दुर्लक्षित वीरगळींचा अज्ञात इतिहास

वीरगळ म्हणजे काय | दुर्लक्षित वीरगळींचा अज्ञात इतिहास
Pc - Atul Chavan

दुर्लक्षित वीरगळींचा अज्ञात इतिहास –

खर तर लहानपणापासून वीरगळी बघत आलोय. पण त्या वीरगळीचा महत्तमपणा,पावित्र्यपणा आणि ऐतिहासिकपणा कळायला वयाची २० ओलांडावी लागली. आमच्या गावात देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधल्या गेलेल्या सुर्यमंदिराच्या आसपास साधारणता ६-७ वीरगळी आहेत. त्या वीरगळीच्या ऐतिहासिक अभिन्नतेमुळे किंवा अज्ञानामुळे त्या इस्थतः पडलेल्या आहेत. काही गाडल्या गेलेल्या आहेत. आमच्या गावाच नाव इतिहासात तस कागदोपत्री अजून आढळलेले नाही पण इथल्या मंदिरातील सुर्यनारायणाची मुर्ती अफझल स्वारीच्या वेळी त्या मुर्तीभंजकांने भग्न करण्यासाठी सैन्य पाठवले होते. अशी मुखोग्दत/दंतकथा पिढ्यान् पिढ्या प्रवाहित होत आमच्या पिढीपर्यंत आलेली आहे. आणि याला पुष्टी देणारी ती श्रीची मुर्ती मुर्तीमंत आणि जीवंत साक्षीदार आहे. कारण मुर्ती भग्न आहे. श्री च्या हातावर,नाकावर आणि संपुर्ण मुर्तीवर दोन तीन भग्नतेच्या खुणा आढळतात. दुर्लक्षित वीरगळींचा अज्ञात इतिहास.

यावरून अफझल स्वारी वेळी त्याने तीर्थक्षेत्राला फोडण्यासाठी सैन्य पाठवले होते याला पुष्टी मिळते आणि महत्वाचे म्हणजे पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरापासुन आमचे गाव फक्त दहा किमी अंतरावर आहे. यावरून अफझलखानाने हे मंदिर नि मुर्ती भग्न करण्यासाठी फोडण्या साठी सैन्य पाठवले होते तेव्हा त्या सैन्यापासुन मंदिराचा नि मुर्तीचा बचाव करण्यासाठी इथल्या पराक्रमी विरांनी त्या मुर्तीभंजकाचा प्रतिकार केला असेल नि लढता लढता त्यांना वीरमरण आले असेल ते धारातीर्थी पडले असतील… असा कयास बांधता येतो.

आता मुख्य मुद्द्यावर येतो. इतिहासात दोन प्रकार असतात.

१] समाकालिन,उत्तरकालिन संदर्भ असणारा ज्ञात इतिहास.

२]संदर्भ नसणारा पण पिढ्यानुपिढ्या कथा,किर्तने,पोवाड्यातुन मुखोग्दत पध्दतीने प्रवाहित होत आलेला ज्ञात-अज्ञात इतिहास.

या दोन इतिहास प्रकाराचा समावेश आपल्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर आहे. यातला दुसरा प्रकार आमच्या गावाच्या,मंदिराच्या इतिहासाशी निगडीत आहे. वीरगळी ही या दुसर्या इतिहास प्रकारात मोडतात.

परकीय शत्रुंशी झुंज घेल्यानंतर त्या झुंजीत कामी आलेल्या, युध्दामधे पराक्रम गाजवुन धारातीर्थी पडलेल्या ज्ञात-अज्ञात वीरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वीरगळी घडवल्या जात. वीरगळी म्हणजे त्या वीरांच्या स्मरणे देणार्या समाध्याच आहेत. इतिहासात त्या लढायातील सेनापती वा मुख्य सरदार,शिलेदार सोडले वा त्या त्या वीरांच्या वंशजांनी त्यांच्या पराक्रमाची, नावाची केलेली जोपासना सोडली तर इतिहासाला बाकी सैन्याची नावे सुध्दा ठाऊक नसतात. त्यांचा त्याग पराक्रम बलिदान सामावुन घेण्यात इतिहासाची ही झोळी अपुरी पडत असावी. असो.

तर या अशा वीरांच्या समाध्या वीरगळ रूपाने अज्ञात स्वरूपाने आपल्या महाराष्ट्रभर विस्कटलेल्या आहेत. त्यांना नाव नाही, पण पराक्रमाचा गंध आहे,वीरत्वाचा साज आहे. अशा अज्ञात वीरांची तेव्हाच्या वंशजांनी घडवलेली वीरगळ एका अखंड दगडात असे आणि त्याचे वाचन खालून वर असे उलट क्रमाने केले जाते.

वीरगळीत प्रामुख्याने: ताशीव कातळ दगड निवडला जाई ज्यात सर्वप्रथम शिवलिंगास पुजणारा वीर दाखविला असतो. ज्याखाली त्या वीराची कोणी स्त्री अथवा स्त्रीया सती गेल्या असल्यास त्यांचा चितेवरील प्रसंग कोरुन सुवासिनीचा हात कोरलेला असतो. त्याखाली त्या वीराच्या अखेरच्या युद्धाचा संक्षिप्त प्रसंग कोरलेला असतो थोडक्यात तो वीर कोणत्या वाराने धारातीर्थी पडला हे दर्शविले असते उदा.भालाफेकित गेला असल्यास भाल्याने जखमी झालेला वीर दर्शविला असतो . सर्वच ठिकाणी शस्त्रउल्लेख असेलच असेही नाही. अखेरच्या स्तंभात त्या वीराचा स्वर्गप्रवेश किंवा अतिंमविधी दर्शविला असतो.

वीरगळ ही उभी आयताकृती असते काही ठिकाणी गरजेनुसार त्याचा संरचनेत बदल दिसून येतो

सतीची शिळा:- युद्धात वीरमरण आलेल्या वीराची स्त्री सती गेली असल्यास तिचा वीरगळीत उल्लेख असतो परंतु वीर एखादा मातब्बर अथवा मोठा सरदार असल्यास त्याच्या स्त्रीच्या स्मरणार्थ स्वतंत्र अशी ही सतीची शिळा उभारली जाई.ही शिळा चौरस कातळ पाषाणाची बनवलेली असते ज्यावर हाताची प्रतिकृती असते. वीरगळी आणि सतीची शिळा या प्रत्यक्ष युद्धभूमीवर अथवा त्या योद्ध्याच्या निवासपरिसरात आढळते.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात एकतरी वीरगळ असतेच. कारण हिंदवी स्वराज्याच्या संकल्पापासुन ते पानिपतावर फुटलेल्या लाख बांगड्यापर्यंत महाराष्ट्र तरवार आणि रण पाठीशी बांधुन स्वातंत्र्यासाठी धावला होता,सांडला होता…

इंटरनेटवर आपल्याला माहित नसलेला एक “डार्क वेब” असतो. तसाच इतिहासात काही वीरगळी,मंदिरे,लेण्या,बारव, ज्यांचा इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख नसतो पण पण त्या इतिहासाचाच एक भाग असतात. असा एक “अज्ञात इतिहास” असतो. जो आपल्याला ज्ञात नसतो पण तो असतो. आपल्या समोर,आपल्या आजुबाजुला,आपल्या परिसरात तो मौल्यवान खजिना दृष्टीक्षेपात येत असुनही आपल्या अज्ञानामुळे तो दृष्टीआड होऊन पडलेला असतो. तो इतिहास अभ्यासकांना,वाचकांना,लेखकांना ज्ञात असतो. पण सर्वसामान्य लोकांना याबाबतची माहीत नसते त्यामुळे इतिहास अभ्यासक,लेखक,वाचक यांचे हात याविषयी जनजागृती करण्यास थोटे पडतात. त्यांना या कामात बलाची मर्यादा पडते.

आज आपल्या या “अज्ञात इतिहासाच्या” अज्ञानामुळे तो इतिहास कायमचाच पडद्याआड जाण्याच्या एका बिंदूवर उभा आहे. तो पडद्याआड गेला तर आपल्या इतिहासाला किंचीतसा तडा नक्कीच जाईल. म्हणुन आपणच उठले पाहिजे त्या “अज्ञात इतिहासा” बाबत जनजागृती केली पाहिजे.

लोकांना त्याची माहिती दिली पाहिजे. आपण जिथे जिथे प्रवास करू तिथे तिथे या “अज्ञात इतिहासा” च्या खाणाखुणा आहेत का हे शोधुन तिथल्या परिसरातल्या लोकांना त्याबाबत माहिती देऊन जागृत केले पाहिजे. हे कार्य खुप छोटे आहे पण त्याचे कार्यफल अलौकीक,अमुल्य असे आहे. कारण हा अज्ञात इतिहास जोपासला तर तो अदृश्य सुंगधासारखा सर्वांना जगण्याची प्रेरणा देत राहिल. आणिक काय लिहू…

सागरास…..

महेश निकम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here