करंबळीचे विष्णू मंदिर –
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर इतिहास कथन करणारी अनेक छोटी छोटी गावं लपलेली आहेत.गेल्या दहा वर्षात या ना त्या कारणाने या भागात आमची भटकंती सुरू आहे. करंबळी.. कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव.या गावात नारायणाचं एक छोटं मंदिर आहे. स्थापत्य बघितलं तर करंबळीचे विष्णू मंदिर अंदाजे पंधराव्या/सोळाव्या शतकात बांधलेलं असावं.गाभाऱ्यातली ही मूर्ती अतिशय सुबक आणि मनमोहक आहे.काही वर्षांपूर्वी मूर्तीचा वज्रलेप करून घेतला आहे असं तिथल्या पुजाऱ्यांकडून समजलं.
या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं तर एका हातात फळ आहे.हातामध्ये फळ असलेली विष्णूची मूर्ती खूप कमी ठिकाणी आढळते.मूर्तीसमोर जो छोटासा चौरस आहे तिथे खाली शिवलिंग आहे.सकाळी लवकरच आम्ही या मंदिरात पोहोचलो तेव्हा अभिषेक सुरू होता.इथलं शांत वातावरण,समोर दिसणारा सुंदर निसर्ग,इतिहासाची साक्ष देणारे मंदिराचे खांब आणि गाभाऱ्यातील हे विष्णूचं रूप पाहून अक्षरशः तिथून पाय निघत नव्हता.अभिषेकानंतरची आरती झाल्यावर नमस्कार करून पुजाऱ्यांचे आभार मानून तिथून बाहेर पडलो.
© आदित्य माधव चौंडे.