उनकेश्वर शिवमंदिर
किनवटच्या रस्त्याला एक वेगळीच सवय आहे… तो तुम्हाला सरळ गंतव्यापर्यंत पोहोचवत नाही; आधी थोडं मनाशी बोलायला लावतो. उनकेश्वर शिवमंदिरच्या दर्शनाला जाताना सारखनीहून मांडवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पळसाच्या झाडांनी आजूबाजूचं माळरान अक्षरशः केशरी करून टाकलेलं दिसलं. जणू निसर्गाने शांतपणे रंगांची उधळण केली आहे. दूरवर पसरलेली ती भगवी छटा डोळ्यांना सुखावणारी आणि मनाला प्रसन्न करणारी वाटत होती.
मधूनच काटेसावरीची उंच, थोडीशी राठ भासणारी झाडं दिसत होती. त्यांच्या शेजारी आकाशाला भिडू पाहणारी काही उंचच उंच, पिवळसर-गर्द साल असलेली मजबूत झाडे दिमाखात उभी होती. पण खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेत होती ती पानगळ झालेल्या फांद्यांवर उमललेली लालभडक, टपोऱ्या फुलांची गर्दी. जणू कोरड्या देठांनीच रंगांचा उत्सव साजरा केला होता.
कोरडेपणाच्या पार्श्वभूमीवर उमललेला हा बहर क्षणभर थांबून विचार करायला लावतो, जीवनातही कदाचित असंच असतं. वरकरणी ओसाड वाटणाऱ्या क्षणांतच आत कुठेतरी रंग दडलेले असतात. त्या रंगांना फुलण्यासाठी फक्त योग्य वेळ लागतो. त्या रस्त्यावरून जाताना निसर्ग केवळ दिसत नव्हता; तो अनुभवता येत होता. केशरी पळस, रक्तवर्णी काटेसावरी आणि उंच, स्थिर उभे असलेले वृक्ष, या सगळ्यांनी मिळून प्रवासाला एक वेगळीच उब दिली होती.
वनऋषी मारुती चितमपल्ली यांनी आपल्या लेखनातून वारंवार किनवट परिसरातील या निसर्गसौंदर्याचा उल्लेख केला आहे. त्याचं लिखाण वाचताना जसं डोळ्यांसमोर सगळं उभं राहतं, तसंच ते किनवटच्या रस्त्याने जाताना प्रत्यक्ष अनुभवायलाही येतं. त्यांच्या लेखणीने ज्या तपशीलाने हा प्रदेश रंगवला आहे, तो केवळ वर्णन नसून अनुभवाचा दस्तऐवज आहे. चितमपल्लींच्या शब्दांतून हे सगळं जसं आहे तसंच आपल्या मनात उतरू लागतं. त्यामुळे किनवटचा हा निसर्ग पाहताना वाटतं, आपण केवळ प्रवासी नाही; आपण त्या लेखनातून आधीच इथले झालेले आहोत.
या नैसर्गिक धनसंपदेच्या सान्निध्यात अचानक नजरेस पडले ते प्राचीन आणि पवित्र असे उनकेश्वर शिवमंदिर. दाट झाडीतून डोकावणारे मंदिराचे शिखर पाहताच मन भक्तिभावाने नतमस्तक झाले. निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे अनुभवास येतो. जणू पळसाच्या केशरी फुलांनी सजलेली भूमी आणि त्या साक्षीने उभे असलेले हे शिवधाम, एकमेकांच्या अस्तित्वाला अर्थ देत उभे आहेत.
या मंदिराच्या शांत प्रांगणात थांबून आजूबाजूला नजर फिरवली की त्याच्या प्राचीनत्वाची जाणीव अधिक ठळक होते. किनवट तालुक्यातील कुंडानजीक वसलेले उनकेश्वर शिवमंदिर हे तेराव्या शतकातील असल्याचे येथे आढळणाऱ्या इ.स. १२८१ सालच्या शिलालेखावरून स्पष्ट होते. त्या शिलालेखात या देवस्थानाचा उल्लेख रामायणाशी जोडलेला आढळतो, ही बाब विशेष लक्षवेधी आहे.
यादव काळातील राजा रामचंद्र देव, त्यांचे मांडलिक भावक देव आणि विद्वान प्रधान हेमाद्री पंडित यांची नावे त्या लेखात कोरलेली दिसतात. मंदिराच्या देखभालीसाठी आणि पूजाविधीसाठी वीस गावे इनाम देण्यात आल्याची नोंदही त्यात आहे. नागरी लिपीत आणि मराठी भाषेत कोरलेला हा शिलालेख केवळ धार्मिक उल्लेख नसून त्या काळातील प्रशासन, भाषा आणि समाजरचनेचेही द्योतक आहे.इतिहासाच्या या साक्षीनंतर स्थानिक लोकपरंपरेत सांगितली जाणारी रामायणकालीन कथा मंदिराच्या आध्यात्मिक महत्त्वाला अधिक अधोरेखित करते.
रामायणाच्या १३ व्या अध्यायात अशी कथा आहे की शरभंग ऋषी त्वचारोगाने ग्रस्त होऊन येथे तपश्चर्या करीत होते. त्यांनी रामनामाचा अखंड जप सुरू ठेवला होता. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीराम येथे प्रकट झाले आणि त्यांनी जमिनीकडे अग्निबाण सोडला. त्या बाणाच्या आघाताने भूमीतून गरम पाण्याचे कारंजे उसळले. ते पाणी ऋषींच्या अंगावर पडताच ते रोगमुक्त झाले, अशी श्रद्धा आहे. तेव्हापासून या कुंडातून गरम पाणी अखंड प्रवाहित होत असल्याचे स्थानिक मानतात. आजही त्या कुंडातून निघणारी उष्ण वाफ आणि पाण्याची सततची धार पाहताना लोककथा, इतिहास आणि निसर्ग यांचा एकत्रित अनुभव मिळतो.
येथे उभे राहिल्यावर जाणवते की हे स्थान केवळ एक प्राचीन मंदिर नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक स्मरण यांचा जिवंत वारसा आहे.
काटेसावरीच्या लाल फुलांच्या पार्श्वभूमीवर उभं असलेलं हे मंदिर एक वेगळीच गोष्ट सांगून जातं. जीवनात कोरडेपणा येतो, वेदना येतात… पण कुठेतरी आतमध्ये उष्ण झरा दडलेला असतो. तो सापडला की रोगही जातो आणि रुखरुखही.
अमित हरीकृष्ण त्रिवेदी.
तामसा रोड, तालुका भोकर, जिल्हा नांदेड
