महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,687

शिवराई होन

By Discover Maharashtra Views: 2227 5 Min Read

शिवराई होन –

राज्यभिषेकप्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘शिवराई होन’ नावाचे २.८८ ग्रॅम वजनाचे व १.३२ सेमी व्यासाचे सोन्याचे नाणे चलनात आणले. या नाण्यावर एका बाजूस बिंदूयुक्त वर्तुळात , तीन ओळीत ” श्री राजा शिव ” व दुसऱ्या बाजूस बिंदूयुक्त वर्तुळात , दोन ओळीत ” छत्र पती ” अशी अक्षरे होती.  होन नावाची नाणी पूर्वीही चलनात प्रचलित होती. यादव , शिलाहार यांच्या लेखात गद्याण , हौनु या सुवर्ण चलनाचे उल्लेख पहिल्यांदा लिखित स्वरूपात येतात.

त्याकाळी दक्षिणेकडील राज्यांत त्यांची-त्यांची सोन्याची नाणी चलनात होती. ही सोन्याची नाणी मुख्यतः मोठ्या व्यवहारासाठी वापरत. शिवपूर्वकालीन उदाहरण द्यायचे झाल्यास एका तहाचा उल्लेख करावा लागेल तो पुढीलप्रमाणे,

इ.स. १६३६ मध्ये बादशहा शाहजहान याने दक्षिण काबीज करण्याच्या हेतूने निजामशाहीवर स्वारी केली आणि राज्य जिंकून घेतले परंतु मोगलांच्या राजधानीपासून दूर असलेला हा प्रांत ताब्यात ठेवणे अवघड असल्याने ६ मे १६२६ या दिवशी त्याने आदिलशहाबरोबर तह केला. त्यात असे ठरले की,’ मामले रायगड व निजामशाही कोकण विजापूरच्या आदिशाहास द्यावेत त्याबद्दल आदिलशाहाने वीस लक्ष होन किंवा ऐंशी लक्ष रुपये शहाजहानला द्यावेत. या तहामुळे आदिलशाही सत्ता रायगड आणि निजामशाही कोकणावर प्रस्थापित झाली.

इ.स.१६७४ मध्ये इंग्रजांची शिवाजी महाराजांसोबत तहाची बोलणी सुरू होती. यावेळी नारायण शेणवी सोबत मुख्य वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडरची नेमणूक करण्यात आली. ३ एप्रिल रोजी दुपारी शेणवी आणि इंग्रज वकील शिवाजी महाराजांनी भेटला यावेळी राजापूरच्या वखारीची लुट केल्याने इंग्रजांचे जे नुकसान झाले होते त्याची भरपाई मिळावी याबद्दलची बोलणी झाली. शिवाजी महाराजांनी भरपाई देण्याचे मान्य केले. नुकसानीच्या रकमेबद्दल २५०० होन राजापूरच्या जकातीतून , २५०० होन १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्यावर्षी व उरलेले ५००० होन पुढील दोन वर्षात द्यावे असे शिवाजी महाराजांनी मान्य केले. या वरून मोठ्या व्यवहारात शिवकाळात शिवराई होनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसते.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकप्रसंगी पाडलेल्या या होनांचा वापर ब्राह्मणांच्या दक्षिणेसाठी मोठ्या प्रमाणात केला गेला.

सुवर्णतुला झाली त्यावेळी शिवाजी महाराजांचे वजन १६००० होन भरले. त्यात एक लक्ष होनांची भर घालून राज्याभिषेकप्रसंगी जमणारया ब्राह्मणांना दान देण्याचे ठरले. शिवराज्याभिषेक प्रसंगी प्रत्येक ब्राह्मणाला १०० होन दक्षिणा दिली. मुख्य पुरोहिताला पाच हजार होन व दोन हजार होनांचे वर्षासन करून दिले. याप्रसंगी २ लक्ष होन दक्षिणेच्या स्वरूपात वाटले. गागाभट्टासही होनाच्या स्वरूपात दक्षिणा दिली.

याच शिवराई होनांनी शिवाजी महाराजांना सुवर्णस्नान घालण्यात आले.राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे ५ वाजता शिवाजी महाराजांनी सिंहासनारोहण केले यावेळी मुख्यप्रधान मोरोपंतांनी मुजरा करून आठ हजार होन शिवाजी महाराजांच्या शिरावर ओतले.  मुख्य हिशोबनीस निळोपंडित    यांनी सात हजार होन , आणखी दोघा प्रधानांनी प्रत्येकी पाच हजार होनांनी शिवाजी महाराजांना सुवर्णस्नान घातले.

राज्याभिषेकानंतर ‘शिवराई होन’ हे नाणे चलनात आले त्याचबरोबर इतर ही ‘होन’ नावाची नाणी चलनात होती. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जी जामदार खान्याची मोजदाद करण्यात आली त्यात आपल्याला अनेक होनांची माहिती मिळते.

शिवछत्रपतींच्या निधनानंतर रायगडावर असलेल्या जामदारखान्यात निरनिराळ्या सोन्याच्या नाण्यांची संख्या आणि त्यांचे प्रकार यांची माहिती मिळते त्यात सुवर्ण नाण्यांमध्ये गंबार , पुतळ्या , शिवराई होन , संणगिरी होन , देवराई होन , जडमोल होन , कावेरी होन , पामनाइकी होन , तुती होन , फलमा नाणे जिन्नस या सोन्याच्या नाण्यांची यादी आलेली आहे त्याचबरोबर २५ ,००,५०० नाण्यांची जिन्नसवार नोंद करताना अजून चौदा प्रकारच्या होनांची माहिती समजते. अपारजी , त्रिपुरी , त्रिमरी , चंदावरी , हणमंतराय , महमदशाही , येलुरी , व्यंकटराई , रामराय , सर्जाफलम , गुंडगौड , बीलमभी , तुलजुमी , देवनहाली. त्याचप्रमाणे निशाणी होन , पादशाही होन , अच्युतराई होन , धारवाडी होन , सैल्याघटी होन , अदवानी होन यासारखे होनांची नावे इतर मोजदादीत आलेली आहेत.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर २० जुलै , १६८० श्रावण शुद्ध  ५ म्हणजे नागपंचमीच्या दिवशी संभाजी महाराजांनी मंचकारोहण केले. या प्रसंगी प्रतापगडच्या भवानीला दहा हजार होन देणगी दिल्याचे उल्लेख एका अप्रकाशित पत्रात आहेत. नंतर ऑगस्ट महिन्यात जामदारखान्याची तपासणी केली.  यावेळी निरनिराळ्या अधिकाऱ्यांजवळ ३ लक्ष होन खरेदीस दिले होते तसेच निरनिराळ्या किल्ल्यांवर ३० लक्ष होनांची संपत्ती ठेवली होती. यावरून संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतसुद्धा ‘शिवराई होन’ नाण्यांचा वापर मोठया प्रमाणात होत असे असे म्हणता येईल. नंतरच्या काळातील संभाजी महाराजांच्या हत्येनंतर अस्थिर राजकीय वातावरण तसेच काही काळ खुद्द राजधानी असलेला रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी ही सोन्याची नाणी लुटली किंवा वितळवली असली पाहिजेत कारण नंतरच्या काळात शिवराई होन या नाण्यांचे उल्लेख सापडत नाहीत तसेच ही नाणी देखिल हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच प्रमाणात सापडलेली आहेत.  म्हणून ‘ शिवराई होन ‘ अत्यंत दुर्मिळ नाणं आहे.

लेखन – नविन म्हात्रे, जोगेश्वरी – मुंबई.

Leave a comment