यशवंतराव चव्हाण | महाराष्ट्राचे शिल्पकार

यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण | महाराष्ट्राचे शिल्पकार

यशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र – नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.

इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात.

साभार – विकिपीडिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here