धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८७ –

यादव नामाजीसह जगदीश्वरदर्शन करून युवराज कुशावर्ताच्या टाक्याजवळ आले. कुणाचीही नजर जखडून पडावी, असे नानारंगी कमळफुलांचे थाळे टाक्यावर उठले होते. गडाच्या मंद वाऱ्याने ते डुलत होते. भारल्यासारखे संभाजीराजे कुशावर्ताकडे बघत राहिले. त्यांच्या मनी एका विचाराचे कमळफूल फुलून उठले – ‘मासाहेबांना फुलांचा खूप सोस. गडावर आणून हे टाके त्यांना एकदा दाखविलं पाहिजे.’

“यादवराव, आत उतरा. वेगवेगळ्या वाणांचे नाळ खुडून आणा.” युवराजांनी आज्ञा केली. पायताणे उतरवून यादव नामाजी टाक्यात उतरला. निळे, सफेद, लाल असे अर्धवट फुलले कमळनाळ घेऊन बाहेर आला. ते निरखीत युवराज बालेकिल्ल्याकडे परतले. दरबारी चौकातील कारंजी हौद आला. शतधारांनी उसळत्या फबाऱ्याकडे नजर टाकीत, संभाजीराजे महालात आले. त्यांना कल्पना नव्हती, पण महालात धाराऊ आणि येसूबाई उभ्या होत्या.

येसूबाईनी रामराजांना वर छातीशी घेतले होते. युवराजांना बघताच धाराऊ आपले आपणालच सांगितल्यागत म्हणाली, “तरकतच ऱ्हात न्हाई. आईच्या पूजंची जुपी लावून द्याची ऱ्हायलीच की बुवास्री!” आणि ती महालातून बाहेर पडलीही.

“या.” रामराजांना घेण्यासाठी कमळनाळांसह संभाजीराजांनी हात पसरले. येसूबाईंच्या काखेतून त्यांना घेताना संभाजीराजांच्या बोटांचा स्पर्श येसूबाईच्या अंगादंडाला झाला! उभ्या अंगावर रसरशीत कमलफुले फुलल्याचा भास त्या स्पर्शाने येसूबाईंना झाला! त्यांच्या पापण्या फडफडल्या. कपाळीच्या कुंकुबोटात घामाचे थेंब तरारून आले. मोठ्या धाडसाने त्यांनी समोरच्या टोपाखालच्या पाणीदार डोळ्यांना आपले डोळे भिडविले. आणि क्षणात ते खालच्या फरसबंदीवर टाकले आणि लगबगीने त्या बाहेर जायला निघाल्या.

“थांबा!” कुणीतरी त्यांचे पाय जागीच खिळवून टाकले. संभाजीराजे रामराजांसह पुढे आले. हातीचे कमळनाळ त्यांनी येसूबाईच्या मुद्रेच्या केतकी कमळाकडे बघत पुढे धरले आणि म्हणाले, “घ्या. एकतर जगदीश्वराला नाहीतर तुम्हालाच ते द्यावेत, असे ठरविले होते!”

धडधडत्या छातीने आणि थरथरत्या हाताने येसूबाईनी ते रंगीबेरंगी फुले असलेले देठ हाती घेतले. ते घेताना पुन्हा झालेल्या बोटांच्या स्पर्शाने त्यांच्या पापण्यांचे अस्तर आणि पुन्हा कानांची पाळी रसरसून आली. डोळ्यांना डोळे भिडले. भांबावलेल्या येसूबाई नेसूच्या शेवाने फरसबंदी झाडीत तरातर महालाबाहेर पडल्या!

थोड्याच वेळात धाराऊ महालात आली, दोघा बंधूंना एकत्र बघून हसली. युवराजांच्या हातात कमळे नाहीत, हे बघून ती म्हणाली, “पूजेची जुपी लागली; पर देवीला कमळाचं देंट ठिवायचं ऱ्हाऊनच ग्येलं. आता कोण बापडीला ते आनून देनार!” आणि रामराजांना घेऊन धाराऊही हसत बाहेर पडली.

बंकापूर लुटून, कारवार तसनस करून, आनंदराव मकाजी यांना पन्हाळा प्रांती ठेवून राजे पुरत्या दोन महिन्यांनंतर रायगडी आले. ते आले नि एक वाईट आणि एक चांगली खबरही त्यांच्या पाठोपाठ गड चढून आली दौलतीचे कदीम चाकर मुजुमदार निळो सोनदेव वारले, ही खबर वाईट होती. आणि काशीचे गागाभट्ट राजांच्या भेटीला येत आहेत, ही खबर चांगली होती

राजांचे कुलोपाध्याय – नाशिकचे अनंतभट कावळे यांनी खास माणूस पाठवून काशीच्या वेदशास्त्रसंपन्न विश्वेश्वरभट्ट उर्फ गागाभट्ट यांना क्षेत्री आणवले होते आचार्य गागाभट्टांना इतमामाने गडावर आणण्यासाठी राजांनी अण्णाजींना पालखी-सरंजामासह नाशिकला रवाना केले. आणि गागाभट्टांचे दर्शन जिजाऊंना घडावे म्हणून त्यांना पाचाडातून गडावर आणण्याची कामगिरी राजांनी संभाजीराजांना जोडून दिली.

गडचढीचे भोये आणि पडदेबंद मेणे घेऊन आज्ञेप्रमाणे संभाजीराजे पाचाडात उतरले. त्यांनी थकल्या जिजाऊंना हातजोड देत मेण्यात बसते केले. दुसऱ्या मेण्यात पुतळाबाई बसल्या. कबिला रायगडावर आला. पण आजारी काशीबाई मात्र तेवढ्या पाचाडातच राहिल्या. श्रीक्षेत्र काशीच्या धर्मपीठाचे श्रेष्ठ आचार्य रायगडावर येत आहेत या जाणिवेने सर्वत्र चैतन्य पसरले. दाक्षिणात्यी मावळी स्वागताची तयारी खुद्द राजे- संभाजीराजे यांच्या देखरेखीखाली सिद्ध झाली

महाडहून अनंतभटांची गडावर वर्दी आली – “आपल्या निवडक शिष्यगणांसह आचार्य येताहेत.”

राजे-संभाजीराजे जिजाऊंची पायधूळ घेऊन गड उतरायला लागले. त्यांच्या पालख्यांमागून मोरोपंत, अण्णाजी,दत्ताजी, येसाजी, निश्चलपुरी, कवी परमानंद, कवी कुलेश, प्रभाकरभट, केशव पंडित अशी निवडीची मंडळी गड उतरू लागली. पालखीच्या राजगोंड्याबरोबर संभाजीराजांचे मन हिंदोळू लागले – “कसे असतील आचार्य गागाभट? समर्थांच्यासारखे? त्यांना तरी आम्ही कुठे पाहिलंय? काशी मथथुरेहून काशीच्या वाटेवर असताना आम्हास परतावं लागलं. काशी राहून गेली! आणि आता बघून तरी काय उपयोग? तिथल्या विश्वेश्वराचं देऊळ औरंगजेबानं लुटलं. मंदिराच्या चिऱ्यांनी त्याच जागी म्हणे, मशीद उठवली! औरंगजेब! भरल्या दरबारी बंदिस्त कठड्याआड बसणारा! आम्हास “’हौदा खेळता काय?’ हे वजिरामार्फत विचारणारा!” पालखीच्या दांड्याच्या कुरकुरीतूनच शब्द बाहेर पडताहेत असा त्यांना भास झाला. “या भूमंडळाचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्रधर्म उरला काही। तुम्हाकरिता!”

महाराष्ट्रधर्म’ नकळत एक हुस्कार त्यांच्या नाकपाळ्यांतून सुटला. पाचाडचा जिजाऊंचा वाडा मागे पडत होता. रस्त्याच्या दुहाती शस्त्रधारी मावळ्यांनी शिस्त धरलेली दिसू लागली. पखाले पालख्या बघून दूर हटू लागले. आगवानीचा डेरा आला. पालख्या ठाण झाल्या. अंथरल्या पायघड्यांवरून राजे, संभाजीराजे डेऱ्यात शिरले. आत मांडलेली बैठक राजांनी निरखली. लोड, गिर्द्या, बिछायती सारा इतमाम ठीक होता. बैठकीच्या बगलेला एक धारकरी सरपोसाने झाकले सुवर्णतबक खांद्यावर घेऊन उभा होता. मोरोपंत, अण्णाजी, येसाजी, परमानंद, कुलेश साऱ्यांच्या चर्येवरून नजर फिरविताना राजांचे मन राजगडाच्या भुयारात शिरावे, तसे खोलवर शिरले.

“केवढा पुण्यवंत योग हा! पाचारण करतो म्हटले, तरी मधल्या गनिमांच्या मुलखाने साध्य होणार नाही, ते काशी धर्मपीठाचे आचार्य आपल्या पावलांनी येत आहेत.’

महाडच्या रोखाने उठलेल्या शंखांच्या कल्लोळत्या निनादाने राजांची साखळी तुटली. प्रभाकरभटांनी आत येत वर्दी दिली. “वेदोनारायण श्री आले !”

राजे-संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. मानेच्या शिरा फुलवीत, आभाळमार्गी तोंड धरून आचार्यांचा शिष्यगण बेहोश शंखनाद उठवीत होता. त्या पवित्र कल्लोळात नौबत-डंक्याचा मर्दाना घोष मिसळला! ठाण झाल्या पालखीजवळ लगबगीने जात राजांनी आचार्य गागाभट्टांना हात दिला. भगव्या बासनातून हळुवारपणे धर्मग्रंथ बाहेर घ्यावा, तसे त्या भगव्या अस्तराच्या पालखीतून राजांनी आचार्य श्रींना बाहेर घेतले! मथुरेत चुकार झालेली ‘काशी’ संभाजीराजे निरखू लागले! मस्तकी लिंबू वाणाचा जरीकिनारी रुमाल, अंगभर लपटलेली भगवी शाल, तिला धरून उत्तरीमाटाचे डाळिंबकिनारी सफेद धोतर; सतेज पायांत लाकडी खडावा, कपाळी गंधाचे शैव- पट्टे, तासाच्या थाळीसारखी गोल तोरंजनी वर्णाची मुद्रा, तेवते शांत डोळे.

गागाभट्टांच्या रूपाने हिंदू विद्वत्तेचा सूर्य मावळी स्वागताच्या चांदण्यात न्हात उभा होता! खेचल्यासारखे संभाजीराजे आचार्यांच्या डाव्या बगलेला झाले.

पायघड्या तुडवीत राजे आणि संभाजीराजे यांच्यामधून गागाभट्ट डेऱ्यात प्रवेशले. मांडल्या बैठकीवर आचार्यांना आदराने बसवून राजांनी सुवर्णी तबकातील पानविडयासह श्रीफळ त्यांच्या ओंजळीत दिले. मानाचे वस्त्र म्हणून शाल त्यावर ठेवली. राजे आणि संभाजीराजे यांनी गुडघे टेकून आचार्यांना नमस्कार केला.

आचार्य तो स्वीकारण्यासाठी झुकते झाले. हात उभवीत, डोळे मिटून त्यांनी आशीर्वाद दिले, “जयोस्तु!”

राजे-संभाजीराजांच्या पायसोबतीत आचार्य रायगड चढून आले. जगदीश्वराचे दर्शन करून व्यापारपेठ, नगारखाना, दरबारी चौक बघत साऱ्यांसह ते राजांच्या खासेवाडयात आले. बैठकमहालात राजे, जिजाऊ, संभाजीराजे, रामराजे यांच्यासाठी देखणी राजवबैठक सिद्ध केली होती. तिच्यासमोर वेदोनारायणांच्यासाठी मृगाजिन घातलेले प्रशस्त आसन मांडले होते.

आचार्य आल्याची वर्दी अंत: पुरात जि जिजाऊंना पोहोचली झाली. राजांच्या राण्या, मुली, येसूबाई, रामराजे असा गोतावळा पाठीशी घेत शुभ्र नेसूधारी जिजाऊ बैठकमहालाच्या उंबरठयाजवळ आल्या. त्यांना बघताच आसनावरून उठलेले आचार्य गागाभट्ट चालत पुढे झाले. जिजाऊंच्या रूपाने बिजलीचं शुभ्र वस्त्रं लेवून सोशीक मावळी आभाळच उंबरठ्यात उभे होते!

पापणी न मोडता त्यांच्याकडे बघत पुढे झालेल्या गागाभट्टांनी – “मॉजी, प्रणाम!” म्हणत झुकून थेट जिजाऊंच्या पायांना आपल्या हाताची बोटे भिडविली! असे काही होईल, ही कल्पना नसलेल्या जिजाऊ लगबगीने पाय मागे घेत म्हणाल्या “हे कोण करणं! आपण थोर-श्रेष्ठ आचार्य.” त्यांची भावना ओळखून गागाभट्टांनी खुलासा केला, “माजी, गंगासे बढकर श्रेष्ठ है आपके चरण। हम आचार्य हे पढत धर्मग्रंथोंके| आप साक्षात्‌ धर्ममाता है।” गंगेच्या खळखळाटासारखे ते बोल होते. ते ऐकताना राजांच्या पापणीकडा दाटल्यागत झाल्या. संभाजीराजांची छाती भरून आली. हाताची खूण देत आचार्यांनी जिजाऊंना बैठक घेण्याची विनंती केली. धिम्या-धिम्या चालीने जात जिजाऊ मांडल्या बैठकीवर बसल्या.

राजांनी आचार्यांना मृगासनावर बसण्याची विनंती केली. आचार्यांनी बैठक घेतली. त्यांच्या चरणाखाली असलेल्या आसनावर प्रभाकरभटांनी ताम्हन ठेवले. राजे, संभाजीराजे, रामराजे, राणीवसा, या साऱ्यांनी आचार्यांची सविध पाद्यपूजा केली. बैठकीवरून उठलेल्या जिजाऊ पाद्यपूजेसाठीच पुढे येताहेत हे बघून गागाभट्ट राजांना म्हणाले,

“नरेश, उन्हे फिरसे आसनस्थ कीजिये। मातासे पुत्र की पाद्यपूजा पुत्र की आयु कम कर देती है। हमें जीवित रहना है। – कमसे कम एक संकल्पित, धर्मकार्य पूर्ण करने तक)”

आचार्यांची इच्छा सांगून राजांनी जिजाऊंना राजबैठकीवर उच्चासनी बसविले. त्यांच्या पायगतीला, दोन्ही तर्फांना संभाजीराजे, रामराजे घेऊन राजांनी बैठक घेतली. पाठीमागे राणीवसा उभा राहिला. भोवती मंत्रिगणांसह, निवडक असामी हात बांधून, अदब धरून – धर्मपीठ आणि धैर्यपीठ यांचा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक झाल्या.

देवस्मरण केलेल्या वेदसंपत्न गागाभट्टांच्या विमल मुखातून बनारसी वाक्‌गंगा स्रवू लागली – “पुरुषोत्तम शिवाजीराजे, हम काशीक्षेत्रसे यहाँ दक्षिणदेश आये – मनमें एक धर्मसंकल्प लेकर। आपका यह किला हमने देखा, परमसंतोष। यहाँ सब है। परंतु एक नहीं। सिंहासन। नरेश, राजदंडके व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ हे। समस्त आर्यावर्तमें आज हिंदुओंका एक भी राजपीठ नहीं। सिंहासन नहीं, जिसे देखकर हिंदुमस्तक गर्व करे। जीवनसंग्राम लडानेकी मनीषा करे। वहीं कारन है कि, हिंदू स्वयं को निराश्रित, पराजित मान रहे है। नरश्रेष्ठ, अनुरक्षित धर्म-धर्म नहीं रहता!….

“आपका कीर्तिसुगंध श्रवण कर हमें प्रेरणा प्राप्त हु राजा शिवाजी, समस्त आर्यावर्तका यह भार कंधोंपर तोलने आप, केवल आपही योग्य है।….

“उत्तरमें हमारे पवित्र देवालय नष्ट हो रहे है।

देव-देवता विटंबित किये जा रहयादी म्लेंच्छोंने उदंड हाहाकार मचा दिया है।

दुर्बल हिंदू प्रजानन बलात्‌ धर्मांतरित किये जा रहे है॥”

आचार्यांचा धीरगंभीर आवाज धरत चालला.

“यही चलता रहा तो रामकृष्णकी यह पवित्र देवभूमी रौरव हो जायेगी।

यही प्रयोजन है कि, समस्त उत्तरवासियोंके प्रतिनिधिरूपमें भिक्षापत्र हाथ लिये हम आपके किलेके महाद्वारमें खडे है।

धर्मरक्षक, हमें सिंहासन प्रदान करो।

नरश्तेष्ठ, धर्मदंडको राजदंड प्रदान करो।

राजा छत्रपती बनो। ‘छत्र’ प्रदान करो!”

भावनावेगाने उंचबळलेल्या आचार्यांनी दोन्ही हात पसरले. उत्तर दक्षिणेला साकडं-साद घालू लागली. डोळे भरल्यामुळे जिजाऊंना समोरचे काहीच दिसेनासे झाले. मिटल्या डोळ्यांच्या राजांचा हात छातीवरच्या कवड्यांवर फिरत राहिला. बोटांना स्पर्शणारी प्रत्येक कवडी त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खर्ची पडलेला चेहरा- चेहरा उभी करू लागली. बाजी, तान्हाजी, मुरार, सूर्याजी, रामजी! कैक. ते सारेच हात उठवून म्हणत होते –

“राजे, आम्हांस छत्र द्या! मरणास मोल द्या!”

संभाजीराजांची पाणीदार नजर वेदभूषण गागाभट्टांच्या सतेज, निर्भय ओठांवर अडकून पडली होती. आचार्यांच्या रूपाने उभा रायगडच आपल्या कड्यांचे भक्कम ओठ उघडून कानाउरांत साठवावे असे काही सांगतो आहे, असे त्यांना वाटले.

“राजदंडके व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है। असुरक्षित धर्म – धर्म नहीं रहता। देवालय नष्ट हो रहे है, देवदेवता विटंबित किये जा रहे है। दुर्बल प्रजानन बलात्‌ धर्मांतरित किये जा हे है॥”

ऐकल्या शब्दाशब्दाला त्यांच्या आतून कुणीतरी फेरसाद घालू लागले.

“मारिता मारिता मरावे। तेणे गतीस पावावे।

फिरोनी येता भोगावे। महत्भाग्य।”

गागाभट्टांची आज्ञा राजांनी शिरोधार्थ मानली. झाल्या बैठकीचे बोलणे रायगडाच्या पाखरांनी आपल्या पंखांवर घेतले! आणि ती फडफडत मावळभर उडाली!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here