विद्या कलेची अधिष्ठाती सरस्वती

सरस्वती

विद्या कलेची अधिष्ठाती सरस्वती –

एखादा खजिना अचानक सापडावा तशी सरस्वती ची ही अप्रतिम मुर्ती अनपेक्षीत जागी दृष्टीस पडली. औंढा नागनाथ जवळ राजापुर नावाच्या छोट्या गावी साध्या चौथर्‍यावर ही मुर्ती ठेवलेली आहे. गणेश चाकुरकर हा इंजिनिअरिंगचा मित्र औंढ्याला नौकरीला होता. त्याच्याकडे गेलो असताना त्याने या गावी नेले. या परिसरात तीन मुर्ती लोकांना सापडल्या. योग नरसिंहाची सिद्धासनातील मुर्ती, अर्धनारेश्वर मुर्ती आणि तिसरी ही सरस्वतीची उभी मुर्ती. अशा मुर्तीला स्थानक मुर्ती असे संबोधतात. (बसलेल्या मुर्तीला आसनस्थ मुर्ती म्हणतात)

हीच्या वरील उजव्या हातात फासा आहे, खालील उजव्या हातात अक्षयमाला असून हा हात वरदमुद्रेत आहे. वरच्या डाव्या हातात एकतारी वीणा आहे, खालच्या डाव्या हातात पुस्तक आहे. तीच्या गळ्यातील हातातील कमरेवरील दागीन्यांचा मणी न मणी मोजता यावा इतके हे कोरीवकाम अप्रतिम आहे. डाव्या बाजूला खाली मोत्याची माळ तोंडात घेतलेला हंस आहे. खाली अंजली मुद्रेतील भक्त/सेवक उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला चामरधारीणी दिसते आहे.  शिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणून या मुर्तीचा गौरव डाॅ. देगलुरकरांनी आपल्या पुस्तकात केला आहे. अशा मुर्ती घडवण्यासाठी गंडकी म्हणजेच नर्मदा नदितील शिळांचा वापर केला जातो.

ही मुर्ती कुठल्या भव्य सुप्रसिद्ध मंदिरातील नाही. एका साध्या गावात गावकर्‍यांनी निष्ठेने या मुर्ती छोट्या जागेत जतन करून ठेवल्या आहेत. खरं तर या सुंदर मुर्तीसाठी मोठं शिल्पकामयुक्त दगडी मंदिर उभं करायला पाहिजे.

(छायाचित्र सौजन्य श्रीकृष्ण उमरीकर)

– श्रीकांत उमरीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here