सेनापती संताजी घोरपडे

सेनापती संताजी घोरपडे | Santaji Ghorpade खाफीखानाच्या नजरेतून संताजी घोरपडे

सेनापती संताजी घोरपडे –

कोणत्याही राष्ट्राचा जीवनकाल हा त्या राष्ट्रातील जनतेच्या  राष्ट्रप्रेमावरून आणि त्या राष्ट्रात जन्मलेल्या पराक्रमी वीरांच्या उपलब्धतेनुसार ठरत असतो. प्रत्येक राष्ट्राच्या जीवनकालात असा एकतरी प्रसंग येतो, की त्या प्रसंगात ते राष्ट्र आपल्या जीवन-मरणाचा लढा देत असते. राष्ट्राच्या ह्या संकटग्रस्त प्रसंगी राष्ट्रात अनेक वीरांचा पराक्रम उदयाला येत असतो किंवा त्यास वाव मिळतो. अश्या वीरांच्या पराक्रमाला जेव्हा राष्ट्र अनुभवते, तेव्हा जीवन-मरणाचा त्याचा संघर्ष फळास येतो, यशस्वी होतो, ह्यायोगे ते राष्ट्र तरते.(सेनापती संताजी)

हा राष्ट्राचा संकटग्रस्त काळ महाराष्ट्राच्याही अनुभवातून किंवा जीवनकालातून अलाहिदा राहिला नाही, महाराष्ट्रासही तो भोगावा लागला, किंबहुना महाराष्ट्राने तो अनेकदा भोगला. ह्या संकटातून महाराष्ट्र वारंवार ढवळून निघाला आणि ह्या मंथनातून महाराष्ट्राला अनेक वीरांचा आणि राष्ट्रपुरुषांचा वारसा लाभला. शिवपूर्वकालातील सुलतानी आक्रमणे, शिवकाळातील अनेक शाह्यांची आक्रमणे आणि शिवोत्तर काळातील आक्रमणातही हे मंथन अव्याहतपणे सुरूच होते.

राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देतांना असणाऱ्या जबाबदारीपेक्षा स्वातंत्र्योत्तरकाळातील जबाबदारी अधिक आव्हानात्मक असते. म्हणूनच  शिवकाळातील मंथनापेक्षा शिवाजी महाराजांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर झालेल्या मोगल आक्रमणात  महाराष्ट्राचे झालेले  अंतर्बाह्य मंथन आणि ह्या मंथनाच्या घर्षणातून निर्माण झालेल्या नानाविध वीरांच्या पुढे जबाबदारी आणि परिस्थिति अधिक आव्हानात्मक होती, संघर्षात्मक होती आणि सर्वात महत्वाचे राष्ट्रीय जीवन-मरणाच्या आणीबाणीची होती.

महाराष्ट्राने अनुभवलेल्या ह्या राष्ट्रीय जीवन-मरणाच्या आणीबाणीच्या मंथनातून अनेक वीरांच्यामालेत, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे कौस्तुभासारखे शोभणारे होते. ह्या उभय कौस्तुभांपैकी संताजी घोरपडे ह्या समराच्या मेघगर्जनेतून अचानक चमकणाऱ्या सौदामिनीप्रमाणे पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्याबद्दल विचार करू.

कोणत्याही व्यक्तीच्या अंगी असलेल्या चांगल्या-वाईट गुणांवरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडत असते. ह्यायोगे  व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला नानाविध पैलू असतात. शिवकाळातील संताजी घोरपडे हे व्यक्तिमत्वही असेच होते. संताजी घोरपडे हे नाव आपण ऐकले किंवा वाचले, म्हणजे आपल्याला शत्रूशी लढतांना शत्रूचा मृत्यू निश्चित करणारा नरव्याघ्र संताजी आठवतो, गनिमी काव्याने शत्रूची दाणादाण उडविणारा युद्धकुशल संताजी आठवतो आणि त्याही पेक्षा एका छत्रपतीची शत्रूने केलेली निर्घृण हत्या आणि त्याच काळात मराठ्यांचा दूसरा छत्रपती जिंजीस परगंदा झाला. आपले किल्ले एक एककरून शत्रूच्या ताब्यात जात आहेत. जिंकण्याची अपेक्षा आणि आत्मविश्वास गमावून बसलेल्या परिस्थितीत  समरभूमीत समर-सौदामिनीप्रमाणे शत्रूवर तुटून पडणारा योद्धा संताजी आठवतो.  पण पुष्पास शोभायमान करणाऱ्या अनेक पाकळ्यांपैकी एक वेगळी पाकळीही संताजीच्या व्यक्तिमत्वात होती, म्हणजेच अनेक पैलूंपैकी एक वेगळा पैलूही संताजीच्या व्यक्तिमत्वाचा भाग  होता. संताजी हा शीघ्रकोपी होता, थोडा उतावीळ होता, पण ह्याचबरोबर संताजी हा सरळपणाचा अवलंब करणारा होता,  स्पष्टवक्ता होता, किंबहुना शिस्तप्रिय होता  आणि काहीसा हट्टीही होता.

संताजी हा शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेला सेनानी होता. परिणामतः शिवाजी महाराजांचे अनेक शिरस्ते त्याच्या अंगी भिनलेले होते. शिवाजी महाराजांनी नवीन वतन देणे बंद केले. पण राजाराम महाराजांना परिस्थितीनुरूप ती पद्धत पुन्हा सुरू करावी लागली. पण नवीन परिस्थितीशी संताजी सहजपणे जुळवून घेऊ शकला नाही. ह्याच अनुषंगाने तो एका ठिकाणी म्हणतो, “यैसीयासी आमच्या राज्यात नवीन वृत्ती दुमाला करावी यैसा दंडक नाही.” यातून संताजीचा  शिवाजी महाराजांनी राबवलेला शिरस्ता दिसून येतो.

संताजी हा सरळस्वभावी होता. तो कसलेला सेनानी होता. त्याच्या सरळस्वभावाची अनेक उदाहरणे त्याच्या चरित्रात विखुरलेली आहेत. इ. स. १६९५ साली दुडेरीला कासामखानशी दोन हात करतांना खानाच्या अनेक माणसांनी दुडेरीच्या गढीवरून उड्या मारून जीव दिला. खासा कासीमखानाचा मृत्यू झाला. अश्या परिस्थितीत खानजादखानाने प्राणांची याचना केली. शरागतास जीवदान द्यावे, हा युद्धधर्म संताजी अंगिकारणारा होता आणि म्हणून त्याने शरण आलेल्या मुगल सैन्याला अभय देऊन ते किल्ल्याबाहेर पडल्यावर भुकेलेल्या सैन्याची अन्न-पाण्याची व्यवस्था केली आणि खानजादखानादी सरदारांना आपले खास पथक पाठवून सुखरूप रवाना केले.

संताजी हा दयाळू होता असे म्हणतांना, वरील दुडेरीचे उदाहरण जसे आहे, तसेच आणखी एक उदाहरण संताजीच्या चरित्रात आहे. नारो महादेव हा कोकणस्थ ब्राह्मण देशावर आल्यावर त्याला संताजीने आपल्या पदरी ठेऊन घेतले, इतकेच नव्हे तर त्याच्यावर पुत्रवत प्रेम केले. नारो महादेवनेही आपल्या धन्याचे उपकार स्मरून आपले जोशी हे आडनाव सोडून संताजीचे घोरपडे हे आडनाव घेतले. हा नारो महादेव घोरपडे पुढे इचलकरंजी संस्थानाचा मुळ पुरुष झाला.

दुडेरीच्या लढाईत आणि नारो महादेवाबद्दल  संताजीची मोठ्या मनाची आणि दयाळू वृत्ती जशी दिसते, तशीच त्याच्या चरित्रात नाण्याची दुसरी बाजू म्हणजे संताजीची हट्टी,शीघ्रकोपी आणि आग्रही वृत्तीही वाचकाच्या निदर्शनास येते. संताजीच्या शीघ्रकोपीत्वाचा विचार करतांना सर्वात ठळकपणे जी घटना नजरेस येते, ती म्हणजे संताजी-छत्रपती लढाईची! राजाराम महाराजांशी वितुष्ट झाल्याने संताजीने थेट आपल्या धन्याशी लढाई केली. १९९६ साली झालेल्या आयेवारकुटीच्या ह्या लढाईत खासे छत्रपती पराभूत झाले, धनाजी जाधव रणांगणातून पळाला आणि अमृतराव निंबाळकरास संताजीने हत्तीच्या पायाखाली दिले. नंतर मात्र संताजी आपले हात बांधून छत्रपतींपुढे क्षमायचनेसाठी हजर होता. यातून संताजीच्या स्वभावातील सरळपणा दिसून येतो. संताजीच्या कोपाबद्दल सांगतांना खाफीखान म्हणतो, “इतरांच्या मानाने संताजी हा शिक्षा करण्यात अत्यंत कडक समजला जात असे. लहानलहान अपराधाबद्दल तो हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा देई.”

इ. स. १६९२-९३ च्या सुमारास मराठ्यांनी जींजीच्या पुढे मोगलांची दाणादाण उडवली तेव्हा, संताजीने मोगलांच्या कमतरतेचा फायदा घेऊन कामबक्षास ओलीस ठेवावे, किंवा त्यांना पूर्णतः संपवावे, असा छत्रपतींना  सल्ला दिला. पण नुकताच महाराजांनी  मुघलांचा त्यांना वांदिवॉशपर्यंत माघार घेण्याची परवानगी देण्याचा तह स्वीकारला. त्यामुळे संताजीचा सल्ला महाराजांनी नामंजुर केला. यावर संताजी दरबारातून रुसून बाहेर छावणी करून राहू लागला.संताजीच्या हट्टीपणाचे हे एक प्रमुख उदाहरण.

१६९३ साली राजाराम महाराजांशी वितुष्ट करून संताजी महाराष्ट्रात आल्यावर रुसून त्याने प्रथेनुसार रामचंद्रपंत अमात्यांची भेटही घेतली नाही. याचे  पंतांना वाईट वाटले. त्यावर संताजी पंतांना पाठवलेल्या पत्रात आपल्या मनातील भाव स्पष्टपणे तो लिहितो. ‘संताजीस जींजी प्रांती ठेऊन घ्यावे व धनाजीस इकडे पाठवावे, असे पत्र पंताने छत्रपतीस पाठविल्याचे आपण ऐकले’, असे तो म्हणतो. (भाषिकदृष्ट्या हे पत्र मुळातून वाचनीय आहे.) परंतु आपण असे कोणतेही पत्र छत्रपतींस पाठविलेले नाही, हे जेव्हा पंत संताजीस शपथेवर सांगतो, त्यावेळी मात्र एकीकडे हट्टी असणारा आणि शीघ्रकोपी असणारा संताजी आपल्या मनातील रुसवा काढून पंतास, ‘आपणही त्या गोष्टीचे मनात काही विकल्प धरिला न पाहिजे’, असे विनंतीपूर्वक म्हणतो.

महाराष्ट्राच्या पडत्या काळात संताजी, धनाजी, रामचंद्रपंत अमात्यादी लोकांनी मराठ्यांची बाजू सावरून धरली. संताजीने तर मरणशय्येवर असलेल्या महाराष्ट्राला नवसंजीवनी दिली. संताजीचा गौरव करतांना पंतअमात्य म्हणतात, “.. त्या समई इकडे (महाराष्ट्रात) गनिमाची धामधूम होऊन कितेक देशदुर्ग (शत्रूने) हस्तगत केली होती. या राज्यात काही अर्थ उरला नव्हता. ते प्रसंगी याणी (संताजीने) येकनिष्ठा करून जिवाभ्य श्रम केले. राज्य रक्षण केले.” दुसऱ्या एका कागदात उल्लेख येतो, “राजश्री राजाराम कर्नाटकात जाऊन प्रकट होऊन लस्कर जमाव केला व या प्रांती राजश्री रामचंद्र पंडित सरकारकून व संताजी घोरपडे सेनापती व धनाजी जाधवराऊ यांनी लस्कर जमाव करून चालीस हजार शाई (सैन्य) मेलवली. गडकोट मुलुक सोडविला. नवेच राज्य पैदा केले..”. सर्जाखान, लुत्फूल्लाखान, जाननिसारखान, अलिमर्दाखान यांसारख्या पराक्रमी आणि नावाजलेल्या सेनानींना धूळ चाटायला लावणारा संताजी, बादशाही तंबूचे शिखर कापणारा संताजी आणि ह्यायोगे महाराष्ट्रात नवसंजीवनी निर्माण करणारा संताजी हयासोबतच वरील काही घटना त्याचे वेगळे गुण दाखवतात, संताजीच्या एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची झलक दाखवतात.

©अनिकेत वाणी

संदर्भ –

१) पेशवे दफ्तर खंड ३१
२) सेनापती संताजी घोरपडे – डॉ. जयसिंगराव पवार
३) शिवपुत्र छत्रपती राजाराम- डॉ. जयसिंगराव पवार
४) मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध- डॉ. जयसिंगराव पवार
५) श्री छत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन हिंदवी स्वराज्याचा मोगलांशी लढा – वा. सी. बेंद्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here