शेंदूर्णीचा त्रिविक्रम विष्णु

शेंदूर्णीचा त्रिविक्रम विष्णु

शेंदूर्णीचा त्रिविक्रम विष्णु –

वामनाने तीन पावलांत स्वर्ग पृथ्वी पाताळ जिंकून घेतले या रूपाला त्रिविक्रम विष्णु म्हटलं जातं. सहसा केशवराज विष्णु या रूपातील मुर्ती जास्त आढळून येतात (पद्म, शंख, चक्र, गदा असा शस्त्र क्रम). त्रिविक्रम रूपातील मुर्तीच्या हातातील शस्त्र क्रम पद्म, गदा, चक्र आणि शंख असा असतो (डावीकडून उजवीकडे). अशी ही त्रिविक्रम विष्णु मुर्ती शेंदूर्णी (ता. जामनेर,  जि.जळगांव) येथे आहे. या विष्णुच्या शक्तीला क्रिया असे म्हणतात. सोयगांव पासून हे गांव अतिशय जवळ आहे. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजूची प्रभावळ ही जवळपास मुर्ती इतकीच आहे.

एरव्ही प्रभावळीवर कोरलेले दशावतार फार लहान असतात. पण इथे मुर्तीच्या सोबत जणू सर्व विश्वच कोरले आहे. आणि त्याचे कारणही परत तीन पावलांत जग व्यापणारा त्रिविक्रम दाखवायचा आहे.  (Jitendra Vispute आणि Sudhir Mahajan या मित्रांमी ही मुर्ती माझ्या निदर्शनास आणून दिली. त्यांचे धन्यवाद. कुणाकडे त्रिविक्रम विष्णु मुर्तीचे अजून स्षष्ट फोटो असतील तर जरूर टाका. जेणेकरून प्रभावळीवरील मुर्ती वाचता येतील.) ही मुर्ती अगदी उकिरड्यात पडलेली होती. शेंदूर्णीच्या एका सत्पुरूषाला दृष्टांत झाला. उकिरडा उकरला गेला आणि ही पाच फुटी भव्य मुर्ती सापडली.

येथे आषाढी एकादशीला व कार्तिकी एकादशीला त्रिविक्रमाची मोठी यात्रा भरते.आषाढी एकादशीला पंढरपूरचा विठ्ठल शेंदुर्णीला त्रिविक्रमाच्या मंदिरात आलेला असतो अशी श्रद्धा आहे. शेंदुर्णीच्या ज्या सत्पुरूला त्रिविक्रमाच्या मूर्तीचा साक्षात्कार झाला ते सत्पुरूष कडोबा महाराज. त्यांचे शेंदुर्णीला मोठे मंदिर आहे. यात्रेकरू त्रिविक्रमांच्या दर्शना सोबतच कडोबा महाराजांचे ही श्रध्देने दर्शन घेतात. (लेखक मित्र रविंद्र पांढरे यांनी दिलेली माहिती).

या दंत कथेतला खरेखोटेपणा आपण बाजूला ठेवू. पण गावकर्‍यांनी भव्य मंदिर उभारून या अप्रतिम मुर्तीची जोपासना केली हे महत्वाचे. ग्रामीण पर्यटन वाढवायचे तर अशी ठिकाणं लोकांपर्यंत समोर आणली पाहिजेत.  तिथपर्यंत किमान चांगले रस्ते बनवले पाहिजेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here