महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७९

By Discover Maharashtra Views: 1232 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७९ –

संभाजीराजांचा ठरला दिनक्रम सुरू झाला. सुक्या तळ्याजवळ मोकळ्या मैदानात असलेल्या लोखंडी मल्लखांबावर ते एका सकाळी सरसर दशरंग फिरत होते. शेजारी उभ्या असलेल्या गोमाजीबाबांची आता त्यांच्यावर नजर ठरत नव्हती. टाळा वासून ते नुसते बघत होते. मल्लखांब लोखंडी असल्याने संभाजीराजांच्या अंगी उठलेल्या घामाने तो निथळून निघाला. त्याच्यावर हात ठरेनात आणि खांबाच्या टोपाकडे चढते गेलेले संभाजीराजे बाणासारखे पायथ्याकडे घसरतीला लागले. त्या घसरतीतच त्यांनी कसबाने अंग बाहेर झोकून दिले आणि पवित्रा घेत, ते गोमाजींच्या पुढ्यात खडे ठाकले! घामाघूम झालेले! पण ओठभर हसणारे!

झटकन गोमाजींनी पुढे होत हातीची शाल त्यांच्या अंगाभोवती लपेटली, “म्हेनतीच्या घामेजल्या अंगावं बारा घेऊ ने, धाकलं धनी!” काहीतरी बोलायचे म्हणून गोमाजी बोलले खरे; पण मनोमन त्यांना उघडे संभाजीराजे बघताना वाटले होते की, “म्हातारी जाली म्हूण काय जालं, आमचीच नदार लागायची या सोनकांबंच्या मल्लखांबाला!’

मेहनत घेऊन आलेले संभाजीराजे पेहराव अंगी घेऊन, धाराऊने दिलेली दुधाची चरवी ओठांआड रिचवून वाड्याच्या सदरबैठकीवर आले. राजे महाडकडे कूच झाले होते. युवराजांना बघताच बसलेले बाळाजी चिटणीस अदबीने उठले. उभ्या असलेल्या अण्णाजींनी झटकन मुजरा घातला. सदरेवर चार-पाच कुणबाऊ माणसे आणि रायगडाच्या पायथ्याच्या वाडीचा गावखोत उभा होता. संभाजीराजांची त्यांच्यावर नजर पडताच, ते सारेच कमरेत झुकले.

“कोण मंडळी ही?” बैठक घेत संभाजीराजांनी बाळाजींना विचारले.

“हे वाडीचे शिकारखेळे आहेत. त्यांच्याविरुद्ध गावखोतांची तकरार आहे.” बाळाजींनी उभे राहून उत्तर दिले.

“कसली तकरार?” संभाजीराजांनी खोतांकडे बघत विचारले.सारेच गप्प होते.

“का? चिटणीस यांची तकरार आम्हास ऐकविण्याजोगी नाही?”

“नाही. तसं नाही युवराज! पण हा कथला सादिलवार आहे. आम्ही त्यास निवाडा देऊ.” एवढा वेळ गप्प बसलेले अण्णाजी नम्रपणे म्हणाले.

“जशी तुमची इच्छा!” संभाजीराजे हसून म्हणाले.

जमलेल्या शिकारखेळ्यांत मात्र चुळबुळ झाली. त्यांच्या म्होरक्या गुंजोटे कमरेत झुकून मुजरा देत म्हणाला, “सरकार गडावं न्हाईत, तर आपुनच काय ती तड लावावी आमची धाकलं धनी.”

“कसली तड! काय झालं? ना कचरता बोला आम्हांस!” संभाजीराजांनी गुंजोट्याला धीर दिला.

“धनी, होेनी आगळ क्येलीय. तड लावायची ती आमची, ह्येंची नाय.” गावखोताने सावधपणे तोंड उघडले.

“कसली आगळ?” संभाजीराजांनी खोताला नजर दिली.

“वाडीच्या वाघोऱ्याच्या रानात होनी शिकार क्‍्येली. मायंदळ जनावरं पाडली. पर सरकारातनं ठरवून दिल्याली शिकारीची तक्षीम आम्हाला न्हाई पावती क्येली! शिकार करून ह्ये वाटा द्याया लागतो म्हून रानातनं गुपचूप पशार जालं.” खोताने तकरार पेश केली. ती मजेदार होती. शिकारखेळ्यांनी केल्या शिकारीचा ठरलेला वाटा गावखोताला दिला नव्हता!

“अण्णाजीपंत, या शिकारीबाबीचा कानू काय?” संभाजीराजांनी विचारले.

“खोत म्हणतात, ते सही आहे युवराज. सरकारी फडातून खोतास तसे अधिकार देण्यात आले आहेत. गुंजोटे आणि त्यांचे शिकारखेळे दोषी आहेत.” अण्णाजींनी बरहुकूम कानुजाबता सांगितला.

“यासी सजा काय?” संभाजीराजांना औरंगाबादेतील ‘त्या’ शिकारीचा प्रसंग आठवला.

“दंड! शिकाऱ्यांनी सरकारी फडात दंड जमा केला पाहिजे. त्यातील तक्षीम गावखोतास तोडून दिली जाईल. जेवढी जनावरं शिकाऱ्यांनी पाडली असतील, तर त्या हर जनावरामागं चार शिवराई दंड जमा करणं भाग आहे!”

शिकारखेळे दंडाची भाषा ऐकताच चळवळले. खोताचा चेहरा जरा उजळ झाला.

“खोत, तुम्ही कधी शिकारीची खेळी खेळता?” खोताच्या ध्यानी-मनी नसलेला प्रश्न संभाजीराजांनी त्याला विचारला.

“जी. खेळतो की!”

“मग त्यातील तक्षीम कधी वाडीच्या शिबंदीच्या सुभेदारांच्या हवाली करता?”

“न्हाई धनी.” खोताचा आवाज पडका झाला.

“तुम्ही शिकार खेळता. तुम्हास ठावे असेल. उठवल्या रानाला अमुकच एक जनावर भेटेल, याचा अंदाज नाही देता येत. या जोखमीच्या खेळीत कधी वाघरासारखं जनावर खेळ्यावर चालून आलं; त्यानं तो जाया झाला, तर त्याची हकिकत पुसता?”

“न्हाई धनी.” खोत गडबडला.

“कुणी वाघराची शिकार पाडली, तर त्याच्या पाठीवर गावखोत म्हणून शाबासकीचा हात देता की त्यातही तक्षीमच मागता?”

“या प्रश्नाला खोताजवळ उत्तरच नव्हते!

“वाघासारख्या जनावराला हा जाबता लागू नाही युवराज.” अण्णाजींनी खोताला पाठीशी घालण्यासाठी अदबीने कायदा पुढे केला. “तेच म्हणतो, आम्ही अण्णाजीपंत. शिकारखेळीला असे काटेकोर कानू लागत नाहीत. जोखमीचे जनावर अंगावर आले, तर घरी ठाव घेतलेले हे खोत काही करणार नाहीत. खायचे जनावर पडले, तर वाटा मागण्यास चुकायचे नाहीत! आम्ही – आम्ही या शिकारखेळ्यांवरील दंड माफ केला आहे!!”

“पण – पण युवराज कानूप्रमाणे….”

“अण्णाजी, आम्ही दंड माफ केला आहे. ही आज्ञा आहे!” संभाजीराजांचा आवाज करडा झाला. मान ताठ झाली.

“जी.” अण्णाजी लपकन कमरेत झुकले.

“खोत. जातीचा शिकारी ‘वाटा’ म्हणून आलेली शिकार कधी खात नाही, हे ध्यानी ठेवा. गुंजोटे, जातीचा शिकारी ज्यांना-ज्यांना शिकार झाल्याचे कळले त्यांना “बाटा’ तोडून दिल्याखेरीज रानातून गुपचूप पळून जात नाही, हे विसरू नका. अण्णाजीपंत, आम्ही आज्ञा केली, ते मनी लावून घेऊ नका. थोरपणी आम्हांस क्षमा करा. औरंगाबादेच्या रानात आम्ही वनगाईंची शिकार होताना डोळ्यांदेखत पाहिली. त्या खेळ्यांना दंड करणे, तुम्हा-आम्हा कुणालाच साध्य न होणारे! त्या वेळी वनगाई समोर बघून हातीची हत्यारे तशीच खाली नेणाऱ्या आमच्या खेळ्यांचा आम्हास कोण अभिमान वाटला! यांना दंड माफ करताना वाटत नाही, एवढा आनंद आम्हांला त्या खेळ्यांना मरातबानं बक्षिसी बहाल करताना वाटला असता!

“खोत, आम्ही जातीनिशी तुमच्या रानात उतरू! शिकार खेळण्यासाठी – रानडुक्करांची! त्या वेळी आमच्या सोबतीला असा. पुरं जनावर वाहून वाडीत न्या. तुम्ही शिकार खा. वाडीच्या गावकऱ्यांच्या तोंडी घाला!”

“जगदंब – जगदंब!” संभाजीराजे थेट राजांच्यासारखे पुटपुटले. छातीच्या कवड्यांच्या माळेवर हातबोटे फिरवीत बैठकीवरून उठले. जगदीश्वराच्या दर्शनासाठी म्हणून अंत:पुराकडे चालू लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला साऱ्यांनीच मुजरे घातले. अण्णाजीपंतांच्या हातातील उपरण्याचे शेव मुठीत घट्ट आवळले गेले होते. युवराजांच्या राजदर्शनाने ते दिपून गेले होते. पण कथलेकऱ्यांसमोर झालेल्या करड्या आज्ञेने ते मनोमन कुठेतरी खोलवर दुखावले गेले होते!

गडावर कोसळणाऱ्या अखंड धारा थांबून थोडासा भांगा मिळताच पाचाडच्या वाडयाच्या सदरेवर घंटा ठणठणून उठत होती. ती ऐकताच असतील तेथून जोड घेऊन राजे आणि संभाजीराजे मावळमाचीवर जात होते. पावसाळी कुंद आकाश, पसरलेले भुरके पाणतुषार यांनी शे-दोनशे हातांपलीकडचे काहीच दिसत नव्हते. गूढ, धुकट दरीतून नुसता “ठण ठण’ असा आवाज ऐकू येई.

त्याच्या रोखाने मावळमाचीवर राजे-संभाजीराजे यांचे मुजरे होत. दोघेही न बोलता समोरच्या धुकट गडतळाकडे बराच वेळ बघत राहत. पावसाची सर धरू लागली की, हुजरे पुढे येत. त्यांच्यावर छत्रे धरीत.

आठ-दहा दिवस असे गेले. जिजाऊ दिसत नव्हत्या. हैराण झालेले संभाजीराजे मावळमाचीवर उभे असता राजांना म्हणाले, “आबासाहेब, या घंटेच्या टोलांनी आम्हांस राहवत नाही. आम्ही पाचाडात उतरावं म्हणतो.”

राजांना मासाहेब आणि संभाजीराजे यांचा काळीजमेळ माहीत होता. समोरच्या धुकटलेल्या गडतळाच्या रोखाने बघत ते म्हणाले, “कधी-कधी तुमचा आम्हांला हेवा वाटतो. मनी उठणारे तुम्ही साफ बोलून जाता. आम्हांला ते बोलता येत नाही. जरूर उतरा पाचाडात. चार दिवस वाड्यातच मासाहेबांची सोबत करा. पुन्हा गडावर या. तुम्हाला मोहिमेचे कामकाज समजून घेणे आहे. शिकारखेळ्यांचे कथले निवाडी लावणे सोपे आहे. याहून कठीण बाबी मार्गी लावणे मुश्कील आहे!” पार दूर बघत असल्यासारखे राजे न दिसणाऱ्या पाचाडावर डोळे लावून बोलले.

“आमचं काही चुकलं कथल्याच्या निवाड्यात महाराजसाहेब?” संभाजीराजांनी नजर टाकली.

“नाही. कथल्यात नाही चुकलं. सदरी रिवाजात मात्र, म्हटलं तर गफलत झाली तुमची. कथलेकऱ्यांसमोर अण्णाजींना आज्ञा करायला नको होती तुम्ही!”

राजांनी पाचाडच्या रोखाने बोट उठविले आणि ते मनाचा खोल कप्पा त्या बोटावर ठेवून म्हणाले, “त्या सदरेवरचे डोळ्यांना काहीच दिसत नाही, तरी तुम्ही जाणता, आम्ही जाणतो तिथे मासाहेब आत्ता उभ्या आहेत. का? श्रद्धा म्हणून. मासाहेबही सुमार झालेल्या डोळ्यांनीसुद्धा स्पष्ट बघत असतील तुम्हा-आम्हाला तेथून. का? माया आहे म्हणून. हे ध्यानी ठेवा. माणसं श्रद्धा आणि मायेपोटीच एकमेकांस जान लावून असतात. प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात.”

ते धारेसारखे बोल संभाजीराजे ऐकत राहिले. त्यांना वाटले कोसळत्या आकाशासारखे हे बोल अखंड वर्षतच राहावेत.

“आमचं चुकलं. इथून जाताच आम्ही अण्णाजींची गाठी घेऊ. त्यांची क्षमा मागू.” संभाजीराजांचे उभारीचे मन राजांच्यासाठी आदराने भरून आले होते.

“नको. ती दुसरी चूक होईल! तुम्ही युवराज आहात!” राजे गडबडीने म्हणाले.

“ध्यानी ठेवा. राजांना चूक करता येत नाही! आणि केल्या चुकीला सफाईही देता येत नाही! चला. पाचाडात उतरण्याच्या तयारीला लागा.” राजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. जिजाऊंच्या दर्शनासाठी पडत्या पावसातून संभाजीराजे पाचाडात उतरले होते.

क्रमशः छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७९.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment