महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,98,789

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९५

By Discover Maharashtra Views: 1344 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९५ –

ज्येष्ठ वद्य नवमीची काळरात्र पाचाडच्या वाड्याभोवती घिरट्या घालू लागली बाहेर पावसाची रपरप धुडगूस घालीत होती. आत दरुणीमहालात मायेच्या मंचकाभोवती जमलेली मने चिंतेने कळंजली होती. आऊसाहेबांच्या हट्टी दम्यासमोर मात्रा हरल्या होत्या, काढे कंटाळले होते, वनस्पती वरमल्या होत्या. खोकून-खोकून फासळी, फासळी खिळखिळी झालेल्या जिजाऊंचा डोळा लागला होता. त्यांची झोपमोड होईल म्हणून हाती धरलेला त्यांचा हात तसाच ठेवून संभाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारीच महाराज आणि रामराजे टेकले होते. मोरोपंत, अण्णाजी, चांगोजी, हंबीरराव, अंतोजी, रायाजी साऱ्या जिव्हाळ्याच्या माणसांचे मंचकाला कडे पडले होते. मंचकाच्या उशालगतीला पुतळाबाई, येसूबाई, धाराऊ, सोयराबाई असा स्त्रीवसा चिंतावल्या डोळ्यांनी उभा होता.

बाहेर घोंघावणाऱ्या पावसाळी वाऱ्यांचा झपकारा मधूनच महालात घुसला. चिराखदाने आणि समयांच्या ज्योती त्याने अंगभर थरथरल्या. त्यांच्या थरथरत्या उजेडाबरोबर आतले मनन्मन नको त्या शंकेने चरकून उठले.

मध्यरात्रीचा सुमार झाला. “राजे” मंचकावरून दमादाटली क्षीण साद आली.

“जी.” महाराज पुढे झुकले

“तीर्थ द्या. गंगेचं.” दमा निर्धारी झाला. “तुळशीपत्रही आणा.”

महाराज उठले. देव्हाऱ्यात ठेवलेली गंगाजलाची तीर्थकुपी आणि तुळशीपत्र घेऊन पुन्हा मंचकाजवळ आले. पळीने त्यांनी गंगोदक मासाहेबांच्या ओठांत सोडले. त्यांच्या हातीचे सोनकडे थरथरले. मासाहेबांच्या ओठांत तुळशीपत्र देताना उभा रायगडच उचलून कुणीतरी आपल्या छातीवर ठेवला आहे, असे त्यांना वाटले. मासाहेबांच्या सेवेत सर्वांत शेवटी रुजू होऊन गंगाजल आणि तुळशीपत्र पावन झाले! “शिवबा, जवळ या.” तुळशीपत्राआडून सावळे, निर्बंध बोल आले महाराज पुढे आले.

“हात द्या.” कधी नव्हे ते, मानी स्त्री-बानदान राजांच्याकडे मागणे घालीत होते. महाराजांनी सोनकड्याचा हात जिजाऊंचा कंकणे घरंगळणाऱ्या हाती दिला.

“शिवबा, आम्ही तुमच्याकडे कधी काही मागणं टाकलं नाही. आज टाकतो आहोत. आम्हास आण द्या.”

“मासाहेब – आज्ञा व्हावी -” राजांची छाती दाटून आली.

“शिवबा, शिवबा, आमच्या शंभूराजांच्या आऊ आता तुम्ही व्हा! आम्ही वचनात आहोत थोरल्या सूनबाईचा. ते तडीस लावा.” ते ऐकताना संभाजीराजांच्या मनाचा बांध-बांध फुटला. हाती धरलेला जिजाऊंचा हात गदगदून हलवून ते मुसमुसत म्हणाले, “आऊसाहेब तुम्ही… तुम्ही हव्यात आम्हाला, आमच्या महाराजसाहेबांना.”

“शंभूराजे, शांत व्हा. तो त्ररणबंध सरला. एक नीट ऐका. तुम्ही – तुम्ही आमच्या स्वारीसारखेच दिसता. पण – पण ते जसे आम्हास पारखे झाले, तसे तुम्ही कधी येसूबाईना होऊ नका!”

“राजे, आम्ही सारं बघितलं. फक्त एक राहून गेलं. आमच्या रामराजांचे हात पिवळे झालेलं बघण्याचं! ते करा. आणि – आणि जिवावरच्या साकड्यात आता स्वत:ला कठी गुंतवून घेऊ नका. तुमच्यासाठी जगदंबेच्या पायाशी धरणं धरायला आता कुणी उरलं नाही!”

ते ऐकताना नाकगड्डा चिमटीत धरलेल्या राजांचा टोप डावा-उजवा हिंदकळला. त्यांच्या पोटात पोकळीचा खड्डा पसरला. शब्द थरथरले – “मासाहेब!”

“राजे, केशव पंडितांना बोलवा. आम्हास समर्थांचा बोध ऐकवा!”

बाहेर पाचाडभर ऐन मध्यरात्र हट्री धरणे धरून बसली. मेटामेटावरचे पहारेकरी एकमेकांच्या हाती बदलत्या पहाऱ्यांचे सटी देताना गस्त घालू लागले – “मेटकरी हुश्यार!” वाड्याच्या छतावर मावळी पाऊस दाभणधारेनं कोसळतच होता. केशव पंडितांनी अडंगीच्या बैठकीवर दासबोध मांडून चौरंगावर बैठक घेतली. त्यांना बोध दिसावा म्हणून धाराऊने अडंगीजवळ तेवती समई ठेवली. केशव पंडितांच्या तोंडून समर्थांचे बैरागी शब्द थरथरत बाहेर पडू लागले –

“सरता संचिताचे शेष। नाही क्षणाचा अवकाश।
भरता न भरता निमिष। जाणे लागे।।
गेले बहुतां बळांचे। गेले बहुतां काळांचे।
गेले बहुतां कुळांचे। कुळवंत राजे।।
बहुतां जन्माचे सेवटी। नरदेह सापडे अवचट!
येथ वर्तावं चोखट। नीतिन्याये।।
काया बहुत कष्टवावी। उत्कट कीर्ति उरवावी।
चटक लावुनी सोडावी। काही एक।।”

पंडितांची जबान थरथरू लागली. शब्दाशब्दांबरोबर भोवतीची मने थिजू लागली. चिराखदानांच्या ज्योती थरथरू लागल्या.

“जीव जीवांत घालावा। आत्मा आत्म्यांत मिसळावा।
राह राहो शोध घ्यावा| परांतराचा।”

केशव पंडितांचा हात कापू लागला. डोळ्यांच्या कडा दाटून आल्या. एक-एक शब्द त्यांच्या दाटल्या गळ्यातून घोगरत बाहेर पडू लागला –

“सरली शब्दांची खटपटा आला ग्रंथाचा शेवट।
येथ सांगितले स्पष्ट। सद्गुरू भजन।।”

“पंडित, नको, वाचू नका…”

संभाजीराजांच्या या कळवळत्या बोलांनी केशव पंडितांच्या पापण्यांवर थरारलेले अश्रूंचे थेंब हातीच्या पानावर टपटपले! त्यांना वाचवेना. कुणालाच काही बोलवेना. ना छत्रपती शिवाजी महाराजांना, ना युवराज संभाजीराजांना, महालातील कुणालाच कल्पना नव्हती की, मिटल्या डोळ्यांच्या जिजाऊंनी आत्मा केव्हाच आत्म्यात घातला होता. देहभान हरपलेल्या, माणसांच्या जगापार गेलेल्या, लोकमाता जिजाऊसाहेबांच्या जीवज्योतीला प्रकाशच प्रकाश दिसत होता – शेवटचा प्रकाश.

होय! साक्षात अष्टभुजा, शस्त्रधारी, वाघावर आरूढ झालेली जगदंबाच त्यांच्या रोखाने येत होती! वाजत-गाजत, तिच्या समोर डोर-चोळणा घातलेला, छातीवर कवड्यांच्या माळाच माळा मिरविणारा, भंडाऱ्याने मळवट भरलेला, हाती पोत नाचविणारा भुत्यांचा सरंजामी तांडाच तांडा “उदं उदं” गर्जत येत होता!

ती “भवानी यात्रा’ थेट जिजाऊंच्या समोर येऊन थांबली. वाद्यांचा गलका विरला. वाघावर बसल्या जगदंबेने जिजाऊंच्या रोखाने आठी हात पसरले! भुत्यांनी बेहोश उदोकार दिला – “उदं उद”.

देहाच्या सिंहासनावरून खंबीर जिजाऊ उठल्या! त्यांनी भगवा पदरकाठ ठाकेठीक केला. जगदंबेच्या डोळ्यांना डोळे जोडून बरेच दिवस मनाच्या खोलवटात रुजून बसलेला एक जाब तिला त्यांनी खानदानी बोलीत विचारून घेतला –

“आम्हास वाटलं होतं तुम्हीच याल! पण वाटलं नव्हतं, तुम्ही अशा याल! वाटलं होतं, तुम्ही येताना आपल्या संगती एक जीनकसला घोडा घेऊन याल! त्याच्या रिकिबीत आमचाही पाय भरून फरफट करीत आम्हांस तुमच्या दरबारी घेऊन जाल! जसं होदिगेरीच्या रानातून तुम्ही आमच्या स्वारींची शिकार करून त्यांना घेऊन गेला होतात तशा…! पण!! चला. आम्ही सिद्ध आहोत!”

राजे, संभाजीराजांसकट साऱ्यांना जिजाऊंच्या ओठांतून “जगदंब! जगदंब!’ असे शब्द बाहेर पडत आहेत असा भास झाला. डुईवर सप्तनद्यांचे पवित्र जल घेतलेले छत्रधारी, अभिषिक्त राजे खऱ्या अर्थाने पोरके झाले! छत्रधारी छत्रहीन! राजांच्या डुईवरचे आऊपणाचे छत्र गेले… आणि आणि… संभाजीराजांच्या? जिजाऊंचा निष्प्राण झालेला, थंडगार हात गदगदा हलवीत, उभ्या चेहऱ्याला इंगळ्याच इंगळ्या डसाव्यात तसे आक्रसल्या चर्येने, महाराजांच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत, संभाजीराजांनी मध्यरात्रीचे पाषाणकठोर काळीजही तडकेल असा हंबरडा फोडला – “आबा, आमच्या आऊसाहेब गेल्या!”

पाठच्या भिंतीवर थडाथड गोंदले कपाळ बडवीत “मासा ब, मासा ब” म्हणत पाय गेलेली धाराऊ मटकन खालीच बसली. उठलेल्या आक्रोशाने शमादानांच्या ज्योतीन्ज्योती थरथरल्या. जिजाऊंच्या निष्प्राण देहावर दुअंगाने डोके धुसळीत महाराज नि संभाजीराजे स्फुंदू लागले. बाहेर पाचाडभर मध्यरात्र सरत होती. थेंबाथेंबाने गळत होती!.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९५ –

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment