अनाजीपंताचे मूळ गाव मराठवाड्यातील वसमत

अनाजीपंताचे मूळ गाव मराठवाड्यातील वसमत

सध्या टीव्हीवर छ्त्रपती संभाजी मालिका फार गाजत असून यातील एक पात्र अनाजी पंताविषयी लोकांच्या मनात विशेष उत्सुकता लागून राहिली आहे. छ्त्रपती संभाजीराजे त्याला कधी शिक्षा देणार ? त्याचे पुढे काय होणार वगैरे … यातील अनाजीपंत म्हणजे अण्णाजी दत्तो कुलकर्णीच्या मूळ गावाविषयी इतिहासाला फारशी माहिती नाही. तरी परंतु अनाजी हा साधारणपणे इ. स. 1646 च्या आसपास शहाजीराजेंच्या तालमीत तयार होऊन छ्त्रपती शिवरायांच्या सेवेत दाखल झाला. शिवरायांच्या अनेक मोहिमात त्याने भाग घेतलेला आहे.

विशेष म्हणजे अफजलखान चालून आला त्यावेळी राजे प्रतापगडाकडे गेले. तेव्हा पाठीमागे जिजाऊ साहेब आणि संभाजी राजे यांच्या देखरेखीसाठी महाराजांनी अनाजीची नेमणूक केली होती, पुढे कोंडाजी फर्जन्दने ज्यावेळी अतिशय कमी सैन्याच्या जोरावर पन्हाळा जिंकून घ्यायचा बेत आखला तेव्हा हाच अनाजी स्वारीच्या पाठीमागची फळी सांभाळत होता. तर छत्रपती शिवाजीराजे शंभूराजासह ज्यावेळी औरंगजेबाच्या भेठीसाठी आग्र्याला गेले तेव्हाही जिजाऊसाहेबांच्या देखरेखीखाली स्वराज्याची जबाबदारी सांभाळण्याचे काम अनाजीने केले. अनाजीला संगमेश्वरचे कुलकर्णीपद देण्यात आले होते. पुढे 6 जून 1674 रोजी शिवाजीराजांनी राज्याभिषेक केला तेव्हा याच अनाजीला आपल्या अष्टप्रधान मंडळातील एक मंत्रिपद देऊन त्याच्यावर मोठा विश्वास टाकला होता.

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.

1. पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.

2. पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्‍याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.

3. पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्‍या येणार्‍या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

4. मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

5. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

6. पंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

7. न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

8. पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : मोरेश्वर पंडित. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्‍या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

अशारीतीने अनाजीपंत अर्थात अण्णाजी दत्तो याच्यावर सचिव म्हणजे अतिशय महत्वाची जबाबदारी पडली. अनाजीपंताचा शिक्का पुढीलप्रमाणे होता.

“ श्रीशिवचरणी तत्पर दत्तसुत अणाजी पंत निरंतर”

आजच्या भाषेत अनाजीपंत म्हणजे महाराजांचा पीए च होता. शिवरायांच्या हयातीत अनाजीपंताने राजेंचा विश्वास संपादून अतिशय छान काम केले. 3 एप्रिल 1680 ला शिवरायांचे निधन झाल्यानंतर स्वराज्याचा छत्रपती कोण नेमायचा यावरून अनेक खलबत व्हायला लागली. तसे अनाजीपंताने थोरले असुनही राजपुत्र संभाजीराजांना डावलून राजारामाला छत्रपती म्हणून बसविले. आणि पुढे अडचण नको म्हणून पन्हाळ्यावर कैदेत असणार्‍या संभाजीराजांना अटक करण्यासाठी सेनापति हंबीरराव मोहीत्यांची नेमणूक केली. सेनापति हंबीरराव मोहितेच राजेंच्या बाजूला गेल्याने हा कट फसला आणि पहिल्यांदा अनाजीपंत उघडे पडले. तरीपण संभाजीराजांनी मोठ्या मनाने त्यांना माफी देऊन पूर्ववत आपल्या कामावर घेतले.

पुढे औरंगजेबाचा एक मुलगा अकबर हा बापाविरोधात बंड करून संभाजीराजेंच्या आश्रयाला आला. यावेळी संभाजी राजांवर विषप्रयोग झाला. यामध्येही अनाजीचा हात होता. दुसर्‍यांदा राजांनी माफी दिली. परंतु कुठल्याही प्रकारे राजेंना गादी वरून दूर करायचेच असा चंग बांधलेल्या मंत्र्यांनी आता थेट अकबराशी संधान बांधले. त्याकरिता अनाजीपंताने अकबराला पत्र लिहून संभाजी राजांना कट करून ठार मारण्यात यावे अशाप्रकारची गळ घातली. या प्रकाराने अकबरसुद्धा घाबरून गेला. त्याला वाटले हे पत्र मुद्दाम संभाजीराजांनी माझी परीक्षा घेण्याकरिता पाठविले असावे. म्हणून त्याने ते पत्र सरळ संभाजीराजाकडे पाठविले. यातील अक्षर हे आपला सचिव अनाजी पंताचे असल्याची त्यांना खात्री पटली. त्यानुसार शेवटी ऑगस्ट 1681 साली संभाजी राजांनी अनाजीपंताला आपल्या हत्तेचा कट केल्याबद्दल हत्तीच्या पायाखाली दिले.

अनाजीपंताला भलेही ठार करण्यात आलेतरी त्याचा मुलगा रघुनाथ पंताला राजांनी पुन्हा एकदा आपल्या सेवेत सामावून घेत संगमेश्वर, थेरगाव आणि बुंदेलखंडातील अनेक गावचे कुलकर्णीपद दिले.

तर अशारीतीने स्वराज्याचे येवढे मोठे पद सांभाळलेले व मराठ्यांच्या इतिहासातील अतिशय महत्वपूर्ण असणारे हे व्यक्तिमत्व मूळचे मराठवाड्यातील असल्याचे वाचल्यानंतर आश्चर्य वाटायला लागते. त्यानुसार अनाजीपंत म्हणजेच आण्णाजी दत्तो यांचा मूळ पुरुष हा दत्तो त्रिंबक कुलकर्णी हे मूळचे मराठवाड्यातील वसमत ( यालाच बसमत असेही म्हटले जाते ) या गावचे रहिवाशी असून त्यांचाच मुलगा म्हणजे अण्णाजी. त्याकाळी नाव लिहिताना आपल्या नावापुढे आडनाव लिहिण्याची पद्धत नसल्याने ऐतिहासिक कागदपत्रात अनाजीचे नाव अण्णाजी दत्तो याप्रमाणे सापडते. आदरपूर्वक त्यांना अनाजीपंत म्हटले जाते.

“ शिवाजी निबंधावली भाग 2” या दुर्मिळ पुस्तकात इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी याविषयी नव्याने माहिती प्रकाशित केलेली असून याकरिता त्यांनी अस्सल साधनाचा आधार घेतलेला आहे. त्यानुसार अनाजीपंताची वंशावळ खालीलप्रमाणे दिलेली आहे.

1. दत्तो त्रिंबक कुलकर्णी ( मूळ पुरुष, वसमत, जि. हिंगोली ) मुलगा एक

2. अण्णाजी दत्तो उर्फ अनाजीपंत ( अष्टप्रधान मंडळातील सचिव )
मुलगा एक

3. रघुनाथ अण्णाजी ( संभाजीराजेंच्या काळात संगमेश्वर, थेरगाव आणि

बुंदेलखंडातील अनेक गावचे कुलकर्णी पद ) मुलगा एक

4. आवजी रघुनाथ मुले तीन – रामचंद्र , लक्ष्मण आणि आबाजी
( पहिल्या दोघांना मूल नाही )

5. आबाजी आवजी ( मुलगा एक )

6. विठ्ठल आबाजी ( मुलगा एक )

7. त्रिंबक विठ्ठल ( मुलगा एक )

8. गणेश त्रिंबक ( मुले दोन ) – शंकर आणि त्र्यंबक

पैकी त्र्यंबक गणेश कुलकर्णी हा पुण्याच्या शेतकी कॉलेजमध्ये नोकरीला होता. अशारीतीने मराठवाड्यातील आजच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत गावचे रहिवाशी असलेल्या अनाजीपंताने सार्‍या इतिहासप्रेमींनी आपल्या नावाभोवती जखडून ठेवलेले आहे.

( don’t copy without permission)

अनाजीपंताचा फोटो प्रतिकात्मक आहे

माहिती साभार – Dr. Satish Kadam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here