महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,48,255

विश्रामबाग वाडा | Vishrambaug Wada

By Discover Maharashtra Views: 1446 4 Min Read

विश्रामबाग वाडा –

शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ यांना पेशवेपद मिळाल्यावर ते शनिवार वाड्यात राहण्यास आले. पण पूर्वी तेथे नारायणराव पेशव्यांचा गारदयांकरवी खून झाला असल्यामुळे नारायणरावांचे भूत आपल्या मानगुटीवर बसेल, अशी भीती त्यांना असे. म्हणून त्यांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी पुण्यात बुधवार वाडा, शुक्रवार वाडा आणि विश्रामबाग वाडा(Vishrambaug Wada) हे ३ नवीन वाडे बांधले आणि त्यात ते आलटून पालटून राहू लागले.

बुधवार वाडा फरासखान्याजवळ बुधवार चौकात होता. तो कचेरी फडासाठी वापरला जात असे. सध्याच्या गाडीखान्यासमोर शुक्रवार वाडा होता. तो राहण्यासाठी वापरला जाते असे. हे दोन्ही वाडे सध्या अस्तित्वात नाही. ह्यातील शेवटचा विश्रामबाग वाडा बाजीराव रोडवर शनिपाराजवळ आहे. जो मुख्यत्वे मौजमजेसाठी वापरला जात असे.

विश्रामबाग वाड्याची जागा सेनापती हरिपंत फडके यांच्या मालकीची होती. त्यांच्याकडून ती विकत घेऊन तेथे वाडा बांधण्यास सुरुवात झाली. इ.स. १८०३ मध्ये सुरू झालेले वाड्याचे बांधकाम इ.स. १८०९ मध्ये पूर्ण झाले. एकूण खर्च २,५४,००० रु. आला. त्यापैकी वाड्याच्या दर्शनी भागाचा, म्हणजे मेघडंबरीचा ठेका ७२,००० रुपयांत मनसाराम नाईक यास देण्यात आला होता. नंतर इ.स. १८०७ मध्ये मागील बाजूचा ठेका ७५,००० रुपयांस त्रिंबकजी डेंगळे यास देण्यात आला होता. बांधकाम पूर्ण झाल्यावर ३० डिसेंबर १८०९ रोजी वाड्याची वास्तुशांत करण्यात आली. हा खर्च ३,५०० रु. आल्याची नोंद आहे.

या वाड्याच्या बांधकामाचा तपशील वाड्याच्या करारामध्ये पुढीलप्रमाणे नमूद केलेला आहे; “पश्चिमेस चौघई चारमजली, पूर्वेस दुधई दोनमजली गच्ची, दक्षिणेस दुघई दोनमजली मधील घर तिघई तीनमजली, उत्तरेकडे एक घई दोनमजली” याप्रमाणे ७ खणांमध्ये ही चौरस इमारत होती. या इमारतीची लांबी ८१५’ असून रुंदी २६०’ आहे. या वाड्याला ३ चौक आहेत. त्यांपैकीं एकांत हौद आहेत. मधल्यांत विहीर आहे. प्रत्येक चौकास भव्य दिवाणखाने जोडलेले आहेत. तळमजल्यावरील चौकांच्या भोवती भरपूर खिडक्या असलेल्या प्रशस्त खोल्या असून तळमजल्यावर दगडी चौथऱ्यावर बसवलेले लोखंडी खांब आहेत. या खांबांचा आधार वरच्या मजल्यांना देण्यात आलेला आहे. या खांबांना जोडून महिरपी कमानी आहेत. कडीपाट, तुळया व खांबांवर सुंदर पाने-फुले व पक्षी कोरलेले आहेत. वाड्याच्या दर्शनी भागात लाकूडकामावर फळे, वेली आणि प्राणी यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. वाड्यातील भिंतीवर महिरपी कोरलेल्या आहेत. वाड्याबाहेर एक मोठा हौद होता. या हौदाला व वाड्याला पाणीपुरवठा करण्याकरिता नारोपंत दातार यांना ४,००० रुपयांचा मक्ता दिल्याचा उल्लेख पेशवेदप्तरात आहे. या वाड्याला व वाड्यासमोर असलेल्या पुष्करणीस सदाशिव पेठ हौदातून पाणीपुरवठा होत असे.

इ.स. १८१८ मध्ये पेशवाई नष्ट होऊन बाजीराव साहेबांची रवानगी ब्रह्मावर्तास झाल्यावर एल्फिन्स्टनने इ.स. १८२१ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर विश्रामबाग वाड्यात संस्कृत पाठशाळा सुरू केली व विद्वान शास्त्री पंडितांना पाचारण करून तेथे सांख्य, वेदांत, वैशेषिक, न्याय, व्याकरण इ. दर्शनशास्त्रे शिकविली जाऊ लागली. संस्कृत पाठशाळेला जोडून इंग्रजी शिक्षणाची शाळाही सुरू करण्यात आली. इ.स. १८३७ मध्ये मेजर कँडी या विद्वान इंग्रज गृहस्थाची तेथे नेमणूक झाल्यावर शाळेचे रूपांतर पूना कॉलेजमध्ये करण्यात आले. इ.स. १८६८ पर्यंत हे कॉलेज विश्रामबाग वाड्यात होते. इ.स. १८६९ मध्ये ते येरवडा येथे जमशेटजी जेजीभॉय यांच्या देणगीतून बांधलेल्या सुंदर इमारतीत स्थलांतरित झाले. आता ते डेक्कन कॉलेज या नावाने ओळखले जाते. इ.स. १८७९ साली बुधवार वाड्यास आग लागून तो भस्मसात झाला. त्याच दिवशी विश्रामबाग वाड्यासही आग लागली, परंतु ती लगेच विझविण्यात आल्याने फारसे नुकसान झाले नाही. लवकरच त्याची दुरुस्तीही झाली. स्वातंत्र्योत्तर काळात विश्रामबाग वाड्यात पुणे नगरपालिकेचे जन्म-मृत्यू नोंद कार्यालय होते. लहान मुलांना पोलिओचा डोस देण्याचा दवाखानाही होता. आजही दक्षिणेच्या बाजूस पोस्ट ऑफिस आहे. इ.स. १८७९ मध्ये विश्रामबागवाड्यास आग लागून वाड्याचा दर्शनी भाग नष्ट झाला. नगरपालिकेने लोकवर्गणीतून वाड्याची पुनर्बांधणी केली. हे बांधकाम मूळ शैलीनुसार केल्यामुळे या वाड्याची ऐतिहासिक वास्तुशैली बहुतांशी कायम राहिलेली आहे.

संदर्भ:
पुण्यनगरीतील वाडे व वास्तू – डॉ. एच. वाय. कुलकर्णी
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
पुणे वर्णन – ना. वि. जोशी
वैभव पेशवेकालीन वाड्यांचे – मंदा खांडके
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी

पत्ता : https://goo.gl/maps/C3pPbbLvLasmqz72A?coh=178571&entry=tt

आठवणी इतिहासाच्या

Leave a comment