सुरसुंदरी

सुरसुंदरी

सुरसुंदरी –

मंदिराच्या बाह्यांगावर अतिशय आकर्षक, डौलदार, सौष्ठवपूर्ण अशी स्त्री शिल्पे आढळून येतात. त्यांना सुरसुंदरी असे म्हणतात. इथे उदाहरणादाखल होट्टल (ता. देगलूर, जि. नांदेड) च्या मंदिरावरील ३ सुरसुंदरींचे छायाचित्र घेतले आहे. सगळ्यात डावीकडची आहे ती तंतू वाद्य वाजविणारी “तंत मर्दला”. आज  स्त्रीया गाताना नृत्य करताना आढळतात. पण त्या मानाने वाद्य वादन करताना फारशा आढळून येत नाहीत. पण प्राचीन मंदिरांवरील शिल्पात वादक स्त्रीया दर्शविलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळात स्त्रीया संगीताच्या क्षेत्रात सर्वच अंगांनी आपले योगदान देत होत्या.

मधली आहे तिच्या हातात देवी देवतांच्या हातात असते तसे बीजपुरक आहे व दूसरा हात अक्षमालेसह वरद मूद्रेत आहे. स्त्रीला देवते इतके महत्व आम्ही देतो हे सामान्य स्त्रीचेच शिल्प कोरून सिद्ध केले आहे. ही सुरसुंदरी त्या दृष्टीने वेगळी आणि महत्वाची ठरते.

सगळ्यात उजवीकडची आहे ती “दर्पणा”. सौंदर्याचा एक सुंदर अविष्कार यातून समोर येतो. दूसर्‍यावर प्रेम करायच्या आधी आरशात पाहून आपण आपल्याच प्रेमात पडायचे ते वय असते. नेमका हाच क्षण शिल्पात पकडला आहे. राजेंद्रकृष्ण यांनी शब्दबद्ध केलेले सी. रामचंद्र यांचे सुंदर गाणे आहे (अमरदीप, १९५८, देव आनंद, वैजयंतीमाला).

झुलेसे घबराके उतरा जो बचपन

भुलेसे एक दिन देखा जो दर्पण

लागी अपनी नजरीया कटार बनके

कोई दिल मे समा न जाये प्यार बनके

तशी ही दर्पणा.

सुरसुंदरी केवळ स्त्रीच्या बाह्य सौंदर्याचा अविष्कार प्रकट करतात असे नव्हे. एकुणच स्त्रीचे जे विविधअंगी विविधपैलू व्यक्तिमत्व आहे त्याचा आविष्कार  प्रकट करतात. ही शिल्पे होट्टल, माणकेश्वर, गुप्तेश्वर मंदिर धारासुर, धर्मापुरी, निलंगा येथील मंदिरांवर मोठ्या सख्येने आणि आकर्षक पद्धतीनं आढळून येतात.

(छायाचित्र Travel Baba )

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here