निगडे देशमुख

निगडे देशमुख...

निगडे देशमुख…

शिरवळच्या पूर्वेला निगडे देशमुखांचा ऐतिहासिक वाडा आहे.भैरवनाथ मंदिराकडे जाताना वाटेत उजव्या हाताला हा वाडा लागतो. निगडे देशमुख वाडयाचे प्रवेशद्वार मोठे आणि घडीव दगडांनी सुडौल बांधलेले आहे.यावरही इस्लामी शिल्पकलेचा ठसा आहे.प्रवेशद्वाराच्या आत समोर विजापूर पद्धतीच्या कमानी दिसतात. शिवपूर्वकाळातील हे वतनदार घराणे.आपल्या अथक परिश्रमाने ज्यांनी हा गाव वसविला, वाढविला तेच हे घराणे.या घराण्यांत अनेक मोठे कर्ते पुरुष होऊन गेले, तसेच तुकाईजी, गुजाई आवा आणि येसाईसारख्या कर्तबगार स्त्रियाही होऊन गेल्या.

शिरवळ हा निगडे देशमुखांचा गाव, तर देशपांडे हे गावाचे कुलकर्णी.या दोन घराण्यांनी गावाच्या जडणघडणीत मोठा हातभार लावला. शिरवळचे तत्कालीन प्रशासकीय दोन भाग होते.एक मुंजेरी आणि दूसरा मोहतर्फा.मात्र गावावर खरा वचक निगडे देशमुख यांचाच होता.ग्रामव्यवस्थेत त्यांना मानाचे स्थान होते.

शिवपूर्वकाळात हे घराणे चांगले नावाजलेले होते.आदिलशाही, निजामशाही आणि मलिकअंबरच्या कारकीर्दीत त्यांनी आपला अंमल टिकवून ठेवला.या घराण्याकडे वतनाचे एकूण ४० गाव होते.निगडे देशमुखांचे वडील घराणे भोंगवली या गावात रहात असे.त्यांना शिक्का चालविण्याचा अधिकार होता.भोंगवलीत आजही त्यांचे वंशज राहतात आणि अजूनही त्यांना ‘सिक्केकरी’ या नावाने ओळखले जाते.येथील त्यांच्या घराला अजूनही ‘गढ़ी’ असेच संबोधतात.

भोंगवलीकर व शिरवळकर निगडे देशमुखांमध्ये वतनासाठी भांडणतंटे झाले हे इतिहास पाहिल्यास आपल्या लक्षात येते. भोंगवलीकर हे शिरवळकरांचे वतनाचे हिस्सेकरी होते.दोघांना वतनाची ४० गावे इनाम म्हणून मिळाली होती.त्यातील भोंगवलीकरांकडे ३५ गावे तर शिरवळकरांकडे ५ गावे होती.पण,पुढे वतनासाठी भोंगवलीकरांनी शिरवळवर हल्ला केला.त्यात शिरवळच्या निगडे देशमुख घराण्यातील अनेक कर्ते पुरुष मारले गेले.तेव्हा घरातील रत्नमाला पवार या दासीने एका लहान मुलाला मोरीच्या पन्हाळीत लपवून ठेवले व त्याचा प्राण वाचवला.त्या मुलाला लहानाचा मोठा केला.मुलगा मोठा झाल्यावर त्या मुलाला घेवून ती दिल्लीला गेली व घडला प्रसंग बादशाहाच्या कानावर घातला.मग बादशाहाने त्या बाईबरोबर बरेच सैन्य दिले व शिरवळकरांना ३५ गावांच्या रूपाने आपले वतन परत मिळवून दिले.तसेच वडीलकीचा मानही मिळाला.इ.स १६१७ साली शिरवळच्या निगडे देशमुखांना मलिकअंबरने ‘यशवंतराव’ हा किताबही दिला.हा किताब शिरवळकर निगडे देशमुख विशेष मानापानाच्या प्रसंगी वापरत असत.

शिरवळकर निगडे देशमुखांचा संबंध हिरडस मावळचे देशमुख कृष्णाजी बांदल व फलटणचे निंबाळकर यांच्याशी होता.तत्कालीन वतनदारांप्रमाणे शिरवळकर निगडे देशमुख आपले वतन कसोशीने सांभाळत असत.कारभार करताना त्यांनी अनेकदा समतोल बुद्धीचा आणि खानदानी मनोवृत्तीचा प्रत्यय आणून दिलेला आहे.देशमुख घराण्याची मुळे फार खोलवर रूजली गेली आहेत.

माहिती साभार – History of maratha sardar family

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here