शरीफराजे समाधी, भातवडी

शरीफराजे समाधी, भातवडी

शरीफराजे समाधी, भातवडी –

अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील भातोडी पारगाव हे गाव इ.स. १६२४ च्या भातवडीच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे. भातवडी पारगाव हे अहमदनगरपासून साधारण १९ कि.मी अंतरावर आहे. येथील लढाईत शहाजीराजेंचे बंधू शरीफराजे यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांची शरीफराजे समाधी या ठिकाणी आहे. पूर्वी येथे तलावाकाठी गढी होती पण ती पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे. गावात मेहेकर नदीकाठी नृसिंह मंदिर आहे.

भातवडीच्या लढाईविषयी थोडक्यात :- इ.स.१६१७ ते १६२१ मध्ये शहाजहानाच्या दक्षिणेत खूप स्वारी झाल्या व त्याने निझामशहा, आदिलशहा यांना जेरीस आणले. यावर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे  या विचारात होता. पुढे शहाजहान आणि जहांगीरची पत्नी यांचे संबंध बिघडले व तिने त्याला कैद करावे असा हूकुम काढला. शेवटी शहाजहान याने क्षमा मागितली आणि नाशिकला मलिक अंबरच्या आश्रयास येवून राहिला. मोगल सेनापती महाबतखान पाठलाग करत दक्षिणेत आला व चाल करू लागला तेव्हा मलिक अंबरने भातवडीच्या गढीत आश्रय घेतला. त्याने तलाव फोडून सर्व वाटेवर चिखल केला आणि मोगली सैन्याला वेढा देवून त्यातील काही सरदारांना शरण येण्यास भाग पाडले. याच लढाईत शहाजीराजेंनी मोठा पराक्रम गाजवला.

शहाजीराजे व शरीफराजे, महाबलवान खेळोजी, मलिकंबराचे प्रिय करणारे कृष्णमुखी यवन (सिद्दी). त्याचप्रमाणे हंबीररावप्रभृती इतर पराक्रमी वीर यांनी हातात याण, चक्रे, तलवारी, भाले, पड्ढे घेऊन मोंगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल केली. तेव्हा ते भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले.या संग्रामात मोगलांचा लष्करखान व आदिलशाहीचा मुल्ला महंमद हे दोन सरदार मारले गेले. शरीफराजे हे धारातीर्थी पडले. याची नोंद शकावलीत आढळते. शके १५४६ रक्ताक्षी कार्तिक मासी मोंगलांचा सुभेदार लष्करखान व येदिलशाही मुल्ला महंमद ऐशी दोन कटके मलिकंवरे बुडविली. ‘

भातवडीच्या लढाईमुळे मालोजीराजे व शहाजीराजे या पितापुत्रांच्या पराक्रमाचे दर्शन घडले. शहाजीराजांची प्रतिष्ठा व पराक्रम, मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे, हे भातवडीने सिद्ध केले. गनिमी काव्याचा हा श्रीगणेशा पुढे मराठेशाहीत अत्यंत उपयोगी ठरला. मलिकअंबरास शहाजीराजांचा द्वेष वाटू लागला त्यामुळे पुढे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीत दाखल झाले. शहाजीराजांनी ४ वर्षे शहाजहानशी जो सामना दिला तो फार महत्त्वाचा आहे. म्हणून असे म्हटले जाते. “इत शहाजी उत शहाजहान.’ गनिमी काव्याने मोंगलांशी लढल्यामुळे महाराष्ट्राचा डोंगराळ प्रदेश त्यांना माहीत झाला. त्यांच्याइतका मातब्बर सरदार दक्षिणेत कोणीच नव्हता.

टीम – पुढची मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here