महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,594

वासुदेव

By Discover Maharashtra Views: 2693 3 Min Read

वासुदेव :

महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण जात. वृत्तीने हे धार्मिक भिक्षेकरी आहेत. एका ब्राह्मण ज्योतिषास कुणबी स्त्रीपासून सहदेव नावाचा पुत्र झाला आणि ह्या सहदेवापासून आपली जात उत्पन्न झाली, असे ह्या जातीचे लोक सांगतात. मराठा कुणब्यांप्रमाणे त्यांचे रीतिरिवाज आहेत. भिक्षा मागून ते उदरनिर्वाह करतात आणि घरातल्या मुलाला योग्य वेळी भिक्षा मागण्याची दीक्षाही समारंभपूर्वक दिली जाते. काही वासुदेव शेतीचा व्यवसायही करतात.

वासुदेव जरी भिक्षेकरी असले, तरी ते भिकारी गणले जात नाहीत कारण त्यांना भिक्षा वाढणे हा धर्माचरणाचा भाग मानला जातो. पहाटेच्या वेळी रामकृष्णांचा नामघोष करीत ते येतात. त्यांचा पोषाख वैशिष्ट्यपूर्ण असतो. घोळदार अंगरखा, सुरवार, गळ्यात तांबडा शेला आणि डोक्यावर शंकूच्या आकाराची मोरपिसांची टोपी, कंबरेला बांधलेल्या शेल्यात बासरी खोचलेली असते. पायात घुंगुर असतात. वासुदेवाच्या उजव्या हातात चिपळ्या आणि डाव्या हातात टाळ असतो. त्यांच्या तालावर तो सुंदर धार्मिक गाणी म्हणतो आणि नाचतो.

गृहिणी त्याला धान्य, पैसे देतात. हे दानही वासुदेव विशिष्ट पद्धतीने स्वीकारतो. दान देणाऱ्याला तो त्याच्या वाडवडिलांचे नाव विचारतो आणि त्यांची नावे घेऊन महाराष्ट्रातील विविध देवतांना व संतांना ते दान ‘दान पावलंऽ दान पावलंऽ’ असे एक गाणे म्हणून पोचते करतो. पंढरपूरचा ‘इट्टोबाराया’, कोंढणपुरची ‘तुक्काबाई’, जेजुरीचा ‘खंडोबा’, सासवडचा ‘सोपानदेव’, आळंदीचा ‘ग्यानुबादेव’, देहूचा ‘तुकारामबाबा’, शिंगणापुरचा ‘महादेव’, मुंगीपैठणातला ‘नाथमहाराज’ अशा सर्वांना वासुदेव दान पावल्याचे सांगतो. म्हणजे हे दानवासुदेवाच्या हातात पडत असले, तरी वासुदेवाची भावना ते दान देवदेवतांना व संतांना पोचविण्याची असते. दाताही दान आपल्या वाडवडिलांच्या नावे देत असल्यामुळे दान देऊन स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईत भर पडावी, अशीच त्याची भावना असते. दान पावल्यानंतर वासुदेव बासरी वाजवतो आणि स्वतःभोवती गिरक्या घेतो.

वासुदेव हा कृष्णभक्त असल्यामुळे त्याने श्रीकृष्णाचा वेष घेतला, असे वासुदेवाच्या पोषाखाचे स्पष्टीकरण प्रा. श्री. म. माटे ह्यांनी दिले असून, ‘वासुदेव ही संस्था म्हणजे लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातील भागवत संप्रदायच आहे’ असे मत डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांनी मांडले आहे.

वासुदेवाच्या गाण्यांत कृष्णचरित्र, भक्तीची थोरवी, प्रपंचनीती असे विषय येतात. अनेकदा साध्यासोप्या भाषेत ही गाणी वेदान्ताचाही बोध करतात. वासुदेव आणि त्यांचा व्यवसाय ह्यांना हजार-बाराशे वर्षांची तर परंपरा आहे. महानुभाव साहित्यात ‘भ्रीडी’ ह्या नावाने वासुदेवाचा निर्देश आलेला दिसतो. ज्ञानदेवांनी तसेच नामदेवांनी वासुदेवावर रूपके केली आहेत.

गावोगावी भरणाऱ्या जत्रांत वासुदेव दिसतात. काही लोक नदीच्या पात्रात उभे राहून वासुदेवाला दान देतात. वेगवेगळ्या वासुदेवांची हक्काची वेगवेगळी गावे असतात आणि त्या गावांत प्रत्येक वर्षी फेरी मारून ते दान घेतात. ज्या गावत त्यांचा हक्क नसतो, त्या गावात दान घेताना ते आपली मोरपिसांची टोपी घालीत नाहीत.

संदर्भ : ढेरे, रा. चिं. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.

कुलकर्णी, अ. र.   

मराठी विश्वकोश

Leave a comment