महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

उपाशी विठोबा मंदिर, पुणे

By Discover Maharashtra Views: 1343 2 Min Read

उपाशी विठोबा मंदिर, पुणे –

चिमण्या गणपती मंदिराकडून भरत नाट्य मंदिराकडे जाताना चौकात डाव्या हाताला एक छोटेसे मंदिर आहे. आजूबाजूच्या इमारतींमध्ये लपल्यामुळे हे मंदिर पटकन नजरेला येत नाही. त्या मंदिराचे नाव आहे, उपाशी विठोबा मंदिर.

सलग तीन पिढयांपासून चालत आलेल्या उपासाच्या व्रतामुळे हा विठोबा उपाशी विठोबा या नावाने प्रसिद्ध झाला. हे मंदिर २००/ २५० वर्ष जुने आहे. पेशवाईच्या अखेरीस पुण्यातीत गिरमे सराफांनी हे मंदिर  उभारले. गिरमे सराफ हे विठ्ठल भक्त होते. दरवर्षी पंढरीची वारी करत. वृद्धापकाळामुळे त्यांना वारीला जाणे जमेना, म्हणून त्यांनी सदाशिव पेठेतील सध्याची जागा विकत घेऊन तेथे विठ्ठल मंदिर बांधले. त्यानंतर त्यांनी भक्तीमध्ये आपला काळ व्यतीत करताना आहारही अत्यंत कमी केला. सकाळी थोडे वरईचे तांदूळ व भुईमुगाचे दाणे आणि रात्री एक खारीक, एवढाच त्यांचा आहार होता.

शुक्रवार पेठेत काळ्या हौदाजवळ राहणारे नाना गोडबोले रोज त्या विठ्ठल मंदिरात भजन करीत. वृद्धापकाळी गिरमे सराफांनी नाना गोडबोले यांना मंदिरात वास्तव्यास बोलाविले. त्यांनीही गिरमे सराफांचे उपासाचे व्रत स्वीकारले. कालांतराने गिरमे सराफांनी नाना गोडबोले यांच्याकडे मंदिर सुपूर्त केले. नाना गोडबोले मंदिरात कीर्तन करीत, तेव्हा त्यांच्यामागे  गंगाधरबुवा काळे उभे राहून टाळ वाजवित. कालांतराने नाना गोडबोले यांनी आपल्या आयुष्याचा अखेरीस गंगाधरबुवा काळे यांच्याकडे मंदिराची मालकी सोपविली. त्यांनीही उपासाचे हे  व्रत पुढे चालविले. ते ताक व लाह्यांचे पीठ खात. त्यांनी रामभाऊ साठे यांना मंदिरात भाडेकरू म्हणून ठेवले होते. ते सहकुटुंब मंदिरात राहात.

गंगाधरबुवा काळे यांच्या पश्चात साठे कुटुंबाकडे मंदिराची मालकी आली. अशा तऱ्हेने नात्याच्या नसलेल्या परंतु विठ्ठलभक्ती ह्या समान धाग्याने तीन पिढ्या विठ्ठलाची सेवा करत आल्या. अत्यंत निरीच्छ वृत्तीने त्यांनी मंदिराची मालकी उत्तराधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली.

संदर्भ:
पुणे शहरातील मंदिर – डॉ. शां. ग. महाजन

पत्ता :
https://goo.gl/maps/D3aGLVwYGqADWdYSA

आठवणी इतिहासाच्या

Leave a comment