महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,353

छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य

By Discover Maharashtra Views: 3971 8 Min Read

‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य’ – नरहर कुरुंदकर

प्रकाशक : देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.

आजच नरहर कुरुंदकरांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य’ हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.

‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यात शिवाजी महाराजांचा इतिहास, तारीखवार घटना, आकडेवारी यांना पूर्णपणे फाटा दिलेला आहे, जे नरहर कुरुंदकरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या थरारक आयुष्यातील अगदी मोजक्या पण अतिमहत्त्वाच्या घटनाक्रमांवर नरहर कुरुंदकरांनी प्रकाश टाकला आहे.

या सुरेख पुस्तकाला स.मा. गर्गे यांची सात पानी प्रस्तावना लाभली आहे तरी पुढची पाने कुरुंदकरांनी ज्या तर्कपद्धतीने व्यापली आहेत ती वाचताना वाचक थक्क होतो.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच कुरुंदकरांनी शिवाजी देवाचा अवतार मानला जातो या श्रद्धेचा वेध घेण्याचा परखड प्रयत्न केला आहे. कुरुंदकर म्हणतात “माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.”
“समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो.”

एवढे परखड आणि वस्तुनिष्ठ विचार वाचल्यावर मी खरे सांगायचे तर एकदम थक्क झालो. कुठे हे कुरुंदकरांचे २० व्या शतकातले वस्तुनिष्ठ विचार? आणि कुठे २१ व्या शतकाच्या विज्ञानयुगातील त्या ‘फ्रान्सिस गोतिए’च्या बुरख्याआड तथाकथित धर्मवाद्यांनी पुण्यात १०० कोटी रुपये खर्चून उभारलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर? असो.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नाट्यमय घटना मोजक्या ५-६ आहेत असे कुरुंदकर निदर्शनास आणतात. पैकी पहिली अत्भुत घटना ते अफझलखानाचा वध ही मानतात. तर या पहिल्या अत्भुत घटनेआधीची २९ वर्षे ही नाट्यशून्यतेची होती हेही ते परखडपणे दाखवून देतात. शिवाय “छत्रपतिंचे कर्त्तॄत्त्व समजून घेताना या रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे” अशी नेमकी जाणीवही ते करुन देतात.

“त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही” असे सांगताना कुरुंदकर पुढे ते सप्रमाणही वाचकाला समजावून देखील देतात. आणि मग वाचकाला आजचे राजकारणी वा तथाकथित धर्माचे रक्षणकर्ते चेव येतील अशी भाषणे वा लेख यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

वतनदारांविरुद्धचा लढा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील खूप कठीण लढा होता. कारण हे वतनदार म्हणजे नुसते त्यांच्याच धर्माची माणसे नव्हती तर नातेवाईक, सगे-सोयरसंबंधातील माणसे होती. प्रश्न दोन : उत्तर एक या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात “शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले, या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे”
शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष हिंदू विरुद्ध मुसलमान अशा स्वरुपात नाकारताना कुरुंदकर मार्मिकपणे म्हणतात – “परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही”

एक अनोखी घटना या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात – “औरंगजेब मैदानात उतरण्यापूर्वीच शिवाजीसारखा असामान्य नेता दिवंगत झालेला होता. ……”
जदुनाथ सरकारांचा दाखलाही कुरुंदकर देतात की “औरंगजेब लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या, पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता!”
“साधनसामग्री नसताना, असामान्य नेता नसताना, सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती. एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्त्व नसणार्‍या जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नवखी आहे, एकाकी आहे”

पान क्र. २२ वर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांना युवावस्थेत राज्यनिर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली असेल याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिजामातेने रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या असतील. विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची हकीकत ऐकली असेल. दादोजी कोंडदेवांचे शासनचातुर्य पाहिले असेल. ज्ञानेश्वर-नामदेव साधुसंतांपासून प्रेरणा घेतली असेल. असे अनेक तर्क आहेत.”पण या बाह्य सामग्रीतून लाखोंच्यापैकी एकालाच प्रेरणा का मिळते, इतरांना का मिळत नाही, याचे समाधानकारक उत्तर कोण, कसे देणार?” असा तर्कशुद्ध प्रश्नही कुरुंदकर उपस्थित करतात.

अफझलखान वधाचा वेध घेताना अफझल खान हा वाईचा सुभेदार होता तेव्हा शिवाजीचा नायनाट हे सुभ्याचा सुभेदार या नात्याने अफझलखानानेच करणे अपेक्षित होते. त्यासाठी आदिलशाही दरबारात शिवाजीचा नाश करण्याचा त्याने विडा उचलण्याची गरज नव्हती व ही केवळ कपोलकल्पित भाकडकथा आहे हेही कुरुंदकर वस्तुनिष्ठतेने निदर्शनास आणून देतात.

त्यानंतर सिद्दी जोहरचा वेढा , शाहिस्तेखानाला अचानक लाल महालात घुसून अचंभित करणे, औरंगजेबाच्या कैदेत असताना दिल्लीहून पलायन या घटनांतून शिवाजी महाराज हे केवळ धाडसीच नव्हते तर कल्पक देखील होते याकडेही कुरुंदकर लक्ष वेधतात. शत्रूच्या नेमक्या वर्मावर घाव कसा घालावा हे शिवाजी महाराजांना अवगत होते.

छत्रपतिंच्या नेत्तृत्त्वाच्या खर्‍या यशाचे मूल्यमापन करताना कुरुंदकर म्हणतात – ” २७ वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शिल्लक राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य आहे. शिवाजीने पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापति नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध २७ वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली, यातच त्याच्या नेत्तृत्त्वाचे खरे यश आहे”

गडांची डागडुजी व उभारणी याचबरोबर आरमाराकडे लक्ष हाही शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन कुरुंदकर दाखवतात. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज व फ्रेंच यांना धडकी भरवली होती. पुढील काळात मराठ्यांनी या आरमाराचा वापर केला असता तर कदाचित इंग्रज देशावर राज्यकर्ता झाला नसता. पुढे खुद्द नानासाहेब पेशव्यांनीच आरमार नष्ट करुन मराठी साम्राज्याचा पाया खिळखिळा करण्यात मोठा हातभार लावल्याचेही कुरुंदकर मोठ्या व्यथित मनाने लिहिताना दिसतात.

जनतेचे प्रेम शिवाजी महाराजांनी कसे मिळवले? याच्या मुख्य कारणांचा परामर्श घेताना कुरुंदकर म्हणतात – “शिवाजीने जिद्दीने घडवून आणलेला हा वतनदारीचा वध सर्वात महत्त्वाचा आहे” याच जोडीने सर्वसामान्यांच्या स्त्रियांची अब्रू वतनदारांच्या पुंडांपासून वाचवून तिला कुठेही निर्भयपणे फिरता येईल असे राज्य शिवाजीने निर्माण केले, हाही उल्लेख महत्त्वाचा आहे.
सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले ( माझ्या मते अनावश्यक ) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे. कारण अलिकडच्या काळात या दिशेने खूप मोठे संशोधन झाले व अनेक पुरावेही समोर आले आहेत, येत आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. मी करुन देत असलेल्या पुस्तकाच्या परिचयाचा नव्हे. तेव्हा एवढे सोडले तर बाकीच्या पुस्तकात कुरुंदकरांनी जे विवेचन केले आहे ते खरेच अफलातून आहे.

छत्रपति शिवाजी महाराजांनी गरीब रयतेला वतनदारांच्या जाचातून मुक्त केले यातच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि यशाचे रहस्य सामावले आहे असे वाचकाच्या लक्षात आणून देण्यास कुरुंदकर पूर्णतः यशस्वी झाले आहेत. आजच्या राज्यकर्त्यांनी केवळ छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या गुणांची अंमलबजावणी केली तर ते कृत्य खरे शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारे ठरेल.

नरहर कुरुंदकर यांचे हे छोटेसे पुस्तक वाचनीय तर आहेच पण छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्‍या प्रत्येक मराठी घरात असावेच असे आहे. शिवाय ऐतिहासिक संदर्भासाठीदेखील हे छोटेसे पुस्तक खूप मोठे काम करते.

नरहर कुरुंदकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य हे पुस्तक मी घेतले आहे. तुम्ही घेणार का?

माहिती साभार – पुस्तकांचा परिचय

Leave a Comment