सुरत – बतसुरत | भाग १

By Discover Maharashtra Views: 5434 18 Min Read

सुरत – बतसुरत | भाग १.

इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट…

काळोख पडून , १ प्रहर झाला , चंद्रप्रकाशाला चिरत , शिवराय ३०० जाबाज , मावळ्यांना घेऊन लालमहालात प्रवेशले . ठरल्याप्रमाणे सर्वजण आपापल्या कार्याला लागले , बहिर्जी नाईक स्वतः राजांसोबत होते . लालमहालात कापाकापी सुरू झाली , परंतु शास्ता ला ह्याची काही खबरच नाही , तो पुरता निद्राधीन झाला होता , प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडीत होता , बहिर्जी राजांना घेऊन खानाच्या कक्षाकडे घेऊन चालले होते , वाटेत येणाऱ्या , हशमांची सरळ कत्तल केली जात होती , लालमहालात रक्ताचा सडाच मराठ्यांनी घातला होता .(इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट)

अखेर तो निर्णायक क्षण आला , राजे शास्ताखानाच्या कक्षात आले , बघतात तर काय खान निर्धास्त झोपला आहे , समोर आपला काळ तलवार उपसून उभा आहे , ह्याची खानाला कल्पनासुद्धा नव्हती , राजांनी पलंगाला असलेले , कापडी आवरण टरकन फाडले , आवाजामुळे शास्ता जागा झाला , त्याच्या पायाखालची जमीनच हादरली , ” शिवाजी , शिवाजी …. ” , म्हणतात तो हा , राजे वार करणार तेवढ्यात खानाने पळ काढला , राजेही त्याच्यामागोमाग आले , अंधार होता , खान शेजारील स्त्रियांच्या शयनकक्षात शिरला , बुरखा घातला , शमादानं विझवली , राजे अचूक त्या शयनकक्षात आले , शिवाजी स्त्रियांवर शस्त्र उचलीत नाही हे खानाला पुरते ठाऊक होते , परंतु जरी खानाने बुरखा परिधान केला असला तरी राजांच्या तीक्ष्ण नजरेतून तो वाचला नाही , राजे समशेर घेऊन पुढे म्हणत आले , ” शास्ता आता तुझी खैर नाही ” , आपल्याला शिवाजीने ओळखले हे खानाने ओळखले त्याने बुरखा काढून पळायला सुरुवात केली , राजे त्याचा पाठलाग करत होते , खान जीवाच्या भीतीने पळत होता , राजे मागेच होते , हा प्रकार लालमहालाच्या पहिल्या मजल्यावर होत होता , पळता पळता खानाने एका खिडकीतून खाली उतरून पळ काढायचा

असा ठरवून तो खिडकीतून उतरू लागला , राजांनी लगोलग हेरून खानवर एक घाव घातला , खान पडला ….. राजांनी बघितले तर खान पडला होता , त्यावेळी राजांना असे वाटले की , खानाची गर्दन मारली , अंधार फार होता , आता राजांना लालमहालातून पसार होणे गरजेचे होते , कारण बाहेर पाऊण लाख फौज होती , आणि मोहिमेचा मुख्य भाग पार पडला होता , पुढे ठरलेल्या योजनेनुसार सर्वांनी आपली भूमिका पार पडली , मोहीम यशस्वी झाली . राजे सिंहगडी आले , दुसऱ्यादिवशी समजले की , खान मेला नाही , जो वार झाला त्यात खानाच्या हाताची ३ बोटे छाटली गेली .

परंतु शास्ताखान म्हणजे प्रतिऔरंगजेब , ह्याला शिवरायांची प्रचंड दहशत बसली , त्याने पुण्यातून ४ दिवसातच पळ काढला , नंतर औरंगजेबाने त्याची नियुक्ती बंगालला केली .

शास्तावर छापा घालून बरेच दिवस झाले , शास्ताचा प्रभाव कमी झाला आहे , हे पाहून आता आपण काही मोठी कामगिरी बजावू , जेणेकरून बादशहाच्या मनात आपले स्थान उंचावेल , असा मनसुभा बांधून जसवंतसिंह ( जोधपूरचा राजा ) , हा ३० हजार फौझेसह , तोफखाना , तसेच प्रचंड लवाजमा घेऊन निघाला , ” कोंढाणा घ्यायला ” , त्याने गडाला वेढा घातला आणि मराठ्यांसोबत संघर्ष चालूच होता ….. मराठे अतिशय तीव्र प्रतिकार करीत होते , जसवंतसिंह १ लाख फौज जरी घेऊन आला असता तरी त्याला विजय मिळाला नसता , हे निर्विवाद सत्य होते .

■ राजधानी गजबजली : –

शाईस्तेखानाचा एवढा मोठा पराभव , शिवाजी महाराजांनी केला , त्यामुळे राजगडावर आनंदीआनंद पसरला होता . दरबार भरला होता , राजांनी ह्या मोहिमेत , ज्यांनी पराक्रम गाजविला त्यांचा यथोचित सत्कार केला , सर्वांचा मानसन्मान केला . दरबाराचे कामकाज पूर्ण झाले , राजांनी बहिर्जी नाईकांना थांबायला सांगितले , बहीर्जींनी ओळखले , राजांच्या मनात नवी मोहीमेबद्दल विचार चालू आहे , आणि वेळ न दवडता बहिर्जी राजांना म्हटले , ” राजे कोणती मोहीम काढलीत ” , राजे स्मित देत म्हणाले , बहिर्जी तुम्ही सर्वच जाणता , तुम्ही तर आमचा ३ रा डोळा आहात , आणि डोळ्यापासून काहीही वाचत नाही . बहिर्जी आधी सिद्दी नंतर शास्ता ह्यांनी स्वराज्याची अपरिमित हानी केली , बराच प्रदेश बेचिराख केला आहे , त्यात रयतेचे हाल खूप वाईट आहेत , मोगलांनी गेल्या

३ वर्षात गावच्या-गावं पेटविली , सर्वत्र हाहाकार उडाला आहे , त्यात आरमाराला धन लागतंय आणि आरमार मजबूत करण्यासाठी एक नवा सागरीकिल्ल्याचे निर्मिती करण्याचा विचार आमच्या मनात आहे ; पण यासाठी मोठ्या प्रमाणात धन लागणार आहे , त्यामुळे आपण असं स्थान शोधा जेथून प्रचंड धन आपल्याला प्राप्त होईल . त्यावर बहिर्जी म्हणाले सद्यस्थितीत , अशी २ वैभवसंपन्न शहरं आहेत , ” सुरत व बुऱ्हाणपूर ” . राजे बुऱ्हाणपुरपेक्षा सुरत बरं आहे , त्याला दोन कारणं आहेत , संपत्ती बुऱ्हाणपूरच्या अधिक आणि परदेशांच्या वखारी आहेत . राजे लागलीच म्हणाले , आपण तात्काळ सुरतेत जावे , आणि सुरतेची खडानखडा , तपशीलवार माहिती काढून आणा . राजांना मुजरा करून ,बहीर्जींनी

निरोप घेतला .

■ बहीर्जींची अय्यारी : –

बहिर्जी अपल्यासमवेत हेरांचे एक मोठे पथक घेऊन सुरतेत दाखल झाले , त्यापथकात सुंदरजी , रावजी , विठूजी मानके , अप्पा रामोशी , अब्दुल कादर , संताजी बोबडे अशा अनेक गुप्तहेरांचा समावेश होता . सर्वांनी वेषांतर करून आपापल्या कार्याला सुरुवात केली , बहीर्जींनी स्वतः जातीने सुरतेच्या सुभेदाराची हेरगिरी केली , तपशील घेतला , इतर गुप्तहेर , गुप्तरित्या माहिती अतिशय सूक्ष्मपणे गोळा करत होते . १ महिना हेरांचे कार्य सुरू होते , संपूर्ण माहिती गोळा केली , आणि काही हेरांना सुरतेत ठेवून नाईक , राजगडाच्या रोखाने निघाले ….

■ राजे व बहीर्जींची गुप्तभेट : –

राजांना वर्दी देण्यात आली , राजे , बहिर्जी नाईक आल्यात , भेटीसाठी परवानगी मागत आहेत , त्यावेळी राजे मोरोपंतांसोबत मसलतीत गुंतले होते , राजांनी वर्दी देणाऱ्या मावल्याला , नाईकांना पाठवायला सांगितले आणि मोरोपंतांना जावयास सांगितले . नाईक आले , राजांना मुजरा केला , राजे बोलले , बोला बहिर्जी , कामगिरी बजावली आपण . बहिर्जी म्हणाले , राजे कामगिरी चोख बजावली . राजे म्हणतात एकूण सुरत काय म्हणते , त्यावर बहिर्जी म्हणाले , ” राजन सुरत काही म्हणत नाही , कारण ती गर्विष्ठ ; पण सुरत मारल्याने , अग्नीत द्रव्य आपणाला मिळेल ” . काय म्हणता बहिर्जी , होय राजे , सुरत ही प्रचंड वैभवसंपन्न आहे , सर्वीकडे श्रीमंतीथाट , राजे कुबेराचे ऐश्वर्य सुद्धा फिके पडेल इतकी , वैभवता सुरतेत आहे . तिथे ३ व्यापारी आहेत , वीरजी बोहरा , हाजी सय्यद बेग , हाजी कासम . राजे ह्या वीरजी बोहरा ह्याच्याकडे एवढी संपत्ती आहे , की त्यातून शास्ताखानाने आपल्याकडे ३ वर्ष जी हानी केली ती भरून निघेल , राजे म्हणतात एवढे धन . होय महाराज , हे तर काही नाही राजे हाजी कासमचं घर कोटीच्या संपत्तीने भरले आहे , त्याची अनेक जहाजे रेशीम तसेच इतर मौल्यवान वस्तूंनी खचाखच भरून , बंदरात आहेत . असे बरेच व्यापारी आहेत , राजे जगाच्या मोठमोठ्या व्यापाराच्या वाटाघाटी ह्या सुरतेत होतात , टोपीकर इंग्रज , वलंदेज , अरमेनी , फरांसिस , मुनानी , फिरंगी , डच असे १८ टोपीकर आपल्या वखारी स्थापित करून सुरतेत स्थित झाले होते , तसेच राजे , ईरानी , तुराणी , हबशी , अरबी , बोहरी , यहुदी , खोजा , अफगाणी , मुगली , बलुची , इत्यादी परदेशी व्यापारी येथूनच व्यापार करीत असत .

सर्वचजण अमाप संपत्ती कमवित , ह्या सर्वांमुळेच सुरतेची बाजारपेठ गजबजलेली होती . राजे त्यामुळे सुरत मारल्याने आपल्याला अगणित धन मिळेल , त्याने आपल्या स्वराज्याची आत्ता आर्थिक स्थिती सुधारेल ; परंतु दीर्घकाळ स्वराज्य आर्थिक अडचणीत सापडणार नाही , हे निश्चित . बहिर्जी अप्रतिम , आपण खरच उत्तम कार्य केलं आहेत , परंतु बहिर्जी मोगलांची एवढी वैभवशाली नगरी आहे , तर सुरक्षा सुद्धा तशीच असेल ना ? , नाही राजे ती तर वेगळीच बाब आहे , राजे सुरतेचा सुभेदार आहे , इनायतखान , तो नेहमी शान –

– शौकिमध्ये दुबलेला असतो , वास्तविक सुरतेच्या संरक्षणाकरीता , औरंगजेबाने ५ हजार सैन्याची सोय केली आहे , पण हा जरा अतीच आहे , त्याने सुरतेत १ हजार सैनिकांची नियुक्ती केली आहे , उर्वरीत ४ हजार सैनिक कागदावरच होते , त्यासर्वांची त्वनखा हाच फस्त करायचा [ भ्रष्टाचार सारा , वास्तविक औरंगजेबाला सर्व माहीत होते परंतु सुरतेतून करोडोंची जकात मिळत होती त्यामुळे तोही मौन बाळगून होता ] , त्याचं असं म्हणणं सुरतेकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोण करेल , पण स्वराज्याचा नरसिंह , नजर ठेवून आहे त्याला माहित नव्हते . राजे सुरतेत एक भुईकोट किल्ला आहे , बळकट आहे , किल्लेदार सुद्धा लढवय्या आहे , इतर ही बारकावे सांगितले , राजांनी आणि बहीर्जींनी , सुरतेची लुटीची योजना आखावयास सुरूवात केली , सर्व ठरले कसे जायचे , किती फौज घ्यायची , किती सरदार बरोबर घ्यायचे , मुळात सुरत लुटण्यासाठी ३२५ मैल आत मोगली मुलखात मजल मारायची होती , पण फायदाही तेवढाच मोठा होता , मेख वेगळीच होत होती , मजल मारून लूट करणे थोडं सोपे होते , परंतु लूट मोगली प्रदेशातून , स्वराज्यात व्यवस्थित आणणे , हे सर्वात कठीण होतं , त्यावरही राजांनी उपाय काढला , तसेच सुरतेला अतितटीच्या वेळी कुठल्या मोगली ठाण्यावरून मदत येईल , तसेच मदत यायला वेळ किती लागेल ह्याचा राजांनी विचार केला , सर्व रणनीती आखली , तारीख निश्चित केली , नाईक मुजरा करून निघाले .

■ महाराज निघाले , देवदर्शनाला : –

राजे राजगडावरून १० हजार हत्यारबंद फौजेसह , तसेच मोरोपंत , प्रतापराव [ कुडतोजी गुजर ] , व्यंकाजीपंत , निळोपंत , मकाजी आनंदराव ,अनाजीपंत , दत्ताजीपंत , मानसिंग मोरे , व रुपाजी भोसले हे विश्वासू आणि पराक्रमी सरदारांना घेऊन राजे [ १५ डिसेंबर , १६६३ ] , निघाले , गडावर बातमी पसरविली त्र्यंबकेश्वरास दर्शनाकरिता जाणार , हा गनिमीकावा राजांनी खेळला . मराठे निघाले , जातानाचा मार्ग हा किल्ले कोंढाणा जवळून होता , येथे जसवंतसिंह वेढा घालून होता , आतापर्यंत अनेक दिवस गेले ; परंतु मराठ्यांचा मारच खात होता , इकडे राजे सुद्धा गेले . राजे एवढी मोठी फौज घेऊन , मात्र ३ मैलांवरून गेले , तरी ह्या जसवंतसिंहास खबर लागली नाही , इतका हा बेफिकीर होता .

पुढे , राजे १५ दिवसांनी ,

त्र्यंबकेश्वरला [ दि. ३१ डिसेंबर १६६३ ] , आले.

राजे त्र्यंबकेश्वरला दाखल झाल्यानंतर , फौज पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं ; परंतु गावकऱ्यांना जेव्हा समजलं कि , दस्तुरखुद्द शिवाजी महाराज आलेत , तेव्हा गावकरी स्थिरावले , राजांना पाहून ते धन्य झाले , नंतर राजांनी त्यादिवशी त्र्यंबकेश्वराची , योग्यपणे पूजा व अभिषेक केला , काही रक्कम दान म्हणून दिली आणि दुसऱ्याच दिवशी राजे निघाले [ इथपर्यंत कोणालाही , माहीत नव्हतं , की राजांच्या मनात नक्की काय आहे किंवा मोहीम कोणती आहे ] , परंतु घोडी जशी गुजरातच्या दिशेने दौड घ्यायला लागली तसं , सरदारांना थोडंफार अंदाज यायला लागला , पण पुढे एका गावात मुक्काम असताना , सर्व मुख्य सरदारांना सुरतेच्या मोहिमेबद्दल सविस्तररित्या माहिती दिली , मोहिमेचं महत्व सर्वांस समजाविले . ४ दिवस जलदगतीने प्रवास करून राजे , दि. ५ जानेवारी १६६४ रोजी , राजे सुरतेपासून ५ मैल अंतरावर , ‘ उदना ‘ ह्या गावी आले , उदना मध्ये सर्वत्र भयावह वातावरण निर्माण झाल होतं .

■ वकिलगिरी : –

शिवाजी महाराजांनी एकदम हल्ला केला नाही , प्रथम राजांनी सुरतेच्या सुभेदाराशी बोलणी करायला [ खंडणीची ] , आपला वकील वल्लभदास गुजराथी , ह्यांस पाठवले .

इकडे सुरतेत सर्वीकडे , घाबराघाबर सुरू झाली , शिवरायांची धास्ती तर होतीच , आणि खुद्द शिवाजी राजेच आलेत , त्यामुळे शहरात सर्व घाबरले . राजांची सुरतेत प्रचंड दहशत होती . सुभेदाराला पण ही

वस्तुस्थिती माहीत होती , परंतु तो असे दर्शवित नव्हता [ हा अतिशय गाफील होता ] . वल्लभदास हे , इनायतखानाला भेटले , त्यानेही योग्य ते आदरातिथ्य केले , मग वल्लभदास हे मुख्य खंडणीची बोलणी करावयास सुरुवात केली , प्रथमतः त्यांनी खंडणीचा प्रस्ताव मांडला , तो असा होता , ” सुभेदार इनायतखान , आपल्या मोगल सल्तनीचे , नामचीन सरदार अबू तालिब

शाईस्तेखान , ह्यांनी गेली ३ वर्षे आमच्या स्वराज्याचे प्रचंड नुकसान केले , शेतीचे तसेच रयतेचे अपरिमित हानी केली , त्यामुळे ह्यासर्वाची परतफेड म्हणोन , आपण १ कोटी होनाची खंडणी आम्हांस लगोलग म्हणजेच उद्याच म्हणजे सुपूर्त करावी , आणि उद्या म्हणजेच

बुधवारी , दस्तुरखुद्द शिवाजी महाराज खंडणी

घ्यावयास येतील , व तेव्हा ह्यावेळी सुरतेतील

सर्वात श्रीमंत व्यापारी , वीरजी बोहरा , हाजी कासम , हाजी सय्यद बेग हे , खानसाहेब जेव्हा आपण शिवाजी राजांना खंडणी पेश करता वेळेस हाजीर असावेत ” . खानसाहेब जर आपण खंडणी व्यवस्थितरीत्या दिलीत , तर राजे सुरतेतील कोणत्याही वस्तूला , घरांना हात लावणार नाहीत ; परंतु जर असे घडले नाही तर

सुरतेची बतसुरत होण्यापासून कोणीही वाचवू

शकत , एवढं नक्की संपूर्ण शहराची लूट केली जाईल आणि सुरतेमध्ये प्रचंड जाळपोळ दिसेल , व जाळपोळ इतकी भयानक असेल की , ते भयावह दृश्य दिल्लीतूनही स्पष्टपणे दिसेल .

राजांच्या वकिलाचे बोलणे ऐकून , खान पुरता चक्रावला , परंतु हे तो दाखवू शकत नव्हता , मग त्याने अतिशय उर्मटपणे उत्तर दिले , आम्ही खंडणी देणार नाहीत , आणि जर उद्या शिवाजी आला तर त्याला दंड

दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत , पुढे मूर्ख प्रवृत्तीच्या इनायतखानाने वल्लभदास ह्यांना अपमानित केले , त्यामुळे वल्लभदास निघून राजांपाशी आले .

वल्लभदास घडलेला सर्व प्रकार अतिशय सविस्तरपणे सांगितला , राजांना असेच होणार हे ठाऊक होते , आता सुरतेत लुटीस प्रारंभ करणे , असे योजनेप्रमाणे राजांनी ठरविले .

[■] टोपीकर इंग्रजांचे धोरण : –

शिवाजी राजे , सुरतेच्या जवळ

आलेत , हे जेव्हा इंग्रजांना कळाले , सर्व टोपीकर अस्थिर झाले , टॉपिकरांचा सुरतेतील प्रमुख प्रतिनिधी जॉर्ज ऑक्झिडण ( Jorge Auxidon ) , हा  इनायतखानाला भेटायला आला , तो खानाला म्हणाला , आम्हाला निश्चित कळलंय , शिवाजीराजा आपल्या फौझेनिशी आला आहे , त्याने जर शहरात प्रवेश केला , तर तो प्रचंड धुमाकूळ घालेल . आपण सुरतेचे मोगली सुभेदार आहात , त्यामुळे सुरतेच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही आपली आहे . त्यावर स्मित करत खान म्हणाला , ” आम्ही तुम्हा टोपिकरांचा असा विचार करायचो की , तुम्ही अतिशय धाडसी , शूर , पण तुम्ही असा विचार करता , आपण असा विचार करणे सोडा , सुरतनगरी अतिशय सुरक्षित ह्या इनायतखानाच्या नजरेखाली . जो आलाय तो खरा शिवाजी आहे का ? की कोणी दरोडेखोर आहे , आणि एक लक्षात ठेवा , खुद्द खरा शिवाजी आला तरी , आम्ही त्यास मौत देण्यास सक्षम आहोत ” . असे बोलणे एकून

जॉर्ज खानाला मुजरा करून निघाला ….

【 वरील प्रकरणावरून मोगली मोठेपणा व गाफिलपणा , किती मोठ्याप्रमाणात सुरतेत होता हे , सिद्ध होतंय . 】

शिवराय आपल्या मुख्य सरदारांना लूट कशी करायची , ते समजावून सांगत होते , रणनिती स्पष्ट करीत होते , बहिर्जी सर्व बारकावे , सर्वांस समजावीत होते . उद्याचा दिवस सुरतेसाठी आणि मोगल सल्तनेसाठी , अतिशय भयावह आणि नामुष्की आणणारा होता , शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व तयारी चालू होती . १० हजार फौज , सकाळचं तांबडं कधी फुटतंय आणि राजे आदेश कधी देणार ह्याची वाट पाहत होते …..

संदर्भ ग्रंथ : –

  • छत्रपती शिवाजी महाराज [ श्री.वा.सी. बेंद्रे ]
  • छत्रपती शिवाजी महाराज [ श्री.प्र.देशपांडे ]
  • क्षत्रियकुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र [ श्री.कृष्णराव अर्जुन केळुसकर ]
  • शिवकाल (१६३०-१७०७)[डॉ.वि.खोबरेकर]
  • शिवजीचारित्र [ जदुनाथ सरकार ]
  • छत्रपती शिवाजी व शिवकाल
  • राजा शिवछत्रपती [ श्री.बाबासाहेब पुरंदरे ]
  • ऐतिहासिक बखरी
  • इंग्लिश दस्ताऐवज
  • इतर ग्रंथ .

माहिती साभार – जगविजेता संभाजी फेसबुक पेज
राहुल पाटील

(इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट,इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट,इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट)

Leave a comment