उमामहेश | आमची ओळख आम्हाला द्या

उमामहेश

उमामहेश | आमची ओळख आम्हाला द्या –

सोलापूर जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे वेळापूरचे अर्धनारीनटेश्वर  नावाने प्रसिध्द असणारे मंदिर होय. माळशिरस तालुक्यातील इतिहास प्रसिद्ध असे वेळापूर हे गाव आहे. पंढरपूर पुणे महामार्गावर हे गाव वसलेले असून, सोलापूर शहरापासून साधारणता ११० किमी अंतरावर वेळापूर  हे गाव आहे. या परिसरात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वेळापूर येथील अर्धनारीनटेश्वर मंदिर होय   वेळापूर येथील मंदिर देवगिरीचे राजे यादव यांच्या काळात  बांधले गेल्याचे पुरावे उपलब्ध होतात. हे मंदिर वेळापूरच्या बसस्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर सुस्थितीत आहे .मंदिराची रचना पूर्व पश्चिम असून परिसर भव्य आहे.(उमामहेश)

दगडी प्रवेशद्वातून आत जाताच मंदिराच्या समोर असणारा बारव, त्यामागे एका उंच दगडी चौथर्‍यावर असलेले खूपच लांब आकाराचे शिवमंदिर पाहताक्षणी यादव कालीन असल्याचे लक्षात येते. समोर असणाऱ्या बारावीच्या लगतच भिंती मध्येच एक लहानसे मंदिर आहे यामध्ये गणेश, नाग, शिवलिंग यांच्या मूर्ती आहेत. बारावाच्या पायऱ्या लगत यादवकालीन शिलालेख आहे.हा देवनागरी लिपीत असून भाषा मराठी आहे.

या मंदिराच्या बांधणीचा कालखंड अंदाजे अकराव्या, बाराव्या शतकातील असावा असे वाटते. वेळापूर येथे असणाऱ्या मंदिरास लोक आजच्या काळात अर्धनारीनटेश्वरिचे मंदिर म्हणून संबोधतात. कित्येक लोक यास वटेश्वर मंदिर असेही म्हणतात. मंदिरात प्रवेश करून आत गेल्यास गर्भगृहामध्ये आपणास एका साळुंके वर उभी असणारी उमामहेश्वरांची प्रतिमा आढळून येते. या प्रतिमेस अर्धनारीनटेश्वर म्हणून संबोधले जाते. वास्तविक पाहता अर्धनारीनटेश्वर म्हणजे,अर्धा शिव व अर्धी पार्वती होय. परंतु या मूर्तीमध्ये असे कोणतेही लक्षण नाही, म्हणून यास अर्धनारी नटेश्वरा ची मूर्ती म्हणणे मूर्ती शास्त्राच्या दृष्टीने उचित होऊ शकत नाही.

साळुंकेवर उभी असणारी उमा महेश्वराची मूर्ती स्थानक आहे. उमामहेश्वराच्या मूर्ती प्रकारातील अलींगन मूर्तीचा हा प्रकार आहे. मूर्ती अतिशय कोरीव आहे. हिरव्या रंगाच्या ग्रॅनाईट दगडापासून मूर्ती बनविल्याचे दिसते. साळुंकेमध्ये मधोमध उमा महेश्वराची ही मूर्ती आहे. या मूर्ती पैकी महेश चतुर्भुज आहे. प्रदक्षणा क्रमाने त्याचा उजवा हात आशीर्वाद मुद्रेत असून ,त्यात जपमाळ आहे. वरच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरचा डावा हात पार्वतीच्या डोक्यावर असून त्यामध्ये नाग धरलेला आहे. खालचा उजवा हात पार्वतीच्या(उमेच्या) कमरेवर ठेवलेला आहे. पार्वती द्विभूज असून तिने डाव्या हातात कमळ धारण केले आहे.  तिचा उजवा हात तिने महेशाच्या खांद्यावर ठेवलेला आहे .

महेश द्विभंगावस्थेत उभा आहे. तर उमा अर्थसंपादन अवस्थेत उभी आहे. महेशच्या मूर्तीच्या पाया लगत म्हणजेच  रथांम्बिकेवर शिवगण व नंदी आहेत. तर उमेच्या पायालगत गणपती आणि घोरपड म्हणजे गोदा हे उमेचे असे वाहन आहे. उमा आणि महेश्वराच्या पायात तोडे आहेत. महेशाच्या कमरेभोवती धोतर गुंडाळलेले असून गुडघ्यापर्यंत त्याचा सोगा सोडलेला आहे. कमरेभोवती कमरबंद असून त्याच्या लडी धोतरावर लोंबकळत सोडल्या आहेत.छाती भोवती देखील एक सुबक कलाकुसरयुक्त पट्ट् आहे. गळ्यामध्ये ग्रीवा ,हार देखील घातलेला आहे. कानामध्ये मोतीयुक्त गोलाकार कर्ण कुंडले आहेत. मस्तकावर जटा मुकुट आहे .जटामुकुट कोरीव असताना तो अत्यंत कलाकुसरीने युक्त असून त्यावर नागबंध देखील आहे. नाग बंधाच्या खाली जटा मुकुटा भोवती नरमुंडमाला असलेली पट्टी आहे.

महेश चा चेहरा शांत आहे.उमेच्या पायात पैंजण असून पैंजणाचा वर तोडे आहेत. तिचेही  नेसूचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आहे. कमरेभोवती कमर बंध आहे. मधोमध कीर्तिमुख आहे. कमरबंधाच्या मोत्याच्या लडी मांडीपर्यंत रुळलेल्या आहेत. गुडघ्याच्या नेसूच्या वस्त्राची किनार अत्यंत रेखीव पद्धतीने कोरलेली आहे. गळ्यामध्ये चार माळा घातलेल्या आहेत. कानात सुबक अशी कर्ण कुंडले आहे. तिचा चेहरा अत्यंत प्रसन्न आहे. तिची केशरचना अतिशय सुबक आहे. रथांबिकेच्या वर डाव्या बाजूस विष्णू तर उजव्या बाजूस ब्रह्मा आहे. मूर्तीचा श्रृंगावर अष्टदिक्पाल शिल्पांकित केले आहेत. मूर्तीच्या मधोमध कीर्तिमुख आहे. मूर्ती साधारणपणे तीन फूट उंचीची आहे. अतिशय कलाकुसरयुक्त ही मूर्ती रेखीव, देखणी व पाहताक्षणी नजरेत भरण्यासारखी आहे. उत्तर चालुक्यकालीन मंदिर स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.

वास्तविक पाहता ही मूर्ती उमा आणि महेशाची असताना या मूर्तीस अर्धनारीनटेश्वर का म्हटले जाते हा प्रश्नच आहे?त्यामूळे मूर्तीशास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या शिल्पास उमामहेश शिल्प असेच संबोधावे.

उमामहेश व अर्धनारीनटेश या दोन्हि मूर्तींचे फोटो दिलेले आहेत.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

अर्धनारीनटेश्वर  उमामहेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here