छ.शाहू काळातील शेखमिरा

कन्टेन्ट | गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे २ ३ ४ ५ ६ ७ | मौर्य सत्तेचा उदय | गड कसे पाहवे | संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर | जावळी मोहीम ६

छ.शाहू काळातील शेखमिरा | अपरिचित ऐतिहासिक व्यक्ति –

इ.स.१७०७ मधे छ. शाहू महाराजांची मोगलांनी सुटका केल्यावर ते महाराष्ट्रात आले. वाटेतच खेड-कडूस येथे ताराराणी सैन्य व शाहू सैन्याचा संघर्ष झाला. ताराराणीच्या सेनापतिपासून बरीच मंडळी शाहूच्या पक्षात आल्याने ताराराणीचा पक्ष कमजोर होऊन पराजित झाला. पुढे शाहू महाराज शिरवळ येथे आल्यावर शंकराजी नारायण सचिव रोहिडा किल्ल्यावर होते, त्यांना शिरवळला येण्याचे महाराजांनी कळविले. सचिवांनी ताराराणीशी दुध भाताची शपथ घेतली असल्याने ते ती शपथ मोडू शकत नव्हते, त्याचबरोबर स्वराज्याचा खरा वारसदार असलेल्या महाराजांच्या आदेशाचा अव्हेर देखील करू शकत नव्हते. अशावेळी सचिवांनी संन्यास घेऊन आंबवडे येथे देह त्यागला. सातारचा किल्ल्ला ताराराणी यांच्या ताब्यात होता. महाराज सातारच्या दिशेने जाताना सातारचा किल्ला आपल्या ताब्यात असणे गरजेचे होते. ताराराणीच्या वतीने सातारचा किल्ला प्रतिनिधी यांच्या सत्तेखाली होता. छ. शाहू महाराजांनी त्या किल्ल्यावरील असलेल्या शेखमिरा याला आपल्या बाजूला करून घेतल्याने सातारचा किल्ला त्यांच्या ताब्यात आला.

शेखमिरा हा वाई येथील त्यांच्या घराण्याचा मूळपुरूष होय. तो फौजेतील पायदळातील लहानसा अंमलदार होता. त्याने सातारच्या किल्ल्यासाठी केलेल्या मदतीच्या बदल्यात महाराजांनी वाईच्या शेखमिरा यास पसरणी गाव इनाम, साठ स्वारांची मनसब व त्याच्या खर्चासाठी चाळीस हजार रुपयेची नेमणूक व दरमहा १८०० रुपयांचा सरंजाम सुरू केला. त्यानंतर पसरणी गावाच्या परिसरातील नऊ गावचा मोकासा शेखमिरा यांस मिळाला. इ.स.१७१९ ते  १७३२ पर्यंत पसरणी गाव, वाई मधील जमीन, एरंडोल व दर्यापूर महालाचा मोकासा याचा समावेश होता.

१७३४ मधे शेंदुरजणे गावी पंधरा बिघे जमीन देवस्थान इनाम म्हणून मिळाली. तो १७३४ दरम्यान मरण पावला असावा पण त्याला वारसपुत्र नसल्याने त्याचा दत्तकपुत्र खानमहंमद हा वारसदार असल्याने तो सर्व मिळकितीचा मालक झाला. तो १७८५ पर्यंत जीवंत असावा व आपल्या वतनाचा कारभार सांभाळून होता. त्याचा मुलगा यांस पेशव्यांनी इनाम व सरंजाम तसाच पुढे चालू ठेवला. १८०६ साली शेखमिरा यांच्या इनामात करंजखोपचा देखील समावेश झाला.

इ.स.१८१८ मधे ब्रिटिशांची सत्ता सुरू झाल्यावर मुंबई गव्हर्नर माउंटस स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने शेखमिरा यांचे इनाम तसेच सुरू ठेवले. १८२८ मधे शेखमिराचा तत्कालीन वारसदार मृत्यू पावला तेव्हा त्यास मोठा मुलगा खानमहमद व धाकटा अब्दुल उर्फ गुलाम कादर हा होता. शेखमिराचा मोठा मुलगा हा इनामाचा वारसदार म्हणून इंग्रजांनी मान्यता दिली. १८३५ मधे खानमहमद हा कर्जबाजारी झाल्याने बराचसा भाग वसुलीसाठी सावकारांनी जप्त करण्यात आला. पुढील काळात खानमहमद व गुलामकादर यांच्यात वाटणीचा दावा बरेच वर्षे चालला. १८६१ मधे कंपनी सरकारच्या काळात दाव्याचा निकाल होऊन गुलामकादर यांस वाटणी मिळाली तर खानमहमदचा दत्तकपुत्र सुलतान सानी ह्याचे सरंजाम सरकार जमा करून घेतला.

( संदर्भ –   श्रीक्षेत्र वाई – वर्णन  = गोविंद विनायक आपटे )

सुरेश नारायण शिंदे, भोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here