनाचे कोतेपण हे अनेक दुःखाचे मूळ असू शकते, याविषयी अडाणी आईने प्रत्यक्ष तर कधी धडे दिले नव्हते., पण आईकडून होणाऱ्या उपदेशातून, वागणुकीतून ते यशवंतरावांनी टिपले. आईच्या आज्ञांचे पालन करण्यासोबतचं वाचन ही साहेबांचं आयुष्य बदलणारी घटना ठरली.

पारतंत्र्यात असणाऱ्या देशाला स्वातंत्र्याच्या दिशेने न्हेण्यासाठी कायर्रत असणाऱ्या, देशप्रेमाने बहारलेल्या क्रांतीकारकांच्या बातम्या साहेब न चुकता वाचत., तेव्हा “लाहोर कट” सबंध देशात गाजत होता, त्याच्या जोडीला प्लेग होताचं. प्लेगमुळे गावची चौकट ओलांडून प्रत्येकानं रानात चार – दोन घरांच्या वस्त्या केल्या, तेव्हा आपलं वाचनाचं वेड आणि देशाचा वेध घेण्यासाठी कंबरभर पाण्यात नदीतून ये – जा करण्याची हि तर केवळ सुरवातचं होती. नंतरच्या काळात घडलेल्या अटकेदरम्यानं मेघदूत, शाकुंतल, शेक्सपिअर पासून मेजरमेंट ऑफ सोशल फिनोमीना, प्रिन्सिपल ऑफ रुलर इकोनॉमिक्स, स्टोरी ऑफ फिलोसॉफी पासून बऱ्याच बऱ्याच ग्रंथांचे यशवंतरावांनी वाचन केले. वयाच्या १७ व्या वर्षीचा कायदेभंग चळवळी दरम्यानचा तुरुंगवासातून पुढे कॉंग्रेसकडील त्यांचा प्रवास एका प्रतिभावंताची विजयीयात्राचं म्हणावी लागेल. वेणूताईंशी विवाह झाला तेव्हासुद्धा भूमिगत चळवळ होतीचं. लग्नानंतर पुन्हा लगेचचं काही दिवसात तुरुंगवास घडला., स्वतःचे, स्वतःसाठी, स्वतःपुरते असे न राहता व्यापक राष्ट्रहितासाठी जी त्यागाची वृत्ती असावी लागते ती चव्हाणसाहेबांकडे निसर्गतः होतीचं; पण हेच आपल्या आयुष्याचे ध्येय आहे, हे तरुणअवस्थेतचं अधोरेखित झाले असावे.

१९२७ ते १९४० या दरम्यान शिक्षणासोबत, राजकीय चळवळ, तुरुंगवास, वैचारिक खळबळ या सगळ्या परिस्थितीच्या चटक्यात तावून सुलखून निघालेले यशवंतराव वयाच्या ४२व्या वर्षी ज्या राज्याच्या नावातचं महान राष्ट्राचे प्रतीक आहे. अश्या महाराष्ट्रभूमीचे १ मे १९६० साली मुख्यमंत्री झाले. याच वर्षी त्यांनी २१ डिसेंबर १९६० का महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली. केवळ आर्थिक संपन्नतेतून महाराष्ट्राची ओळख न होता, इथला सांकृतिक वारसा हि सर्वपरिचित व्हावा यासाठीची हि धपडप होती. हे करत असतानाचं सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे सूत्र खेड्यातल्या शेवटच्या घरापर्यंत नेणे फार महत्वाचे होते., म्हणूनचं राज्यस्थापनेच्या दोन वर्षातचं पंचायत राज या योजनेचा प्रारंभ झाला. यानुसार निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती ह्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात जी भूमिका बजावली त्यामागची प्रेरणा म्हणजे “यशवंतराव”.

शेती सोबत कृषी औद्योगिक धोरणाची अंमलबजावणी यशवंतरावांच्या सखोल अभ्यासातून झाल्याने डेअरी, पोल्ट्री, फळबागा, मच्छीमारी या उद्योगांनाही चालना मिळाली. “दुधाचा महापूर” या विधानावर काहीजण एकेकाळी कुत्सितपणे हसले होते. पण या क्षेत्रातील भरीव कामगिरीने दुधाचा महापूर प्रत्यक्षात आला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात नाही म्हणता येणार, तर महाराष्ट्राचा पर्व यशवंत झाला तो यशवंतराव चव्हाण साहेबांमुळे. महाराष्ट्राचा गाडा यशस्वीरित्या घौडदौड करता केल्यानंतर साहेबांना केंद्राचे बोलावणे आले. तेव्हा केंद्रात पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान म्हणून सुशासन करत होते.
वसंतराव नाईक यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे कि “स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू व यशवंतरावजी चव्हाण यांच्यामध्ये एक साधर्म्य आढळून येते, पंडितजींचे व्यक्तिमत्व एखाद्या वटवृक्षाप्रमाणे होते. वाटचाल करणाऱ्या पंतस्थाला ज्याप्रमाणे वाटेवरील वडाचा आधार वाटावा तसा राजकारणात काटेरी वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्यांना पंडितजिंचां मोठाच आधार वाटत असे., हीच गोष्ट यशवंतरावांनाही लागू पडते. एकंदरीत राष्ट्राच्या जीवनावर पंडितजींच्या विचारांचा आणि विशाल व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला आहे तीच गोष्ट महाराष्ट्रात यशवंतरावांच्या बाबतीत घडते.

शत्रू तोफा डागून भेडसावित असताना वयाची पन्नाशीही न घाटलेले संरक्षणाच्या महत्वपूर्ण खात्याची जवाबदारी नेहरूंनी यशवंतरावांच्या खांद्यावर टाकली आणि ती साहेबांनी लीलया पेलली देखील., रणात लढणारा प्रत्येक सैनिकानं आपल्या पराक्रमाची शर्थ केलीचं, पण राष्ट्रनिष्ठेपुढे राजकारण उभे करून मेनन साहेबांनी केलेले घोळ साहेबांच्या हातून घडले नाही. १९६५ साली भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी प्रत्यक्ष Warfield वर येऊन मद्रास रेजिमेंटचे अभिनंदन करतानाची यशवंतरावांची करारी मुद्रा प्रचंड गाजली होती.

भारत-पाक युद्धादरम्यान २० सप्टेंबरला पाकिस्तानी वायुसेनेने एक भारतीय प्रवासी विमान पाडले, त्या हल्ल्यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री बळवंतराय मेहता मृत्युमुखी पडले. हि बातमी ऐकून व्यथित झालेले यशवंतराव म्हणाले “I hate these Pakistanis. It was the most dastardly attack on non-military and a tiny plane. Balwantbhai has died a martyr’s death.”

१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान सतत युद्धभूमीवर वावरत सैन्याचे मनोबल वाढवणारे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६२ च्या युद्धातील पराभवामुळे मनौधैर्य खच्ची झालेल्या भारतीय सैन्याची खर्या अर्थाने पुनर्बांधणी केली.सतत राजकारण्यांच्या दावणीला बांधलेल्या सैन्याला त्यांनी युद्धादरम्यान विशेषाधिकार दिले जेणेकरून त्यांना दिल्लीवरून ग्रीन सिग्नल ची वाट पहावी लागू नये. सैन्याला प्रोत्साहित करण्यासाठी ते स्वतः बॉर्डर फ्रंट वर फिरत होते,अनेक ठिकाणी सभा घेतल्या,सियालकोट -लाहोर या पाकिस्तानी ठाण्यांच्या जवळ भेटी दिल्या. सप्टेंबरच्या उत्तरार्धात शस्त्रसंधी झाली, शस्त्रसंधी झाली असती तर ज्याचे सैन्य जिथे आहे तिथला ताबा त्यांच्याकडेच राहणार होता.

भारतीय सेना मोठा प्रदेश जिंकू शकत होती परंतु त्यासाठी त्यांना वायुसेनेच्या सपोर्ट ची गरज होती. वायुसेनेला युद्धात उतरविण्यासाठी इमर्जन्सी कमिटीच्या परवानगीची गरज होती,पण त्यासाठी बराच वेळ गेला असता,आणि सरकारच्या अशक्त धोरणामुळे परवानगी न मिळण्याचीच शक्यता होती. अश्या वेळी यशवंतरावांनी धाडसी निर्णय घेत सेनेला ऐर स्ट्राईक ची परवानगी दिली. युनायटेड नेशन्स च्या मध्यस्थीने जेव्हा शस्त्रसंधी झाली तेव्हा म्हणजे २२ सप्टेंबर ला भारताने १८४० चौ किमी म्हणजे पाक पेक्षा तिप्पट प्रदेश ताब्यात घेतला होता.२३ सप्टेंबर ला दोन्ही बाजूंनी आपापली शस्त्रे म्यान केली. भारताच्या या तडाख्याने मस्तीत असलेला चीनही सावध झाला आणि त्यांनी आपल्या कुरबुरी बंद केल्या.

यशवंतरावांच्या मुत्सद्दी धोरणामुळे भारताने या युद्धात विजय तर मिळवलाच पण भारतीय सैन्याला प्रचंड आत्मविश्वास हि मिळाला. यशवंतराव संरक्षणमंत्री असताना त्यांनी केलेली भाषणे ज्यांनी ऐकली, वाचली असतील त्यांना त्यांच्या अमोघ कर्तुत्वाची आणि शब्दसामर्थ्याची खात्रीने कल्पना आली असेल. यशवंतरावांनी याकाळात केलेली भाषणे म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विस्डम चर्चिल यांनी जी आवेशयुक्त हाजारो भाषणे केली त्यांचा आटीव अर्क चव्हाणसाहेबांच्या एकेका भाषणात भरलेला आढळतो.
एक संसदपटू म्हणून सुद्धा यशवंतरावांची कारकीर्द उत्कृष्टचं ठरते. भारताच्या नवजात लोकशाहीत लोकशाही परंपरा आणि संकेत पाळावयास सुरवात यशवंतरावांनी केली., लोकशाहीत राज्य करताना विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याचे तत्व त्यांनी अंगिकारले. विरोधी पक्षाशी संबंध ठेवण्याची आदर्श परंपरा यशवंतरावांनीच निर्माण केली असे महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे, वीजप्रकल्प राज्यमंत्री – शिवाजीराव पाटील यांनी यशवंतरावांच्याविषयी लिहून ठेवले आहे.

१९७२ ते १९७५ या काळात ५ वेळा अर्थसंकल्प यशवंतरावांनी मांडला., अर्थमंत्री झाल्यापासून यशवंतरावांनी आपली करआकारणी मागची आपली भूमिका अगदी स्वच्छ आणि ठाम ठेवली.
१. कर आकारणीद्वारा उत्पन्नातील विषमता दूर करणे.
२. कर योजनेचा पाया विस्तृत व व्यापक करणे.
३.कर आकारणीची व करवसुलीची प्रशासन यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे.
हि यशवंतरावांच्या कामाची त्रिसूत्री होती.

परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या साहेबांनी, आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर असंख्य कार्य पारपाडलीत., आज वेगवेगळ्या देशातील भारतीय वकालती हे त्यांच्या मुरब्बी आणि चाणाक्ष कार्यपद्धतीचा निकाल म्हणून पाहता येईल., परराष्ट्रमंत्री असताना यशवंतरावांचा २६ देशांशी संबंध आला होता.

उत्कृष्ट संसदपटू, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान या सगळ्या पदांवर सदैव कार्यरत राहत यशवंतरावांनी आपल्या देशाच्या हितासाठी सदैव कार्यरत होते. 1963 मध्ये अमेरिकन पत्रकार बेल्स हेगन यांनी “नेहरुंनंतर कोण” या शीर्षकाचे एक पुस्तक लिहिले होते त्यात एकूण आठ शक्यता वर्तवल्या होत्या त्यातली एक शक्यता म्हणजे “यशवंतराव चव्हाणसाहेब” याहीपुढे जाऊन सांगायचे झाले तर यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राने राष्ट्राला दिलेली एक बहुमूल्य भेटचं….!

शास्त्रीजींच्या निधनानंतर इंदिरागांधी पंतप्रधान झाल्या., चव्हाण यांची त्यावेळी. एक उत्कृष्ट नेता म्हणून साऱ्या देशात ओळख होती. यावेळी अमेरिकेतील सीआयए हि गुप्तचर संघटना हि इंदिरागांधी यांच्या मंत्रीमंडळातील बलाबल आजमावीत होती.. त्यासंदर्भात अमेरिकेचे माजी अध्यक्ष लिंडन बी जोन्सन यांना सीआयएने पाठविलेल्या अहवालातील उल्लेख काही असा होता. –

“सर्वकाही लक्षात घेता असे लक्षात येते की चव्हाणांच्या राजकीय हालचाली अगदी योग्य आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून अगदी मोक्याच्या क्षणी माघार घेतल्यामुळे हे निश्चित झाले की सौ. गांधीनंतर चव्हाणच प्रधानमंत्री होतील. भारतीय सैन्याच्या अतुलनीय कामगिरीमुळे चव्हाणांचे राजकीय वर्चस्व अजून वाढले आहे. १९६२ च्या आक्रमणादरम्यान व्ही. के. मेनन असमर्थ ठरले तेव्हा चव्हाणांनी संरक्षण खात्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. मग चव्हाणांनी संरक्षण खात्यात अमुलाग्र बदल घडविले., जे भारतीय सैन्यास फायदेशीर ठरले भारतीय सैन्य दुपटीने वाढले आणि रशिया – अमेरिका शस्त्रविभाजनाचा अगदी योग्य फायदा चव्हाणांनी घेतला.”

अश्या ध्येयवादी भारतीय नेत्याची प्राणजोत २५ नोव्हेंबर १९८४ रोजी मालवली. त्यांच्या कार्याचा साक्षीदार असणाऱ्या हिमालयाच्या कुशीत जाता हि कवनं आठवल्यावाचून राहत नाही.

हिमालयावर येता घाला, सह्यगीरी हा धावुन गेला |
मराठमोळ्या पराक्रमाने, दिला दिलासा इतिहासाला |
या मातीच्या कणाकणातुन, तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने|
जोवर भाषा असे मराठी, “यशवंताचि “घुमतील कवने | !

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a comment