धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८४

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८४

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८४ –

“ठण ठण ठण’ गडवाऱ्याने आणून सोडलेले सूर त्यांच्या कानात उतरले. पाचाडच्या सदरेवर जिजाऊ आल्याची खूण देणारी घंटा झडत होती!! मावळमाचीवर जाऊन तिला मान देण्याएवढाही समय नव्हता. संभाजीराजांनी पाचव्या मजल्यावरून पाचाडच्या रोखाने तीनदा रिवाज दिला. राजांचे बोल त्यांच्या मनात फिरले – “ध्यानी ठेवा. श्रद्धा आणि मायेपोटीच माणसे जान लावून असतात. प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात! श्रद्धा आणि माया!” एक दीर्घ निःश्वास त्यांच्या नाकपाळ्यांतून सुटला.

“केवढे ठाव घेणारे बोलतात आबासाहेब!’ राजांची दाढीधारी, हसरी, सतेज मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळली. आणि आठवले की, आबासाहेब सांप्रत समर्थांच्या सान्निध्यात दंग असतील! महाडच्या तलावातून आणलेले रक्तवर्णी, आकाशवर्णी, सफेद अशा वाणांचे कमळगड्टे रायाजी आणि अंतोजींकडून कुशावर्त तलावाकाठच्या चिखलात लावून झाले. तलावाकाठच्या करंजीच्या झाडाखाली सावली धरून संभाजीराजे उभे होते. त्यांनीच ते कमळगड्टे आणवले होते.

“देठांचे नाळ चिखलात ठेवून नानारंगी कमळांचे डुलते थाळे या कुशावर्तावर दाटतील तेव्हा कसा दिसेल हा तलाव?’ पोटऱ्यांवर चोळणा दाटलेले रायाजी, अंतोजी पायऱ्याच्या बाजूने तलावात उतरून चिखलमाखले हातपाय धुऊन बाहेर आले.

“रायाजी, बघू या तुमचा हातगुण कसा निघतो? बघू किती गड्डे जीतवन धरतात ते!” संभाजीराजे म्हणाले.

“धाकलं धनी, फुलांची ही जात लई चरनी धरनारी! वाईच ठाव घावला की, पसारती हां-हां म्हन्ता. सम्दं टाकं येरगटून टाकतील ह्ये गइं!” अंतोजी हसून म्हणाला.

“कसूर माप धाकलं धनी, सरकार याद करत्यात. हिंदुस्तानातलं कुनी दोन पावनं गड चडून आल्यात. ह्येः आडवं पट्ट हाईत कपाळाचं गंदाचं.” वाड्याच्या आलेल्या जोत्याजी केसरकराने करंजीच्या झाडाखाली येऊन वर्दी दिली. राजे चाफळहून येऊन दीड तास लोटला होता.

“चला,” म्हणत संभाजीराजांनी माथ्यावरची सावली सोडली. जगदीश्वराचा सोनकळस दूरवर त्यांना उन्हाच्या तिरिपेत झगमगताना दिसला. त्याने फेकलेल्या प्रखर झोताने लवभर युवराजांचे डोळे अंधारल्यागत झाले. एक विचित्र विचार त्यांच्या मनात फेर टाकून गेला. “जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाला हयातीत कधी हा तळपता सोनकळस बघायला मिळणार नाही!’

“हिंदुस्थानी पाहुणे कोण असतील?’ विचार करीतच त्यांनी राजांच्या बैठक महालाचा उंबरठा ओलांडला. राजांना मुजऱ्याचा रिवाज दिला. कमरेच्या हत्यारावर हाताची डावी मूठ रुपवीत, राजांच्या बैठकीसमोर असलेल्या दोन्ही असामींना निरखीत ते पुढे झाले.

“या, यांना ओळखलंत?” राजांनी त्यांना समोरच्या दोन्ही असामींच्या रोखाने हात करीत हसत-हसत विचारले. दोन्ही उत्तरी असामींनी युवराजांना हात जोडून, कमर झुकवीत मथुराई नमस्कार घातले. रुजाम्याची वळी उलगडावी, तसा संभाजीराजांच्या मनी आठवणींचा पट खुलला यमुनेचे गिरके वळण डोळ्यांसमोर तरळले. दोन्हींतील एका असामीच्या अंगी भगवी कफनी होती. दुसरीने उत्तरी डौर, जरीकिनारी धोतर-उपरणे, घेरदार पगडी असा पेहराव केला होता.

“हे… हे कविराज!” आठवणीसाठी कपाळीच्या शिवगंधाला मुडपीत संभाजीराजे म्हणाले, “आम्हास वाराणशीच्या वाटेवरून मथुरेपर्यंत सोबत करणारे कवी कलश!” “कसूर माफ हो, युवराज. कलश नहीं कवी कुलेश!” कवींनी हसून दुरुस्ती केली. “आणि हे कोठीत भेटलेले कवी परमानंद.” राजांनी कफनीधारी असामीची याद दिली.

“युवराज, ही मंडळी म्हणताहेत, “केवळ भेटीसाठी आलो आहोत. चार-दोन दिवस राहून परतू.’ त्यांना सांगा तुम्हाला काव्य केवढे प्यार आहे ते. आम्ही त्यांना येथे कायमचे ठेवून घेऊ म्हणतो.” असे म्हणून राजे हसले.

“जी, आपला बेत बरोबर आहे. आमचाही त्यांना तसाच आग्रह आहे.” युवराजांच्या या बोलण्यावर सारेच हसले.

“चंडी चंडी” हसण्याच्या शेवाला धरून कुलेश पुटपुटले!

शाळिग्रामी रंगाच्या एका तकतकीत घोड्यावर मांड जमवून भवानीटोकाच्या बाजूने संभाजीराजे फेर टाकीत होते. डाव्या हाताला लिंगाणा, उजव्या तर्फेला पोटला आणि समोर दूरवर त्यांना तोरणा-राजगडाची काळपट शिखरे दिसत होती.

“राजगड! उडत्या गरुड पक्ष्याच्या पवित्र्यात माच्यांचे पंख पसरून असलेला गडराज!’ त्या शिखराने त्यांची नजर पकडून ठेवली. दुड दुड दुड’ रायगडावरच्या नगारखान्याचा नौबतडंका त्यांना ऐक्‌ आला. पाठोपाठ तोफखान्यावरून फुटलेल्या भांड्यांचे बार दणदणले. कायदे खेचून त्यांनी मांडाखालच्या जनावराला मोजडीची टाच दिली. काळेशार जनावर शेपटीचा फुलवा नाचवीत दौडू लागले. काळा हौद, जगदीश्वराचा कळस मागे पडला. दौडते जनावर खडखडाट करीत व्यापारपेठेत घुसले.

उंच जोत्यावर बसलेले नागाप्पा शेटीचे व्यापारी बसकणीवरून उठून, जोत्यांना घोडी भिडवून खरेदी करणारे धारकरी घोड्यांवरून खाली झेपा घेऊन धडाधड मुजरे करताहेत, इकडे संभाजीराजांचे लक्ष नव्हते. होळीमाळ मागे पडला. नगारखान्यातून घुसताना संभाजीराजांना कमानीवर कोरलेल्या, पंजा उगारल्या दगडी वाघाचे मानचिन्ह निसटते दिसले. आत जाताच त्यांनी डाव्या रिकिबीवर भार देऊन जनावरावरून खाली झेप घेतली. हातीचे कायदे सामोरा आलेल्या मोतहाराच्या दिशेने फेकले. आणि ते झपाझप दरबारी चौकातील हजारी कारंजी पार करून गेले. तशी त्यांच्या जाम्याच्या पाठीवरची सोनजरीची वेलबुट्टी लखलखली. दरबारी चौकाच्या बैठकीवर राजे माणसांच्या घेरात उभे होते. संभाजीराजांना बघताच त्यांनी एका मावळ्याच्या खांद्यावरील परातीतील साखरेची मूठ भरून घेतली.

राजे दगडी पायऱ्या उतरून येताहेत, हे बघून संभाजीराजे झपाझप पुढे झाले. मुजऱ्यासाठी ते झुकणार ते बघून राजांनी त्यांना थोपविले.

“शंभूराजे, तोंडी साखर घ्या. पन्हाळा फते झाला! बारा वर्षांनी आमचा मनसुबा तडीस लागला.” राजांनी हसत मूठ युवराजांच्या ओठांशी नेली. तोंडात रेंगाळणाऱ्या साखरेच्या चवीने संभाजीराजांच्या मनाच्या मठीत लपलेले दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल भगवी कफनी चढवून वर आणले –

“नरपति, हयपति। गजपति, गडपति।

पुरंदर आणि शक्ति। पृष्ठभागा।”

त्या दिवशी संध्याकाळी समाधानी राजे सोयराबाईंच्या महाली आले. बाईंनी चौरंगीवर साखरेचे भरले तबक कुणबिणीकडून ठेवून घेतले होते.

रामराजांना घेऊन त्या चौरंगीजवळच उभ्या होत्या. राजे जवळ जाताच त्या रामराजांना म्हणाल्या, “जा, आबासाहेब काय देतात बघा तरी!”

रामराजांना आपल्याकडे घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकीत राजे म्हणाले, “आम्ही काय देणार यांना? देणार ‘श्री’ थोर आहे.” राजांच्या दाढीच्या स्पर्शाने हुळहुळलेल्या गालांवर रामराजांनी तळहात फिरविला. तीन वर्षांचे रामराजे म्हणाले, “्धी’ म्हेजे काय आबा?”

हसत राजे म्हणाले, “ते आम्हांस तरी पुरतं कुठं माहीत आहे! ते माहीत झालं की, माणसाचा समर्थ होतो!”

आतल्या आत धुसफुसलेल्या सोयराबाईंच्या मनात राजांच्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेकडे बघताना एक बटबटीत विचार फिरला, ‘तोंडी साखर पडायला मोठेपणाचं भाग्य लागतं! आणि मग त्या म्हणाल्या, “या. तुम्ही नको ‘समर्थ’ व्हायला.”

सोयराबाईंनी रामराजांना राजांच्याकडून आपल्याकडे घेतले. दरबारी चौकात राजांनी संभाजीराजांच्या तोंडात हसत साखर भरलेली सोयराबाईचा दरूबंकी बयाजी याने बघितले होते. बघितले तसे आपल्या बाईसाहेबांच्या कानी घालायला तो विसरला नव्हता! बाहेर पडताना राजे विचार करू लागले. “तुम्ही नको ‘समर्थ’ व्हायला!” “राणीसाहेब असे का म्हणाल्या?” पण त्यांना ते कळलेच नाही. कळणारही नव्हते!

चैत्री पाडव्याचा सण आला. चुना-कुंकवाची ओली बोटं फिरलेल्या, आंबवतीनं सजल्या, हिरव्या, रसवंत, तोरणकाठ्या गडाच्या घरट्या-घरट्यांसमोर उठल्या. त्यावरचे झळझळीत चंबू तळपू लागले. कोऱ्या खणांचे रंगीबेरंगी शेव आणि सफेद चाफ्यांच्या माळा गडवाऱ्यावर हिंदोळू लागल्या. कोंडाजी फर्जंद, अण्णाजी, मोत्याजी खळेकर आणि गणोजी कावळा यांनी हिकमतीनं दस्त केलेला पन्हाळा डोळ्यांत साठवून घ्यायला राजे आज रायगड सोडणार होते. संगतीला फौजेसुद्धा प्रतापराव दौडणार होते. रायगड युवराज संभाजीराजांच्या अखत्यारीत येणार होता. सणाची म्हणून गोडाची पाने उठली. दुपारच्या विसाव्याची डावी कूस झाली.

उन्हे थोडी कलतीला लागली असताना राजे, संभाजीराजे व प्रतापराव यांच्यासह जगदीश्वराच्या दर्शनाला आले. दर्शन करून सारी मंडळी मंदिराबाहेर पडली. संभाजीराजे समोर दूरवर दिसणाऱ्या लिंगाण्याच्या डोंगररांगेकडे बघतच होते. फांदीवर फांदी टक्करल्याने पडलेल्या ठिणगीमुळे असो, वा कुणब्यांनी तरव्यातील किटण उडाल्यामुळे असो, लिंगाण्याच्या घसरंडीवर धडधडलेला वणवा मावळतीच्या किरणांत नजर खेचून घेत होता. जसा उभा लिंगाणा पिवळ्या- तांबडसर ज्वाळांचे भंडारामाखले हात आकाशाच्या रोखाने मूकपणे नाचवीत होता.

मंदिराच्या दगडी आवारकठड्याला हात टेकून युवराज तो आगीचा नाच पापणी न मोडता रोखल्या नजरेने घेत राहिले. सडक बोटांचा एक गुलाबी हात-पंजा त्यांच्या खांद्यावर चढला तशी त्यांची ती अग्नरिसमाधी डहुळली. त्यांनी मागे बघितले. लिंगाण्याच्या घसरंडीला डोळा जोडलेले राजे केवढेतरी गंभीर दिसत होते.

“ही अमनधपक्यानं पेटल्याली रानची आगट लई वंगाळ धनी. कानांत रानवारा भिनल्याली पाखरं येलबाडून ह्येच्यात घालून घेत्यात! हाकनाक पंख होरपळून घेत्यात!”

प्रतापराव गुजर हत्यारावरची मूठ चाळवीत समोरच्या ज्वाळा बघत म्हणाले.

“दोष पाखरांचा नाही, पेटल्या वणव्याचा नाही, सरलष्कर. दोष त्या क्षणाचा आहे, ज्या क्षणी या वणव्याला कारण होणाऱ्या दोन फांद्या टक्करल्या जातात! आणि कुठल्याही क्षणावर कुणाचीच हुकमत चालत नाही.” राजांच्या ओठांतून सुटलेले बोल ऐकून संभाजीराजांना भरून आले.

धाराऊला संगती घेऊन पाचाडात आलेल्या येसूबाई आठ दिवस जिजाऊंच्या संगती राहून पुन्हा गड चढू लागल्या. शाळूचे दिवस असल्याने झोंबरा वारा, चेहऱ्याभोवती पदराचा लपेटता फेर घेऊन त्या थोपवू बघत होत्या. त्या वाऱ्याला धरून, आईसाहेबांनी सांगितलेले जाणते विचार त्यांच्या मनी फिरू लागले.

बाताने धरलेल्या गुडघ्यांच्या सांध्यांना डुकराची चरबी चोळणाऱ्या येसूबाईना जिजाऊ एकदा म्हणाल्या होत्या, “ही भोसल्यांची माणसं अशीच आखडल्या सांध्यासारखी आहेत, नातसूनबाई! मुक्या मनानं मायेचं तेलवण चोळलं, तरच झाली तर थोडी सुमार व्हायची!”

मेणादरवाजाने बाहेर आलेल्या येसूबाई धाराऊसह खुल्या पठारावर आल्या होत्या. सातमहालाला लागून हे पठार आबाजीपंतांनी मुद्दाम खुले राखले होते. राजांच्या जनान्याला मेणादरवाजा पार करताच मोकळी हवा घेण्यासाठी या पठारावर येता येईल, अशी ही सोय होती.

शिकारीसाठी संभाजीराजे पाचाडवाडीलगतच्या रानात खेळ्यांसह उतरले होते. राजे पन्हाळ्यावर होते. मोकळ्या मनाने भोवतीचा फुललेला चेैत्राचा परिसर न्याहाळत येसूबाई धाराऊशी मध्येच काहीतरी तुटक बोलत होत्या. लाल फुलांच्या तुऱ्यांनी पेटलेली पळसाची आणि पिवळ्या फुलांच्या घोसांनी लवलेली बाव्यांची झाडे भोवतीच्या कड्यांवर उठून दिसत होती. वाऱ्याच्या झपत्काराने उडू बघणारा पदर येसूबाईंनी गळ्याजवळ घट्ट लपेटता धरून घेतला. मावळतीला भिडलेले बिंब बघताना त्यांना न कळणारा भास झाला. पळसाच्या फुलतुऱ्यांचा लाल टोप त्या बिंबाने घातला आहे! कोकिळाची उठलेली थरथरती किलकारी धावत थेट त्या टोपाला जाऊन भिडली आहे! म्हणता-म्हणता समोरचा ढालीसारखा सूर्य वितळून मावळतीवर पसरतो आहे! त्यांना वाटले, ‘इथं आमच्या तहबंदात! छातीवर! समोरचा सूर्य वितळतो आहे! हे असं काय होतं आहे?’

“धाराऊ” येसूबाईचे शब्द थरथरले आणि उभ्या येसूबाई पदराचा शेव तोंडात धरीत मटकन खालीच बसल्या!

क्षणभर धाराऊ झाल्या प्रकाराने चक्करली. मग तिचे डोळे लखलखले. तिचा गोंदला हात अपार मायेने येसूबाईच्या पाठीवर आला. कुणबी जाणतेपण ओठांतून निसटले, “भिऊ नगासा. चला. ह्यो वारा असा अंगावर घेऊ नगा.” येसूबाई थरथरत होत्या. धाराऊने त्यांना उठवून घेतले. सावरते धरून त्यांना ती सातमहालाच्या रोखाने चालवू लागली. भोवतीची चैत्री दुनिया उंबरठा ओलांडत होती. मावळतीच्या उन्हात न्हात होती!!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here