महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,552

विजयदुर्ग आणि ती भिंत…

By Discover Maharashtra Views: 3843 5 Min Read

विजयदुर्ग आणि ती भिंत

या महाराष्ट्राच्या पटलावर शेकडो किल्ले आजही अगदी दिमाखात उभे आहेत. डोंगरी किल्ले , सागरी किल्ले अशी वर्गवारी करता येईल. महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा अन त्यावर असणारे बुलंद किल्ले आजही सागरलाटांशी झुंज देत आजही उभे आहेत.

असाच एक किल्ला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बळकट असा विजयदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला विजय संवत्सरात जिंकला म्हणुन या किल्ल्याचे नाव विजयदुर्ग. तीन बाजुंना पाणी आणि एका बाजूला जमिनीचा मार्ग असलेला हा विजयदुर्ग नैसर्गिकरित्या बेलाग आहे. तिहेरी तटबंदी या किल्ल्याला मजबूत करते. घनचक्कर , गोविंद , मनरंजन , सदाशिव , सर्जा , व्यंकट , शाह , शिकरा , दर्या , राम गणेश अशी त्यांतील काही बुरुजांची नावे आहेय.
विजयदुर्ग ला छुपे दरवाजे आहेत त्यातच एक आहे जिभिचा दरवाजा. जिभिचा दरवाजा म्हणजे लाकडी दरवाजापुढे असलेली दगडांची तटबंदी. यालाच हस्तिनख असेही संबोधले जाते. गिर्ये गावामुळे या किल्ल्याला घेरिया किल्ला म्हणुनही ओळखले जाते.

शिवाजी महाराजांनंतरच्या काळात कान्होजी आंग्र्यांकडे मराठा आरमाराची जबाबदारी होती. आरमार बुडवण्यासाठी डच आणि इंग्रज अथक प्रयत्न करत होते पण वेळोवेळी त्यांना अपयश येत होते. कान्होजी आंग्र्यांना इंग्रज शार्क असेही संबोधित असत. जेम्स डग्लस लिहितो आंग्रे हा एखाद्या शार्क माशासारखा किंवा मगरीसारखा तस होता.
मुंबईचे चार्ल्स बुन हा गव्हर्नर आला आणि त्याने आंग्र्यांचा बंदोबस्त करण्याचा चँग बांधला. ५ एप्रिल १७१८ मध्ये तेव्हाच्या बॉम्बे कौन्सिलची बैठक भरली आणि त्यात आंग्र्यांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंग्रज विजयदुर्गच्या दिशेने रवाना:
विजयदुर्ग घेण्याच्या उद्धेशाने बुन ने मोहीम आखली त्याची दोन कारणे होती एक आंग्र्यांना नष्ट करणे आणि दुसरं पावसाळ्यात मराठा आरमाराची बरीचशी जहाजे विजयदुर्ग च्या आश्रयास तळ टोकून होती. कान्होजींची आणि त्यांच्या हालचालींची माहिती काढण्यासाठी बून ने एकाची नेमणूक केली त्याचे नाव होते मान्यूअल द कॅस्ट्रो. बुनच्या ताफ्यात अजुन एक चमत्कारीत गोष्ट होती ती म्हणजे आगीचा वर्षाव करणारे एक जहाज. बुन पावसाळ्याची वाट बघत होता. जेणेकरून पावसाळ्यात मराठ्यांची जहाजे विजयदुर्ग च्या भागात आश्रयास येतील आणि त्यांना आग लावून आरमार बुडवण्याचा हेतु बून साधुन होता.

बुन न आपल आरमार तयार केल. मेजर व्हेन या कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याने जहाजांवरच्या तोफांची पाहणी केली. ९ जून १७१८ रोजी इंग्रज आरमार विजयदुर्ग च्या दिशेने निघाले. अडीच हजार शिस्तबद्द सैनिक या आरमारात होते.
इंग्रज आरमाराने वाघोटन खाडीची आणि विजयदुर्ग ची नाकाबंदी करण्यास सुरवात केली होती. किल्ल्याच्या तटबंदीच्या पूर्वेकडील टोकापासुन ते बंदराच्या बाहेरील भागापर्यंत जहाजाची एक रांग उभी करून बंदराबाहेर जाणाऱ्या भागाची नाकेबंदी करण्यास इंग्रज आरमाराने सुरवात केली. इंग्रजांच्या मोठ्या जहाजांच्या पाठीमागे काही लहान जहाजे ही आंग्रेंच्या जहाजाचा पाठलाग करण्यासाठी तयार होती. विजयदुर्गवर आणि मराठ्यांच्या आरमारावर तोफांचा बडीमार सुरू केला. इंग्रज तोफांच्या बडीमाराला फारस उत्तर विजयदुर्ग वरून मिळत नव्हतं.

मराठा आरमार पेटवून देण्याच्या तयारीत असलेल्या इंग्रज आरमाराची काही जहाजे दलदलीत अडकली. एक जहाज अचानक फुटलं. ते का फुटलं याचा शोध घेण्याचा समय इंग्रजांकडे नव्हता. सलग तोफांचा वर्षाव करूनही मराठ्यांवर आणि विजयदुर्गवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हतं. इंग्रजांच्या तोफांचे गोळे तटबंदी पर्यंत पोहचत नव्हते. तटबंदी जवळ उतरून जमिनीवरून किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्नही केला गेला पण मराठ्यांनी गोफणीच्या साहाय्याने तोडीस तोड उत्तर दिल.

दिवसरात्र प्रयत्न करूनही विजयदुर्ग काही हाती लागत नव्हता. अमाप खर्च विजयदुर्ग मोहीमेसाठी करण्यात आला होता. १८ जुन १७१८ रोजी मराठ्यांकडून सपाटून मार खाल्ल्या नंतर इंग्रज जहाज पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाली. कोकणच्या इतिहासात झाला नाही इतका तोफांचा बडीमार विजयदुर्गवर करण्यात आला पण यश मात्र हाती आले नाही.

इंग्रजी जहाजे समुद्रात फुटण्याचे कारण मात्र समजत नव्हते. काहीतरी तिथे होते जे दिसत नव्हते.

इ.स १९८९ च्या एप्रिल महिन्यात आय.एन.एस दर्शक हे जहाज पाणबुड्यांना घेऊन विजयदूरच कडे निघाले. शोधाच्या तिसऱ्या दिवशी हेलिकॉप्टर मधुन पाहणी करताना काही गोष्टी दिसुन आल्या. ज्या ठिकाणी काहीतरी आहे असे जाणवले त्या ठिकाणी फ्लोट्स टाकण्यात आले.  दगडावर दगड रचुन केलेली एक भिंत त्याठिकाणी आढळली. भिंतीची लांबी साधारण ४०० मीटर्स. समुद्राच्या तळापासून भिंतीची उंची साडेतीन चार मीटर्स होती. भिंतीवरील काही दगड छिनलेले होते. अभ्यासनुसार ती भिंत तीन शतके जूनी असल्याचा अनुमान करण्यात आला. ही भिंत ऐन समुद्रात विजयदुर्गच्या पश्चिमोत्तर बाजुस १५० मिटर्सवर आहे. ही भिंत नेमकी कोणी बांधली हा प्रश्न अनुत्तरित आहेच. त्याठिकाणी फुटलेल्या जहाजांचे अवशेष ही सापडले पण ते आता कुठे आहेत याची माहीती नाही..

संदर्भ : विजयदुर्गाचे रहस्य
फोटोसाभार : गुगल

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment