तुळशी विवाह संबंधी पौराणिक कथा

By Discover Maharashtra Views: 2416 2 Min Read

तुळशी विवाह संबंधी पौराणिक कथा –

“जालिंदर” नावाचा महापराक्रमी राक्षस होता. त्याने त्याच्या पराक्रमाच्या बळावर अनेक देव-देवता, साधू संतांचा छळ केला, या त्रासाला कंटाळून शेवटी सारे भगवान विष्णू कडे गेले,आणि रक्षण व सुरक्षिततेकरिता विनंती करू लागले. तेव्हा त्यांना असे कळते की, जालिंदर राक्षसाची पत्नी “वृंदा” ही महान पतिव्रता असुन केवळ तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे च जालिंदर नेहमी विजयी ठरतो, त्यामुळे साहजिकच जालिंदर चा पराभव करण्यासाठी, वृंदेच्या पतिव्रतेच्या भंग करण आवश्यक होते, मात्र त्यासाठी कोणीही धजावत नसल्याचे पाहून, अखेरीस भगवान विष्णूने जालिंदराचे रुप घेतले आणि, वृंदेच्या महाली तिच्या पतिव्रतेच्या भंग करण्यासाठी गेले, आणि वृंदेच्या पतिव्रात्येचा भंग झाला, त्यामुळे जालिंदर मृत्यूमुखी पडला,तत्पश्चात वृंदेला सर्व प्रकार समजला..तेव्हा वृंदेने दु:खी होऊन विष्णू चा धिक्कार केला.(तुळशी विवाह)

“तु ही पत्नी विरहाने दु:खी होशील, शेष नागाने मुनी चा वेष घेऊन फसवले त्यामुळे तो ही लक्ष्मण बनेल, तुम्ही सारे वनात भटकाल” असे म्हणून वृंदेने अग्नी प्रवेश केला. वृंदेच्या प्रेमाने आसक्त झालेले विष्णू, वृंदेची राख शरीराला लावून तेथेच व्यथित होऊन राहीले. तेव्हा शक्ती देवीने देवता, मुनींना “सरस्वती, लक्ष्मी आणि गौरी” कडे जाण्यास सांगितले. या तिन्ही देवतांनी काही बिया दिल्या आणि सांगितले, विष्णू ज्या ठिकाणी विरहात स्थित आहेत त्या ठिकाणी या बिया पेरा..

ठरल्याप्रमाणे त्या बिया वृंदेच्या राखे मध्ये पेरल्या,त्या बियांतून “धात्री,मालतीलता, आणि तुलसी” या तीन वनस्पती उगवल्या. यात धात्री म्हणजे “सरस्वती”, तुलसी म्हणजे “गौरी”, मालतीलता म्हणजे “लक्ष्मी”. या वनस्पती “तम रज आणि सत्वमय” होत्या. विष्णू ने या स्त्रीरुपी वनस्पती ला पाहीले आणि मोहावश होऊन, तुलसी रुपी वृंदेस प्रार्थना करु लागले. धात्री आणि तुलसी ने ही विष्णू चे अनुराग पुर्ण अवलोकन केले मात्र लक्ष्मी ने ईर्ष्येने पाहीले. तत्पश्चात विष्णू तुलसी आणि धात्री समवेत वैकुंठ लोकी गेले.

“सर्वपापहरं नित्यं कामदं तुलसीवनमं। रोपयन्तिनरा: श्रेष्ठास्तेनपश्यन्तिभास्करिम्” ।।

त्यामुळे विष्णू ला तुलसी प्राणप्रिय आहे तसेच धात्री (आवळा) फळाचा तुलसी विवाहात मान असतो. तद्वतच विष्णू आणि तुलसी यांचे पूजन “कार्तिक” वृताच्या उद्यपनार्थ करणे आवश्यक सांगितले आहे.

Shrimala K. G.

Reference:- स्कंदपुराण कार्तिकमास महात्म्य – अध्याय १४ ते २३

Leave a comment