महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

साम्राजगड | Samrajgad Fort

By Discover Maharashtra Views: 3788 4 Min Read

साम्राजगड | Samrajgad Fort

साम्राजगड जाण्यासाठी आपल्याला प्रथम मुरुडला पोहोचावे लागते. मुरुड हे गाव शहरांना गाडीमार्गाने जोडलेले आहे. सामराजगड उर्फ दंडाराजपुरी किल्ला हा छोटासा किल्ला मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळील टेकडीवर अवशेषरुपात शिल्लक आहे. एकदरा गांवातल्या शिवमंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनाऱ्याचा सुंदर देखावा दिसतो. इथुनच चढाईला सुरुवात करायची. या वाटेने १० मिनीटात साम्राजगड(Samrajgad Fort) वर पोहोचता येते. वर चढतांना वाटेत काही भग्न अवशेष दिसतात. गडाच्या समुद्राकडील बाजुस एक कोरडा पडलेला बांधीव तलाव दिसतो.

सामराजगडाच्या बालेकिल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. दगड एकमेकांवर नुसते रचून ही तटबंदी बनविण्यात आली होती. तटबंदीमध्ये असणारे पाच बुरुज आजही दिसून येतात. गच्च वाढलेल्या झाडीत थोडीशी शोधाशोध केल्यावर दोन चौथरे दिसून येतात. सामराजगडावरुन जंजिरा व पद्मदुर्ग या जलदुर्गांबरोबर मुरुड परिसराचा मस्त देखावा दिसतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. बाकी जास्त अवशेष नसले तरी सामराजगडाची इतिहासाने मात्र नोंद घेतलेली आहे. जंजिरा किल्ला हा हबश्यांच्या ताब्यात होता. या हबश्यांचा किनाऱ्यावरील रयतेला खूपच उपद्रव पोहोचत असे. लुटालुटी बरोबरच किनाऱ्यावरील गावांमधून बायकांमुलांना पळवून नेवून त्यांचे धर्मांतर करणे अथवा गुलाम म्हणून अरब देशात विकणे असे उद्योग सिद्दीचे चाललेले असत. जंजिऱ्याच्या सिद्दीबाबत शिवकालीन कागदपत्रामधे एक उल्लेख येतो.

जंजिऱ्याचा सिद्दी म्हणजे स्वराज्यांला लागलेला उंदीर. या उंदराचा समुळ नायनाट करण्याचा महाराजांनी अनेकदा प्रयत्न केले पण त्यात यशाने नेहेमीच हुलकावणी दिली. सिद्दीच्या या जाचाला आळा घालण्यासाठी आणि त्याच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरात पद्मदुर्गाची तर किनाऱ्यावर सामराजगडाची उभारणी केली. हा किल्ला त्याकाळी दंडाराजपुरीचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. जंजिऱ्यावरील मोहिमांसाठी मराठ्यांचा तळ या किल्ल्यावर पडत असे. सामराजगड बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी व्यंकोजी दत्तो यांना फौजेनिशी पाठविले. त्यांनी सिद्दीचा दंडाराजापूरीच्या आसपासचा मुलुख ताब्यात घेतला. सिद्दीने हबशी घोडेस्वार मराठ्यांवर पाठविले. या युध्दात ३०० हबशी मारले गेले. सिद्दीने महाराजांशी तहाची बोलणी केली, पण महाराज बधले नाहीत राजापूरीजवळ जिंकलेल्या डोंगरात महाराजांनी सामराजगड बांधला.

सामराजगड बांधल्यापासून तो सिद्दीच्या डोळ्यात खुपत होता. तो घेण्यासाठी सिद्दीने आपले निवडक सैनिक होडीत बसवून किनाऱ्यावर उतरविले. त्यांनी सामराजगडा भोवतीच्या माडांच्या झाडांना तोफा बांधून किल्ल्यात मारा केला, पण तोफा झाडावरुन खाली पडून सिद्दीचेच नुकसान झाले. ११ फेब्रुवारी १६७१ हा होळीचा दिवस होता. जंजिऱ्याच्या मोहिमेसाठी महाराज रायगडावरुन निघाले होते. त्यांचा मुक्काम रायगडापासून ९ कि.मी.वर होता. या मोहिमेपूर्वी सिद्दीने सामराजगड जिंकण्याचा बेत आखला. रात्रीच्या गडद आंधारात सिद्दी कासिम होड्यांमधून आपले सैन्य घेऊन बाहेर पडला व सामराजगडाच्या पायथ्याशी उतरला. त्यांनी तटाला शिड्या, दोरखंड लावले. याच वेळी जमिनीच्या बाजूने सिद्दी खैरत

आपल्या ५०० हबशी सैनिकांनिशी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आला. त्याने होळीच्या रंगात बेसावध असलेल्या मराठ्यांवर जोरदार हल्ला केला. त्यांना सावरायला वेळही मिळाला नाही. तरीही नेटाने मराठे सिद्दी खैरतवर तुटून पडले. या संधीचा फायदा घेऊन सिद्दी कासिमने आपले सैन्य दुसऱ्या बाजूने किल्ल्याच्या तटावर चढविले. सिद्दीच्या या दुहेरी हल्ल्यामुळे मराठी सैन्य विभागले गेले. तरीही मराठे प्राणपणाने लढत होते, इतक्यात दारु कोठाराचा स्फोट झाला. त्यात दोन्ही बाजूचे अनेक सैनिक ठार झाले व सामराजगड सिद्दीच्या ताब्यात गेला. मध्यरात्री झालेल्या स्फोटाच्या आवाजाने शिवाजी महाराज जागे झाले. त्यांनी आपले जासूद ताबडतोब सामराजगडाकडे रवाना केले. सामराजगडाची बातमी कळल्यावर शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहिम रद्द केली.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment